मा सर्वाना जाहीर करण्यात येते की
यापुढे येथे कोणत्याही प्रकारची
कोणत्याही जातीची, पातीची,
रीतीची, भातीची,
मातीची, तसेच संस्कृतीची
फुले फुलवण्यास
सक्त मनाई करणेत येत आहे
फूल ना फुलाची पाकळी म्हणून
उमलू दे एखादी कळी म्हणणारांसही
कायद्याने सक्त मनाई करणेत येत आहे,
आदेशावरून!

तशी करण्यात आलीच आहे
सगळ्याच बागांची नसबंदी
घालण्यात आली आहेत
कुंपणे इंचाइंचावर काटेरी
करण्यात येत आहे
फवारणी विखारी
कलमे करणारे हात तर केव्हाच
केले आहेत कलम
वाटिकावाटिकांतून वाटण्यात आले आहे
विशेष फुलरोधी मलम

म्हणाल तर केलाच आहे कडेकोट
बंदोबस्त
डोहाडोहात एकेक कालिया
दाही तोंडाने फूत्कारतो आहे विखार
मुळांच्या जावळापाशीच थेट
द्वेषाची ठिबक धार
आता तर म्हणे पानापानांतून सुरू केलेय
काळोखाचे संश्लेषण
की फुलांनाही काटेच यावेत
पाकळ्यांऐवजी
प्रयोगशाळांमध्ये तर कधीचे सुरू आहे
संशोधन

तसा तर हाही प्रयोग सुरूच आहे, की
काटय़ाने काढावा काटा
तशी फुलांनी काढता येतील का फुले?
गोळ्या घालून टिपल्या जातील का कळ्या
समजा, फुलांच्याच हातात दिली पिस्तुले
विद्वेषाच्या नखांनी खुडून खुडून
पाडले जातील का पाकळ्यांचे सडे?
धडाधड कोसळतील का फुलांची धडे?
समजा गेंदफुलास दिले झेंडूच्या
वेगळेपणाचे धडे!

तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून
यापुढे येथे कोणत्याही प्रकारची
कोणत्याही जातीची, पातीची,
रीतीची, भातीची,
मातीची, तसेच संस्कृतीची
फुले फुलवण्यास
सक्त मनाई करणेत येत आहे
फूल ना फुलाची पाकळी म्हणून
उमलू दे एखादी कळी म्हणणारांसही
कायद्याने सक्त मनाई करणेत येत आहे

तेव्हा समस्त लोकांस आमचे विनम्र
आवाहन
की कृपया फुले फुलवू नका
काय आहे,
उघडय़ा डोळ्यांनी फुले गळताना पाहणे
हे खूप अवघड असते मित्रहो,
खूप अवघड!
त्याहून या जगात निष्पुष्प असणे सोपे!!

balwantappa@gmail,com