व र्षां- एक अत्यंत स्मार्ट दिसणारी मुलगी- माझ्यासमोर खाली मान घालून बसली होती. तिचे डोळे अगदी मलूल दिसत होते. खांदे पडलेले.. आत येतानासुद्धा डोळ्यांतले भाव तिच्या मनातलं वैफल्य दाखवत होतेच, पण समोर बसल्यावरदेखील तिची देहबोली बरंच काही सांगून जात होती.
‘‘वर्षां, काय झालं? काय सांगायचंय तुला?’’, असं मी विचारताच तिच्या डोळ्यांतून अश्रूधाराच वाहू लागल्या. अक्षरश: दोन मिनिटं ती रडत होती. भावनांना वाट मोकळी करून देत होती. मी पण थांबून राहिलो. कारण हा निचरा होणं तिच्यासाठी आवश्यक होतं.
मग ती बोलायला लागली, ‘‘डॉक्टर खरंच मला काय करावं काहीच कळत नाही हो! असं वाटतं, सगळं सोडून द्यावं आणि कुठेतरी लांब निघून जावं. कधी कधी आयुष्यही नकोसं वाटतं. असं वाटतं, काय या ‘मनाविरुद्ध’ जगण्याला अर्थ?’’
मी विचारलं, ‘‘मनाविरुद्ध म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे?’’
‘‘काय सांगू डॉक्टर, हुशार असूनसुद्धा त्या हुशारीचा मला काहीसुद्धा उपयोग होत नाही. दहावीनंतर मला आर्ट्सला जायची खूप इच्छा होती. पुढे जाऊन मानसशास्त्र किंवा भाषांमध्ये काही करावं, अशी इच्छा होती, पण आईने रिझल्टच्या आधीच अनेकदा म्हटलं होतं की, मी सी.ए किंवा एमबीए होऊन मॅनेजमेंटमध्ये असलेली बघण्याची तिची इच्छा आहे. त्यामुळे आर्ट्सच्या माझ्या निर्णयावर ती खूश नव्हती. ती विरोध करत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावरून मला समजायचं. मग मीच ठरवलं की, माझी आई माझ्या निर्णयावर खूश नसेल तर काय उपयोग? मग कॉमर्सला गेले. हुशार असल्यामुळे तिच्या मनासारखे एमबीए झाले. आता चांगल्या कंपनीत मी मॅनेजमेंटमध्येच काम करते. पण तिथेही प्रॉब्लेमच होतो. मला निर्णयच घेता येत नाहीत. मी घेतलेल्या निर्णयाने डिपार्टमेंटमधले काही नाराज होतात, काही खूश होतात. मग मलाच त्या नाराज लोकांचे चेहेरे बघून खूप अपराधी वाटू लागतं. झोप येत नाही, काही सुचत नाही. अनेकदा वाटत राहातं की, सोडून द्यावी नोकरी. पण जो जॉबमध्ये प्रकार होतो, तोच आता घरीही होतोय. माझं लग्न ठरलं आहे. अनेक स्थळं बघून, दोन-तीनदा चर्चा करून मी हा मुलगा पसंत केला. साखरपुडाही झाला. पण आता आम्ही फिरायला जातो तेव्हा एकूण होणाऱ्या गप्पा, त्यावेळी अनेकदा त्याचं समोर येणारं वागणं मला खटकत राहतं. पसंतीच्या आधी त्याने मांडलेले विचार आणि त्याचं आचरण यात खूपच फरक आहे. मग पुढे जाऊन रिस्क घेण्यापेक्षा आताच बाहेर पडलेलं बरं, असा नुसता विचार घरी मांडल्यावर वडिलांनी आक्रमक रूपच धारण केलं. लोकं काय म्हणतील, आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, वगरे वगरे! त्यामुळे त्यांचा राग, आईचा उदास चेहरा एकीकडे, तर दुसरीकडे असा माझा होणारा नवरा ज्याच्याबद्दल मला खात्री वाटत नाही. इकडे आड तिकडे विहीर! म्हणूनच आता कित्येक दिवसापासून माझं कामात लक्ष नाही, करायचं म्हणून करते, झोप नाही, भूक नाही. जगणंच नकोसं झालं आहे. काय करायचं डॉक्टर, आता तुम्हीच मार्ग दाखवा!’’
