यापूर्वीही निमित्ता-निमित्ताने ‘निरंकुशाची रोजनिशी’, ‘गाणारी वाट’ आणि ‘अनुबंध!’ या माझ्या पुस्तकातून याबद्दल मी थोडंबहुत लिहिलं आहे. पण आज ही कविता-सखीची वाटचाल सांगताना इथे पुन्हा या अत्यंत महत्त्वाच्या वळणाचा परामर्श घ्यायलाच हवा.. तेव्हा त्या संदर्भातील यापूर्वी सविस्तर लिहिलेले
लहान-मोठे इतर तपशील वगळून, केवळ कवी म्हणून मी या वळणावर कसा होतो आणि आज
मागे वळून पाहताना मला तो कसा दिसतो ते शोधण्याचा थोडा प्रयत्न इथं करून पाहणार आहे. पण त्यासाठीही थोडी तपशिलात्मक ओळख करून द्यावी लागेल.
पहिली महत्त्वाची नोंद करायला हवी ती म्हणजे, १९७२ हे वर्ष हा माझ्या काव्य-प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा मुक्काम आहे. कारण १९७२ च्या मे महिन्यात पं. भीमसेन जोशी यांनी गायलेलं आणि संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेलं ‘सखि, मंद झाल्या तारका’ हे माझं अनोखं भावगीत आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्वर-चित्र या विशेष मालिकेतून प्रथमच आकाशात झेपावलं आणि त्याच्या आजवरच्या विक्रमी वाटचालीचा शुभारंभ झाला आणि त्या पाठोपाठ १५ ऑगस्ट १९७२ या दिवशी पुण्याच्या भरत नाटय़मंदिराच्या भरगच्च भरलेल्या प्रेक्षागृहात ‘स्वतंत्रते भगवती’ हा माझा पहिलावहिला गीतकाव्य-प्रयोग ‘स्वरानंद’ या प्रयोगशील संस्थेतर्फे थाटामाटात साजरा झाला. १९७२ साली येणारा भारतीय स्वातंत्र्याचा रौप्य-महोत्सव हे त्या प्रयोगाचं प्रयोजन होतं. त्याचा संगीतकार होता, विश्वनाथ ओक आणि ‘स्वरानंद’चे गुणी गायक-गायिका-वादक आणि कार्यकर्ते यांचाही मोलाचा सहभाग त्यामध्ये होता. एस. एम. जोशी हे त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. ना. ग. गोरे, नरुभाऊ लिमये आदी अनेकांची मान्यवर उपस्थिती त्याला लाभली होती. अशा या माहौलमध्ये सुधीर मोघे हा कवी- गीतकार- सादरकर्ता म्हणून प्रथमच पुणेकर रसिकांना सुपरिचित झाला आणि त्याच्या पुढच्या आजवरच्या झालेल्या चार दशकांच्या भरभक्कम प्रवासाची त्यादिवशी एकप्रकारे पायाभरणी झाली.
जानेवारी १९७३ मध्ये मुंबई दूरदर्शनवरून स्वतंत्रते भगवती संक्षिप्त स्वरूपात सादर झाला आणि गाजलाही! आकाशवाणी मुंबई आणि पुणे केंद्रांनीही त्यांची दखल घेतली आणि पाठोपाठ ‘स्वतंत्रते भगवती’ पुस्तकरूपात प्रकाशात आलं. त्यांचं देखणं आशयघन मुखपृष्ठ पद्मा सहस्रबुद्धे यांचं होतं. पुस्तकाच्या पाठीवर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा आशीर्वाद होता आणि पुस्तकाचं प्रकाशन कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या भरघोस कौतुकाच्या शब्दांनी झालं.
