तुम्हांस दिवाळीचा लाडूही गोड लागत नाही? सर्वत्र अंधार दाटल्यासारखे वाटते? पाठ नेहमीच दुखते आपली. पण आज कोणीतरी पाठीत खंजीर खुपसल्यासारखे वाटते? निकालानंतर तोंडावर पडून आपलाच ‘नारायण’ झाल्यासारखे वाटते?
lok03मग निश्चित समजा, आपलाच काहीतरी गैरसमज झालाय! आपल्यामध्येच काहीतरी वैचारिक दोष आहे. फार काय, आपल्यालाच मेंदूच्या.. किमानपक्षी डोळ्यांच्या डॉक्टरची आवश्यकता आहे.
का की, तुम्ही समजता तसे काहीच झालेले नाहीये!
आता तुम्ही पुसाल, की मग हे जे काही चाललेले आहे ते ठीक आहे का? तर तुम्हांस सांगतो, हे जे काही चालले आहे ते ठीकच चालले आहे.
मग तुम्ही म्हणाल, की काल एकमेकांची वसने फाडत होते, ते आज एकमेकांच्या नेसूचे पंचे झाले आहेत. हे कसे?
तर तुम्हांस या बोटावरच्या शाईची शप्पथ घेऊन सांगतो, हे आपल्या तमाम माध्यमकर्मीनी रचलेले भलेमोठे षड्यंत्र आहे. वृत्तपत्रे आणि च्यानेलांचे कारस्थान आहे. तुमचा आणि आमचा लोकशाहीवर गाढा विश्वास. तो डळमळीत करण्याचा हा पंचमस्तंभी डाव आहे.  
हातात लेखणी आहे. खोटे सांगणार नाही. कालपर्यंत आम्हांसही तुमच्यासारखेच वाटत होते.
पण आम्हांस अचानक या अवघ्या छद्मी मॅट्रिक्सचे दिव्यज्ञान झाले. त्या दैवी प्रकाशात आम्ही किंचित मागे वळून पाहिले.
आणि राजे हो, आम्हांस काय दिसले?
त्याचीच ही एक झलक..
ती पाहा. ती पाहा. मुंबईतल्या सोमय्या मैदानावरची भव्य सभा.
आपले परमपूज्य पंतप्रधान आणि भारतभाग्यविधाते नरेंद्रभाई मोदी आपल्या अमृतवाणीची बरसात करीत आहेत. गेल्या काही दिवसांत या बरसातीने महाराष्ट्रभूमी अक्षरश: पूरग्रस्त झाली आहे. पण प. पू. पं. नरेंद्रभाईंच्या वाणीचा मान्सून कोसळतच आहे.
‘मित्रों, मला शरद पवार यांना विचारायचे आहे, की तुम्ही तर देशाचे कृषीमंत्री होता. मग तुमच्या राज्यातच एवढे सिंचन प्रकल्प का झाले? तुमच्या राज्यातलाच शेतकरी एवढा सुखी का? त्यांचा पक्ष एनसीपी. कांग्रेसचे मुख्यमंत्री म्हणतात, एनसीपी भ्रष्टाचारी आहे. कोणी म्हणते, ती नॅचरली करप्ट पार्टी आहे. मी सांगतो, ती नॅचरली कोलिएशन पार्टी आहे!
शरदराव, मैं आप को बताता हूं, या निकालानंतर या राज्याची जनता तुमची कदापि सुटका करणार नाही. तुम्हाला केवळ राज्याचे हित पाहू देणार नाही. तुम्हाला केंद्रात जावेच लागेल.. कारण तुमची पार्टी तर नॅचरली कोलिएशन पार्टी आहे!’
प. पू. पं. नरेंद्रभाईंचे हे भाषण दाखविण्यासाठी भाजपने कोणत्या च्यानेलला पैसे दिले नव्हते काय? दिले होते. मित्रों, दिले होते. पण कटकारस्थान! तुम्हाला हे कोणी ऐकवलेच नाही!
आमचे परमलाडके  नेते व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते भाषण तरी कुणी ऐकवलेय?
‘मी मर्दाचा बच्चा आहे. पण यांनी आमची साथ सोडली. ऊंऊंऊं. २५ वर्षांची युती तोडली. ऊंऊंऊं. आम्हाला म्हणाले, गपचुप दिल्या जागेवर बसा.. ऊंऊंऊं. फसवलं मला. ऊंऊंऊं. आता मी त्यांना अफझुल्याच म्हणणार. दिल्ली की बिल्ली म्हणणार. पोकेमॉन, डोरेमॉन पण म्हणणार..’
झाला ना तुमचा हातरुमाल ओला?
काळजाला घरे पाडणाऱ्या या भाषणाचे सोडा. किमान ती जाहिरात तरी दाखवायची होती. पण नाही. बाकीच्या सगळ्या दाखविल्या; पण नेमकी ही मात्र दडवली..
एक तरणाताठा, गोडगोजिरा माणूस असा फुटपाथवर उभा आहे. समोर मंत्रालय. मध्ये रस्ता. त्यावर गाडय़ा सुसाट धावताहेत. मग हिरवा सिग्नल लागतो. तरी त्याला रस्ता ओलांडताच येत नाही. कारण त्याच्यात बळच नसते. मग एक मिशीवाला माणूस येतो. म्हणजे आधी येत नाही. बोलावल्यावर येतो. नमस्कार करतो. म्हणजे आधी करीत नाही. याने केल्यावर करतो. मग ते एकमेकांचा हात धरतात. बरीच ओढाताण करतात, पण रस्ता ओलांडतात. तेव्हा तो गोडगोजिरा त्याला विचारतो, ‘भावा, तुझे नाव काय?’ तेव्हा तो मिशीवाला म्हणतो, ‘माझे नाव शिवसेना!’
ही जाहिरात आधीच दाखविली असती तर झाला असता का गैरसमज?
आमचे जाणते राजे महामहीम शरदश्चंद्रजी पवारसाहेब यांनी तर हज्जारदा सांगितले की, समविचारी पक्षांशी आम्ही युती करणार. शिवाय आपण आशावादी असून, राष्ट्रवादी सत्तेवर येणार, हेही त्यांनी सांगितले.
यात गैरसमजाला कुठे वाव होता? पण हल्ली माध्यमांतल्या मंडळींचा अभ्यास कमी पडतो!
पवारसाहेबांचा विचार म्हणजे सत्ता.
हाच ज्यांचा विचार- ते सगळे साहेबांच्या समविचारी धोरणात बसणारे.
प्रश्नच मिटला! पण कोणीही आपणास हे सांगितलेच नाही.
अशा अज्ञान अंध:कारामुळेच आज येथील मतदारराजा गोंधळला आहे.
त्याला दिवाळीचा उरलासुरला लाडू गोड वाटत नाही. पाठीत खंजीर खुपसल्यासारखे वाटते.
फार काय, निकालानंतर आपलाच ‘नारायण’ झाल्यासारखी भावना वारंवार होते.
राजकारणात ‘ध’चा अर्थच ‘मा’ असतो, ही दिव्यदृष्टी त्याला कधी लाभणार कोण जाणे!
आम्हाला तर फारच काळजी वाटते या मतदारराजाच्या गैरसमजांची.
उगा टीका करीत बसतात.. नाही तर काय!!