देशातील अन्नधान्याच्या भीषण टंचाईच्या पाश्र्वभूमीवर ‘देशातील प्रत्येक माणसाने जर आठवडय़ातील एक दिवस रात्री उपवास केला तर देशाचे बरेचसे अन्न वाचू शकेल,’  या तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या आवाहनाला त्या काळच्या युवावर्गाने मोठा प्रतिसाद दिला. २ ऑक्टोबर या शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त या अनोख्या व्रताची माहिती आणि चार तपे निष्ठेने हे राष्ट्रीय व्रत केलेल्या सुभाष खडकबाण या व्यक्तीचा जीवनपरिचय.

२ ऑक्टोबर हा जसा महात्मा गांधींचा जन्मदिन, तसाच तो माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचाही जन्मदिवस असतो. हा दिवस जवळ आला की, अंबरनाथचे एक ज्येष्ठ नागरिक सुभाष खडकबाण ऊर्फ भाऊ हळवे होतात. त्यांना शास्त्रीजींच्या आठवणींनी गहिवरून येतं. भाऊंचं तारुण्य आणि लालबहादूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द यांचं एक गहिरं नातं आहे.

भाऊंचं वय आता ६७ वर्षे आहे. यापैकी ४९ वर्षे त्यांनी एक व्रत पाळलं. ते व्रत कुठलं धार्मिक व्रत नव्हतं. ते होतं एक राष्ट्रीय व्रत. त्याला ते ‘शास्त्रीजींचे उपवासाचे व्रत’ असं म्हणतात. तेव्हा देशात अन्नधान्याचा तुटवडा होता, म्हणून शास्त्रीजींनी नागरिकांना आठवडय़ातला एक दिवस रात्री उपवास करण्याचं आवाहन केलं होतं. भाऊंनी आपल्या वयाच्या १८ व्या वर्षी ते व्रत स्वीकारलं आणि अगदी अलीकडेपर्यंत निष्ठेने पाळलं.

शास्त्रीजी पंतप्रधान झाले, तेव्हा भाऊ अवघे १८ वर्षांचे होते. ते वयच स्वप्नाळू, भाबडं आणि आदर्शवादी असतं. भाऊंना शास्त्रीजी पूर्वीपासूनच आवडायचे. पंतप्रधान होण्याआधी लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री होते. तेव्हा झालेल्या एका रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता.

एकदा शास्त्रीजींची आई अलाहाबादवरून दिल्लीला आली आणि ‘मेरा लाल कहाँ रहता है,’ असं विचारीत-विचारीत रेल्वेमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचली होती. नंतर कळलं की, ती शास्त्रीजींची आई आहे. शास्त्रीजींनी आपल्या आईला आणायला गाडी किंवा नोकर पाठवला नव्हता. ही घटना तेव्हा देशात गाजली होती. त्यामुळे त्यांची प्रतिमा एक नि:स्पृह नेता अशी होती. शास्त्री जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशाची अवस्था मात्र फार बिकट होती- आर्थिक आणि सामरिक दोन्ही अर्थानी. चीन युद्धाचा पराभव देशाच्या जिव्हारी लागला होता. सैन्याचं मनोबल रसातळाला गेलं होतं. कुणी तरी थोबाडीत मारून अपमान केल्यासारखी देशाची मन:स्थिती होती. देशाने आत्मविश्वास गमावला होता. त्यापेक्षाही भयंकर गोष्ट

म्हणजे देशात अन्नधान्याची भीषण टंचाई होती. रेशन दुकानांवर अपुरे आणि निकृष्ट धान्य मिळायचे. खुल्या बाजारातही धान्य उपलब्ध नसायचे. अमेरिकेत ज्याला जनावरे तोंड लावत नव्हती ती मिलो ज्वारी-गहू भारतात आयात करून रेशनवर पुरवला

जात होता.

भाऊ सांगतात, ‘आम्ही तेव्हा बदलापूरला राहायचो. मुंबईचे अनेक लोक तेव्हा बदलापूरला तांदूळ मुबलक व स्वस्त मिळेल या आशेने खरेदीला यायचे. नेहरूंनी भाक्रा-नांगल वगैरे धरणे बांधली होती, पण त्यांचे परिणाम दिसू लागले नव्हते. हरितक्रांती नजरेच्या टप्प्यातसुद्धा आलेली नव्हती. कुटुंबनियोजन रुजलेले नव्हते. प्रत्येक कुटुंबात मुलांची संख्या भरपूर असायची. लोकसंख्येच्या मानाने शेतकी उत्पादन कमी होते. देशातली पाऊण जनता रोज अर्धपोटी- उपाशी राहत होती.’