या ‘स्वतंत्रते भगवती’मुळेच संगीतकार वसंत देसाई यांनी या कवीची ‘राजा शिवछत्रपती’ या ऐतिहासिक चित्रपटासाठी गीतकार म्हणून निवड केली.. आणि त्यातून त्या कवीची पुढची उणी-पुरी ४० वर्षांची चित्रपट-गीतकार म्हणून एक झळाळती कारकीर्द उलगडत गेली. असा हा निदान स्वत: कवीच्या आयुष्याच्या संदर्भात केवळ अपूर्व म्हणावा असा महिमा लाभलेलं हे ‘स्वतंत्रते भगवती’ नामक भाग्यवान गीत-काव्य! ..आणि तरीही आजच्या कलाविश्वाच्या एकूण झमेल्यात, काही इनिगीनी चोखंदळ मंडळी सोडली, तर या गीतकाव्याच्या अस्तित्वाचा कुणाला पत्ताही नाही, हे त्यांचं आजमितीचं रोखठोक वर्तमान आहे.
१८५७ चा स्वातंत्र्य-लढा ते १५ ऑगस्ट १९४७ हा इतिहासाचा धावता मागोवा हा ‘स्वतंत्रते भगवती’ या काव्याचा विषय होता! या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि प्रधान व्यक्तिमत्त्वं यांचा घेतलेला काव्यमय वेध हे त्यांचं एकूण स्वरूप आहे. ‘सखि, मंद झाल्या तारका’ मुळं नुकताच आपल्यातील गीतकाराचा शोध लागला होता आणि त्यामुळे मनात एक वेगळा विचार तरळू लागला होता.. तो म्हणजे गीतकार म्हणून एखाद्या कथा-विषयाला भिडून एखाद्या सशक्त गीतमालालेखनाला हात घालून आपली कवित्वशक्ती अजमावून पाहावी. पण म्हणून पुराणातील, इतिहासातील रेडिमेड कथाविषय निवडून ते गीतात गुंफणे हा तसा सोपा मार्ग नको होता! मी अशा विषयाचा शोध घेत होतो, ज्याचं आकाश मोठं असेल.. आवाका प्रचंड असेल आणि आपला कस लागेल.. नेमका विश्वनाथ ओकने हा विषय सुचवला आणि मनातल्या मनात मी तरंगू लागलो.
१८५७ ते १९४७ हा ९० वर्षांचा विशाल कालपट, त्यावरच्या असंख्य घटना, प्रसंग आणि लहानथोर अगणित व्यक्तिमत्त्वं यांनी विणलेला प्रदीर्घ इतिहास डोळ्यांपुढून सरकू लागला आणि छातीच दडपली. खरं म्हणजे लहानपणापासूनच्या आवडीमुळे या संदर्भातलं थोडंबहुत वाचन-श्रवण आधीच घडलं होतं. पण आता नव्याने रीतसर ‘अभ्यास’ वगैरे सुरू केल्यावर पार तारांबळ उडू लागली. अभ्यास आणि तारांबळ ही युती तशी शालेय वयापासून अतिपरिचित होतीच. त्यामुळे उभय पक्षी अतिपरिचयात अवज्ञा ओघानेच आली. असेच काही महिने कोरडे गेले. मे महिना उजाडला. १० मेला आठवलं की, आजच्या दिवशीच अचानक मंगल पांडेने बिथरून गोळीबार सुरू केला आणि पूर्वतयारीच्या आधीच १८५७ च्या स्वातंत्र्य- युद्धाला तोंड लागलं.
एक धुमसती शतवर्षांची अंधारी रात्र
उरांत होता तिच्या उताविळ जळता अंगार
स्फोटाआधी एक निखारा अवचित उंच उडे
काळोखाला जणु तेजाचे क्षणभर स्वप्न पडे..
.. आणि जाणवलं.. ध्यानी-मनी नसताना कवितेचा प्रवाह वाहता झाला आहे.. मग जाणीवपूर्वक जाणिवेत आणि नेणिवेतही तोच एक ध्यास घेतला.. सर्वार्थाने कवितेच्या पुरता स्वाधीन झालो.. पुढचे सुमारे १५/२० दिवस एक तीच धून लागली. रोज उजाडणारा दिवस एक कविता घेऊन येऊ लागला. विषय, प्रसंग व्यक्तिमत्त्व, कवितेचा पदर धरूनच पुढे अवतरू लागले.
