‘दीमो’क्रसी आणि मीडिया : उलटतपासणी’ हा जयदेव डोळे यांचा लेख वाचला. लेखक स्वत: पत्रकार आहेत. लेखात त्यांनी पत्रकारांवर ज्या दुगाण्या झाडल्या आहेत त्या त्यांना स्वत:लाही लागू पडतात असे समजायचे lr04का? ज्या ‘ओपन’, ‘आउटलुक’, ‘तहलका’मधील लेखांची ते भलामण करतात त्यांची विश्वासार्हता कोणी ठरवायची? अनिरुद्ध बहल, तरुण तेजपाल यांची कृत्ये प्रसिद्ध झाल्यावर त्यांचा दांभिकपणा पुरता उघड झाला आहे.
विचारांचे सामान्यीकरण करून सर्वच माध्यमांनी मोदींसाठी भाटगिरी करून त्यांना निवडून आणले, हे डोळे यांचे विधान ‘लोकसत्ता’ आणि अशा वृत्तीच्या  नसलेल्या माध्यमांतील पत्रकारांवर प्रचंड अन्याय करणारे आहे. याउलट ‘मीच स्वछ आणि नि:स्पृह’ या  स्व-प्रतिमेच्या प्रेमात पडलेले डोळे कार्यकुशलता, हुशारी, तडफ, जिद्द या मोदींच्या नेतृत्व गुणांकडे दुर्लक्ष करून त्यांना कायम गोध्य्राच्याच पिंजऱ्यात अडकवू पाहतात. जनमानसातील मोदींची उंचावलेली प्रतिमा सहन न होऊन आपल्या पत्रकार-सहकाऱ्यांवर नीतीभ्रष्टतेचा आरोप करतात. माध्यमे हे स्वत: दृश्य नसून दृश्याची प्रतिमा दाखवणारा आरसा आहे हे ते विसरतात.

हे गांभीर्याने घ्यायला हवे
वाळवा येथील कोवळ्या तरुणाने व्हॉट्सअ‍ॅपवर स्वत:ला श्रद्धांजली वाहून जीवन संपविले, या घटनेच्या पाश्र्वभूमीवर  तरुणाईच्या मानसिकतेचा वेध घेणारे लेख ‘लोकरंग’मध्ये वाचले. व्यक्त होणे ही माणसाची नैसर्गिक निकड आहे. अभिव्यक्तीला जन्मापासूनच वाव मिळणे हा आपल्या स्वतंत्र देशात प्रत्येकाचा हक्क असूनही तो मिळत नाही, हे सत्य आहे. मूल शाळेत जाऊ  लागल्यापासून ते अधिकाधिक वेळ शिक्षकांसमवेत असते. शिक्षकांनी मुलांच्या अभिव्यक्तीला वाव देणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या मनात जे काही चालले आहे, ते जाणून घेतल्याशिवाय मूल खऱ्या अर्थाने समजत नाही. मुलाला पूर्णत्वाने समजून घेण्याची क्रिया त्याला काहीही शिकविण्यापूर्वी घडून आली पाहिजे. जर ती घडून आली नाही तर मूल शिकत तर नाहीच; परंतु त्याच्या मनातील खळबळ मात्र व्यक्त न झाल्यामुळे आहे तिथेच दबली जाऊन विकृत रूप धारण करते.
 शिक्षण हे एकमेव क्षेत्र असे आहे, की जिथून मानसिकरीत्या आरोग्यपूर्ण समाज निपजणे शक्य आहे. म्हणूनच सुसंस्कृत, संवेदनशील आणि सुजाण समाज तयार करणे हे जबाबदारीचे जीवनकार्य शिक्षकांच्या हातून घडून येणे अत्यावश्यक असताना प्रत्यक्षात मात्र हे होताना दिसत नाही. आज सुशिक्षित समाज दिशाहीन होऊन भरकटत आहे, हे आपल्या सदोष शिक्षणाचे नासके फलित आहे. शाळेत मुलांना समजून घेणे, त्यांना त्यांच्या पद्धतीने व्यक्त होऊ  देणे, जेणेकरून मुलांची मने स्वच्छ राहतील, याऐवजी पाठय़पुस्तकांतील शाब्दिक माहिती मुलांच्या डोक्यात कोंबली जाते. पाठय़पुस्तकाच्या बाहेर डोके काढण्यासही मुलांना मुक्तता न देणाऱ्या शाळा आणि शिक्षण-पद्धतीही मुलांचा बालपणापासूनच अशा प्रकारे कोंडमारा करत आहे. अशी कोंडलेली मने ही व्यक्त होण्यासाठी साहजिकच मोबाइलसारख्या साधनांचा आधार घेतात. आज आपले आईवडील, नातलग हे मुलांना आधारस्तंभ वाटत नाहीत; कारण संस्कारबद्धता, रीतीभाती आणि खुळ्या रूढी यांनी सर्वानाच जखडून ठेवले असल्यामुळे स्वच्छंदीपणे व्यक्त होण्याच्या संधीला सारेच मुकले आहेत. परिणामी ‘व्यक्त होण्याचा भीषण नाद’ आजच्या तरुणाईला मृत्युपंथास लावत आहे. हे  गांभीर्याने घ्यायला हवे.  
मंजूषा जाधव, मुंबई.