मावशीकडे नव्या शुक्रवार पेठेत राहायचो. समोरच मोहनचं घर.. एखाद्या सोमवारी मावशीकडून रात्रीचा नारायण पेठेतल्या आत्याकडे किंवा एखाद्या मित्राकडे चालत निघालो तर मुंबई आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत असलेली ‘आपली आवड’ कार्यक्रमातली गाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांतून अखंडपणे कानी पडत.

अ गदी लहानपणची आठवण. म्हणजे सुमारे ५-६ वर्षांचा असेन तेव्हा.. राज कपूरच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटातलं ‘मेरा जुता है जपानी’ हे गाणं, खांद्यावर काठी म्हणून धरलेल्या फूटपट्टीच्या टोकाला पंचा किंवा पिशवीचं गाठोडं बांधून मी साभिनय गाऊन सादर करी.. या यशस्वी आयटमचे नातेवाईक/ स्नेही कुटुंबांच्या गोतावळ्यात वारंवार प्रयोग घडत. पुढे अकोल्याच्या नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक सातच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमात मला सवरेत्कृष्ट गायक आणि सवरेत्कृष्ट अभिनेता असे दोन पुरस्कार (म्हणजे पाणी प्यायची पितळेची भांडी- त्यावर स्पर्धा/ पुरस्कार क्रमांक हा तपशील कोरलेला असे) म्हणून दोन भांडी मिळाली. पण आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या अधिकारात त्यातलं एक भांडं माझ्याबरोबर नाटुकल्यात सहभागी झालेल्या आणि त्यांचा लाडका असलेल्या कुणा एकाला देताना ‘तुला एकटय़ाला दोन काय करायचेत,’ असे मला उद्देशून उद्गार काढले.. पण आमच्या शाळेतल्या संगीतशिक्षक सुधाकर प्रधानसरांचा मी अगदी लाडका. गणेशोत्सवानिमित्त नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी शेतकऱ्याच्या भूमिकेत धोतर-सदरा आणि डोक्याला भलं मोठं पागोटं, कपाळी गोपिचंदाचा टिळा अशा वेशात गाऊ लागलो. पण प्रेक्षकांत बसलेल्या माझ्या आईला काही मी गाईपर्यंत माझी ओळख पटेना.. नाटुकल्यातल्या इतर पात्रांत ती मला शोधत होती. सूर कानी पडताच तिने मला ओळखलं..
साधारणपणे आठव्या इयत्तेत असताना आवाज फुटू लागला. बरोबरचे गाणारे- आवाज न फुटलेले, त्यामुळे मला खूप निराश वाटू लागलं. वर्गातला पहिला नंबर घसरून तिसरा होताना गायन क्लास वर्षांपूर्वीच बंद झालेला. गुरूचं मार्गदर्शन पौगंडावस्थेत आवाज फुटू लागताना गाणाऱ्या मुलाला फार आवश्यक, पण ते दोर घरून कापलेले.. सुरांपासून लांब जाण्याचा विचारही सोसत नव्हता..
एका संध्याकाळी.. साडेसात-आठचा सुमार असेल.. अकोल्याच्या सीताबाई आर्ट्स कॉलेजचे प्रिन्सिपॉल एम.जी.जोशीसरांच्या घरून निरोप आला- सरांनी तातडीनं बोलावलंय.. तिथं पोहोचलो तर सीताबाई आर्ट्स कॉलेजमधले गायक/ गायिका/ वादक बसलेले.. सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाकरिता दृक्श्राव्य सादरीकरणाकरिता संहितेतल्या गाणुल्यांना स्वरबद्ध करण्याची खटपट चाललेली.. पण लेखक/ दिग्दर्शकांच्या पसंतीस काहीच उतरत नव्हतं. एम. जी. जोशीसर हे करडय़ा शिस्तीचे भोक्ते आणि त्यांच्याविषयी सर्वत्र आदरमिश्रित दरारा होता. जोशीसरांच्या सांगण्यावरून कुणीतरी माझ्या हातात गाणुल्याचा कागद दिला आणि ‘चाल लाव’ अशी ऑर्डर एम.जी. सर देते झाले.
