गुरू नानक परंपरेचा महाराष्ट्राशी दुवा जुळला तो संत नामदेवांमुळे. या वस्तुस्थितीचा अभिमान जसा पंजाबला आहे, तसाच तो महाराष्ट्रालाही आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या १९७७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘मानसयात्रा’ या पुस्तकातील लेख घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर आम्ही पुनर्मुद्रित करीत आहोत.
गुरू नानकांचा पंथ हा संतांचा नि वीरांचा पंथ आहे; त्याचमुळे संत वीरांचा पूजक असलेल्या महाराष्ट्राचा त्यांच्याशी आणि त्यांच्या परंपरेशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. नानकपंथीयांचा वावर महाराष्ट्रात अगदी नानकांच्या काळापासून चालू आहे. नानकांच्या चरित्रचारित्र्याचा नि त्यांच्या वाणीचा सुगंध सह्य़ाद्रीच्या शिखरांनी प्रारंभापासून अनुभवला आहे. इथल्या संतनामावळ्यांत नानकांच्या नामाचा मूल्यवान मणी गोवलेला आहे, अन् इथल्या संतचरित्रग्रंथात त्यांची तेजोमयी जीवनगाथा गायिलेली आहे.
परंतु नानकांशी नि त्यांच्या परंपरेशी असलेला महाराष्ट्राचा संबंध याहूनही गाढ आहे. सत्यनिष्ठेपायी प्राणार्पणाची सिद्धता राखणारी जीवने गुरू नानकांनी ज्या भूमीतून फुलविली, त्या भूमीची नांगरट प्रथम महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने केली होती. त्याचे नाव आहे संत नामदेव. चौदाव्या शतकाच्या प्रथमार्धात ते पंजाबात गेले आणि दीड तपाहून अधिक काळपर्यंत तिथे राहून त्यांनी पंजाबचे वातावरण धर्मजागृतीने गजबजून सोडले. त्या वेळी नामदेवांची जन्मभूमीही स्वातंत्र्याला आंचवली होती, हे जरी खरे असले, तरी पंजाबच्या मानाने ती कमी कमनशिबी होती. आक्रमकांच्या असंख्य पदाघातांनी पंजाबचा अणूरेणू तुडवला गेला होता. सारी जनता हताश बनली होती. अस्मिता राखण्यासाठी नितांत आवश्यक असलेले मनोबल नाहीसे झाले होते. अशा वेळी नामदेवांनी पंजाबला निर्भय सत्यनिष्ठेची दीक्षा दिली आणि मूर्तिमंदिरांच्या विध्वंसाने अंतरीचे परम सत्य उद्ध्वस्त होत नसते, याचा साक्षात्कार घडविला.
ईभै बीठलु, ऊभै बीठलु, बीठलबिनु संसार नहीं।
थानथनंथरि नामा प्रणवै पूरि रहिउ तू सरब मही।।
असा परम सत्याच्या सार्वभौमत्वाचा डंका नामदेवांनी पंजाबात घुमविला आणि केवळ पंजाबातच नव्हे, तर साऱ्या उत्तर भारतात धर्मजागरणाच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली. उत्तर भारतात नामदेवांच्या नंतर झालेल्या अनेक थोर संतांनी नामदेवांचे हे धर्मऋण मुक्तकंठाने मान्य केले आहे.
गुरू नानकांनी आणि त्यांच्या परंपरेतील गुरूंनी नामदेवांविषयी अपार कृतज्ञता प्रकट केली आहे. ‘नामे नारायणे नाही भेद’ अशी पाचवे गुरू आणि ‘गुरुग्रंथसाहेबा’चे संकलक अर्जुनदेव यांनी दिलेली ग्वाही आहे. शीखांचे धर्महृदय बनलेल्या ‘ग्रंथसाहेबा’त नामदेवांची एकसष्ट पदे समाविष्ट झाली आहेत आणि त्यांची पंजाबातली स्मृतिस्थाने गुरुद्वाऱ्यांचे स्वरूप पावली आहेत.

