उस्मानाबाद जिल्ह्य़ातील नळदुर्ग किल्ल्यातील ‘पाणीमहाल ’ त्याच्या स्थापत्य आणि सौंदर्याबद्दल जगप्रसिद्ध आहे. त्या स्थापत्यास यंदा चारशे र्वष पूर्ण होत असून याचवर्षी मराठवाडय़ात झालेल्या जोरदार पावसामुळे तो त्याच्या नर-मादी धबधब्यांसह वाहू लागला आहे. या अशा पाणीमहालाचाच हा सौंदर्यानुभव.

अज दीदन ई चश्म मुहिब्बान रोशन

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात

मीगर्दद व चश्म दुश्मनान गर्दद कूर

(या पाणीमहालाकडे एखाद्या मित्राची नजर गेल्यास त्याचे डोळे प्रसन्नतेने उजळतील, तर शत्रूच्या डोळय़ांपुढे अंधारी येईल!)

सोलापूरहून हैदराबादकडे निघालो, की वाटेत नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) नावाचे पहिलेच मोठे गाव लागते. खरेतर हे गाव येण्यापूर्वी या गावाशेजारचा किल्लाच लक्ष वेधून घेतो. या नळदुर्ग किल्ल्यात असलेल्या पाणीमहाल नामक एका गूढ-अद्भुत वास्तूवरील हा फारसी लिपीतील शिलालेख व त्याचा हा अर्थ!

मराठवाडय़ात जोरदार पावसाच्या बातम्या आल्या, की हा नळदुर्ग एकदम चर्चेत येतो. एरव्ही कोरडी ठणठणीत असणारी इथली बोरी नदी दुथडी भरून वाहू लागते. हे पाणी किल्ल्यातून वाहणाऱ्या नदीवरील पाणीमहालाला येऊन धडकते. बांध भरतो आणि त्याच्या नर-मादी सांडव्यावरून तो वाहू लागतो. धावते पाणी आणि त्याला आवर घालणारी एक चिरेबंदी वास्तू यांच्या भेटीतून सौंदर्याचा आविष्कार जन्म घेतो. ज्यामुळे हा पाणीमहालच नाही तर सारा नळदुर्गच खुलून जातो. यंदा तब्बल सहा वर्षांनंतर हा आविष्कार पुन्हा अवतरल्याने अनेकांची पावले नळदुर्गकडे धावली आहेत.

सोलापूरहून ४८ तर तुळजापूरहून ३२ किलोमीटरवर हा नळदुर्ग! मोठा आकार, प्रेक्षणीय अशा अनेक वास्तू आणि मुख्य म्हणजे पाणीमहालाचे गूढ सौंदर्य या साऱ्यांमुळे हा किल्ला पर्यटकांपासून ते अभ्यासकांपर्यंत अनेकांना सतत खुणावत असतो.

हा किल्ला व्यवस्थित पाहायचा असेल तर सोलापूर किंवा तुळजापूरला मुक्काम करत भल्या सकाळीच नळदुर्गच्या दारात हजर व्हावे. नळदुर्ग गावात आल्यासरशीच ही अवाढव्य वास्तू समोर उभी राहते. १२६ एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल ११४ बुरुजांची दुहेरी तटबंदी, ही आकडेवारीच या किल्ल्याची भव्यता स्पष्ट करते.

नळदुर्ग ही चालुक्यांची निर्मिती! पण स्थानिक लोक त्याचा इतिहास अगदी पुराणातील राजा नल आणि दमयंतीपर्यंत नेऊन भिडवतात. चालुक्यांनंतर इथे बहमनी राजवट आली. या बहमनी राजवटीचे तुकडे झाल्यावर पुढे तो विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. या राजवटीतच सुलतान अबुल मुजफ्फर अली आदिलशाह पहिला याने इसवी सन १५६० मध्ये गडाला आजचे हे आक्रमक रूप दिले. अशारीतीने चालुक्य, बहमनी, आदिलशाही, मुघल आणि सरतेशेवटी हैदराबादचा निजाम असा भलामोठा प्रवास करत हा नळदुर्ग आज एक राष्ट्रीय स्मारक बनला आहे.

