समाजभाषेची जडणघडण ही सामाजिक संकेतांवर आधारलेली असते. कोणत्या व्यक्तीसाठी कोणता शब्दप्रयोग करावा याचेही काही सामाजिक संकेत ठरलेले असतात. कोरकू लोक शहरातील सुटाबुटातल्या सुशिक्षित माणसासाठी ‘जांगडी’ हा शब्द वापरतात. हे लोक मोठय़ा अभिमानाने स्वत:स ‘कोरो’ (माणूस) असे संबोधतात. त्यामागे  श्रेष्ठत्वाचा भाव आहे.

महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या ४७ आदिवासी जमातींपैकी कोरकू ही एक प्रमुख जमात आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्य़ाच्या धारणी व चिखलदरा या तालुक्यांमध्ये बहुसंख्य प्रमाणात कोरकूंची वस्ती आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील पूर्व निमाड (खांडवा), बैतूल, हौशंगाबाद आणि िछदवाडा या जिल्ह्य़ांमध्ये कोरकू राहतात. निसर्गावर प्रेम करणारी ही जमात अतिशय साधीभोळी आहे. वांशिकदृष्टय़ा कोरकू ही बिहारमधील मुंडा या आदिवासी परिवाराशी संबंधित आहे. ‘आस्ट्रो- एशियाटिक’ या भाषाकुलांतर्गत येणाऱ्या मुंडा किंवा कोल या भाषेच्या बोलींमध्ये कोरकू बोलीचा समावेश होतो. कोरकू या शब्दात ‘कोरो’ व ‘कू’ अशी दोन पदे आहेत. पैकी ‘कोरो’ या पदाने ‘माणूस’ या अर्थाचा निर्देश होतो, तर ‘कू’ या बहुवचनी प्रत्ययाने ‘माणसे’ असे त्याचे बहुवचनी रूप सिद्ध होते.
कोरकू समाजात व्यक्तिवाचक विशेषनामांचे वैविध्यपूर्ण प्रयोगातील सामाजिक संदर्भ निरनिराळे आहेत. त्यांच्यात नवजात बालकाचा नामकरण विधी सामान्यत: दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी किंवा छटीपूजनाच्या दिवशी संपन्न होतो. कोरकूंची आपल्या पूर्वजांवर नितांत श्रद्धा असल्याने बालकाच्या रूप व स्वभाववैशिष्टय़ांचे साम्य ज्या पूर्वजाशी मिळतेजुळते असेल त्या पूर्वजाचे नाव त्यास ठेवले जाते. ज्या दिवशी बालकाचा जन्म झाला त्या दिवसाच्या नावाचे संक्षिप्त रूप करून नवजात बालकाचे नाव ठेवले जाते. उदा. सोमवार- सोमा, सोमी, समोनी, सोमय; मंगळवार- मंगल, मंगली; बुधवार- बुधू, बुद्ध, बुधाट, इत्यादी. वस्तू, प्राणी, झाड, गोत्र यावरूनही विशेषनामे ठेवली जातात. उदा. सोना, मोती, हिरा, रतूनाय, कुला, सोनाय, तोटा, साकोम, जांबू, रूमा.
कोरकू समाजात सर्वाधिक लाडिक, प्रेमळ नाव म्हणून ‘बुडा, बोको, भुलय, फुला’ या विशेषनामांचा वापर केला जातो. कोरकूबहुल बहुतांशी गावांची नावे निसर्गाशी संबंधित आहेत. उदा. प्राण्यांशी संबंधित- चिलाटी (साप), नागापूर (साप), हत्तीघाट (हत्ती), बारलिंगा (बारसिंगा), मोरगड (मोर), काटकुंभ (खेकडा), बिच्चूखेडा (विंचू).
