आजही डॉ. डेमिंग यांची शिकवण तितकीच शिरोधार्य आहे. अनुकरणीय आहे. भारतात अनेक ठिकाणी डॉ. डेमिंग यांच्या विचारसरणीवर आधारित अभ्यासक्रम, प्रशिक्षण वर्ग चालवले जात आहेत. लखनौमध्ये तर एक शाळा डेमिंगच्या तत्त्वप्रणालीवरच चालवली जाते. डॉ. डेमिंगची तत्त्वे शालेय जीवनापासूनच तेथील विद्यार्थ्यांना शिकवली जातात.
२० १२ सालचा अखेरचा महिना आता सुरू झाला आहे. साल संपत आले आहे. गेले वर्षभर आपण डॉ. एडवर्ड डेमिंगच्या विचारसरणीचा परिचय करून घेतो आहोत. डेमिंगच्या विचारप्रणालीचा मुख्य भर आहे तो ‘शासन-उद्योग जगत-शिक्षण आणि आरोग्य’ या चार विभागांच्या परस्पर सहकार्यावर-सामंजस्यावर. शिक्षणाविषयी बोलताना एका भाषणात डेमिंग म्हणतो, ‘आपल्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था या वास्तवात विद्यार्थ्यांना केवळ भूतकाळात काय घडले याचीच जाणीव करून देत असतात. भावी काळाची आव्हानं स्वीकारणं, भविष्यकाळ घडवणं या आघाडीवर अशा शिक्षणसंस्था अनेकदा अपयशी ठरतात. विद्यार्थ्यांनी अर्थार्जन कसे करावे, पैसे कसे मिळवावेत यावरच सगळा भर आहे. समाजाकरता आपण नेमके काय योगदान दिले पाहिजे या बाबतीत सर्वत्र सामसूम आहे.’
डॉ. डेमिंगचा पैसा कमवायला विरोध होता असा याचा बिलकूल अर्थ नाही. मात्र ते एकमेव ध्येय असता कामा नये; पैसा मिळवताना आपल्या योगदानाकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये असेच त्याला सुचवायचे आहे. डॉ. डेमिंगच्या या विचारांचा प्रभाव जपानवर इतका खोलवर रुजला आहे, की सामान्य जपानी नागरिक ‘सरकार-उद्योग-शिक्षण आणि आरोग्य’ या चारही विषयांत आपले व्यक्तिगत योगदान काय याविषयी सदैव दक्ष असतो.
डॉ. डेमिंग यांचा भारताशीही संबंध आला होता. आश्चर्य म्हणजे भारताविषयीही त्यांना विलक्षण आस्था वाटत होती. भारतीयांकडून त्यांना खूप आशा होत्या. डॉ. एडवर्ड डेमिंग १९३४ साली इंग्लंडमध्ये संख्याशास्त्र या विषयात पीएच.डी. करत होते. यावेळी त्यांचे सहाध्यायी होते प्रख्यात भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचन्द्र महालनोबीस. जागतिक कीर्तीच्या या शास्त्रज्ञाचे नाव आज भारतात फार मोजक्या लोकांना ठाऊक असेल. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर स्थापण्यात आलेल्या पहिल्या योजना आयोगाच्या अध्यक्षपदी याच द्रष्टय़ा शास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९४५ साली महालनोबीस यांनी, ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट’ची स्थापना केली. डॉ. डेमिंगचा आणि त्यांचा इंग्लंडमध्ये एकत्र शिकताना चांगलाच स्नेह जुळून आला होता.
