डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘मुळारंभ’ या आगामी कादंबरीमागची संकल्पना आणि वेगळा आयाम दर्शवणारा लेख..
‘मुळारंभ’ ही निखालस ‘बिल्डंगज्रोमान’ या सदरात मोडणारी कादंबरी आहे. व्यक्तीची जडण-घडण कशी होत जाते याचं चित्रण या प्रकारच्या कादंबरीमध्ये दिसतं.
buildungsroman  अथवा  ‘novel of formation कादंबरीचा प्रकार पुष्कळ जुना आहे. सॅलिंगरची’the catcher in the rye’ याच प्रकारात मोडते. मराठीमधील ‘कोसला’ आणि प्रकाश नारायण संतांच्या लंपनच्या शेवटच्या कथा या याच वाङ्मयप्रकाराशी साधम्र्य सांगतात.
‘मुळारंभ’मध्ये एका सोळा-सतरा वर्षांच्या मुलाची जडण-घडण खऱ्या अर्थाने ज्या दहा-अकरा महिन्यांमध्ये होत जाते; त्या महिन्यांचं, त्या कालावधीचं आणि त्या कालावधीत झपाटय़ाने होत जाणाऱ्या बदलांचं चित्रण आहे. पण ‘मुळारंभ’चं वेगळेपण आहे ते दोन संदर्भात : एक म्हणजे त्याचा काळ. ही कादंबरी घडते जून १९९८ ते एप्रिल १९९९ या कालावधीमध्ये. तो काळ अनेक अर्थानं संक्रमणाचा काळ होता. भारतानं नव्या जगाची आर्थिक कास जरी १९९१मध्ये धरली; तरी त्याची दृश्य फळं ही १९९६पासून पुढे हळूहळू दिसू लागली. ‘मुळारंभ’मध्ये हा संक्रमणाचा काळ साऱ्या घटनांवर अंथरलेला दिसेल. माणसाचे कपडे, राहणीमान, विचार, नाती या सगळ्याच गोष्टी झपाटय़ानं मागच्या दशकात बदलत गेल्या. त्या बदलांची पहिली चाहूल, पहिली निजखूण या कादंबरीभर पसरलेली आहे.
‘‘पण बदल हा फक्त चांगला किंवा वाईट नसतो, तर अपरिहार्य असतो. एक तर जग तुम्हाला बदलवतं किंवा तुम्ही ताकदीचे असाल तर तुम्ही जगाला बदलवता; पण ‘बदल मला नकोच, असं म्हणायची मुभा नियतीनं ठेवलेली नाही. नियती अपरिहार्यपणे वय वाढवत, चेहरा सुकवत, शक्ती खचवत वार्धक्याकडे नेतेच. आणि शेवटी या चमत्कारिक धबडग्यातून जो सुटका करतो तो मृत्यूही शाश्वत असा कुठे असतो?’’ हे कादंबरीतलं विधान तिचं मुख्य सूत्र सांगतं. हा संक्रमणाचा काळ छोटय़ाछोटय़ा विधानांनी अधोरेखित होत जातो. उदाहरणार्थ, ओमला – कादंबरीच्या नायकाला  आणि त्याच्या मैत्रिणीला – म्हणजेच मँडीला, एका टप्प्यावर असं जाणवतं :
‘‘लग्नाआधी मजा करणं ज्यांना पटतं, पण करवत नाही – अशी आपण दोन नालायक मुलं एकमेकांना भेटलो आहोत.’’
 आताच्या २०१२मधल्या तरुण पिढीला हे पटेलही आणि करवेलही! फार पूर्वीच्या पिढीला हे पटणारच नाही.