थोडक्यात, वर्षां खूप निराश झाली होती. नराश्यग्रस्त बनली होती. अगदी टोकाचे विचारदेखील तिच्या मनात येत होते. म्हणजेच नराश्याची विरूप/नकारात्मक अविवेकी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे तिच्या कामावरदेखील परिणाम होत होता. हा परिणाम कशामुळे होत होता? असा प्रश्न विचारला तर कोणीही म्हणेल की, काय सोप्पं आहे, लग्नाच्या बाबतीत तिला टेन्शन आलं होतं, त्यामुळेच ती निराश झाली होती. म्हणजे विवाहाच्या बाबतच्या तिच्या निर्णयाचं तिला टेन्शन आलं होतं. त्यामुळे घरात जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याचा तो परिणाम होता, असाच सर्वसामान्य विचार होईल.
पण खरोखरच असं होतं का? आपण तिचे विचार तपासून पाहू या. तिच्या संवादातून आपण पाहिलं, ती म्हणत होती की, तिला या ‘मनाविरुद्ध जगण्याचा कंटाळा आलाय!’ मनाविरुद्ध म्हणजे नेमकं काय म्हणायचं होतं? पण त्याही पुढे जाऊन बघितलं तर असं दिसेल की, तिला आपल्या निर्णयावर सर्व खूशच असावेत, असं कायम वाटत आलं होतं. दहावीच्या वेळी आई आपल्या निर्णयावर खूशच असावी, म्हणून ‘मनाविरुद्ध’ निर्णय बदलला. ऑफिसमध्ये काम करताना आपल्या निर्णयांवर काही नाराज बघून तिने अनेकदा निर्णय लांबणीवर टाकले होते, काही वेळा बदलले होते. तर आत्तासुद्धा विवाहाच्या बाबतीतील तिचा विचार आई-वडिलांना पटला नाही, आवडला नाही, म्हणून ती निराश झाली होती.
आपल्या निर्णयाने, वागण्याने सगळेच कायम खूशच असावेत, ही तिची विचारपद्धती होती; जी अविवेकी आहे. आपल्या निर्णयाने सगळेच खूश राहतील, असलेच पाहिजेत हा अट्टहास होता. मग ती योग्य विचार कसा करू लागली असती? तर, ‘माझे निर्णय किंवा माझं वागणं हे जास्तीत जास्त लोकांना आवडेल, असं मी पाहीन. पण सर्वानाच एकजात खूश करणं निव्वळ अशक्य आहे, हेही मी लक्षात घेतलं पाहिजे,’ असा विचार किंवा अशी अपेक्षा तिनं करणं हे अधिक रास्त ठरलं असतं. म्हणजेच तिच्या त्या अट्टहासामुळे तिच्या अविवेकी विचारपद्धतीमुळे, ही घटना घडल्याच्या निमित्ताने तिच्या मनात नराश्याच्या विरूप भावनेचा कल्लोळ निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तिच्या ‘अविवेकी अट्टहासा’कडून ‘विवेकी अपेक्षे’कडे नेण्याने ती नराश्यापासून स्वत:ला दूर ठेवू शकणार होती. विवेकी अपेक्षेमुळे तिला क्वचित दुख झालं असतं, उदा. आईची नाखुशी वगरेमुळे. पण जीवन नकोसं करणारं नराश्य नक्की दूर राहिलं असतं.
तर या ‘अट्टहासा’कडून ‘अपेक्षे’पर्यंत तिला प्रवास करायचा होता आणि त्याचं सारथ्य मला करायचं होतं. ही सहज, सोपी प्रक्रिया नव्हती. पण तरी ते शिवधनुष्य मला पेलायचं होतं!