स्वातंत्र्याचा रवि उगवला.. उजळीत सकल दिशांना
धरणीमाता – आज आपुली – मुक्त जाहली- अर्पित तिज वंदना
शब्दांवरून नजर फिरवताच माझ्या मनात कुठंतरी ‘संगीत सौभद्र’तल्या स्वरराज छोटा गंधर्वानी गायलेल्या ‘प्रिये पहा रात्रीचा समय सरून येत उष:काल हा’ या पदाची सुरावट तरळली असावी.. स्वा ऽ तं ऽ त्र्या ऽ चा ऽ  यातल्या प्रत्येक अक्षराला सा रे ग ध ध ऽ ध ऽ यातला एकेक स्वर योजून ‘देसकार’ रागाच्या सुरावटीत मी गाणुल्याच्या ओळी गात गेलो आणि चाल झाली.. छान झाली.. लेखक/ दिग्दर्शक आणि एम.जी. सरांचं कौतुक.. हिवाळ्यातल्या त्या रात्री गरमागरम अद्रकवाल्या चहाच्या फैरीवर फैरी.. आणि त्याच बैठकीत मी सर्व गाणुल्यांच्या चाली बांधल्या..
आतापर्यंत आवाजाच्या फुटण्यामुळे आलेलं नैराश्य, संगीतापासून तुटलं जाण्याचं भय या सगळ्या चिंता हरल्या होत्या. मला माझ्यातल्या वेगळ्याच गुणाचं- नव्हे शक्तीच्या अस्तित्वाचं प्रथमच भान आलं.  माझ्यातल्या संगीतकाराचं ते अनोखं दर्शन मला नवी उभारी देतं झालं. माझ्या अंतरीची खूण मला पटली.
मी नववीत असताना के. व्ही. देशपांडेसर आमच्या शाळेत बदलून आले. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. स्वत: उत्तम हार्मोनियम वाजवीत आणि प्रधान सरांसारखेच पानाचे शौकीन! त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद उभा केला. तबला, हार्मोनियम, बासरी, बुलबुलतरंग आणि गायक मंडळी असा संच. मी डावखुरा असल्याने माझ्या हाती बुलबुलतरंग आलं.. आयुष्यातलं पहिलं वाद्य. सोहोनी, भूप, यमन रागातल्या बंदिशी आमच्याकडून बसवून घेतल्या. शिवाय फिल्मी गाणी असं वाद्यवृंदवादन आणि जोडीला आमची गाणी. पुढल्या वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं मी स्वागतगीत लिहिलं- संगीतबद्ध केलं आणि प्रभंजन मराठे या माझ्या मित्राच्या साथीनं गाऊन सादरही केलं. ‘सृजन हो असो शुभ स्वागत। योग आजचा मणिकांचनवत’ अशा ध्रुपदाच्या स्वागतगीताला मी ‘कलावती’ रागात बांधलं होतं. तेव्हा ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकातल्या प्रसाद सावकारांनी गाऊन लोकप्रिय केलेल्या ‘जय गंगे भागीरथी’ या गाण्यामुळे ‘कलावती’ हा मूळ कर्नाटक संगीतातला राग आपल्याकडे रुजला होता आणि रसिकप्रियही झाला होता. त्यावर्षी माझ्या त्या स्वागतगीताचं खूप कौतुक झालं, पण गोष्ट इथेच संपत नाही. त्यानंतर पुढली अनेक वर्षे हे माझं स्वागतगीत अकोल्यातल्या शाळा/कॉलेजांच्या मुलामुलींच्या गळ्यातून विविध समारंभातून सादर होत राहिलं. काही वर्षांनी काही निमित्तानं अकोल्याला गेलो असताना मित्राच्या घरी त्याची सर्वात धाकटी बहीण आरशापुढे वेणीफणी करताना चक्क माझं ते स्वागतगीत गुणगुणताना पाहून तिला विचारलं, ‘कुठलं गं हे गाणं?’ म्हणाली-‘‘काय की .. कुणास ठाऊक.. पण गेली अनेक वर्षे आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये हेच गायलं जातंय..’’