तब्बल हजारएक वर्षे जुनी ही काळाची पावले शोधतच आपण नळदुर्ग फिरू लागतो. गड विस्ताराने भलामोठा आणि त्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंचीही तेवढीच गर्दी. हत्तीखाना, मुन्सिफ कोर्ट, जामे मशीद, धान्य – दारूगोळय़ांची कोठारे, ब्रिटिशांची स्मारके, मछली बांध, नऊ पाकळय़ांचा नवबुरूज, रंगमहाल, बारादरी, राजवाडा, राणीमहाल, उफळय़ा ऊर्फ टेहळणीचा बुरूज असे गडावर बरेच पाहण्यासारखे आहे. पण या साऱ्यांत पाणीमहाल नळदुर्गच्या हृदयस्थानी!

वास्तूंच्या या गोतावळय़ातच राजवाडय़ाच्या दिंडीदरवाजातून त्या पाणीमहालाचे प्रथम, भिजरे दर्शन घडते आणि मग आपले मनही चिंब होते.

गडाच्या मध्यातून वाहणारा नदीचा तो फाटा. पाण्याने भरलेला! भूगोलातील या आश्चर्याला इतिहासातील तटबुरुजांच्या बाजूबंदांनी सजवलेले ..आणि या साऱ्या देखाव्यात नदीपात्रात मधोमध पाय रोवून उभा ठाकलेला तो पाणीमहाल! सशक्त शरीराचा आणि नाजूक सज्जे, कमानी-गवाक्षांचा! या गवाक्षांच्याच पुढून ते नर-मादी धबधबे कोसळत असतात. हिरवाईच्या कोंदणात, पाण्याचे सान्निध्य घेत!

हा सारा एका नदीवरचा-तिच्या पाण्यावरचा खेळ! तो सुरू आहे, एका चिरेबंदी तरल वास्तूशी! नळदुर्गच्या उत्तरेकडून बोरी नावाची एक नदी वाहात येते. ती उत्तर आणि पूर्व बाजूने गडाला वेढा घालत दक्षिणेकडे निघून जाते. ..हा इथला मूळचा भूगोल! पण या भूगोलालाच मग कधीकाळी एका पराक्रमी इतिहासाची जोड मिळाली. नळदुर्गच्या निर्मात्याने या नदीच्या आरंभीच तिला तिच्या आकाराचे आणखी दोन फाटे दिले-तयार केले. एक फिरवला गडाच्या पश्चिमेकडून दक्षिण दिशेला, तर दुसरा गडाच्या मध्यभागातून पुन्हा मूळ नदीकडे वळवला. मूळ नदी आणि तिच्या नव्याने फिरवलेल्या या फाटय़ांमुळे या भुईकोटाचा एक जलदुर्गच बनला. दुर्गाभोवती फिरलेल्या नदीच्या या पाण्याने या दुहेरी तटाच्या किल्ल्याभोवती जणू पाण्याचा आणखी एक तट उभा राहिला. तर गडाच्या मधून फिरलेल्या पात्रातून पाण्याची सोय भागवली गेली.

नळदुर्गच्या या नदीजोड प्रकल्पास दुसरा इब्राहिम आदिलशाह याने इसवी सन १६१३ मध्ये, म्हणजे बरोबर चारशे वर्षांपूर्वी आणखी एक प्रकरण जोडले. जोडले कसले, ऐन नदीपात्रात उभे केले. गडाच्या मधोमध वाहणाऱ्या या नदीप्रवाहावर त्याने एक भलामोठा बांध घातला. ज्यायोगे नदीपात्रामुळे विभक्त झालेला किल्ला तर पुन्हा जोडला गेलाच, पण त्यापेक्षाही या बांधाच्या पोटात एक महाल तयार करत या स्थापत्याला सौंदर्याचीही जोड दिली. स्थापत्य आणि पाण्याच्या सुंदर मिलाफातून तयार झालेला हाच तो पाणीमहाल!

