आपण आपल्या जागृत जगण्याचा जास्तीत जास्त काळ ज्याच्या अमलाखाली घालवतो, ती म्हणजे हलणारी-बोलणारी चित्रे.. आणि ही चित्रे आपल्यावर ओतणारे चित्रपट आणि दूरदर्शन! अवघ्या १७६ वर्षांपूर्वी ज्या कलेची मुहूर्तमेढ रोवली गेली, आणि जगाच्या वाढलेल्या गतीला अनुसरून ज्या कलेने इतक्या कमी काळात शब्दश: जग पादाक्रांत केले, ती प्रकाशचित्रकला याचे मूळ! या कलेची वेगवेगळ्या दिशांनी वाढ होत गेली. स्थिरचित्रण करणाऱ्या उपकरणांमध्ये बदल होत असतानाच तंत्रज्ञांना चलचित्रण करण्याचे आव्हान खुणावू लागले.
पडद्यावर हलती चित्रे दाखवण्याचे प्रयोग खरे तर १८ व्या शतकातच सुरू झाले. १७९८ मध्ये एटीन गॅस्पार रॉबर्टने पॅरिसमध्ये पडद्यावर हलती चित्रे दाखवली. त्याने कंदिलासमोर चित्रे रंगवलेल्या काचेच्या पट्टय़ा ठेवून भिंगातून त्याचे प्रक्षेपण समोर ठेवलेल्या पडद्यावर केले. पट्टय़ा वेगाने सरकवून त्याने ही चित्रे हलत असल्याचा आभास निर्माण केला. या प्रयोगाला ‘मॅजिक लँटर्न’ नावाने ओळखले जाते. १८९५ च्या सुमारास भारतातही पटवर्धन पिता-पुत्रांनी ‘शाम्बरिक खरोलिका’ नावाने असाच प्रयोग केला. (त्यांच्या काही पट्टय़ा आजही उपलब्ध आहेत.) १९ व्या शतकात हलती चित्रे दाखवण्याचे अनेक प्रयोग झाले; ज्यामध्ये एक सुसंवादी साखळी असलेली चित्रे एका फटीसमोरून वेगाने सरकवल्यास हलते चित्र दिसायचे. पुढे कॅमेरा शोधल्यावर तो वापरून प्रकाशचित्रे काढता येऊ लागली आणि १८७८ मध्ये एडवर्ड मेब्रिजने अनेक स्थिर प्रकाशचित्रे एकत्र करून त्यापासून हलती चित्रमालिका तयार करण्याचे प्रयोग केले. चित्र क्र. १ मध्ये मेब्रिजने तयार केलेली चित्रपट्टी दाखवली आहे. एकापुढे एक असे अनेक कॅमेरे लावून मेब्रिजने पळणाऱ्या घोडय़ाची आणि घोडेस्वाराची अनेक प्रकाशचित्रे टिपली. पळणाऱ्या घोडय़ाच्या पायामुळे मार्गात आडवे लावलेले दोर कापले जाऊन त्याला जोडलेले कॅमेरे त्यासमोरचे दृश्य टिपत गेले व ही बारा प्रतिमांची सलग दृश्यमालिका तयार झाली. तिचे प्रक्षेपण केले गेले. हा जगातील पहिला चित्रपट होता.
१८८५ मध्ये ईस्टमन आणि वॉकरने पहिले फिल्मचे रीळ बनवले आणि १२ फेब्रुवारी १८९२ रोजी लुमिये बंधूंनी हाताने चालवल्या जाणाऱ्या, ‘सिनेमॅटोग्राफ’ नावाने ओळखला जाणाऱ्या पहिल्या चलचित्र कॅमेऱ्याचा शोध आपल्या नावावर नोंदवला. चित्र क्र. २ मध्ये दिसणारा लुमिये बंधूंचा हा कॅमेरा आजही पॅरिसमधील संग्रहालयात बघायला मिळतो.
या सर्व प्रयोगांमागे असलेले विज्ञान म्हणजे ‘दृष्टीसातत्याचा (Persistance of vision) नियम.’ या नियमानुसार आपण एखादी प्रतिमा पाहतो तेव्हा ती पुढे काही काळ आपल्या मेंदूत तरळत असते. त्याच काळात जर दुसरी प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे आली तर ती पहिल्या प्रतिमेत मिसळली जाते. आणि एकापाठोपाठ एक अशा अनेक प्रतिमा डोळ्यांपुढून वेगाने सरकल्या तर आपल्याला हलते चित्र पाहिल्याचा परिणाम दिसतो. लहानपणी पुस्तकाचे कोपरे वेगाने उलगडत गेल्यास पानांचे आकडे हलल्याचा आभास व्हायचा तोही याच नियमामुळे. (याचे सगळ्यात अलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘तारे जमीं पर’ चित्रपटातील ईशानची रेखाटनवही!) अनेक प्रयोगांनंतर असे लक्षात आले की, सलग हालचाल दिसण्याचा आभास होण्यासाठी किमान १६ चित्रे प्रति सेकंद या वेगाने ही चित्रे डोळ्यांसमोरून जाणे आवश्यक आहे. त्यानंतर चलचित्रीकरणाचा वेग ठरला तो म्हणजे २४ चित्रे प्रति सेकंद! आजही सर्व प्रकारचे कॅमेरे (आणि प्रोजेक्टर) याच गतीने चालतात.
