lr16गेली पासष्ट वर्षे सातत्याने चालू असलेला डॉ. रा. चिं. ढेरे यांचा ज्ञानयज्ञ अजूनही धगधगत आहे. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यासारख्या ज्ञानक्षेत्रातील मातब्बर व्यक्तींच्या साक्षीने आणि आशीर्वादाने सुरू केलेला त्यांचा हा प्रवास एखाद्या व्रतस्थ संशोधकाचा आहे. अण्णा (डॉ. रा. चिं. ढेरे) एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले होते की, ‘संशोधक जी सामग्री गोळा करतो, त्यापैकी थोडीच ग्रंथरूपात येते, बहुतांशी तशीच राहते.’ त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ आता त्यांच्याच संदर्भात लक्षात येत आहे. आपल्या आयुष्यभराच्या संशोधनप्रवासात त्यांनी अनेक हस्तलिखिते, दुर्मीळ ग्रंथ, संदर्भग्रंथ जमा केले. प्रवास केला. त्यांतून त्यांचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह पन्नास हजारांच्या जवळपास झाला आहे. संशोधनासाठी जी हस्तलिखिते वा साधनसामग्री गोळा केली, त्यातून बरेच संशोधनपर ग्रंथ तयार होऊ शकतात. त्या अपेक्षेने ही सामग्री त्यांनी जपून ठेवली असणार. पण आता प्रकृतिस्वास्थ्याअभावी ते भविष्यात फार शक्य होईल असे वाटत नाही. या पाश्र्वभूमीवर त्यांनी पूर्वी लिहिलेल्या काही लेखांचे पुनव्र्यवस्थापन करून तीन नवीन पुस्तके डॉ. ढेरे यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवशी पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.
या तीन पुस्तकांपैकी ‘श्रीपर्वताच्या छायेत’ या ग्रंथात शिवोपासनेविषयीचे लेखन एकत्र गठित केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर शिवोपासना प्राचीन काळापासून गाजत राहिली आहे आणि तिचा मूलस्रोत आंध्रातला श्रीपर्वत आहे. नागार्जुनाची जन्मभूमी विदर्भ; पण कर्मभूमी श्रीशैल पर्वत होती. महानुभाव पंथाचे श्रीचक्रधर यांनी श्रीपर्वतावर एकांतात एक तप काढले. श्रीचक्रधर, श्रीज्ञानदेव आणि श्रीमुकुंदराज या तिघांच्याही कार्य आणि विचारविश्वाशी श्रीपर्वताचा थेट संबंध असणे, याचा संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीशी आहे.
या गोष्टींचा संदर्भ लक्षात घेता डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येईल. श्रीपर्वत हे केवळ बारा ज्योतिर्लिगांपैकी एक लिंग म्हणून व शिवभक्तांचे श्रद्धास्थान आणि साधनास्थान म्हणून प्रसिद्ध असले तरी श्रीपर्वताची आणखीन काही वेगळी वैशिष्टय़े आहेत. बौद्धांच्या मंत्रयान आणि वज्रयान पंथांची ती जन्मभूमी आहे, तर शैव आणि शाक्त तांत्रिकांची प्रख्यात कर्मभूमी आहे. नाथपंथाचा उदयही येथूनच झाला. या पाश्र्वभूमीवर श्रीपर्वताचा महाराष्ट्राच्या शैव-विचारांवर, सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांवर कोणता व कसा परिणाम झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे व आवश्यक ठरते. हे परिणाम नव्याने स्पष्ट करतानाच काही कूटरहस्यांचाही उलगडा यात केलेला आहे.