उभ्या देशाला अन्नधान्याची भीषण टंचाई भासत असताना लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांनी ‘जय जवान जय किसान’ घोषणा दिली ती या पाश्र्वभूमीवर. भारतीयांचा सामरिक स्वाभिमान जागविण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या पोटाची आग शांत करण्यासाठी.

या पाश्र्वभूमीवर शास्त्रीजींनी असं आवाहन केलं की, देशातील प्रत्येक माणसाने जर आठवडय़ातील एक दिवस रात्री उपवास केला तर देशाचे बरेचसे अन्न वाचू शकेल. त्या काळी अनेक तरुणांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. भाऊ त्यांपैकीच एक. त्यांनी दर सोमवारी एकभुक्त राहण्याचा (रात्री काही न खाण्याचा) निश्चय केला.

पुढे १९६५ चे पाक युद्ध जिंकून शास्त्रीजींनी देशाचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला. या युद्धात त्यांनी आपल्या सैनिकांना पाकिस्तानात आत घुसण्याची परवानगी दिली होती. आपले सैन्य पाकिस्तानात खूप खोलवर शिरले होते. या युद्धातील विजयामुळे भारतीय सैन्याचेच नव्हे, तर जनतेचेही मनोबल उंचावले. ही शास्त्रीजींची किमया होती. धान्य उत्पादनाच्या आघाडीकडे लक्ष द्यायला मात्र शास्त्रीजींना पुरेशी उसंत मिळाली नाही. त्यापूर्वीच ते निवर्तले. त्यानंतर देशात हरितक्रांती झाली. अन्नधान्याचा सुकाळ झाला. आता तर धान्य गोदामांत सडते आहे, पण तरीही भाऊंनी हे व्रत सोडले नाही. हे व्रत धार्मिक नव्हते. धार्मिक व्रतात पळवाटा शोधल्या जातात. पण भाऊंनी कधीही कोणतीही आडवाट शोधली नाही. दर सोमवारी रात्री ते काही खायचे नाहीत. त्यांच्या आयुष्यात असे अनेक सोमवार आले, जेव्हा त्यांच्या नातेवाईकांची लग्ने असायची. त्यांचा किंवा त्यांच्या मुलांचा वाढदिवस असायचा, ते फिरायला गेलेले असायचे आणि मित्रमंडळी मौजमजा करीत असायची, पण भाऊंनी मात्र सोमवारी रात्री कधी अन्न ग्रहण केले नाही. देशाची अन्न परिस्थिती सुधारल्यावरही शास्त्रीजींना श्रद्धांजली म्हणून आणि आपण या देशाचे काही देणे लागतो याची आठवण राहावी म्हणून त्यांनी हे व्रत चालूच ठेवले. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ या निष्ठेने त्यांनी आता-आतापर्यंत हे व्रत कसोशीने पाळले. अगदी अलीकडेच त्यांच्यावर गुडघा प्रतिरोपण शस्त्रक्रिया झाली तेव्हा वैद्यकीय र्निबधांमुळे त्यांना हे व्रत खंडित करावे लागले.

हा उपवास गरज म्हणून करावा, अशी भाऊंची परिस्थिती कधीही वाईट नव्हती. ते स्वत: आर्थिकदृष्टय़ा अतिशय संपन्न जीवन जगले. आपल्या घरातले अन्न वाचावे म्हणून हा उपवास करण्याची त्यांना कधीच गरज नव्हती. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी तो केला आणि निभावला. चार तपे त्यांनी हे राष्ट्रीय व्रत केले.

