मुंबईतल्या लोकल ट्रेनचा अपघात, हॉस्पिटलमधला प्रदीर्घ मुक्काम आणि आपण एका मर्यादेपर्यंतच बरं होणार आहोत, ही बोचरी जाणीव मनाशी बाळगत पुढचं सगळं आयुष्य धीराने जगण्याचं ठरवून ते अमलात आणणाऱ्या १७ वर्षांच्या धर्यकन्या मोनिका मोरे हिने यंदाची बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. ती इथेच थांबणार नाही. नव्या हातांनी जेव्हा तिने आपलं नाव लिहिलं, तेव्हा तिचं मुळातलं सुवाच्य अक्षर आठवून तिच्या आईचे डोळे पाणावले. मोनिका नेटाने लिहीत राहील अशी खात्री तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघून वाटते. नवीन बसवलेल्या कृत्रिम हातांनी बी. कॉम.ची परीक्षा जमलं तर स्वत:च्याच हातांनी पेपर लिहून द्यायचा तिचा मानस आहे. आणि मेंदीही काढायची आहे तिला त्या हातांनी. एका वर्षांत मोनिकाचं सारं आयुष्य बदलून गेलं. मोनिकाने नक्कीच विचार केला असणार, की रेल्वे अपघातामुळे आलेलं अपंगत्व कायमचंच आहे; तेव्हा किती दिवस रडत बसायचं?  तिची मावशी म्हणते की, मोनिकाचे आई-वडील सारखे डोळ्यांतून टिपं काढीत, पण मोनिका कधी रडली नाही. कृत्रिम हात बसवून घेणं आणि त्यांचा वापर करायला शिकणं वेदनामय असलं तरी तिने ते प्रयत्नपूर्वक स्वीकारलं. कृत्रिम हात वापरताना होणारा त्रास, वेदना सहन करत नेटाने पुढच्या आयुष्याची वाटचाल करणाऱ्या मोनिकाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक करावं तेवढं थोडंच.
या पाश्र्वभूमीवर अमेरिकेतली एक ताजी घटना आठवली. ३० वर्षांच्या शॉनच्या मरणाची बातमीही दोन-तीन महिनेच जुनी. अमेरिकेत जन्मलेल्या शॉनलाही असंच १६ व्या वर्षी एका मोठय़ा दुखण्याला सामोरं जावं लागलं. शॉनला नॅन्सी आणि मायकेल पेट्रोझिनो दाम्पत्याने तो लहान बाळ असतानाच दत्तक घेतलं होतं. शॉन आई-वडिलांचा अतिशय लाडका होता. आई शाळेत शिक्षिका. वडील स्वत:चा पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करीत. त्यांनी शॉनला चांगलं वळण लावलं होतं. मायकेल क्लॅरिओनेट वाजवीत असे. शॉनही ते वाजवायला शिकला. त्याच्या प्रत्येक कॉन्सर्टला मायकेल न चुकता जात असे. खूप सुखी कुटुंब होतं ते!
पण १६ वर्षांचा शॉन आजारी पडला तेव्हा सुरुवात घसा दुखण्याने झाली. बघता बघता हुडहुडी भरून १०४ डिग्री ताप आणि उलटय़ा सुरू झाल्या. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी ‘बॅक्टेरिअल मॅनेन्जायटिस’ असं त्याच्या दुखण्याचं निदान केलं. सहा तासांचं आयुष्य उरलं आहे, असंही सांगितलं. पण शॉनच्या आयुष्याची दोरी बळकट! तो दुखण्यातून बाहेर आला; सहीसलामत मात्र नाही. दोन्ही हातांच्या तळव्यांचा बराचसा भाग, बोटं  आणि गुडघ्यापासून खालचे दोन्ही पाय त्यानं गमावले.
मात्र, लोकांच्या शॉन लक्षात राहिला तो त्याच्या सकारात्मक विचारांमुळे. तो म्हणत असे की, ‘बऱ्या आणि वाईट गोष्टी बऱ्याचदा अशाच घडतात. लॉटरीचं तिकीट लागणं ही चांगली गोष्ट आणि माझ्यासारखं हात-पाय गमावून बसणं, ही वाईट गोष्ट. मात्र, या वाईट प्रसंगी मला माझ्या आई-वडिलांचं आणि मित्रपरिवाराचं मिळालेलं प्रेम, आधार यांना तोड नाही.’ शॉनला लोकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. आवाजाच्या कमांड्सवर चालणारा लॅपटॉप, त्याच्याकरता खास तयार केलेली व्हॅन व विशेष व्हीलचेअर कंपन्यांनी त्याला भेट म्हणून दिली.  हायस्कूलमध्ये असतानाच त्याची सिंथियाशी मत्री झाली. चार वर्षांनी दोघांनी लग्न केलं.