तिला जेव्हा कळलं की ते मी लिहिलंय/ संगीतबद्ध केलंय तशी चकित झाली आणि खूशही! उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन सीताबाई कॉलेजच्या विज्ञानशाखेत प्रवेश घेतल्यावर मग चित्रपट, नाटक, संगीत, खेळ अशा अभ्यासेतर गोष्टींमध्ये एवढा रमलो, की अभ्यासावरचं लक्ष उडालं ते कायमचंच. आयुष्यात संगीताच्या क्षेत्रातच काहीतरी करायचं हे आत्मभान- हीच अकोल्यातल्या महाविद्यालयीन काळातली कमाई. आणि माझं ध्येय मला अकोल्यात राहून कधीही साधता येणार नव्हतं या वास्तवाची जाणीवही!
सत्तर साली उन्हाळ्याच्या सुटीत पुण्याला आलो असता मोहन गोखले या नव्या मित्राशी ओळख झाली. मोहन कधी माझा मितवा झाला कळलंच नाही. १९७१ साली अकोल्यातून इंटरसायन्सची परीक्षा पास होऊन पुणे मुक्कामी सर परशुरामभाऊ कॉलेजात एस.वाय.बी.एस्सी.च्या वर्गात प्रवेश घेत माझ्या ध्येयाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं..
मावशीकडे नव्या शुक्रवार पेठेत राहायचो. समोरच मोहनचं घर.. एखाद्या सोमवारी मावशीकडून रात्रीचा नारायण पेठेतल्या आत्याकडे किंवा एखाद्या मित्राकडे चालत निघालो तर मुंबई आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत असलेली ‘आपली आवड’ कार्यक्रमातली गाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांतून अखंडपणे कानी पडत. लक्ष्मी क्रीडा केंद्रात आयोजित नामवंत गायक/ गायिकांची गाणी.. गणेशोत्सवाच्या काळातल्या चौकाचौकातल्या शास्त्रीय/ सुगम संगीताच्या मैफिली.. पुरुषोत्तम करंडक.. राज्य/ कामगार कल्याण नाटय़स्पर्धा.. वसंत व्याख्यानमाला.. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन शास्त्रीय/ सुगम गायन/ वादन स्पर्धा आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सव साऱ्या पंचप्राणांना डोळ्यांत, कानांत एकवटून मी सगळं साठवत होतो. मोहनच्या नाटय़चळवळीतला सहभागी बनून गेलो. सदाशिव पेठेतलं बाळासाहेब केतकरांचं फ्रेंड्स म्युझिक सेंटर आणि फग्र्युसन रोडवरचं रिसबुडांचं ‘स्वरविहार’ या आपल्या मनपसंत रेकॉर्ड्स ऐकण्याच्या अलीबाबाच्या गुहा आणि जोडीला अलकाच्या चौकातलं ‘रिगल’ किंवा ‘सनराईज’ या इराण्याच्या हॉटेलातले चार आण्याचे कॉइन टाकून उपलब्ध रेकॉर्ड्समधून आपल्या आवडीची रेकॉर्ड वाजवणारी ज्युक बॉक्स नावाची चैन..
..पहिल्या सेमिस्टरच्या माझ्या यशाच्या आनंदाला दु:खाची किनार म्हणजे वडिलांचा कॅन्सर.. अखेर १ मार्च १९७२ रोजी त्यांचं निधन झालं.. दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेचा (आणि माझाही) निकाल लागला. तिन्ही विषयांचे प्रत्येकी एकेक पेपर राहिल्याने पुढल्या वर्षांला प्रवेश मिळणार नव्हता. पुन्हा घरीच अभ्यास सुरू केला. जोडीला हंगामी टायपिस्टची नोकरी. पगार दरमहा शंभर रुपये. आणि अशातच मोहननं एका संध्याकाळी विजय तेंडुलकरांच्या नव्या नाटकाचं टंकलिखित स्क्रिप्ट वाचायला दिलं. वाचून उडालो.. एकदम अनोखं.. नंतर त्या नाटकाच्या तालमीला घेऊन गेला, ‘तुला काम करायचंय’ असं सांगत..
महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या पुण्यातल्या प्रायोगिक नाटय़ संस्थेतर्फे सादर व्हायच्या नाटकाचे दिग्दर्शक होते तेव्हाचे पीडीएतले तरुण प्रतिभावंत दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल.. आणि नाटकाचं नाव- घाशीराम कोतवाल.            ल्ल
      ंल्लंल्लेििं‘3@ॠें्र’.ूे