आधीच म्हटल्याप्रमाणे डॉ. रा. चिं. ढेरे यांनी जी प्राचीन हस्तलिखिते गोळा केली होती, त्यांपैकी ‘कल्पसमूह’ या हस्तलिखिताचे प्राचीन मराठी साहित्याच्या संदर्भातले महत्त्व ओळखून डॉ. ढेरे यांनी काही शोधनिबंध लिहिले होते. ‘षट्स्थल’च्या हस्तलिखिताच्या निमित्ताने विसोबा खेचरांची ग्रंथकृती त्यांनी प्रथमच प्रकाशात आणली. हे महत्त्वाचे संशोधन आहे. या सगळ्यांच्या आधारे महाराष्ट्रातील शैव संप्रदायाचे सांस्कृतिक योगदान काय आहे, याचे अतिशय मुद्देसूद विवेचन प्रस्तुत ग्रंथात केले गेले आहे. मुख्य म्हणजे मूळ ‘कल्पसमूह संहिता’ ग्रंथाच्या परिशिष्टात दिली आहे. जाणकारांना आणि अभ्यासकांना ती पुढील संशोधनासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
या त्रिखंडात्मक प्रकल्पातील दुसरा ग्रंथ आहे- ‘त्रिविधा’! यात प्राचीन मराठी साहित्याच्या तीन साहित्यधारांवर प्रकाश टाकलेला आहे. प्राचीन मराठी साहित्यावर विविध धर्मसंप्रदायांचा प्रभाव होता. या संप्रदायांत अनुयायी होते तसेच ग्रंथकारही. त्यांपैकी ज्यांचा प्रभाव होता, त्या गाणपत्य आणि जैन ग्रंथकारांनी प्राचीन मराठी वाङ्मयात मौलिक भर घालून ते समृद्ध केले. या ग्रंथकारांची आणि ग्रंथकृतींची चर्चा करणारे, त्यांचा मागोवा घेणारे लेख या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत. डॉ. ढेरे वाङ्मयाचा अभ्यास करतानाच वाङ्मयाची सांस्कृतिक पाश्र्वभूमीही शोधतात आणि त्याच्या आधारे समाजजीवनाची विविध अंगे, त्यांचे परस्परसंबंध उलगडून दाखवतात. पासष्ट वर्षांच्या त्यांच्या संशोधनाच्या वाटचालीत पहिली तीस वर्षे त्यांनी प्राचीन मराठी वाङ्मयाभ्यासाची साधने शोधणे, त्या साधनांची विविध प्रकारे, विविध पातळ्यांवर उपयुक्तता जाणून घेणे, प्राचीन मराठीच्या अभ्यासाचे मार्ग तपासून पाहणे यात निष्ठेने घालविली. त्यांच्या तत्कालीन अभ्यासाचे प्रतिबिंब ‘त्रिविधा’ पुस्तकात परावर्तित झाले आहे. मराठी आणि महाराष्ट्राची आदिकालीन वाङ्मयीन समृद्धी यातून समजण्यास मदत होते. या संस्कृतीच्या प्रारंभकाळापासून आजपर्यंत चालू असलेल्या गाणपत्य साहित्यनिर्मितीकडे दुर्लक्ष करता येत नाही. या गाणपत्य साहित्यनिर्मितीप्रमाणेच जैन साहित्याकडेही दुर्लक्ष करता येत नाही. या दोन्ही परंपरांतील ग्रंथकारांचा आणि ग्रंथांचा या पुस्तकात त्यांनी मागोवा घेतला आहे.
या दोन साहित्यधारांइतकीच महत्त्वाची साहित्यधारा आहे- मुकुंदराज आणि मुकुंदराज परंपरेतील वाङ्मय. मुकुंदराजांच्या महाराष्ट्रातील प्रभावाचे अजिबात विस्मरण करता येणार नाही. श्रीज्ञानदेवांप्रमाणेच जाती, धर्म, भाषा, प्रदेश यांच्या सीमा मुकुंदराजांनी ओलांडून आपली परंपरा सिद्ध केली आहे. त्यांचे हे महत्त्व ओळखून डॉ. ढेरे यांनी मुकुंदराज आणि त्या परंपरेतील वाङ्मयाची चर्चा येथे केली आहे.
यानिमित्ताने महाराष्ट्राच्या धर्मेतिहासाचाही उलगडा येथे झाला आहे. प्राचीन मराठी साहित्याच्या सामर्थ्यांची, सौंदर्याची आणि भक्तिभावनेच्या अखंड सूत्राची जाणीव प्राचीन वाङ्मयाच्या अभ्यासकांना आणि यासंबंधीचे कुतूहल असणाऱ्या वाचकांना होईल, हे नक्की.
