कोंबडा आरवल्याचा टिंकल मेंदूत झाला तसा अंगाला आळोखेपिळोखे देत एच-१२६ए@ उठला. स्लीपिंग बॅगच्या प्रोगॅ्रममध्ये सात वाजले होते, त्यामुळे तिचीही लगेच घडी झाली.
‘‘चला उठा हृषी, दिवस सुरू झाला.’’ त्याने स्वत:लाच सांगितले. गेली १५-२० वर्षे ही एक सवय त्याने lok02जाणीवपूर्वक लावून घेतली होती. रात्री झोपताना आणि उठल्यावर तो स्वत:लाच हाक मारायचा. आपले स्वत:चे नाव विसरायला नको म्हणून!
६०-७० वर्षांपूर्वी अगदी कौतुकाने हे नाव ठेवले होते आणि त्यालाही त्या काळी ते आवडायचे; पण नवीन काळात अशा नावांमुळे जगाची व्यवस्था चालायला बऱ्याच अडचणी यायला लागल्या, म्हणून नावांची नवीन नंबरिंग पद्धत रूढ झाली. त्यात पहिले डिजिट मानवाचे वंश दाखविणारे. कॉकेशिअन, मंगोलिअन आणि निग्रोइड यांना अनुक्रमे १, २, ३. दुसरे डिजिट पुरुष अथवा स्त्री या लिंगासाठी. तिसऱ्या आणि चौथ्या डिजिटमध्ये त्या मानवाची संपूर्ण बायोमेट्रिक माहिती आणि शेवटच्या स्पेशल कॅरॅक्टरसाठी मात्र तुम्हाला निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य! या नवीन नामकरणविधीमुळे त्याच्या लहानपणीच्या जातपात आणि धर्माच्या सगळय़ा समस्या संपल्या होत्या. या नवीन नावात जातीधर्माचा कुठलाही उद्बोध व्हायचा नाही. या नवीन नावांचा व्यवस्था चालवण्यासाठी फायदा असला तरी तो स्वत: जुनाट विचारांचा असल्यामुळे त्याला त्याच्या काळातले नावातले वैविध्यच आवडायचे.
‘‘हे काय एच-१२६ए@, छय़ा!’’ तो
स्वत:शीच म्हणाला.
त्याला त्याच्या लहानपणाचे जोशीकाका आठवले, आडनाव विचारून जात ओळखणारे. यामुळे समोरच्याशी बोलताना योग्य विषयावर आणि समोरच्यांच्या भावना न दुखावता बोलता येते, अशी काकांची थिअरी. तो हसला मनाशीच, त्या
जुन्या आठवणीने.
किचनमध्ये जाऊन त्याने किचनकट्टय़ावरच्या स्क्रीनवर उजवा हात ठेवला. तीन सेकंदांत त्याच्या मेंदूतील गंध आणि स्वाद ओळखणाऱ्या पेशी उद्दीपित झाल्या. कॉफी, आम्लेटचा वास आणि चव मेंदूत रेंगाळली. lr11स्क्रीनच्या मेम्ब्रेनमधून गरजेपुरते प्रोटीन, व्हिटामिन वगैरे शरीरात शिरले आणि शारीरिक गरज भागली. पोट भरल्याचा सिग्नल मेंदूकडे पोहोचला आणि त्याने हात काढून घेतला.
या नवीन व्यवस्थेमुळे प्रातर्विधीची फारशी गरज पडायची नाही. इनटेकच नसल्यामुळे दात घासणे, शौचाला जाणे या फार कधी तरी करण्याच्या गोष्टी उरल्या होत्या. बबल शॉवरमध्ये जाऊन तो मानसिक समाधानासाठी स्वच्छ होऊन आला आणि आपल्या व्हच्र्युअल ऑफिसमध्ये शिरला. सन २०१० च्या पूर्वार्धात या अशा व्हच्र्युअल गोष्टींमुळे तो अगदी वेडा झाला होता. तो कॉलेजमध्ये असताना व्हच्र्युअल साइट्सनी ताबा घेतला होता त्याच्या सगळय़ा पिढीचा. २४ तास ते आभासी जग. अर्थात काही खरेखुरे मित्रही होते ग्रुपमध्ये; पण बहुतेक सगळे कमओळखीचे. (अगदीच अनोळखी नाहीत, म्हणून कमओळखीचे. मित्राचे मित्र वगैरे!)
मोबाइल आणि कॉम्प्युटर म्हणून काहीबाही यंत्र वापरायची त्याच्या वेळची पिढी. त्या यंत्राच्या स्क्रीनकडे बघत कुठल्या तरी आभासी जगात यायला
आवडायचे सगळय़ांना.
याचे आईवडील होते आधीच्या पिढीचे. ते सारखे कानीकपाळी ओरडत असत याच्या.
‘‘अरे, जरा बाहेरची हवा लागू द्या तुम्हा मुलांना, हाडामांसाच्या माणसांना भेटा. ती जवळीक तुमच्या नात्याला एक उबदारपणा देईल.’’ पण अजिबात पटायचं नाही तेव्हा. त्यालाच असे नाही, त्याच्या वेळेच्या बहुतेकांना आणि आज व्हच्र्युअल ऑफिसमध्ये शिरताना, त्याला तो नात्यांचा उबदारपणा हवाहवासा वाटत होता; पण सगळेच बदलून गेले होते.
ऑफिसमध्ये शिरून समोरच्या स्पेशल व्हीस्कस एअर कर्टनवर त्याने बोटाने ३०x३० ची एक फ्रेम तयार केली. त्यात एक लेआऊट बनवून, रोबोंना जरूर त्या आज्ञा दिल्या आणि त्याचे दिवसाचे काम संपले.
आता दिवसभर काय करायचे, हा प्रश्न मात्र त्याला पडला नाही!
‘‘ते तरी एक बरे झाले.’’ शास्त्रज्ञांना धन्यवाद देत तो मनाशी म्हणाला.
सन २०४० च्या पूर्वार्धात शास्त्रज्ञांनी कंटाळय़ाच्या भावनांचे रसायन निर्माण करणाऱ्या ग्रंथी शोधून काढल्या होत्या. त्या हायबरनेट केल्या, की माणूस निर्विकार बसून राहू शकत असे, कितीही काळ आणि अर्थातच कंटाळा न येता! हा विशेष शोध शास्त्रज्ञांनी लावला, कारण आधीच्या काळात मानवाने नैसर्गिक स्रोतांची अमाप उधळण केली होती. या नवीन शोधामुळे माणसाला कंटाळा घालवण्यासाठी ना कुठे बाहेर जायची गरज पडत होती, ना काही चंगळवादी मटेरियलची. त्यामुळे नैसर्गिक साधनांची गरज आपोआपच कमी झाली होती.
‘‘अर्थात शास्त्रज्ञांचेपण अंदाज आणि प्रयोग चुकतात कधीकधी.’’ तो मनात जुनी आठवण जागवत म्हणाला. तो कॉलेजमध्ये असताना, लोकसंख्येचा विस्फोट वगैरे शब्द जोरात होते. नैसर्गिक स्रोत संपल्यामुळे जगाचा नाश कसा होईल याचे अंदाज बांधण्याची अहमहमिका लागायची; पण २०३० च्या मध्यावर काय झाले कुणास ठाऊक आणि मानवजातीचा वंशवृद्धी दर एकदम घसरला. विस्फोट तर राहूच दे, पण मानवजातीचा र्निवश वगैरे होतो की काय अशी भीती निर्माण झाली. मग शास्त्रज्ञांनी कंबर कसली. आहे ती मानव जमात आणि त्यांची संख्या तरी जपायची. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल असा निर्णय झाला जागतिक अ‍ॅपेक कमिटीत.
नवीन पद्धतीत शास्त्रज्ञांनी मानवाला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. ही व्यवस्था त्यांना सुरक्षित वाटली. या योजनेत, एखाद्या मानवाला काही प्रॉब्लेम असेल, तर तो त्या मानवापुरताच मर्यादित राहील आणि बाकीचे सुरक्षित राहतील अशी विचारसरणी त्या योजनेच्या मागे होती. त्यामुळे कुटुंबपद्धती कालबाहय़ झाली.
शास्त्रज्ञांनी मेंदूचे प्रोग्रॅमिंग करायला सुरुवात केली होती. नवीन प्रयोगशाळेत जन्म घेणाऱ्या मानवाचा प्रश्न नव्हता, कारण तो प्रोग्रॅम फीड होऊनच बाहेर पडत होता; पण जुन्या मानवासाठी शास्त्रज्ञांनी स्मृती घालवून टाकण्याचा पर्याय उपलब्ध केला होता. त्याच्या काळातील उरल्यासुरल्या बऱ्याच जणांनी तो पर्याय निवडला होता. ‘जुन्या स्मृतीमुळे स्वत:लाच त्रास होतो,’ असे काही तरी विचार होते त्यांचे. त्याने मात्र तो पर्याय निवडला नाही. जुन्या आठवणीत रमणे हा एकच विरंगुळा होता त्याचा आणि त्याला तो विरंगुळा आवडतही होता.
अशाच काहीबाही जुन्या नव्या विचारांत तो आत गेला. कपाटाच्या आतल्या कप्प्यातून त्याने एक जुनाट यंत्र बाहेर काढले. त्यावर काही अक्षरे आणि आकडे होते. यंत्राच्या वरच्या बाजूला ‘नोकिया’ का असेच काही तरी पुसट दिसत होते. २००० च्या दशकात वडिलांकडून त्याला बक्षीस मिळालेली वस्तू, त्या काळचा निरोप्या.
‘‘याच्यापासूनच सुरुवात झाली बहुतेक.’’ तो मनाशीच म्हणाला. ‘‘याच्यामुळेच हळूहळू प्रत्यक्ष भेटणे आणि बोलणे कमी झाले का?’’ त्याला नक्की काही आठवेना. राग येत होता तरीही त्याने ती वस्तू घट्ट धरून ठेवली, कारण जुन्या काळाशी जोडणारा तो एकमेव दुवा होता त्याच्याकडे.
तो एकमेवच दुवा नाही म्हणा! त्याच्या मेंदूत बहुधा अजूनही काही जुने बग्ज होते. (त्याने मुद्दामच ते सायन्स कमिटीकडे रिपोर्ट केले नव्हते.) कारण ते बग्ज त्याला हवेहवेसे वाटत होते. त्यातलाच एक बग अ‍ॅक्टिवेट झाला होता आत्ता. त्याच्या आजी-आजोबांच्या वेळेस एक कोणी तरी मदन का मोहन म्हणून वेडा संगीतकार होता. त्याचे गाणे त्या बग्जमुळे मेंदूतल्या श्रवणग्रंथींना जाणवू लागले. ‘ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नही-’
त्याच गाण्याच्या धुंदीत त्याने नोकियावरची बटणे दाबायला सुरुवात केली. टाइप केले. ‘‘मला बोलायचेय तुझ्याशी थोडे, भेटू या का?’’ पण ना ते यंत्र चालू झाले, ना स्क्रीनवर काही उमटले.
अर्थात यंत्र सुरू झाले असते तरी आपण हे लिहिले असते कोणासाठी आणि पाठवायचे कोणाला ते तरी त्याला कुठे माहीत होते!
मग तो तसाच नुसताच त्या यंत्राकडे बघत उभा राहिला.