मरिअम, चेन्नईतील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री. विवाह झालेला. एक गृहिणी म्हणून ती वावरत होती. दोन मुलांची आई होती. स्वत: पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली. स्वत:च्या संसारात आनंदाने रममाण झाली होती. एके दिवशी तिच्या बहिणीने तिला सांगितलं, ‘मी तुझ्या कॉलेजमधल्या उषा नावाच्या मत्रिणीला पाहिलं. ती मत्रीण रस्त्यावरून अस्ताव्यस्त अवस्थेत फिरत होती. ओरडत होती, विचित्र पद्धतीने हसत होती. अगदी गलिच्छ अवस्थेत आहे ती. कदाचित अनेक दिवस आंघोळही केली नसावी. मला तिची अवस्था बघवलीच नाही. तिला हाक मारली तरी तिचं लक्ष नव्हतं. किती छान होती ती कॉलेजमध्ये तुम्ही असताना. आपल्या घरी यायची, तुमच्या तासन्तास गप्पा रंगायच्या.. मला सगळे आठवले आणि खूप वाईट वाटले. कशी गं अशी अवस्था झाली तिची?’ मरिअमची बहीण तिला सांगत होती.
ते सर्व ऐकताना मग मरिअमला आठवले की, कॉलेजच्या शेवटच्या एक-दोन वर्षांपासूनच तिला मानसिक आजार सुरू झाला होता, चेन्नईमधल्याच स्किझोफ्रेनिया रिसर्च फाऊंडेशन (रउअफा) या संस्थेत तिच्या वडिलांनी तिच्यावर उपचार सुरू केले होते. त्या अवस्थेतही उषाने तिचे शिक्षण पूर्ण केले होते. म्हणून मग मरिअमने तिला भेटायचे ठरवले.
मरिअम जेव्हा तिच्या घरी गेली, तेव्हा उषाचं घर सताड उघडे होते. घराची अवस्था अगदीच वाईट होती. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता कळले की, तिचे वडील मध्यंतरी निधन पावल्यावर तिला बघायला कुणीच आले नाही आणि ती अशीच फिरत बसते. अनेक दिवस उलटले, ती घरी आलेलीच नाही. तिला सख्खे कुणी नव्हते. पण इतर नातलगही कोणी बघायलाही येत नाहीत. आता ती कुठे आहे, काहीच माहीत नाही. म्हणून मग मरिअमने रउअफा संस्थेत चौकशी केली असता कळले की, ती अनेक वर्षांपासून उपचारांसाठी आलेलीच नाही. मग मरिअमने पोलीस वगरेंमार्फत तिचा तपास केला असता एका अनाथाश्रमात ती असल्याचे कळले. मरिअम तिला बघायला गेली तेव्हा तिची अवस्था अगदी वाईट होती. तरीही तिने मरिअमला ओळखले. मरिअमचा हात तिने हातात घेतला. मरिअमला जाणवले की, तिला मायेची, समजूतदार मायेची गरज आहे.
मग तिने नवऱ्याशी चर्चा करून ठरवले की, तिला आपल्या घरी आणायचे. त्यासाठी कोर्टात जाऊन सर्व सोपस्कार काही महिन्यांत पूर्ण केले व तिचा ताबा मिळवला. तिला आपल्या घरी आणले. सुरुवातीला तिच्या काही नातेवाइकांनी नावे ठेवली, पण तिचा नवरा तिच्या पाठीशी ठाम उभा राहिला. मरिअमने उषाला आपल्या बहिणीप्रमाणेच वागवले. तिला प्रथम रउअफामध्ये पुन्हा नियमित उपचार सुरू केले, जे आजही सुरूच आहेत. उषाला आज घरात स्वतंत्र बेडरूम आहे, ज्यात तिला स्वतंत्र टीव्ही वगरेही आहे. ती मरिअमच्या मुलांना इंग्लिश शिकवते. मरिअम त्यांच्या दोघींच्या कॉलेजच्या मत्रिणींना बोलावून गेट-टुगेदर करते. मरिअमचा नवरा, मुलेही तिच्या उपचारांबद्दल जागरूक असतात. तिची काळजी घेतात. सर्व एकत्र जेवायला जातात, असे अगदी नॉर्मल आयुष्य सुरू आहे.
अलीकडेच ठाण्याच्या आयपीएच संस्थेतर्फे मरिअमच्या या परिश्रमगाथेचा  ‘द्विज पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. ‘द्वि जायते इति द्विज’ अशा मानसिक आजाराशी झगडणाऱ्या, तसेच त्यांना झगडण्यात बळ देणाऱ्या शुभार्थी व शुभंकरांचा ‘द्विज पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात येतो. मरिअमसारख्या आणखीही काही परिश्रमगाथा होत्या. परंतु, मरिअमचे वेगळेपण हे की, कोणतेही रक्ताचे नाते नसताना, केवळ कॉलेजमधली जवळची मत्रीण एवढेच पूर्वाश्रमीचे नाते असतानाही तिने कोर्टबाजी करून तिचा ‘स्वीकार’ केला. तिनेच नव्हे तर तिच्या कुटुंबाने तिचा स्वीकार केला. तिला घरातील एक सदस्यत्व दिले आणि तिचे आयुष्य पूर्वपदावर आणले. यात संपूर्णपणे मानवतेचा व विज्ञानाचा दृष्टिकोनच मरिअमच्या मनात होता. त्या मानवतावादी, वैज्ञानिक विवेकी दृष्टिकोनाचा तो सत्कार होता. तो सत्कार मानसिक आरोग्यासाठीच्या (ज्यात आजाराची लक्षणे बरी होण्यापासून पुनर्वकिासाकडे प्रवास अपेक्षित आहे.) मरिअमने घेतलेल्या अथक प्रयत्नांचा सत्कार होता आणि म्हणूनच माझ्या मनाला तो जास्तच भावला. इतर सत्कारमूर्तीच्याही अशाच परिश्रमगाथा होत्या, हे नक्की. त्यांचेही महत्त्व कमी लेखून चालणार नाहीच.