संक्रमणाचं अजून निदर्शक आहे ते म्हणजे आंतर-सांस्कृतिक संवादाची वाढ. भारतभर जी मरगळ होती ती त्या काळात हटली आणि कॉलेजमध्ये देशभरामधील मुलं-मुली दिसायला लागली. दादरला राहायचं आणि एलफिन्स्टन कॉलेजला जायचं हा आधीचा सुरक्षित पायंडा मोडला. ओमचा ग्रुप हा मुळीच मराठी नाही. तो बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आहे. दिवाळीची सुट्टी ओमचा ग्रुप साजरी करतो; त्या प्रकरणात तर ही बाब प्रकर्षांने जाणवते.
तसाच संक्रमणामधला धागा आहे भाषेचा. ओमची आणि त्याच्या कंपूची भाषा क्रमाक्रमानं मोकळी, खुली, बेधडक आणि तरुण होत जाते. आज ‘सेक्सी’ या शब्दाचा वापर कुणीही केव्हाही करतं; पण जेव्हा तो शब्द कनक वापरतो, त्या वेळेस ते एक भाषिक आणि वैचारिक संक्रमणच ठरतं.
पण ‘मुळारंभ’चं दुसरं आणि महत्त्वाचं वेगळेपण आहे ते त्याच्या भारतीय संदर्भात. पाश्चात्त्य novel of formation  चाprotagonist  हा स्वतंत्र, बेटासारखा पुष्कळदा वाढत जातो. ‘मुळारंभ’मधला ओम हा तसा वाढूच शकत नाही. आजही भारतीयसंदर्भात माणसाचं वाढणं हे एकटं-एकटं असत नाही, एकटय़ावरच अवलंबून असत नाही, ते मित्रांना, मैत्रिणींना, शिक्षकांना, पालकांना, आजी-आजोबांना, नात्यामधल्या काका-मावश्यांना, बिननात्याच्या मामा-मावश्यांना, झाडांना-झुडपांना, नेहमीच्या दुकानदारांना, भावंडांना, पाऊस आणि सुगंधांना आपल्या सोबत, आपल्या कवेत घेत जातं.
ओमचं वाढणं म्हणजे फक्त त्याचं वाढणं नाही. ते मनदीप, गीता, कनक, जिंदीया, पूनम या त्याच्या मित्रांचंही वाढणं आहे. ते ओमच्या आईचं-वडिलाचं-आजीचंही वाढणं आहे. ते ओमच्या शिक्षकांचं, सहाध्यायी मंडळीचं वाढणं आहे. आणि असं वाढणं हे सोपं नसतं. ‘मुळारंभ’मध्ये ओमला गाणी ऐकता ऐकता जाणवतं :
‘‘वाढणं म्हटलं तर सोपं असतं आणि काही प्रमाणात नैसर्गिकही. पण अस्ताचलास रविबिंब टेकत असताना मनातला रावा भेटणं अवघड असतं बुवा. फारच अवघड.’’
अर्थात इथूनच कादंबरीभर irony चा खेळ चालू राहतो. जे जग ओमला अनुस्यूत आहे; ते तसं नसतं हे आपल्याला अनुभवानं माहीत असतं. पण आपणही ओमच्या वयाच्या मांडवाखालून कधी ना कधी गेलेलो असतो.
‘मुळारंभ’चं कथानक सरळ रेषेत प्रवास करतं. ओम नावाचा सतरा वर्षांचा तरुण मुलगा डेंटल कॉलेजात प्रवेश घेतो, नाना नवे अनुभव घेतो, मित्र-मैत्रिणींच्या कंपूत रमतो, मनदीपच्या प्रेमात पडतो, अभ्यास करतो, सुट्टीत मजा करतो, पुढे त्या कंपूमध्ये भांडणं होतात, ती मिटतात आणि तरी सल कायमसाठी राहते. ओमचं आईसोबतचं, बाबांसोबतचं, आजीसोबतचं नातं एकाच वेळी जवळ आणि लांब असं हेलकावत राहतं. अशा चार-पाच वाक्यांमध्येही या कादंबरीचं कथानक सांगता येईल, पण ‘मुळारंभ’मध्ये महत्त्वाचे आहे ते कथन; कथानक नव्हे!