मेळघाटातून गडगा व सिपना या दोन प्रमुख नद्या वाहतात. कोरकू बोलीतील ‘गाडा’ (नदी) या शब्दावरून ‘गाडगा’ हे विशेषनाम प्रचलित झाले असावे. सिपना म्हणजे सागवृक्ष. सागाच्या जंगलातून वाहणारी नदी म्हणजे ‘सिपनी’ असा प्राकृतिक संदर्भ या विशेषनामाशी जुळलेला आहे.
कोरकू नातेवाचक शब्दांवरून त्यांची कौटुंबिक व सामाजिक घडण लक्षात येते. नातेसंबंधदर्शक शब्दांचे वैविध्यपूर्ण प्रयोग केले जातात. स्वत:च्या नात्यांचा उल्लेख करण्यासाठी एक शब्द आणि दुसऱ्याच्या नात्यांचा उल्लेख करण्यासाठी दुसरा शब्द वापरला जातो. अशी व्यवस्था क्वचितच दुसऱ्या बोलीत वा भाषेत आढळेल. त्यादृष्टीने कोरकू बोली समृद्ध व अर्थप्रवाही आहे. उदा. कोन (स्वत:चा मुलगा), कोनटे (दुसऱ्याचा मुलगा), कोनजे (स्वत:ची मुलगी), कोनजेटे (दुसऱ्याची मुलगी), गागटा (स्वत:चा पुतण्या), गागटाटे (दुसऱ्याचा पुतण्या). स्वत:च्या आई-वडिलांसाठी ‘आयोमबा’, तर दुसऱ्याच्या आई-वडिलांसाठी ‘आनटेबाटे’ असा शब्दप्रयोग केला जातो.
बहीण-भावासाठी त्यांच्या वयानुरूप किंवा कुटुंबातील स्थानानुसार स्वतंत्र शब्दप्रयोग केला जातो. उदा. बोको (लहान भाऊ), डइ (मोठा भाऊ), बोकोजे (लहान बहीण), बई (मोठी बहीण). भावाच्या मुलाला ‘कोसरेट’ आणि मुलीला ‘कोमोन’ असे म्हटले जाते. लहान भावाच्या मुलाला ‘गागटा’, तर मुलीला ‘गागटाटे’ या नावाने संबोधले जाते.
समाजभाषेची जडणघडण ही सामाजिक संकेतांवर आधारलेली असते. कोणत्या व्यक्तीसाठी कोणता शब्दप्रयोग करावा याचेही काही सामाजिक संकेत ठरलेले असतात. कोरकू लोक शहरातील सुटाबुटातल्या सुशिक्षित माणसासाठी ‘जांगडी’ या शब्दाचा प्रयोग करतात. ‘जांगडी’ या शब्दप्रयोगावरून ‘तो आपल्यापैकी नाही’ हा अर्थसंकेत तर व्यक्त होतोच; पण त्यासोबतच शिकलेल्या माणसाच्या- नागरी माणसाच्या विश्वासघातकीपणाचा भावही त्यातून व्यक्त होतो. कोरकू लोक मोठय़ा अभिमानाने स्वत:स ‘कोरो’ (माणूस) असे संबोधतात. त्यामागे अन्य जातीजमातींपेक्षा श्रेष्ठत्वाचा आणि नैतिकदृष्टय़ा उन्नत असल्याचा भाव आहे.
कोरकू भलेही गरीब व कष्टप्रद जीवन जगणारे असोत, पण त्यांच्यातली आतिथ्यशीलता वाखाणण्याजोगी आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचे ‘हेजे हेजे’ (या.. या) या शब्दप्रयोगाने अनौपचारिक स्वागत केले जाते. चहा किंवा प्रसंगी सिडू (दारू) देऊन आलेल्या पाहुण्यांचा अकृत्रिम पाहुणचार केला जातो. जेवण करताना पाहुण्यांना ‘जोजोमबा’ असे म्हणून आग्रह केला जातो.
अलीकडच्या काळात धर्मप्रसार व आधुनिकीकरणाच्या संपर्कामुळे कोरकूंच्या आगतस्वागत व अभिवादनवाचक शब्दप्रयोगांमध्ये परिवर्तन यायला लागले आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?