शॉनचं आयुष्य नंतर मात्र भरकटलं. दोन र्वष कॉलेजमध्ये जाऊन त्याने ते सोडून दिलं.  कशातच करिअर केलं नाही. सिंथियाचं कॉलेजचं शिक्षण चालू होतं. दोघांनी  बँकेचं कर्ज काढून घर घेतलं. पण दोन-तीन वर्षांमध्ये ते बँकेनं परत घेतलं. त्यांना बँकेचे हप्ते भरता आले नव्हते. सिंथियाशी पटेनासं झाल्यावर दोघं विभक्त झाले. सिंथियापासून विभक्त झाल्याचं अतोनात दु:ख शॉनला  झालं. कुत्र्याला घेऊन शॉन आई-वडिलांच्या घरी परत आला. आई-वडील मोठय़ा घरात राहत होते. दोघांच्या उत्तम नोकऱ्या होत्या. शॉनने आपल्या आयुष्यातल्या काही घडामोडी आई-वडिलांना सांगितल्या नव्हत्या. आल्यापासून आठव्या दिवशी त्याने आई-वडिलांना गोळ्या घालून मारलं आणि वडिलांची गाडी घेऊन कुत्र्यासोबत तो ड्राइव्ह करत राहिला.. अगदी दिशाहीन असा. शॉनची आई शाळेत गेली नाही, तिने रजाही मागितली नव्हती. तिला केलेल्या फोन कॉल्सना उत्तर मिळत नाही म्हटल्यावर शाळेने पोलिसांत कळवलं. थोडय़ाच वेळात पोलीस आले. शॉनच्या वर्णनावरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. शॉन ड्राइव्ह करत दुसऱ्या राज्यात गेला होता. रस्त्यात एकीकडे यू टर्न घ्यायला मनाई असताना तो त्याने घेतला म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी त्याला थांबायला सांगितलं. शॉनने जवळच्या पिस्तुलातल्या गोळीने आपलं आयुष्य पोलीस गाडीजवळ पोहोचण्याआधीच संपवलं होतं. बंदुकीची त्याला उत्तम माहिती होती. कृत्रिम तळवे वापरणं त्यानं कधीच सोडलं होतं. कृत्रिम पाय मात्र त्याला वापरावेच लागत. शॉनची मित्रमंडळी, सिंथिया, सिंथियाची आई, त्याचे शेजारी सगळ्यांच्याच मते, शॉन हा अगदी शांत तरुण होता. त्याचं खासगी आयुष्य भरकटलं होतं. जवळ पसा  नव्हता, चरितार्थासाठी तो काहीही कामधंदा करत नव्हता, मनातल्या गोष्टी तो मित्रांकडे किंवा आई-वडिलांकडे बोलत नव्हता. आई-वडील सधन होते. त्यांचं स्वत:चं घर होतं. पसे मिळवण्याचा सोपा मार्ग शॉनने निवडला. आपल्याला इतकं सुंदर आयुष्य देणारे, आपल्या दुखण्यात जिवाचं रान करणारे, सिंथियाबरोबर थाटात लग्न लावून देणारे आई-वडील नंतर मात्र शॉनच्या लेखी पसे मिळवायचा सोपा मार्ग म्हणूनच उरले. शॉनने केलेलं हे अघोरी कृत्य अमेरिकेतील कुटुंब- व्यवस्थेबद्दल बरंच काही सांगून जातं.
अमेरिकेतले सगळेच शॉन आणि सिंथिया हायस्कूलचं शिक्षण झालं की घराबाहेर पडतात. (अमेरिकेत हायस्कूलपर्यंतचं शिक्षण फुकट असतं.) तोवर ती साधारण १७ वर्षांची झालेली असतात. आयुष्याचा जोडीदार, ड्रायिव्हग लायसन्स, नोकरी वगैरे दृष्टिपथात आलेलं असतं. काही स्वत:च्या हिमतीवर (बहुतेक वेळा नोकरी करत किंवा कर्ज काढून) कॉलेजचं शिक्षण घेतात, राहायला घर बघतात आणि स्वत:चं बरं-वाईट भविष्य स्वत:च घडवतात. आई-वडिलांचं अस्तित्व त्यांच्या आयुष्यातून धूसर होत जातं. स्वातंत्र्याच्या या मुक्त, मोकळ्या वातावरणात बरेचसे तरुण तरतात, पण शॉनसारखे काहीजण भरकटतातही! आपल्या आणि इथल्या संस्कृतीतला हा फरक प्रकर्षांनं जाणवतो.
शशिकला लेले – naupada@yahoo.com
फ्लोरिडा