हा स्नेहाचा अनुबंध पुढे अधिकाधिक दृढ बनत गेलेला दिसतो. या संदर्भात गुरू नानकांचे पुत्र आणि उदासी संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचंद्राचार्य यांच्या चरित्रातील एक घटना विशेष चिंतनीय आहे. श्रीचंद्राचार्य हे परकीय आक्रमकांच्या विध्वंसक वृत्तीने अस्वस्थ झालेले होते. राजस्थानातील रजपूत वीरांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भारताच्या विपरीत परिस्थितीचे त्यांनी डोळसपणाने निरीक्षण केले होते. हिमालयापासून रामेश्वपर्यंत, एवढेच नव्हे तर वायव्येकडे काबूलपर्यंत त्यांनी भ्रमण केले. परंतु त्यांनी पुन्हा  एकदा दक्षिणेकडे यात्रा करण्याचा संकल्प केला. आपला एक शिष्य कमालिया याला बरोबर घेऊन ते दिल्ली, ग्वाल्हेर, जबलपूर, नागपूर, रामटेक या मार्गाने रामेश्वपर्यंत गेले. तिथून परतताना शके १५४६ मध्ये ते नाशकास आले. तिथे जवळच गोदा-नंदिनी संगमावर एक सोळा वर्षांचा तेजस्वी बालयोगी निग्रहाने तपाचरण करीत आहे, असे त्यांना समजले. त्यांनी त्या बालयोग्याची भेट घेतली अन् त्याला आपल्या अंतरीचे शल्य दाखवून सामर्थ्यांच्या उपासनेचा आदेश दिला.
श्रीचंद्राचार्याना भेटलेला हा बालयोगी म्हणजे पुढे महाराष्ट्र धर्माचे विजयशाली उत्थान घडविणारे समर्थ रामदास होत. या ऐतिहासिक महत्त्वाच्या भेटीनंतरच त्यांनी भारतभ्रमण केले आणि त्यानंतर लवकरच महाराष्ट्रात सह्य़ाद्रीच्या कडेकपारीतून श्रीरामाच्या कोदंडाचे टणत्कार ऐकू येऊ लागले.
हनुमंताचा भुभु:कार आक्रमकांच्या हृदयाचा थरकाप उडवू लागला. भवानीचे खड्ग महिषासुरांच्या शिरच्छेदासाठी खणखणू लागले. नानकांच्या पुत्राने महाराष्ट्रात गोदेच्या तीरावर पेरलेले हे प्रेरणेचे अग्निबीज महाराष्ट्राने रक्ताचे सिंचन करून रुजवले-फुलवले आणि शेकडो अग्निफुलांनी डवरलेल्या सह्याद्रीने आक्रमकांची थडगी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली.

यानंतर नानक परंपरेशी महाराष्ट्राचा संस्मरणीय संबंध घडला, तो गुरू गोविंदसिंहांच्या जीवनकाळात. महाराष्ट्रात, ‘मारितां मारितां मरावे’ अशी मृत्युंजयी जिद्द जागवून शिव-समर्थानी मराठा तितुका संघटित केला होता आणि औरंगजेबाच्या सैन्याला ‘त्राहि भगवन्’ करून सोडले होते. तिकडे उत्तरेतही गुरू गोविंदसिंह आपल्या शीख बांधवांना सांगत होते-
सूरा सो पहचानिये लढे दीनके हेत।
पुर्जा पुर्जा कट मरे, कभु न छोडय़ो खेत।।
(जो धर्मासाठी प्राणपणाला सिद्ध होतो आणि तुकडे तुकडे होऊन मरण आले तरी रणक्षेत्र सोडीत नाही, त्यालाच शूर म्हणावे.)
