‘मनगंगेच्या काठावर’ हे शीर्षक वाचून हे पुस्तक नेमकं कशावरचं आहे असं वाटेल. कवितासंग्रह किंवा ललित लेखसंग्रह आहे असं वाटून जे हे पुस्तक वाचायला जातील त्यांचा भ्रमनिरास होईल आणि केवळ याच lok20कारणासाठी जे वाचणार नाहीत ते एका वेगळ्या प्रकारच्या चांगल्या पुस्तकाला मुकतील, असा घोळ या पुस्तकाच्या शीर्षकाने होऊ शकतो. पण संघर्षांच्या वणव्यात पाय रोवून उभं राहणाऱ्या व्यक्तीच्या पुस्तकाचं शीर्षक असंच अपेक्षित होतं, असं पुस्तक वाचून झाल्यावर वाटत राहतं. कदाचित असंही असेल, की इतक्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यात सबिता गोस्वामी यांच्या व्यक्तिमत्त्वाला कवितेशी जोडली जाणारी एक किनार असावी. 

प्रत्यक्षात हे पुस्तक आहे सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला धगधगता आसाम तसंच नैर्ॠत्य भारत आणि तिथला संघर्ष जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या एवढंच नाही तर ‘बीबीसी’, ‘ब्लिट्झ’, ‘द वीक’साठी तिथल्या तत्कालीन घडामोडींचं वार्ताकन केलेल्या एका पत्रकार स्त्रीचं आत्मचरित्र. 

गोस्वामी आज सत्तरीच्या पुढे आहेत. पगाराला ‘पॅकेज’ म्हणण्याच्या पद्धतीचा मागमूसदेखील नव्हता अशा काळातली म्हणजे ४०-४५ वर्षांपूर्वीची त्यांची पत्रकारिता. तीही आसाममधली. स्थानिक विरुद्ध घुसखोर या
lr11
संघर्षांत पेटलेला आसाम आणि चाळीसेक वर्षांपूर्वीचा काळ हे समीकरण लक्षात घेतलं तर एका बाईसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातल्या राज्यात पत्रकारिता करणं अजिबातच सोपं नव्हतं. उल्फा, आसाम गण परिषदेच्या चळवळी, अतिरेक्यांच्या हिंसक कारवाया या सगळ्यात आसाम पेटलेला असताना त्यांनी बातमीदारी केली. तिथल्या घटना-घडामोडींचं विश्लेषण केलं. तेही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांसाठी. समाजातल्या वरच्या थरापासून ते तळच्या थरापर्यंत सगळीकडे असलेला संपर्क आणि स्वत:च्या घरातून चालवल्या जाणाऱ्या स्थानिक नियकालिकापासून ते बीबीसी, तसंच फ्रान्समधल्या वृत्तसेवेसाठी केलेलं वार्ताकन असा त्यांच्या पत्रकारितेचा व्यापक पट या पुस्तकातून समोर येतो. वेळप्रसंगी उल्फा, आसाम गण परिषदेच्या नेत्यांना चार गोष्टी सुनावण्याचं धाडस करणाऱ्या गोस्वामी राज्य सरकारच्याही एका अर्थाने ‘हिट लिस्ट’वर होत्या. गुप्तहेर असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर पाळत ठेवली जाई. त्यांच्या भाच्याने मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोस्वामी यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. पण त्या सगळ्यातून त्या तावून- सुलाखून बाहेर पडल्या. या सगळ्या प्रक्रियेत आपल्या कामावरची त्यांची निष्ठा मात्र कायम राहिली. भारत बांगलादेशाच्या सीमेवर जाणं, दंगली घडत तिथे जाऊन दंगलग्रस्तांना भेटून त्याचं वार्ताकन करणं, सरकारी अधिकारी तसंच उल्फा बंडखोरांच्या संपर्कात राहून सतत वेगवेगळ्या बातम्या देणं यातून त्यांची बातमीदारी सतत तळपत राहिलेली दिसते. या सगळ्यातून हाताला लागतं ते एका पत्रकाराच्या प्रत्यक्ष अनुभवातून मांडलं गेलेलं आसाममधील आंदोलन. म्हणूनच देशाच्या राजकारणात आणि पत्रकारितेत रस असलेल्यांसाठी हे आत्मचरित्र म्हणजे एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.
आसाममधल्या सामाजिक आणि राजकीय वास्तवातली खदखद कमी वाटावी अशी परिस्थिती त्यांच्या घरात, वैवाहिक आयुष्यात होती. स्वत:च्या मनाने केलेला प्रेमविवाह, हुशार, पण दुभंग व्यक्तिमत्त्वाचा पती, त्याच्या स्वभावामुळे झालेली फरफट या सगळ्यामधून दोन मुलींना वाढवत केलेला संसार आणि संपूर्ण राज्यच एका झंझावातात ढवळून निघालेलं असताना केलेली पत्रकारिता हे सगळं आज वाचताना ‘युद्धस्य कथा: रम्य:’ सारखं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ती तारेवरची कसरत होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी घर चालवण्यासाठी मिळेल त्या नोकऱ्या केल्या. नवऱ्याची गोव्यातली नोकरी गेल्यावर शिक्षिकेचं काम करण्यासाठी दुर्गम भागात जाऊन राहिल्या. नवऱ्याची उधळपट्टी, त्याच्याकडून होणारी मानहानी, चारित्र्याबद्दल घेतला जाणारा संशय हे सगळं असह्य़ झाल्यावर त्यांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण त्यातून वाचल्यावर मात्र ठरवलं की आता मुलींसाठी जगायचं. मग शाळेतली नोकरी, एलआयसी एजंट असं करत करत त्या एक दिवस चक्क ‘ब्लिट्झ’ च्या वार्ताहर झाल्या. ते काम करत असतानाच त्यांना ‘बीबीसी’साठी विचारलं गेलं आणि त्यांची पत्रकारितेतली कारकीर्द बहरत गेली.
जाता जाता पुस्तकातला इंदिरा गांधींबद्दलचा एक संदर्भ. १२ एप्रिल १९८० रोजी इंदिराजी काही काळासाठी आसाममध्ये आल्या होत्या. नुकतंच त्यांना बहुमत मिळाल्याने त्या पुन्हा काँग्रेसच्या नेतेपदी आरूढ झाल्या होत्या. त्यांनी आंदोलनाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. काही आश्वासनं दिली. त्यांचे उल्लेख करून लेखिका सांगते, की १४ एप्रिलला त्या दिल्लीला परत गेल्या आणि त्यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी झाला. या उल्लेखाच्या आधी आणि नंतरही कुठेही आणीबाणीचा उल्लेख नाही. भारतीय राजकारणात सत्तरच्या दशकात आणीबाणी आणि संबंधित घडामोडींच्या उल्लेखाशिवाय पुढे जाताच येत नाही. पण आसामच्या त्या दशकातल्या घडामोडींमध्ये कुठेही आणीबाणीचा आणि त्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडींचा संदर्भही येत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण प्रत्यक्ष आसाममध्येच त्या काळात प्रचंड वेगवान घडामोडी घडत होत्या हे असलं तरी पूवरेत्तर राज्यांचं तुटलेपण हे दुसरं कारण कसं नाकारता येईल?
सविता दामले यांनी आपल्या अनुवादाने हे पुस्तक आणखी वाचनीय केलं आहे.
‘मनगंगेच्या काठावर’ – सबिता गोस्वामी, अनुवाद- सविता दामले, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २५३,
मूल्य – २५० रुपये.