जुन्या जमान्यातील शाहीर लीलाधर हेगडे यांचे हे नवे पुस्तक. वयाच्या ८६ व्या वर्षीही हेगडे कार्यरत आहेत आणि तितक्याच जोमाने लिहीतही आहेत. हे त्यांचे नवे पुस्तक भारतातील सरकारी पातळीवरील भ्रष्टाचाराच्या गोष्टी सांगते. म्हणजे या पुस्तकात अशा २४ सुरस व सरस भ्रष्टकथा आहेत. ‘स्वातंत्र्याला दीडशे वर्षे पूर्ण’ हा २०९७ साली काय परिस्थिती असेल याविषयीची फँटसीमय गोष्ट सांगणारा लेख आहे. त्याच्या शेवटी ‘हा मजकूर वाचून जी व्यक्ती बेचैन होईल, तिने भ्रष्टाचार करणार नाही अशी शपथ घ्यावी’ अशी विनंती केली आहे. साठ टक्के, चाळीस टक्के, कचरा, हातभट्टी, बदली, दूध, टेंडर, मिटवामिटवी, सर्टिफिकेट अशी एकेका प्रकरणाची नावे आहेत. भ्रष्टाचार कुठे कुठे आणि कसा कसा होतो, याच्या या कथा मात्र बऱ्याचशा बाळबोध आणि सरधोपट आहेत.
‘मेरा भारत महान‘ – शाहीर लीलाधर हेगडे, खासगी प्रकाशन, पृष्ठे- १०८, मूल्य- ८० रुपये.

जुन्या हिंदी गाण्यांच्या आठवणी
हिंदी चित्रपटातील जुन्या गाण्यांचे शौकीन लोक तसे पुष्कळ  असतात आणि ते साधारणपणे ज्येष्ठ या वर्गात मोडणारे असतात. असे लोक हौसेने त्याविषयी लिहितात. पण ते ज्या समरसतेने गाणी ऐकतात, ती समरसता त्यांच्या लेखनात उतरत नाही. त्यामुळे त्यांचे लेखन हे केवळ तपशील आणि आठवणी सांगणारे होते. या पुस्तकाचेही तसेच झालेले आहे. हिंदी गाणी, त्यांचे गायक, संगीतकार यांच्याविषयीचे वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रकाशित झालेले लेख यात एकत्र वाचायला मिळतील. ज्यांना जुन्या गाण्यांविषयी नव्यानं जुनंच काही जाणून घ्यायचं आहे, त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जावं.
‘सुरा मी वंदिले’ –     प्रा. कृष्णकुमार गावंड, सिद्धार्थ प्रकाशन, मुंबई, पृष्ठे- १४४, मूल्य- २५० रुपये.

(अ)सामान्य आत्मचरित्र
रवी गावकर या गोव्यातील कोळमे या छोटय़ाशा खेडेगावात ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या माणसाचं हे आत्मचरित्र.  शिक्षणाच्या तळमळीने गावकर यांनी वयाच्या सहाव्या वर्षी घर सोडले. स्वत:च्या हिमतीवर ते वयाच्या २१व्या वर्षी दहावी पास झाले. ६६ साली अमेरिकेला गेले. तिथे शिक्षण घेऊन नंतर नोकरी केली. स्वत:ची कंपनी सुरू केली. अमेरिकेत मराठी संस्कृती जपण्याचा आपल्यापरीने प्रयत्न केला. याची ही तपशीलवार हकीकत आहे. १९६०-७०च्या दशकात अमेरिकेत गेलेल्या मराठी माणसांच्या प्रेरणा, परंपरा आणि विचारधारा यांचे प्रतिबिंब या पुस्तकातून काही प्रमाणात जाणून घेता येते. निर्मळ आणि प्रांजळपणा हे या आत्मचरित्राचे विशेष आहेत. त्यामुळे किमान वाचनीयतेची पायरी त्याने गाठली आहे.
‘जिद्द- ओपा, गोवा ते क्लीव्हलंड, यूएसए व्हाया..’- रवी गावकर, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ३१२, मूल्य- २५० रुपये.

‘ती’च्या सनातन दु:खाविषयी..
कवी ना. धों. महानोर यांनी ‘तिची कहाणी’ या कवितासंग्रहात ग्रामीण भागातील स्त्रियांच्या भोगवटय़ाविषयी लिहिले आहे. ही कविता केवळ पीडित-अत्याचारित स्त्रीचीच नाही तर समाजाच्या मानसिकतेचीही आहे. त्या कवितेचे हे विश्लेषण करणारे हे पुस्तक. विद्यापीठीय प्रबंधाचे पुस्तकरूप असले तरी ते तुलनेने सुसह्य़ आहे. शेवटी महानोर यांची मुलाखत दिली आहे. ती मात्र वाचनीय आहे. त्यामुळे त्यांची या कवितेमागची प्रेरणा जाणून घ्यायला मदत होते. मात्र परिशिष्ट दोनमध्ये ‘हिंदोळ्यावर’ ही महानोरांची कविता का दिली आहे, याचे प्रयोजन लक्षात येत नाही. त्याचा खुलासा करायला हवा होता.
‘तिची कहाणीच्या निमित्तानं’- वृषाली श्रीकांत, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, पृष्ठे- ११२, मूल्य- १०० रुपये.

एक ‘सुशील’ चरित्र
केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे हे नवे चरित्र. याआधीही त्यांची पाच-सात चरित्रं प्रकाशित झाली आहेत. हैदराबाद येथील मुक्त पत्रकार, चरित्रकार आणि मानसशास्त्रज्ञ पी. आर. सुबास चंद्रन यांनी हे चरित्र लिहिले आहे. या मूळ इंग्रजी चरित्राचे नाव ‘हू रोट माय डेस्टिनी’ असे असणे आणि मराठी अनुवाद ‘एका संघर्षांची वाटचाल’ असे असणे हे तसे पटण्यासारखे आहे. २१ प्रकरणांमधून त्यांनी चरित्रनायक सुशीलकुमार शिंदे यांचा जीवनपट उभा केला आहे. ही यशाची प्रेरक कथा आहे. संकटांतून मार्ग काढत पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना बळ देणारी कहाणी आहे. साधी, सोपी भाषा आणि ओघवती शैली यामुळे हे चरित्र वाचनीय झालं आहे.
‘एका संघर्षांची वाटचाल’- सुशीलकुमार शिंदे- डॉ. पी. आर. सुबास चंद्रन, अनुवाद- संतोष शेणई, अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे, पृष्ठे- १७३, मूल्य- ३३० रुपये.