अमेरिकेविषयी मराठीमध्ये आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अलीकडच्या काळात तर त्यात सारखीच भर पडत आहे. महाराष्ट्रातल्या उच्चमध्यमवर्गातील मुलं-मुली नव्वदच्या दशकात आधी शिक्षणानिमित्त आणि नंतर नोकरीनिमित्त अमेरिकेतच स्थायिक व्हायला लागली आणि त्यांच्या पालकांच्या अमेरिकेच्या फेऱ्या सुरू झाल्या. याशिवाय पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्याही याच दशकात वाढली. त्यामुळे समृद्धीच्या या आविष्कारातून अमेरिकेबद्दलच्या पुस्तकांचा सुकाळ वाढला. त्यातली बरीचशी पुस्तके अर्थातच प्रवासवर्णनपर आहेत. एकटय़ा माणसाच्या अनुभवाला मर्यादा असणार. त्यामुळे त्यांच्या पुस्तकातही त्या उमटलेल्या दिसतात.  पण या भाऊगर्दीत ‘मुक्काम पोस्ट अमेरिका : ओळख अमेरिकेच्या अंतरंगाची’ हे डॉ. मोहन द्रविड यांचे पुस्तक फारच वेगळे आणि अभिनव आहे. हे प्रवासवर्णन नाही, तर
४०-४५ वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी अमेरिका सर्व बाजूंनी आणि सर्व तऱ्हांनी समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या शोधापासून, सुरुवातीच्या इतिहासापासून दैनंदिन व्यवहारापर्यंत अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती करून घेतली. द्रविड यांची दृष्टी विचक्षण म्हणावी अशी आहे. त्यांच्या मिश्कील नजरेतून काहीच सुटत नाही. शिवाय सर्व गोष्टींकडे ते औत्सुक्याने आणि गमतीने पाहतात. त्यामुळे त्यांची निरीक्षणे अतिशय मार्मिक आणि रोचक आहेत.
हे पुस्तक म्हणजे अमेरिकेची उलटतपासणी करण्याचा प्रयत्न नाही की तिथलं काय चांगलं, काय वाईट हे सांगण्याचाही लेखकाचा उद्देश नाही. लेखकाने त्यांना जशी अमेरिका दिसली, वाचनातून समजली आणि प्रत्यक्ष व्यवहारातून उमजत गेली, तशी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा अमेरिकेचा संक्षिप्त इतिहास आहे. इतिहासापासून खानपानापर्यंत आणि राजकारणापासून भाषेपर्यंत अनेक गोष्टींचा आढावा घेत लेखकाने त्यातील वैशिष्टय़े आपल्या खुसखुशीत शैलीत सांगितली आहेत. त्यामुळे कुठलेही प्रकरण कंटाळवाणे झालेले नाही. शिवाय ‘आम्ही अमुक पाहिले, तमुक ठिकाणी गेलो’ अशी बतावणी करत पानेच्या पाने वाया घालवली नसल्याने हे पुस्तक आपल्याला स्वत:बरोबर खेचत नेते.
लेखकाच्या भाषेच्या सौष्ठवाचे आणि भाषेवरील प्रभुत्वाचे विशेष कौतुक केले पाहिजे. कुठल्या विषयाची किती लांबी-रुंदी आहे, याचे अचूक भान असल्याने त्यांनी कुठल्याच गोष्टीचे अवडंबर माजवले नाही. अर्थात या श्रेयात ग्रंथ-संपादकांचेही
योगदान असेलच.
लेखक सर्वार्थाने अमेरिकेशी एकरूप झालेले असले तरी काय सांगावे आणि किती सांगावे असे त्यांचे झालेले नाही, ही या पुस्तकाची सर्वात जमेची बाजू आहे. अमेरिकेतले लोक स्वत:च्या देशाला ‘अमेरिका’ असे क्वचितच म्हणतात. या सुरुवातीच्या निरीक्षणापासून अमेरिकेत गेल्यावर भारतीय संस्कृती कशी सर्वश्रेष्ठ आहे हे कुणालाही पटवायला जाऊ नका, या शेवटच्या सल्ल्यापर्यंत या पुस्तकातील नऊ प्रकरणे वाचनीय आहेत.
लेखक काही इतिहासकार नाहीत. पण इतिहास किती रंजकपणे सांगता, लिहिता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. अर्थात इतिहास-समीक्षकांना या पुस्तकाला इतिहास का म्हणायचे असा प्रश्न पडला असेलच. पण ज्याला अमेरिका नावाचे गारूड समजून-उमजून घ्यायचे आहे, त्याने त्याची पर्वा न करता थेट हे पुस्तक वाचायला सुरुवात करावी. त्याचा अपेक्षाभंग होणार नाही. अर्थात हा निखालस नाही. इतिहासलेखनाची शिस्त या पुस्तकात नाही. तसा लेखकाचाही हेतू नाही, पण लेखकाने शेवटी संदर्भग्रंथाची यादी दिली असती किंवा पुस्तकात आपल्या स्रोताचे धागेदोरे स्पष्ट केले असते तर अधिक बरे झाले असते हे नक्की.
मुक्काम पोस्ट अमेरिका : ओळख अमेरिकेच्या अंतरंगाची – डॉ. मोहन द्रविड
रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १९५,
मूल्य- १९५ रुपये.