योजना आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर डॉ. महालनोबीस यांच्यासमोर पहिले मोठे आव्हान होते, ते स्वतंत्र भारताच्या जनगणनेचे. हे जगड्व्याळ काम सुरू झाले आणि भारताच्या योजनाबद्ध विकासाचा सखोल-तपशीलवार विचार व्हावा या हेतूने त्यांनी डॉ. डेमिंग यांच्याशी संपर्क साधला. ही १९४७ सालातली घटना आहे. डॉ. डेमिंग त्या सुमारास आपल्या पहिल्यावहिल्या जपान दौऱ्यावर निघणार होते. ‘गुणवत्ता’ या विषयावर जपानमध्ये त्यांच्या व्याख्यानांचा दौरा ठरला होता. याच जगप्रसिद्ध व्याख्यानातून जपानला आपल्या प्रगतीचा रस्ता सापडला.
जपानला जाण्याच्या धावपळीत असतानाच डॉ. डेमिंग यांना महालनोबीस यांचे भारत भेटीचे निमंत्रण मिळाले. इंग्लंडमध्ये एकत्र शिकत असतानाच्या काळात डॉ. डेमिंग आपल्या महालनोबीस व इतर काही भारतीय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेने अतिशय प्रभावीत झाले होते. तो १९३७ काळ. स्वातंत्र्याचे आंदोलन ऐन भरात होते. इंग्लंडमध्ये विद्यापीठात याविषयी साहजिकच चर्चा झडत असत. डॉ. डेमिंग या सगळ्याकडे अतिशय कुतूहलाने पाहात असत. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच त्यांना भारताविषयी जिज्ञासा आणि आस्था होती. महालनोबीस यांचे पत्र मिळताच त्यांनी उत्तर धाडले. या पत्रात त्यांनी भारतीय संख्याशास्त्रज्ञांबरोबर काम करण्यास आपल्याला आनंदच वाटेल असे स्पष्टपणे लिहिले.
महालनोबीस यांना कमालीचा आनंद झाला. त्यांनी या प्रकल्पाला आकार यावा याकरिता सर्व थरांवर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. डॉ. डेमिंग यांच्याशीही ते सतत संपर्क ठेवून होते. डॉ. डेमिंग यांनी महालनोबीस यांना एक मुद्दा वारंवार आग्रहाने सांगितला, ‘मी भारतात येऊन अखिल भारतीय पातळीवर काही जबाबदारी घ्यावी असे आपणांस वाटत असेल तर मला माझ्या कार्यात तुमच्या देशातील सर्वोच्च नेतृत्वाच्या सक्रिय सहभागाची नितांत आवश्यकता आहे. माझी चळवळ अमेरिकेत साफ अपयशी ठरली याचे कारण त्यात अमेरिकेतील सर्वोच्च नेतृत्वाचा सहभाग नव्हता.’
महालनोबीस यांना हा मुद्दा पटला आणि लगेचच त्यांनी त्यावेळचे आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संपर्क साधला. पंडित नेहरू विचाराने अत्यंत आधुनिक-अतिशय विशाल दृष्टिकोन असलेले-विचारांची व्यापक बैठक लाभलेले म्हणून प्रसिद्ध. आपल्या या कल्पनेचे ते नक्की स्वागत करणार, अशी डॉ. महालनोबीस यांना पक्की खात्री होती. प्रत्यक्षात मात्र पंडित नेहरूंचा प्रतिसाद अतिशय थंड होता. डॉ. डेमिंगना भेटण्यात पंडित नेहरूंना फारसा रस नाही हे महालनोबीस यांच्या लक्षात आले. महालनोबीस यांनी आपल्या परीने नेहरूंना समजवण्याचा परोपरीने प्रयत्न केला. पण नेहरूंचे मन वळवणे त्यांना शक्य झाले नाही. नेहरू हे त्या काळात संपूर्णपणे साम्यवादी विचारांच्या-रशियाच्या प्रभावाखाली होते आणि डॉ. डेमिंग हा शेवटी बोलूनचालून अमेरिकन. त्यामुळे नेहरूंचे मत काहीसे पूर्वग्रहदूषितच होते. त्यात नुकतेच अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले होते. प्रचंड नरसंहार झाला होता. सर्व जगात अमेरिकेची निर्भर्त्सना होत होती. ‘शांतीदूत’ नेहरूंच्या मनात त्या काळात अमेरिकेविषयी तीव्र कटुता असणार, हेही आपण समजू शकतो. कारणे काहीही असोत डॉ. डेमिंगला भेटण्याविषयी नेहरू उत्साही नव्हते, हे मात्र खरे.
