0015चारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने.. प्रत्येकाच्या तोंडी मॉलची चर्चा रंगलेली. ‘अहो, एवढा मोठ्ठा मॉल. संपूर्ण एअर कंडिशन आहे म्हणे!’ ‘हे आहे का? ते आहे का? असलं विचारायचं नाही. काय पाहिजे ते ब्रँडेड मिळणार!’.. असा मॉलचा बोलबाला वाढतच गेला. शेवटी हे मॉलचं वातावरण एवढं तापलं, की शुभारंभाच्या दिवशी प्रवेशासाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या. तरीही लोक आटोक्यात येईनात. शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं. काहींनी पोलिसांचे दंडुके खाल्ले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत मॉलसमोर लागलेल्या लांबच्या लांब रांगांचे फोटो झळकले. त्यामुळे उर्वरित लोकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. परिणामी मॉलची गर्दी काही हटेना. एकमेकांना विचारणं सुरू झालं, ‘तुम्ही अजून मॉलमध्ये गेला नाहीत?’ या प्रश्नातील ‘अजून’वर दिलेला जोर बघून अधिकच मागासल्यासारखं वाटायला लागलं. एखादा उत्साही रसिकमित्र मारधाड सिनेमा पाहून आल्यावर साभिनय स्टोरी सांगतो. त्यात त्यानं जवळपास चित्रपटाची गंमतच सांगून टाकलेली असते. तसे मॉलला भेट देऊन आलेले उत्साही लोक भेटल्यावर भरभरून बोलू लागले. तिथले सरकते जिने, रोषणाई, वस्तूंच्या मोहक व्हरायटी, स्वस्त आणि मस्त प्रॉडक्ट्स, बिलिंग पद्धत, दुडूदुडू धावणाऱ्या ट्रॉलीज्, तन आणि मन आल्हाददायक ठेवणारं वातावरण.. असं काय काय सांगताना लोक थकत नव्हते. हे सर्व ऐकताना इथले दारिद्रय़च संपून गेलंय, एकदाची मस्त सुबत्ता आलीय असं वाटू लागलं.
उत्सुकता वाढलेली होतीच. शिवाय ‘मॉलमध्ये न गेलेला’ असा मागासलेपणाचा शिक्काही पुसायला हवा म्हणून एक दिवस मॉलमध्ये गेलो. आता पोलिसांना पाचारण करावं लागावं अशा रांगा नव्हत्या. पण गर्दी मात्र होतीच. खरंच, या शहराच्या मानानं भव्यदिव्य मॉल होता. लोकांचं कुतूहल ओसंडून वाहत होतं. सरकत्या जिन्यांवर काहीजण तर बागेतल्यासारखे ये-जा करण्याचा खेळ खेळत होते. लोकांची दणकावून खरेदी सुरू होती. ट्रॉलीची गाडी- गाडी करीत वस्तू गोळा करीत होते. हातात चमचे- काटेचमचे नाचवत काही काही खात होते. आता मॉल बऱ्यापैकी परिचयाचा झालाय. पण नव्यानं मॉल अनुभवणाऱ्याला प्रभावित होण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यांनी एखाद्या खोलीतलं कागदाच्या पुडीत गूळ-साखर-शेंगदाणे बांधून देतानाचं किराणा दुकान पाहिलंय, किंवा दहा- वीस कपडय़ांचे गठ्ठे म्हणजे कपडय़ाचं दुकान असा ज्यांचा अनुभव आहे, त्या लोकांसाठी हा वस्तूचा अद्भुत झगमगाट टोळे दिपवून टाकणारा होता. गळ्यात मॉलचं ओळखपत्र अडकवून उभ्या असलेल्या तरुण मुलं-मुलींचं हिंदी बोलणं ऐकतानाच ते मराठीभाषिक असल्याचं लक्षात येत होतं. दोघेजण तर ओळखीचे विद्यार्थीच निघाले. त्यांना हिंदीतच बोललं पाहिजे अशी ताकीद दिलेली होती. फळानं लगडलेल्या एखाद्या बागेतून फिरावं तसं वाटत होतं.
‘मॉलमध्ये रमतं मन
थंडगार राहतं तन
मॉलमधेच उगवतात भाज्या,
लटकणाऱ्या कपडय़ांना
लगडतात माणसं,
या चकचकीत लोणच्यापासून
तयार होते कैरी,
या मोहक फुलांसाठीच जन्मलीत फुलपाखरं,
हेच दूध नेऊन भरलं जातं
गाई-म्हशीच्या आचळात,
ही अंडी उधार नेऊन
पक्षी करतात स्वत:ची वंशवृद्धी,
कधीही येऊ शकतात मधमाश्या
या नॅचरल मधाच्या बाटलीवर..’