प्रत्येक व्रताची काही फलश्रुती असते. भाऊंच्या शास्त्रीजींच्या उपवासाच्या व्रताचीही अशीच काही कृतार्थ फलश्रुती आहे. कायम हसतमुख, जिंदादिल आणि मनमिळाऊ असलेले भाऊ तुकोबारायांची ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे’ ही उक्ती प्रत्यक्ष जगले. आर्थिक संपन्नतेपेक्षाही त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत माणसे जोडली. धनसंग्रहापेक्षा त्यांचा जनसंग्रह मोठा आहे. तरुणपणी ते बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्याने ऐकायला कल्याणला जात. दोन तासांच्या व्याख्यानासाठी त्यांना सात तास घालवावे लागत. (कारण गाडय़ा जास्त नव्हत्या.) बाबासाहेबांशी त्यांची ओळख झाली. भाऊंनी बाबासाहेबांची व्याख्याने पदरमोड करून बदलापुरात घडवली. बाबासाहेबांनी त्यांच्यातली ऊर्जा ओळखली आणि त्यांना आपल्या हृदयात कायमचे स्थान दिले. बाबासाहेबांचा अपार स्नेह त्यांना लाभला. त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाने शिवचरित्राची गोडी लागली आणि अवघं जीवन उजळून निघालं. त्यांच्या जीवनाचा स्तरच उंचावला. बाबासाहेबांमुळेच पुढे मंगेशकर परिवार, उषा मंगेशकर, कविवर्य कुसुमाग्रज, सातारच्या राजमाता सुमित्राराजे- कल्पनाराजे भोसले, माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, शिल्पकार भाऊ साठे, व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार अशा मोठय़ा माणसांशी भाऊंचा परिचय झाला, स्नेह जुळला. तो त्यांनी जिवापाड जपला, टिकविला, वृद्धिंगत केला.

बाबासाहेबांच्या सोबतीने त्यांनी अनेक गड-किल्ले काबीज केले. खिंडी लढवल्या. वर्तमानातल्या चिंता खुंटीला टांगून इतिहासाची बेहोशी अनुभवली. शिवाजी या व्यक्तिविशेषाच्या आयुष्यातल्या एकेका क्षणाची चर्चा करण्यात रात्री रात्री जागवल्या. ते वेळ वाया घालवणं नव्हतं. ते स्वत:लाच संपन्न करणं होतं. चाकोरीबद्ध जगणाऱ्यांना त्यातली धुंदी समजणार नाही. त्यासाठी शिवाजी या महापुरुषाचं वेड लागावं लागतं. भाऊंमध्ये ते वेड आहे. इतिहासाचंच नव्हे, माणसं जपण्याचंही.

म्हणूनच बाबासाहेब मुंबईत कुठेही शिवचरित्र सांगून झाले की, रात्री गप्पा मारायला, मुक्कामाला भाऊंकडे येतात. उषाताई मंगेशकर कोळंबीची चव चाखायला त्यांच्याकडेच हक्काने येतात. अरविंद इनामदारांना बारवी धरणाची किंवा कासच्या पुष्पपठाराची सहल करायची असेल तर सोबती म्हणून भाऊच बरोबर लागतात. राजमाता सुमित्राराजे भोसले त्यांना आपला मानसपुत्र मानत. तोच स्नेह पुढे त्यांच्या स्नुषा कल्पनाराजे यांनीही जपला. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बहिणीचे दिल्लीला लग्न होते तेव्हाची गोष्ट. सुमित्राराजे व कन्या सत्त्वशीलाराजे त्या लग्नाला जाणार होत्या. बाबासाहेबांचेही तेव्हा यशवंतराव चव्हाणांकडे काही काम होते. या मोठय़ा माणसांत वास्तविक सुभाष खडकबाण नामक पंचविशीच्या मुलाचे काहीच काम नव्हते, पण सुमित्राराजेंनी फर्मान काढले, ‘सुभाष, तूही चल आमच्याबरोबर दिल्लीला!’ पण सुभाषरावांचे वडील परवानगी देईनात. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांची समजूत घातली. परवानगी मिळवली आणि भाऊ या बडय़ा मंडळींबरोबर दिल्लीदर्शन करते झाले. यशवंतराव चव्हाणांनाही भेटले. आयुष्यात ज्या वयात मौजमजा करायची असते ती भाऊंनी अशी थोरामोठय़ांबरोबर केलेली आहे. त्यांच्याकडून लाभलेला हा अपार स्नेह हीच सुभाष खडकबाण ऊर्फ भाऊ यांची खरी मिळकत आहे. चंगळवादाच्या कोलाहलात आपल्यापुरती वैराग्याची पणती त्यांनी तेवत ठेवली आहे. शास्त्रीजींच्या उपवासाची तीच खरी फलश्रुती आहे.