नदीपात्रात उभी असलेली ही गूढ चिरेबंदी वास्तू एरवीदेखील येणाऱ्या प्रत्येकाला खुणावते, पण त्यातही पावसाळा सुरू झाला, की या महालाचे सूर बदलतात.

पाऊस सुरू होतो. गडाच्या दिशेने येणाऱ्या बोरीतून तो वाहू लागतो. पात्र फुगत जाते आणि हळूहळू  बांध भरू लागतो. मग एके दिवशी अचानक हे पाणी या महालावर प्रेम करत त्याच्या अंगाखांद्यावरून वाहू लागते.

पाण्याचा हा भलामोठा पसारा महालावरील नर-मादी या दोन सांडव्यावरून विलक्षण वेगाने फुसांडत बाहेर पडतो. कुणी म्हणते नळदुर्गचे धबधबे वाहू लागले, कुणी पाणीमहाल जिवंत झाल्याची उपमा देते,  कुणी नर-मादी जागे झाल्याचे बोलते, तर कुणी आणखी काही! त्या दोन धारा जिवंत होतात आणि जणू या चिरेबंदी वास्तूच्या अंगावरूनच चैतन्याचे झरे वाहू लागतात. केवळ पाण्याच्या त्या एका स्पर्शाने इतके दिवस शांत, मूक असलेल्या वास्तूचे सारे सौंदर्य उमलून येते.

खरेतर ही वास्तूही या पाण्याची-पावसाची दरवर्षी अतिशय आतुरतेने वाट पाहात असते. पण मराठवाडय़ाशी कायम अंतर ठेवणारा हा पाऊस या नळदुर्गपासूनही चार हात दूर राहतो. वर्षांमागे वर्ष जातात, ऋतू-नक्षत्रांची अनेक आवर्तने सरतात, पण बोरी कोरडीच राहते आणि मग पाणीमहालही असाच अश्रू आटलेला उरतो.

पण, मध्येच कधीतरी एखाद्या वर्षी तो बरसू लागतो. पाऊस पडतो. बोरी दुथडी भरून वाहू लागते. मग गेल्या अनेक वर्षांचे हे आर्त दूर लोटत ही वास्तू पुन्हा मोहरते.. यंदाची ही तृप्तता अशीच काहीशी!

काय आणि कशी आहे, ही गूढरम्य वास्तू! १७४ मीटर लांब, अडीच ते १४ मीटर रुंद आणि तब्बल पाचमजली इमारतीएवढी म्हणजे १९ मीटर उंच! या बांधावरूनच चार मार्ग महालाच्या पोटात उतरतात. पहिला साधारण दोन मजले खाली उतरतो. इथे एक अष्टकोनी हौद, ज्यात कधीकाळी पाणचक्की चालत होती. पाण्याच्या शक्तीचा हा आणखी एक पैलू! साठलेले पाणी गतीने बाहेर पडत असतानाच त्यावर धान्याची चक्की चालविण्याची ही योजना. वेगवेगळय़ा मोऱ्यांमधून वेगाने येणारे हे पाणी इतिहासात इथे या चक्कीला फिरवायचे आणि त्यावर साऱ्या सैन्यासाठीचे धान्य दळून निघायचे. वरवर वाटणाऱ्या सौंदर्याला आता विचार-हुशारीची किनारही जाणवू लागते.

दुसरा भुयारी मार्ग पाणीमहालाच्या छतावर उतरतो, तर चौथा एकाखाली एक तीन मजल्यांवरून गणेशाचे दर्शन घडवतो. अन्य ठिकाणच्या कुठल्या तरी मंदिराची गणेशपट्टी इथे या दालनात दर्शनी भागात बसवलेली आहे. या गणेशाच्याच वास्तव्याने मग या महालालाच त्याचे नाव पडले. ही वास्तू इस्लामी कलेतील, पण त्यातही हे ‘मांगल्य’ कसे सामावलेले!

या साऱ्यातील तिसरी भुयारी वाट महत्त्वाची. ही त्या पाणीमहालाकडे निघते. अरुंद जिना त्या बांधकामाच्या आत शिरतो. ही वाट त्या बांधाच्या अगदी तळापर्यंत उतरते. या वाटेच्या मध्यावर तो पाणीमहाल दडला आहे.

