सॉमरसेट मॉम हा महान फ्रेंच लेखक. पहिल्या महायुद्धानंतर त्यानं प्रामुख्यानं कथालेखन केलं. डॉक्टर असलेल्या मॉमने वैद्यकीय व्यवसाय केला नाही. पहिल्या जागतिक महायुद्धात तो रेड क्रॉसच्या हेर खात्यात नोकरीला लागला. युद्धकाळात त्यानं भरपूर प्रवास केला. युद्ध संपल्यावर १९२० नंतर तो फ्रान्सला परतला आणि उर्वरित आयुष्य त्यानं तिथेच घालवलं. मॉमचा अठरा कथांचा मराठी अनुवाद व्यवसायानं अभियंते असलेल्या सदानंद जोशी यांनी केला. या अठरा कथा ‘द हॅपी मॅन’ आणि ‘कर्नल्स वाइफ’ या दोन पुस्तकांत समाविष्ट आहेत. तांत्रिकदृष्टय़ा ही दोन पुस्तकं वेगळी असली तरी त्यांचा एकत्रित विचार करायला हवा. सगळ्यात ठळक गोष्ट जाणवते म्हणजे या कथांमधील आशयसूत्र. दोन-तीन कथांचा अपवाद वगळता सर्वच कथा या स्त्री-पुरुष संबंधांभोवती गुंफलेल्या आहेत. मागच्या शतकांतील युरोपातील वातावरण, भव्य बंगले, नोकर-चाकर, प्रौढ स्त्री-पुरुषांच्या नियमित होणाऱ्या पाटर्य़ा, त्यांचे कपडेलत्ते या सगळ्यांची विस्तृत आणि बारकाईने वर्णनं मॉमने या सर्व कथांमधून केलेली आहेत. समाजातील प्रौढ राजकीय वजन असलेला पुरुष व कमी वयाची तरुण सुंदर सामान्य परिस्थितीतील स्त्री (अ‍ॅपिअरन्स अँड रिअ‍ॅलिटी), सामान्य कलाकार असलेल्या नवऱ्यासोबत राहणारी, पण मनानं एका प्रतिभावंताच्या प्रेमात बुडालेली स्त्री (द सोशल सेन्स) केवळ नोकरी मिळावी म्हणून पन्नाशीत लग्न करणारा पुरुष व अपंग आईची सेवा करत करत अविवाहित राहिलेली स्त्री (द मॅरेज ऑफ कन्व्हिनिअन्स) प्रतिष्ठित पुरुष व त्यानं दुर्लक्षित ठेवलेली, काहीशी उपेक्षित राहिलेली त्याची प्रतिभावंत कवयित्री बायको (कर्नल्स वाइफ), मरण पावलेल्या मित्राच्या आठवणीत सैरभैर होऊन पत्नीचा संशयावरून खून करणारा कैदी (अ मॅन वुइथ कॉन्शिअस), प्रेमाच्या त्रिकोणात पुरुषाचा झुरून मृत्यू, प्रियकर दूर निघून गेलेला आणि एकटी उरलेली स्त्री (व्हर्च्यू), तरुणाच्या प्रेमात पडणारी सामान्य वयस्क स्त्री काही काळानं त्यालाही सोडून दुसऱ्या प्रौढ पुरुषासोबत लग्न करते (जेन) अशी कितीतरी रूपं मॉमने रंगवलेली आहेत. स्त्री-पुरुष संबंधांचा, या आदिम नात्याचा वेध घेताना भोवतालचे मोजके सोयीस्कर तपशील तो घेतो. इतर बऱ्याच गोष्टी त्यानं टाळल्या आहेत. कुठल्याच कथांमध्ये लहान मुलं येत नाहीत. अगदी अपवाद म्हणून सावत्र मुलांसोबत राहणारी आणि त्यांचा अभिमान असणारी स्त्री (इन अ स्ट्रेंज लँड) आढळते. शिवाय नोकरचाकर, नातेवाईक असेही फारसे कुठेच येत नाहीत. एकतर त्याची आवश्यकता मॉमला वाटत नाही किंवा सगळं लक्ष स्त्री-पुरुष संबंधांवरच एकाग्र केल्यानं त्याला इतर काही दिसतही नाही. सगळ्या कथांचे निवेदन एकवचनी प्रथमपुरुषी ‘मी’नेच केलेले आहे. कदाचित त्या काळातील ही शैली म्हणूनही मॉमला वापरावी वाटली असेल.