अशा कवितेत केलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्यावर समाधान वाटण्यापेक्षा धक्काच अधिक बसतो. तीनेक वर्षांपूर्वी छोटय़ा मुलीला विद्यापीठातील आमराई दाखवायला मुद्दाम घेऊन गेलो होतो. झाडांना मस्त आंबे लागलेले होते. वेगवेगळ्या जातीची झाडं. वेगवेगळी चव, रंग व आकार असलेले आंबे. हातानं तोडता यावेत असे लोंबणारे आंब्याचे घोस. काही गाभुळे आंबे खाली पडलेले. एका गोटी आंब्याच्या झाडाखाली आम्ही थांबलेलो. त्या छोटय़ा आकाराच्या आंब्याचं मुलीला कुतूहल वाटलं. एक खाली पडलेला छोटुसा पिवळा आंबा मी तिला दिला. न कापता आंबा खातात हे तिला माहीत नाहीए. शेवटी तिला मी एक आंबा स्वत: खाऊन दाखवला. मग तिनेही जमेल तसा आंबा खाल्ला. मुळात एवढे लखाटलेले आंबे प्रथमच प्रत्यक्ष बघून ती खूश झालेली होती. आता आंबा खाल्ल्यावर तर तिचा चेहरा चांगलाच खुलला. तिला चव आवडलेली होती. मी मुद्दाम विचारलं, ‘कसाय आंबा? आवडला का?’ तर ती म्हणाली, ‘छानय. पण बाबा, हा तर फ्रुटीसारखा लागतोय!’ हा संवाद कळला असता तर ते आंब्याचं झाड उन्मळूनच पडलं असतं. यात मुलीचीही चूक नाही. तिनं आधी घेतलेली फ्रुटीची चव तिच्या डोक्यात पक्की आहे, आणि आता नंतर ती आंबा खात होती. त्यामुळं मॉलमधली अंडी उधार नेऊन पक्षी वंशवृद्धी करतो, किंवा मॉलमधलं फ्रेश दूध गायीच्या आचळात नेऊन भरलं जातं, असं कवीला वाटणं फार अनाठायी ठरत नाही.
धूमधडाक्यात सुरू झालेले असे अनेक मॉल काही दिवसांतच बंदही पडले. पडताहेत. त्यामागेही काहीतरी वेगळं गणित असणारच. वाढत्या लोकसंख्येबरोबर खरेदी करण्याची क्षमता वाढलेल्या लोकांसाठी अद्ययावत बाजारपेठ असायलाच हवी. संकरित बी-बियाण्यांच्या तुलनेत देशी वाण सात्त्विक असणारच. पण या हायब्रीडमुळंच मुबलक धान्यसाठा आपण करू शकलो, हे मान्य करावंच लागतं. म्हणून आज दुष्काळ पडला तरी पाण्याचा तुटवडा आहे; पण धान्य मात्र पुरेसे उपलब्ध आहे. कुठलाही बदल हा अपेक्षितच असतो. तो स्वीकारावा लागतो. पण पुन्हा त्याचे म्हणून काही दुष्परिणाम असतात.
रंगभूमी, चित्रपटांतून एक संवेदनशील अभिनेता म्हणून संदीप मेहता सुपरिचित आहे. त्याच्या व्यावसायिक नाटकाचे औरंगाबादेत सलग दोन प्रयोग होते. पहिला प्रयोग झाल्यावर दुसऱ्या दिवशी नाश्त्याला घरी येण्याचं ठरलं. घरासमोरच्याच हॉटेलात उतरला असल्यामुळे संदीप सकाळी सहज चालत येऊन पोहोचला. गप्पा सुरू होत्या. संदीप मूळ जळगावचा. तीसेक वर्षांपासून आता तो मुंबईत आहे. जाहिराती, चित्रपट, नाटक असा त्याचा दमदार प्रवास आहे. त्याचं वाचन चांगलं आहे. सडेतोड मतं मांडत असतो. गप्पा, खाणं सुरू होतं. तेवढय़ात टेबलावरचं पॅक दही बघून तो सटकला, ‘अरे, असलं पॅक दही खाण्याशिवाय आम्हा मुंबईवाल्यांना पर्याय नाहीए. तुम्ही कशाला असलं दही खाता? मस्त ताजं दही मिळतंय इकडं, ते खा की!’ प्रिझव्‍‌र्हेटिव्हमुळे हे दही आंबट होत नाही, खराब होत नाही, हे मलाही माहीत होतं. पण ताजं दही आणायला वेळ नव्हता म्हणून समोरच उपलब्ध असलेलं पॅक दही ऐनवेळी आणलेलं होतं. मग रासायनिक परिणामांवर घनघोर चर्चा झाली.