पायऱ्या उतरू लागतो तसे अंधार आणि गूढ भीतीचे सावट चेहऱ्यावर दाटू लागते. समोरून अचानक वर उसळणारी वटवाघळे या भीतीत भर घालत असतात. मनातली ही भीती-ताण आणि पाठीमागचा विशाल जलाशय याचे दडपण झेलत आपण त्या वाटेच्या मध्यावर येतो आणि एकदम प्रकाशाची चाहूल लागते. हायसे वाटते. अंधारात बुडाल्याशिवाय प्रकाशाचे हे द्रष्टेपण समजत नाही, असेच काहीसे. प्रकाशाचे हे बोट पकडत डावीकडे वळत, चारदोन पावले टाकली, की एका सुंदर दालनात आपले पाऊल पडते. हाच तो एवढा वेळ प्रतीक्षा पाहणारा पाणीमहाल!

पश्चिम-उत्तरेकडे तोंड केलेली आयताकृती अशी ही दोन दालने, तर त्याला लागूनच बाहेर डोकावणारा नऊ गवाक्षांचा एक रेखीव सज्जा! यातील मुख्य दालनाच्या मधोमध कारंजे. या दालनाला लागूनच डावीकडे एक विशेष खोली अगदी स्नानगृह आणि शौचकूपासह! साऱ्या वास्तूत महिरपी भिंती, कलात्मक कमानी. छत-भिंती-कमानींवर सर्वत्र चुन्याच्या गिलाव्यात केलेले बारीक नक्षीकाम, छताच्या मधोमध झुंबर-हंडय़ांसाठीच्या कडय़ा, वेलबुट्टीत सजलेले सज्जाचे नऊ गवाक्ष! आजही सारे कसे नीटस, अलगद! अगदी काल-परवापर्यंत वापरात असल्याप्रमाणे!

हे सारे पाहता-पाहता भारावून जायला होते. या अवस्थेतून बाहेर सज्ज्यात यावे तो आपले जणू अस्तित्वच हरवायला होते. काय म्हणावे या दृश्याला, कसे प्यावे या सौंदर्याला. त्या रेखीव गवाक्षांच्या कमानींचे कोंदण घेत वरून कोसळणाऱ्या पाण्याचे पडदे अखंड वाहात असतात. मागे सारा हिरवाईचा काठ आणि त्यावरचे हे शुभ्र ईश्वरी देणे..जणू सारे जीवनच भारून जाते!

पावसाळा नसेल त्या वेळी या गवाक्षातून संध्याकाळच्या त्या पश्चिमा रंगतात. रात्रीचे आकाश चमचमते आणि पौर्णिमेचा चंद्रही आत डोकावतो.

..कसे असेल ते दृश्य! बाहेर सज्ज्यातून कोसळणारे पाण्याचे पदर, त्यातून आत शिरणारा मंद, गार वारा, कधी आत उतरणारे ते मावळतीचे गहिरे रंग तर कधी रात्रीचे चांदणे! कोनाडय़ातील दिवे, हंडय़ांतून पाझरणारा तो मंद प्रकाश, महालाच्या मधोमध नाचणारे ते कारंजे, त्याभोवतीने नृत्य करणारी ती ललना आणि शेजारच्या दालनातून आळवले जाणारे सूर-संगीत..हे सारे सौंदर्याचे राग, रंग, छटा अनुभवताना त्या वास्तूच्या, त्या वास्तुपुरुषाच्या मनात नेमके कुठले भाव उमटत असतील. सगळे अनाकलनीय, स्वर्गीय!

या अज्ञात स्थपतीचा मनोमन हेवा वाटतो, त्याच्या रसिकतेचे कौतुक वाटते आणि सौंदर्यदृष्टीची भुरळ पडते. या अनाघ्रात सौंदर्याला किती काळ पाहावे आणि किती साठवावे, असे होते.

असे वाटते, कधीकाळच्या या विलासी रंगात आज एकदम हे समाधीचे भाव कुठून आले?