यात दोन कथा मात्र सणसणीत अपवाद आहेत. त्यांचा विचार स्वतंत्रपणेच करावा लागेल. पहिली आहे, ‘फॉल ऑफ एडवर्ड बर्नार्ड.’ इझाबेल, बेरमन आणि एडवर्ड असा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. दोन्ही मित्रांचे इझाबेलवर प्रेम आहे. एडवर्ड आणि तिचा साखरपुडाही झाला आहे. एडवर्डच्या वडिलांना आर्थिक अरिष्टाला सामोरे जावे लागते. अपरिहार्यतेतून एडवर्ड शिकागो सोडून दूरवरच्या ताहिती बेटांवर कामधंद्याच्या शोधात जावे लागते. त्याची नियमित पत्रे इझाबेलला येत राहतात. पण हळूहळू त्या पत्रांमधून एडवर्ड शिकागोला परत न येण्याचा सूर उमटत राहतो. शेवटी बेरमन एडवर्डचा शोध घेत प्रत्यक्ष त्या बेटांवर पोचतो. एडवर्ड त्या शांत बेटावर निसर्गरम्य वातावरणात रमून गेलेला असतो. त्याच्या मनातून शिकागोच्या गर्दीची, जिवघेण्या स्पर्धेची, चकाचक आयुष्याची ओढच नाहीशी झालेली असते. त्याच्या मनात परतण्याची शक्यताच संपून जाते. गुन्हेगार ठरवलेला शिक्षा भोगून त्या बेटावर गेलेला इझाबेलचा मामा एडवर्डला आसरा देतो. शिवाय जवळचा दुसऱ्या बेटांवर त्याला व्यवसाय उभारण्याची, आपल्या मुलीशी लग्न करण्याची ऑफरही देतो. या कथेत सॉमरसेट मॉमने निसर्गाच्या वर्णनाचा एक सुंदर उतारा दिला आहे. या कथेचा आवाका खरे तर एका कादंबरीचा आहे. मॉमने याची कथा का केली कळत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची व्यवस्थाच बदलली. व्यापार, जीवघेणी स्पर्धा, पैशाला अतोनात महत्त्व, महत्त्वाकांक्षेपोटी आलेली भयानक गती हे सगळे सहन न होऊन शांत निसर्गात किमान गरजांसह समाधानानं राहण्याची ओढ माणसाच्या मनात जास्तच निर्माण झाली. हे सगळं मॉमने फार लवकर ओळखलं व शब्दांत चितारलं.
दुसरी कथा आहे, ‘द व्हर्जर’ नावाची. अल्बर्ट हा चर्चमध्ये फारमन म्हणून काम करणारा सामान्य नोकर. आतापर्यंत त्याने त्याचे काम अतिशय नेकीने केले. तो आयुष्याच्या उतरणीला लागलाय. नवीन आलेला पाद्री त्याच्या निरक्षरतेवर आक्षेप घेतो. लिहिणं, वाचणं शिकला नाहीस तर तुला नोकरीला मुकावे लागेल असे सांगतो. आल्बर्ट विलक्षण अस्वस्थ होतो. या उतारवयात आता साक्षर होणे शक्य नाही. आणि चर्चचे पवित्र काम सोडून दुसरे कुठलेही काम कसे करणार? ते हलकेच आहे असं लोक म्हणणार ना. विचारात रस्त्यानं चालताना त्याला सिगारेट ओढायची तल्लफ येते. एरव्ही तो काही नियमित सिगारेट ओढत नसतो. अस्वस्थ मनाने त्याला सिगारेटची आठवण येते. बरेच चालले तरी सिगारेटची टपरी सापडत नाही. अचानक त्याच्या मनात कल्पना येते- आपण एखादी टपरी का टाकू नये? खरेच मग तो सिगारेटचे छोटे दुकान टाकतो. त्याला प्रतिसाद मिळून दुसरे दुकान टाकावे लागते. मग तो हाताशी माणूस ठेवतो. असा त्याचा व्यवसाय बराच वाढतो. तो नियमित बँकेत पैसे भरत जातो. काही वर्षांनी त्याला बँकेचा मॅनेजर म्हणतो, ‘तुम्ही नुसते बचत खात्यात पैसे गुंतवू नका. शेअर्समध्ये गुंतवा.’ आल्बर्ट म्हणतो, ‘मला त्यातलं काही कळत नाही.’ मॅनेजर म्हणतो, ‘मी कागदपत्र आणून ठेवतो. तुम्ही फक्त सह्या करा.’ हा म्हणतो, ‘मला वाचता येत नाही. जेमतेम मी माझी सही करू शकतो.’ बँकेचा मॅनेजर आश्चर्यचकितच होतो. तो म्हणतो, ‘अहो, तुम्हाला लिहिता-वाचता आले असते तर हाच व्यवसाय किती वाढवता आला असता.’ आल्बर्टच्या तोंडी सॉमरसेट मॉमने दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. ‘मी शिकलो असतो तर चर्चमध्येच नोकरी करत राहिलो असतो.’ दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर औपचारिक शिक्षणाची कागदोपत्री पदव्या मिळविण्याची मोठी लाटच आली. १९९० च्या जागतिकीकरणानंतर संपर्क क्रांतीनंतर यातील फोलपणा सगळ्यांच्याच लक्षात येत चालला आहे. हे सगळे शंभर वर्षांपूर्वीच मॉमने जाणले हे विलक्षणच म्हटले पाहिजे.
या दोन्ही पुस्तकांतील अनुवादाची भाषा प्रवाही आणि मूळ कथाविषयाला न्याय देणारी उतरली आहे. एडवर्डच्या कथेत पंचे गुंडाळून दोघे तळ्याच्या पाण्यात उतरतात, या वाक्यात टॉवेलला ‘पंचा’ हा नेमका शब्द वापरून एडवर्डची खेडं आवडणारी मानसिकता सदानंद जोशी यांनी चांगली पकडली आहे.
कर्नल्स वाइफ आणि इतर कथा- सॉमरसेट मॉम.
अनुवाद : सदानंद जोशी
पृष्ठे- १५२, किंमत- १६०/-
‘द हॅपी मॅन आणि इतर कथा’
सॉमरसेट मॉम. अनुवाद : सदानंद जोशी
पृष्ठे- १५२, किंमत- १६०/-
पद्मगंधा प्रकाशन ल्ल

 

Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान