वाघ हा भारतातला प्राणी आहे किंवा , हा मुद्दा वेगळा; परंतु भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीशी तो जोडला गेला आहे, हे नक्की. निसर्ग आणि पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या या प्राण्याने जंगलाचा राजा म्हणून मान मिळवला तो उगाच नाही. त्यामुळे प्रत्येकालाच त्याच्याविषयी, त्याच्या अधिवासाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. अलीकडच्या काही वर्षांत तर तो जागतिक पातळीवरील महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या, त्याच्या अधिवासाबद्दलच्या लिखाणाची यादी वाढते आहे. नुकतेच विलास गोगटे यांनी ‘माझे जंगलातील मित्र- वाघ’ हे स्वानुभवावरील पुस्तक लिहिले आहे. अतिशय साध्या, सोप्या, सरळ भाषेत मांडलेल्या त्यांच्या अनुभवांनी समृद्ध अशी या पुस्तकाची रचना झाली आहे.
चंपा वाघिणीची सुरस आणि माहितीपूर्ण कथा या पुस्तकात लेखकाने गुंफली आहे. वाघाच्या बछडय़ांचा मोठा होण्यापर्यंतचा प्रवास रंजकपणे सादर केला आहे. वाघाचे बछडे दोन वर्षांचे होईपर्यंत आईजवळच राहतात आणि नंतर हळूहळू ते शिकारीचा सराव करता करता आईपासून वेगळे होतात, हे सर्वाना माहीत आहे. मात्र, तो प्रवास कसा असतो, यातले बारकावे फक्त या क्षेत्रातील तज्ज्ञांनाच ठाऊक असतात. लेखकाने हा प्रवास ज्या पद्धतीने वर्णन केला आहे, ते बघता सुरुवातीला लहानांसाठी ही कथा गुंफण्यात आली असावी असे वाटते. मात्र, मोठी माणसे जेव्हा हे पुस्तक सहज म्हणून चाळायला घेतील, तेव्हा तेसुद्धा आवडीने वाचतील, हे नक्की. वास्तव आणि विज्ञान या दोहोंची सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे. अर्थातच त्यांच्याजवळ तेवढा स्वानुभव आहेच.
यातल्या दुसऱ्या प्रकरणात वाघाची कुळकथा मांडलेली आहे. वाघ हा भारतीय प्राणी आहे, याच भ्रमात अध्रेअधिक लोक आहेत. पण सुमारे एक कोटी वर्षांपूर्वीची सैबेरियातील त्याची उत्पत्ती आहे. मार्जार कुळाच्या उत्पत्तीपासून वाघाचा सैबेरिया ते भारत हा प्रवास, आजघडीला वाघांचे वास्तव्य असलेले देश, वाघांच्या जाती-प्रजाती यांचीही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. वाघाचे छायाचित्र असलेली स्टॅम्प तिकिटे, वाघाचा छाप असलेली नाणी यात पाहायला मिळतात.
कथेपासून सुरू झालेल्या या पुस्तकात गोगटे यांनी काही तांत्रिक बाजूही मांडल्या आहेत. मार्जार आणि श्वानकुळातील प्राण्यांमध्ये साम्य दिसत असले तरीही त्यांच्यातल्या छोटय़ा छोटय़ा फरकांविषयी या पुस्तकातून कळते. उदाहरण द्यायचे झाल्यास मार्जार कुळातील प्राण्यांच्या पायांच्या बोटांमधून नखे दिसत नाहीत, तर श्वान कुळातील प्राण्यांच्या पायातील बोटांमधून नखे स्पष्टपणे दिसून येतात, हा फरक आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. अशा छोटय़ा छोटय़ा, पण महत्त्वाच्या गोष्टी चित्रांतून आणि शब्दांत मांडण्यात आल्या आहेत. वाघ आणि माणसाचे नाते, प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जमातीतील त्याचे महत्त्व, त्याला देव मानणाऱ्या जमाती अशा कितीतरी नावीन्यपूर्ण गोष्टी यातून कळतात. याव्यतिरिक्त भारतातील काही महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये यांचीही माहिती थोडक्यात दिली आहे.
वाघ आणि त्याचा अधिवास हा गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय असला तरीही त्याच्यासंबंधातील कित्येक प्रश्नांच्या उत्तरापासून सामान्य माणसे अनभिज्ञ आहेत. इंग्रजांच्या काळात या रुबाबदार प्राण्याची शिकार हा अभिमानाचा विषय होता. भारत स्वतंत्र झाला आणि शिकारीवर बंदी आली. मात्र, इंग्रजांचा काळ अधिक चांगला होता की आताचा, हा प्रश्न पडावा इतपत वाघांच्या शिकारीचा आलेख चढता राहिलेला आहे. म्हणूनच जंगलाच्या संवर्धनासाठी गेली अनेक वष्रे काम केल्यानंतर विलास गोगटे यांच्या लेखणीतून उतरलेले हे पुस्तक नक्कीच वाचनीय आणि मननीय आहे.
‘माझे जंगलातील मित्र : वाघ’  – विलास गोगटे,
ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १०३,
मूल्य- १०० रुपये.