परंतु, स्किझोफ्रेनियासारख्या आजारात त्या शुभार्थीचा आजाराबद्दलचा स्वीकार हा सुरुवातीला नसतोच, कारण त्यांचे वास्तवाचे भानच कमी      झालेले असते.
परंतु, त्यांच्या केअरगिव्हर/ नातलगांकडूनही हा ‘स्वीकार’ जिथे फार उशिरा होत असतो, तिथे मरिअमने अनाथ झालेल्या त्यात स्किझोफ्रेनिया झालेल्या मत्रिणीसाठी कोर्टात लढून तिला स्वीकारले. एवढेच नव्हे तर आपल्या सख्ख्या बहिणीचे स्थान तिला आयुष्यात दिले व तिचा विकास केला. हे जे ‘आजारासकट’ ‘स्वीकारणे’ आहे, हे एखादे शिवधनुष्य पेलून दाखवण्यासारखे आहे, असे मला वाटते आणि म्हणूनच तिच्या योगदानाचे मोल कांकणभर जास्त वाटले. या सर्व परिश्रमगाथांतून समाजाला विवेकाची मोठी देणगी दिली आहे. या आजाराला, जो सर्वाना होण्याची शक्यता एक ते दोन टक्के आहे, त्याला त्यांच्या दीर्घकालीन वैशिष्टय़ांसह स्वीकारणे फार महत्त्वाचे आहे. हा आजार मेंदूमधील जीवरसायनांच्या असमतोलामुळे होतो, (जसा मधुमेह इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होतो.) या वास्तवासकट स्वीकारायला हवा. मध्येच तो वाढू शकतो. आपल्याला सतत ‘जागत्याची’ भूमिका घ्यायची आहे, हा विवेकी विचार करणे आवश्यक आहे.
‘माझ्याच मुलाला का? हे असेच चालू राहणार का? कधी हा व्यवस्थित होणार?’ असे अविवेकी विचार त्रागा, वैफल्य, नराश्य वाढीला लावतात. तसेच शुभार्थीमध्ये होणारे चांगले बदल टिपत राहिले तर मन अधिकाधिक शांत राहू शकते. आपली कुबडी देण्याऐवजी पंखात बळ भरायचे आहे त्यांचे ‘फिनिक्स’ करायला! रक्ताचे नाते नसताना, स्वीकार केला नसता तसेच एखाद्या आश्रमात ठेवून उपचार केले व मोठे कार्य केले, असे मरिअमने दाखवले तरी चालणारे होते. पण तिने केलेले कार्य तिचा विवेकी दृष्टिकोन दाखवून देतो. अशा कितीतरी मरिअम समाजात नक्की असतील, त्यांना यातून बळच मिळेल यात शंका नाही. परंतु, जे आपल्या शुभार्थीला अजूनही तिरस्काराने, त्राग्याने बघताना, लांब ठेवून जबाबदारी झटकू पाहतात त्या सर्व शुभंकरांच्या डोळ्यातही अंजन घालणारे हे उदाहरण आहे.
शरीराचा आजार जसा आपण सहज स्वीकारतो तसाच मनाचाही आजार स्वीकारला तर शुभार्थीला/ रुग्णाला लवकर विकासाकडे नेता येते. मन हा मेंदूचा भाग असतो. त्यातील जीव-रसायनांच्या असमतोलामुळे मानसिक आजार होतात, हा विवेकी वैज्ञानिक दृष्टिकोन आपण स्वीकारायला हवा. शरीराचे आजार स्वीकारून रुग्णाची सेवा केली, मदत केली तर त्या रुग्णाची प्रगती होते. तीच गोष्ट मनाच्या आजाराबाबतही लागू होते. हा संदेश या उदाहरणातून मिळतो. मरिअम व इतर अशा सर्व परिश्रमगाथा म्हणूनच दीपस्तंभासारख्या दिशादर्शक आहेत.
ज्येष्ठ तत्त्वज्ञ द व्हाइस रॉ यांनी म्हटले आहे, ‘कोणत्याही समस्येचे जर कधी उत्तर सापडले असेल तर ते कोणीतरी त्या समस्येचं अस्तित्व मान्य करण्याची तयारी दाखवली म्हणून. सगळ्याची सुरुवात वस्तुस्थितीला सामोरे जाण्यापासूनच होते. ज्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत आलात त्यांना तुम्ही ओळख दिलीत तर तुम्ही प्रथमच आयुष्याच्या नजरेला थेट नजर भिडवत असता. तुमच्या आमच्यासाठी पलायनवाद (अंधश्रद्धा वगरे) उपयोगाचा नाही. ज्या गोष्टीला तोंड द्यावे लागते, तिला तोंड द्यावेच लागते, लवकरात लवकर!’
माझ्या मते, हे सगळे दीपस्तंभ आपणा सर्वाना मानसिक आरोग्याविषयीची ‘स्वीकाराची’ दिशा व त्यातूनच विकासाचा मार्ग दाखवत आहेत.