मात्र तरीही डॉ. महालनोबीस यांच्या शब्दाचा मान राखण्याचा उदारपणा नेहरूंनी दाखवला. पंडित नेहरू आणि डॉ. डेमिंग यांची भेट झाली. मात्र ही भेट हा केवळ एक उपचार होता. डॉ. डेमिंग काय सांगणार याविषयी नेहरूंना अजिबात स्वारस्य नव्हते. आपल्या एका जवळच्या स्नेह्य़ाला डॉ. डेमिंग याने या भेटीविषयी नंतर सांगितले. डॉ. डेमिंग म्हणाले, ‘भेट कसली, एक शब्ददेखील उच्चारू दिला नाही मला नेहरूंनी.’
१९४७ नंतर जपानने जे जे ज्ञान डेमिंगकडून मिळवले, ते मिळवण्याची चालून आलेली सुवर्णसंधी आपण मात्र गमावली हे निश्चित. पंडित नेहरूंच्या योगदानाइतकीच त्यांच्या महान चुकांचीही सतत चर्चा होत असते. चीनशी झालेल्या युद्धातील आपल्या पराभवाला नेहरूंचे काही निर्णयच कसे कारणीभूत आहेत, हा विषय तर सध्या परत ऐरणीवर आला आहे. कधी कधी वाटते नेहरूंच्या चुकांच्या यादीत ‘डॉ. डेमिंगविषयी संपूर्ण अनास्था’ या चुकीचाही समावेश करावा का?
अर्थात हा जर-तरचा विषय आहे. नेहरूंनी जर का डेमिंगचे स्वागत केले असते तर भारताचा आज जपान झाला असता असले अति सपक तर्कट लढवायचे नसते हे खरे.. पण चांगली संधी गमावली हेही खरे.
अर्थात अजून ही वेळ गेलेली नाही. आजही डॉ. डेमिंग यांची शिकवण तितकीच शिरोधार्य आहे. अनुकरणीय आहे. भारतात अनेक ठिकाणी डॉ. डेमिंग यांच्या विचारसरणीवर आधारित अभ्यासक्रम, प्रशिक्षण वर्ग चालवले जात आहेत. लखनौमध्ये तर एक शाळा संपूर्णपणे डेमिंगच्या तत्त्वप्रणालीवरच चालवली जाते. डॉ. डेमिंगची तत्त्वे शालेय जीवनापासूनच तेथील विद्यार्थ्यांना शिकवली जातात. या शाळेची तीन प्रमुख तत्त्वे आहेत- शिस्त आहे, पण शिस्तीची भीती वाटता कामा नये. नात्यांना कमालीचे महत्त्व आहे, पण त्या नातेसंबंधात अपेक्षांचे दडपण नको. प्रशिक्षण तर सर्वात महत्त्वाचे, पण ते घेताना रोजचे टाइमटेबल – वर्षांची दोन सत्रे – अशी वेळापत्रकापायी होणारी कुचंबणा नको. या शाळेत महत्त्व मार्काना नाही तर विषय समजण्याला आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवड निर्माण होईल हे पाहाणे हे शिक्षकांचे प्रथम कर्तव्य आहे.
असे उपक्रम जसजसे वाढत जातील तसतसे डॉ. डेमिंगचे विचार रुजण्यास अधिक मदत होईल. अर्थात या संदर्भात अजून बरेच काम बाकी आहे आणि डेमिंगच्याच शब्दात सांगायचे तर- भरपूर काम आहे याचा अर्थ, भरपूर आनंद आहे.