आपल्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात वेळ वाचवणारं, सहज उपलब्ध असणारं आणि चकचकीत असणारं आपण स्वीकारतो. त्याला शहरात पर्यायही नाहीए. या असहायतेचा मग फायदा घेतला जातो. ‘सिर्फ दो मिनिटा’त तयार होणारा पदार्थ आपल्या जगण्याचा भाग बनला. ‘मॅगी तेरी याद में’ आजही अनेकजण दु:खी आहेत. पण दुष्परिणाम समोर आल्यामुळं शांतता आहे. खरं तर यात आपली भूमिकाही निर्दोष नाही. आपल्याला आजारी पडल्याबरोबर ताबडतोब दुरूस्त व्हायचं असल्यामुळं डॉक्टर अ‍ॅन्टीबायोटिक्सचा मारा करतात. यातूनच बाजारात उपलब्ध फळं, भाज्या, वस्तू खात्रीलायक राहिल्या नाहीत. काहीजणांनी केळी खाणं सोडून दिलंय. पावडरमध्ये पिकवलेल्या पिवळ्याजर्द दिसणाऱ्या आंब्याची चव गायब झाली. दुधात युरिया खत निघालं. हॉटेलात जेवताना हिरव्यागार पालकच्या भाजीचं केलेलं कौतुकही हात धुताना धुऊन गेलं. कारण ती ताजी भाजी नव्हती, तर हिरवा रंग होता, हे कळतं. परवा तर तांदळामध्ये न ओळखू येतील असे प्लॅस्टिकचे दाणे निघाले. मग आता खायचं तरी काय? काहीतरी तर खावं लागेलच ना! म्हणून मग आम्ही धुंडाळतो नवनवे मॉल. करतो भरपूर खरेदी. बऱ्याचदा खरेदी ही गरज न राहता करमणूक झाली आहे. बोअर होत होतं म्हणून शॉपिंगला जाणारेही भेटतील. त्यामुळं वस्तूंचं अप्रूप राहिलं नाही. वर्षभरात पाहिजे तेव्हा टरबूज उपलब्ध आहे. पण ते टरबूज कुठल्या पाण्यावर वाढलंय, आणि कसलं इंजेक्शन देऊन पिकवलंय, ते सांगता येणार नाही. लोक खरेदी करताहेत.. आस्वाद घेताहेत. अमेरिकन सॉफ्ट चॉकलेट्स गट्टम् करणाऱ्या लेकरांना गूळ- शेंगदाण्याची चिक्की खा असं म्हणणं म्हणजे हनीसिंग ऐकणाऱ्यांना दीनानाथ मंगेशकरांच्या गायनाची रेकॉर्डप्लेयर लावून दिल्यासारखं आहे.
व्हिक्टर द्रागुन्स्की नावाच्या लेखकाने छोटय़ांसाठी छान छोटय़ा छोटय़ा गोष्टी लिहिलेल्या आहेत. एका गोष्टीत नोकरी करणाऱ्या आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा. घरी एकटाच असतो. त्याच्या हट्टामुळं आई त्याला महागडी मोटार घेऊन देते. ही मोटार बटने दाबताच घरभर पळते. तिचे दिवे लागतात. मुलाला ही मोटार खूप आवडते. एक दिवस घरात एकटाच मुलगा मोटारीसोबत खेळत असतो. तेवढय़ात शेजारी राहणारी त्याची छोटी मैत्रीण येते. दोघे खेळू लागतात. मैत्रिणीलाही ती मोटार खूप आवडते. मैत्रीण ती मोटार त्याच्याकडे मागते. तो छोटा मुलगा ‘मोटारीच्या बदल्यात काय देशील?’ असं विचारतो. ती मुलगी त्याला एक काडय़ाची पेटी दाखवते. त्या पेटीत बाभळीचा पाला असतो आणि तो पाला खाणारा एक सोनकीडा असतो. निळसर हिरवा, दोन काळ्या ठिपक्यांचे डोळे असणारा आणि सदैव मिशांसारखा अ‍ॅन्टेना हलवणारा तो कीडा मुलाला खूपच आवडतो. तो अदलाबदलीला तयार होतो. ती मोटार मैत्रिणीला देऊन तो कीडा घेतो. संध्याकाळी घरी आल्यावर आईला मोटार दिसत नाही. म्हणून ती विचारते, तर ती मोटार मैत्रिणीला देऊन त्या बदल्यात सोनकीडा घेतल्याचं तो सांगतो. एवढी महागडी मोटार दिली म्हणून आई रागावते.. ‘वेडायस का? एवढी महागडी मोटार देऊन हा कीडा घेतलास. एवढं काय आहे त्या किडय़ात?’ मुलगा उत्तर देतो, ‘आई, मोटार छान आहे, पण तिचं बटन दाबावं लागतं. हा कीडा मात्र जिवंत आहे. म्हणून मला आवडलाय!’
आपण सगळे अशा जिवंत वस्तूंच्या शोधात आहोत. भोवताली मात्र बटनस्टार्ट वस्तूंचा बाजार भरून गेलाय.