चलचित्र निर्माण करणारा कॅमेरा म्हणजे मेब्रिजने केलेल्या प्रयोगाचे स्वयंचलित यंत्रात झालेले रूपांतर. यातही आता दोन प्रकार आहेत. पहिला फिल्मवर सदृश (analog) पद्धतीने समोरील दृश्याचे चित्र आहे तसे फिल्मवर उमटवणारा फिल्म कॅमेरा आणि दुसरा सांख्यिकी (digital) पद्धतीने संवेदकामार्फत दृश्य साठवणारा डिजिटल कॅमेरा. फिल्म कॅमेरा कसा चालतो, ते पाहू.
चित्र क्र. ३ मध्ये चलचित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्याचे संकल्पनाचित्र दाखवले आहे.
१. कच्च्या (प्रकाशाला सामोरे न गेलेल्या) फिल्मचे रीळ. प्रकाशबंद डब्यात असलेली ही फिल्म पुढे जाण्याचा मार्ग काळ्या टिंबांनी बनवलेल्या रेषेने दाखवला आहे.
२. पथ ठरवणारे रोलर, स्प्रिंगच्या साहाय्याने दाब देणारे रोलर आणि स्प्रॉकेट चक्र- गियरसारखे दात असलेल्या स्प्रॉकेट चक्राच्या दात्यांमध्ये फिल्मच्या कडेला असलेली भोके (चित्र क्र. ४) अडकतात आणि ते चक्र फिरताना फिल्मला पुढे ओढते. त्याचवेळी स्प्रॉकेट चक्राच्या वरच्या बाजूला असलेल्या पथदर्शक (Guide) आणि स्प्रिंगच्या साहाय्याने दाब देणाऱ्या रोलरमधून फिल्म पुढे ढकलली जाते.
३. कॅमेऱ्यासमोरील दृश्यावरून परावर्तित होणारे प्रकाशकिरण भिंगातून आत येतात आणि भिंगामागील (पिवळ्या रंगात दाखवलेल्या) लोलकात दुभंगले जातात.
४. निम्मे किरण (काळ्या रंगातील) उघडलेल्या पडद्यातून आत जातात आणि फिल्मवर पडतात आणि त्यावेळी समोर असलेली फिल्मची चौकट (Frame) प्रकाशाने प्रभावित (Expose) होते.
५.  बाकीचे निम्मे किरण आरशावर पडतात.
६. पडदा (shutter) म्हणजे सेकंदाला २४ वेळा उघडझाप करणारी यांत्रिकी पापणीच असते. स्प्रॉकेट चक्र चालवणाऱ्या यंत्रणेमार्फतच याचे नियंत्रण होते. जेव्हा फिल्म पडद्यासमोर येते तेव्हाच यातून प्रकाश आत सोडला जातो आणि जेव्हा एक चौकट जाऊन पुढची चौकट येत असते तेवढा वेळ यातून प्रकाश आत जाऊ  शकत नाही.
७. स्प्रॉकेट चक्राच्या खालच्या बाजूला असलेले फिल्म पथदर्शक आणि स्प्रिंग रोलर प्रभावित झालेली फिल्म पुढे ओढतात.
८. आरशातून परावर्तित होणारे प्रकाशकिरण दृश्यशोधकामधून बाहेर पडतात आणि चित्रीकरण करणारी व्यक्ती चित्रित होणारे दृश्य आहे तसे पाहू शकते.
९. पथदर्शक (guide) रोलरवरून फिल्म दुसऱ्या रीळकडे पाठवली जाते.
१०. मागील बाजूस असलेल्या रीळमध्ये दृश्य चित्रित केलेली फिल्म गुंडाळली जाते.
चित्र क्र. ५ मध्ये चलचित्र कॅमेऱ्याचे रेखाचित्र दाखवले आहे.
हा कॅमेरा आता मागे पडला आहे. याची जागा आधी चुंबकीय फिल्मवर मुद्रण होणाऱ्या VHS  कॅमेऱ्याने घेतली आणि आता डिजिटल कॅमेऱ्याचे राज्य प्रस्थापित झाले आहे.
दीपक देवधर – dpdeodhar@gmail.com

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?