गोविंदसिंहांच्या या सिंहगर्जनेने शीख पेटून उठले. त्यांनी प्राणांची बाजी लावून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी निकराचा लढा दिला. निष्ठा अभंग राहिल्या, पण भौतिक सामथ्र्य उणे पडले. गुरूंना आपल्या परिवारासह सरहिंद भागात वनवासी होऊन राहावे लागले. तिथे स्वजनांनीच विश्वासघात केला. सिंहाच्या छाव्यांसारखे गुरूंचे दोन पुत्र फत्तेसिंह नि जोरावरसिंह सरहिंदच्या सुभेदाराने भिंतीत चिणून मारले. त्या कोवळ्या छाव्यांची ती भीषण हत्या या सिंहाने निग्रहाने सहन केली, तरी त्यांचे ते वीरहृदय आतल्या आत जळत राहिले. परिस्थितीची प्रतिकूलता टोकाला गेली होती. त्यांचा शत्रू दक्षिणेतल्या सिंहांची शिकार करण्यासाठी इकडेच तळ ठोकून राहिला होता. गुरू आपल्या मूठभर सहकाऱ्यांनिशी दक्षिणेकडे आले. मराठय़ांच्या विक्रमाच्या वार्ता त्यांना ऐकू येत होत्या. अखेरीस वाटेतच त्यांना हताश झालेल्या औरंगजेबाच्या मृत्यूची वार्ता कळली. गुरू तसेच पुढे आले. त्यांनी गोदावरीचे नाभितीर्थ असलेल्या नांदेड नगरीत निवास केला. त्या ठिकाणी माधवदास नावाचा बैरागी आश्रम उभारून तपाचरण करीत होता. गुरूंची आणि त्यांची भेट झाली. गुरूंच्या अतुलनीय त्यागाची, देदीप्यमान शौर्याची नि दाहक व्यथेची त्याला प्रतीती आली. तो गुरूंचा ‘बंदा’ बनला. अन् मायभूमीची ‘बंदगी’ करण्यासाठी त्याने हाती कृपाण घेतले. गुरूंच्या आदेशाने हा गोदावरीचा पुत्र रावी-बियासच्या तीरी गेला आणि त्याने अवघा पंजाब पुनश्च जागवला. गुरूंच्या हृदयाच्या जखमा त्याने नव्या नव्या विजयवार्तानी भरून काढल्या. गुरूपुत्रांना भिंतीत चिणून मारणाऱ्या सरहिंदच्या सुभेदाराला त्याने आपल्या दाहकतेने भस्मसात केले आणि इकडे गुरू गोविंदसिंह गोदावरीच्या तीरावर उभारलेल्या ‘अविचलनगरा’त अविचल वृत्तीने समाधिस्थ झाले.
औरंगाबादेतही शीखांच्या पवित्र तीर्थस्थानांची निर्मिती झाली. गुरुद्वारा धौनीसाहेब हा शीखांचा पंचप्याऱ्यांपैकी भाई दयासिंहजी यांच्याशी संबद्ध आहे. औरंगजेब दक्षिणेत आयुष्याची अखेर कंठित होता, त्या वेळी भाई दयासिंहांनी या ठिकाणीच त्याला गुरुजींचा जफरनामा आणून दिला होता.

गुरू गोविंदसिंहापासून स्फूर्ती घेऊन त्यांच्या संकल्पांच्या पूर्तीसाठी झगडलेल्या बंदा बैरागी हा नामदेवांचा महाराष्ट्र आणि नानकांचा पंजाब यांच्या अतूट स्नेहबंधाचा साक्षी आहे. हे सिंहाच्या काळजाचे दोघे वीरपुरुष गोदामाईच्या पावन प्रवाहाच्या काठी विसावले आहेत आणि त्यागशील शौर्याचा संदेश देत आहेत.
समर्थ रामदासांनी समाधीसमयी आपल्या सर्व शिष्यांना असे सांगितले होते की-
आत्माराम दासबोध। माझे स्वरूप स्वत:सिद्ध।
गुरु गोविंदसिंहांचे अंतिम संदेशासंबंधीचे उद्गार असेच आहेत-
नानक गुरू गोविंदसिंह पूरन हरि अवतार।
जगमग ज्योत विराजहि श्रीगुरुग्रंथमझार।।
आग्या भई अकालकी सबी चलायो पंथ।
सब सिक्खनको हुक्म है गुरू मानियो ग्रंथ।।
गुरू नानकांपासून गुरू गोविंदसिंहांपर्यंतच्या सर्व शीख गुरूंची आत्मज्योती गुरुग्रंथसाहेबामध्ये झगमगत आहे. या ग्रंथालाच गुरू मानून त्या ज्योतीच्या प्रकाशातच सर्व शीखांनी अकाल पंथ चालवावा, असा हा आदेश आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे की, त्याने कधी या झगमगणाऱ्या ज्योतीला आपल्या स्नेहाने प्रज्वलित केली आहे, तर कधी त्या ज्योतीच्या प्रकाशात अस्मितेचे दर्शन अनुभवले आहे.
अगदी अलीकडच्या काळातही जेव्हा इंग्रज सत्तेविरुद्ध क्रांतीच्या ज्वाळा भडकल्या, तेव्हाही महाराष्ट्राने गुरू गोविंदसिंहांच्या नि बंदा बैराग्याच्या विक्रमगाथा गाऊन सहस्रावधी स्वजनांना क्रांतिप्रवण बनविले होते. त्या वीरगाथांचे प्रतिध्वनी मराठी मातीतून आजही अस्पष्ट स्वरूपात उमटताना ऐकू येतात.