वणव्याच्या ज्वालेवर झेप घेणारे वासुदेव बळवंत दिसले. भारतीय तत्त्वज्ञानाचा ध्वज समुद्रापार घेऊन जाणारे ‘योगी भाग्यवंत संन्यासी’ विवेकानंद साकार झाले.. ‘नररूपे अवतरलेला तो पुरुषसिंह होता’ असे नरकेसरी लोकमान्य उभे राहिले. गोपाळ गणेश आगरकर, ज्योतिबा फुले, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र, महात्मा गांधी, जवाहरलाल अशा व्यक्ती तर गीतातून साकार झाल्याच पण जोडीला सर्व देशभक्तांचं स्फूर्तिस्थान ठरलेली ‘वंदेमातरम’ ही कविता, जालियानवाला बागेतलं हत्याकांड, मिठाचा सत्याग्रह, १९४२ चा देशव्यापी झंझावात, भूमिगत क्रांतिकारकांचं वादळी आयुष्य आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ हा सोनियाचा दिवस ही सारी मर्मस्थानं कवितेनं टिपली.. कवी म्हणून एक भूमिका मुळात पक्की होती.. उसनं अवसान घेऊन फुरफुरणारी स्फूर्तिगीतं असं त्याचं स्वरूप नको.. सर्व गीतांचा मूळ पिंड हा भाव-कवितेचाच हवा. व्यक्ती-घटना यांच्यातील नावं-गावाच्या तपशिलांपेक्षा त्यातील ‘मंत्र’ शब्दांतून जागवीत जाणं हे अधिक महत्त्वाचं होतं. त्यामुळे कवितेची लांबीही आटोपशीर असायला हवी.. आणि ही सगळी ‘तारेवरची कसरत’ न वाटता, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अशी उत्स्फूर्त प्रवाहित होणारी कविता म्हणून ती भेटावी. सोपं नव्हतं, पण हे सगळं झालं.. आजही ‘स्वतंत्रते भगवती’चं पुस्तक ही साक्ष उत्सुक रसिकांना देईल याविषयी कसलाही संदेह नाही.
एक कवी म्हणून त्र्ययस्थ नजरेनं त्या कलाकृतीकडे आज इतक्या वर्षांनी पाहताना तिचा एक विशेष मुद्दाम अधोरेखित करावासा वाटतो. या संपूर्ण गीत-बंधाची ‘शब्दकळा’ हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. १९४२ च्या आंदोलनात सहभागी झालेल्या स्त्रीशक्तीबद्दल एक कविता त्यात आहे. तिची एक ओळ वानगी म्हणून सांगायचा मोह आवरत नाही. ‘फुलपंखीची राणी आली अग्नीच्या प्रांगणी, मूर्त ही कविता तेजस्विनी.’ कमल पाध्येकृत ‘बंध-अनुबंध’मध्ये, भररस्त्यावरची धावती बस बेधडक पुढे जाऊन अडवणाऱ्या, तिरंगी ध्वज घेतलेल्या ऐन विशीतील सुनीता देशपांडेचं सुंदर वर्णन आहे. ते वाचताना माझी ती कविता साक्षात जिवंत झाली, असंच मला वाटलं..
‘स्वतंत्रते भगवती’चा एक खासगी प्रयोग आम्ही फक्त दोन व्यक्तींसाठी केला होता. गजानन वाटवे आणि कविवर्य सुरेश भट.. कविराजांची ३० वर्षांपूर्वीची केवळ एका वाक्यात सामावलेली मौल्यवान दाद कवि-हृदयाला आजही सुखावते, ‘खूप दिवसांनी मी अभिजात सुंदर मराठी ऐकतो आहे..’
‘स्वतंत्रते भगवती’चं व्हावं तसं चीज झालं नाही अशी एक रुखरुख माझ्या आईच्या हृदयात अखेरपावेतो होती. मला मात्र आज वाटतं, तो इतिहास प्रत्यक्ष घडवलेल्या असंख्य व्यक्तींच्या हौतात्म्याचं जिथं कणभरही चीज झालेलं नाही.. तिथं त्यांचं केवळ संकीर्तन करणाऱ्या माझ्या कविता-सखीची काय कथा..                                n

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…