तिसरे पुस्तक आहे- ‘श्रीनामदेव, जनी आणि नागरी’! प्राचीन मराठी वाङ्मयाप्रमाणेच संतसाहित्य हा डॉ. ढेरे यांच्या आत्मीय जिव्हाळ्याचा विषय आहे. हे लेखन किंवा त्यासंबंधीची टिपणे त्यांनी आपल्या प्रारंभीच्या संशोधनकाळातच केलेली आहेत. हे पुस्तक नव्या संशोधकांनाही मार्गदर्शक ठरेल; कारण या पुस्तकाच्या आधारे मौलिक साहित्याच्या अपपाठांची प्रवृत्ती समजून घेणे, मूळ ग्रंथलेखकाचा आशयव्यूह समजून घेणे, विवेचनाच्या संदर्भाना समजून अर्थनिश्चिती करणे आणि देशी भाषेची उत्तम जाण असणे, या गोष्टींचा वस्तुपाठ या लेखांतून मिळतो. राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेच्या काळात वारकरी संप्रदायाची पताका पंजाबात पोहोचविणाऱ्या आणि वारकरी कीर्तन परंपरेचे प्रवर्तक असलेल्या नामदेवांचे ऋण महाराष्ट्राची भक्तीपरंपरा आणि महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.
या पुस्तकाचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे नागी किंवा नागरीचे आठ अभंग. नागरी ही नामदेवांची पुतणी. डॉ. ढेरे यांनी कष्टपूर्वक मिळविलेल्या एका बाडातील हे अभंग म्हणजे केवळ ‘नागरीची आत्मकथा’ एवढेच त्याचे वैशिष्टय़ नाही, तर ते पहिले मराठी स्त्रीचे आत्मकथन आहे. मूळ अभंगाच्या संहितेसह त्यांचे नागरीसंबंधीचे लेखनही येथे समाविष्ट केले आहे.
नामदेवांची दासी म्हणून जनीची ओळख आहे. तिचे लौकिक आणि वाङ्मयीन चरित्र या पुस्तकात दिले आहे. एक लहानशी, पण महत्त्वाची भर यानिमित्ताने नामदेव यांच्या साहित्याच्या अभ्यासात पडली आहे, हेच या ग्रंथाचे वेगळेपण.
एकूणच महत्त्वपूर्ण असा हा त्रिखंडात्मक प्रकल्प सादर करताना डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या प्रकृतीमुळे काही अडथळे आले. तरीही जिद्दीने त्यांच्या ८५ व्या वर्षी त्याचे प्रकाशन करता आले याचा प्रकाशक म्हणून मला सार्थ आनंद आणि अभिमान आहे. आज संशोधन क्षेत्र अतिशय संवेदनशील झाले आहे. कर्कश्श वादविवादापासून डॉ. ढेरे सतत अलिप्त राहिले. आयुष्यभर लोकांत टाळून आपल्या संशोधनकार्यातच ते मग्न राहिले. श्रम, निष्ठा, संपूर्ण आयुष्य झोकून देणे, व्यासंग आणि संशोधनाच्या सतत नव्या दिशा शोधण्याची वृत्ती यामुळे डॉ. ढेरे यांनी मोठी ग्रंथनिर्मिती केली आहे. गेल्या २० वर्षांत पद्मगंधा प्रकाशनाने डॉ. ढेरे यांचे १८ ग्रंथ प्रकाशित केले. ते सर्व ग्रंथ आज उपलब्ध आहेत. डॉ. ढेरे यांना शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा!
१. ‘श्रीपर्वताच्या छायेत’
पृष्ठे : ३००
किंमत : ३१० रुपये
२. ‘त्रिविधा’
पृष्ठे : १८४
किंमत : २०० रुपये
३. ‘श्रीनामदेव, जनी आणि नागरी’
पृष्ठे : १२४
किंमत : २०० रुपये.
अरुण जाखडे

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!