‘‘पण मला जो एक बंध हवाय ना, तो मात्र इथे नाही, तो कॉलेजमध्येही नाही. खरं तर तो कुठे असेल का, याचीही मला शंका येते.’’, असं म्हणणाऱ्या ओमला जी मैत्री अभिप्रेत आहे ती वेगळ्या प्रतलावरची आहे, हे उघडच आहे. त्याला जाणवतं :
‘‘मैत्रीचं खास रसायन तसंही वेगळंच असतं. कॅरॉटीड आर्टरीच्या शाखांइतका त्याचा उगम नि अंत स्पष्टपणे दाखवता येत नाही!’’
‘मुळारंभ’ ही अनेकसूत्री कादंबरी आहे, पण त्यातला महत्त्वाचा धागा आहे तो मैत्रीचा – त्रिलोकात संचार करेल अशा बंधाचा.
आई-वडिलांचं किशोरवयीन मुलांशी असलेलं नातं, हे अजून एक महत्त्वाचं सूत्र प्रस्तुत कादंबरीत आहे. (ओमच्या सुदैवानं) ओमचे आई-वडील हे सुजाण आहेत, मोकळे आहेत आणि किशोरवयीन मानसिकता समजून घेणारे आहेत. म्हणूनच त्याची आई तिच्या मैत्रिणीला सहजपणे सांगू शकते:
‘‘अगं, अडनीडं वय. आज ही मुलगी आवडते, उद्या ती! मग कोणीच आवडेनासं होतं नि स्वत:वरच जीव प्रेम करतो. कधी वडील आवडीचे असतात, कधी आई, तर कधी दोघेही नाहीत. रोहिणी आजीच फक्त.’’
पण असं असलं, तरी या समजूतदार नात्यामध्येही ताण उतरतात आणि साऱ्यांनाच प्रगल्भ करून सोडतात.
‘मुळारंभ’चं एक सूत्र मैत्री आणि बंध असेल, तर दुसरं त्याच्या बरोबर विरुद्ध टोकाचं – एकटेपणाचं आहे. माणसाच्या ठायी असलेला मूलभूत एकटेपणा हा ओम पुष्कळांपेक्षा फार लवकर जाणतो.
‘‘आणि एवढं सगळं असूनही या गूढ, भव्य, सुंदर जगात या बाकडय़ावर अखेर आपण एकटेच! आपल्याला सोबतीचं असं इथं कोणीच नाही.’’ ही जाणीव कादंबरीच्या मध्यावरच ओमला होते.
अर्थातच, ओम हा काही फक्त तत्त्वचिंतक नाही. तो अगदी तरुण मुलगा आहे – सळसळत्या शरीराचा. त्याचं शरीरगान हे कादंबरीभर उलगडत जातं. त्याची शारीरिक, लैंगिक वाढ ही खास त्याच्या अनुभवांमधून व्यक्त होत राहते. आणि म्हणूनच ‘मुळारंभ’चं अजून एक महत्त्वाचं सूत्र हे प्रेमाचं, शरीर-गानाचं आहे.
‘‘डिसेक्शनच्या टेबलावर ठेवलेली नग्न शरीरं आणि आताचं हे सळसळतं अंग. छे! यांच्यात काही म्हणता काहीच साम्य नसतं,’’ असं ओम म्हणतो आणि तसं म्हणता म्हणता मनदीपच्या प्रेमातही पडतो. त्याचा जीव तिच्यात अडकलेला असला, तरीही त्याची आतली हाक ही वेगळ्याला साद घालत राहते. सिद्धार्थ शहाचं पात्र हे त्या वेगळ्या याराचं प्रतीकात्मक (symbolic) पात्र आहे.
‘‘जो यार त्याला हवा होता आणि भेटत नव्हता, जो यार त्याला छळत होता आणि कळत नव्हता; त्याला जाब विचारल्यागत ओम गाऊ लागला.’’
तो यार मुलगा-मुलगी या भेदापलीकडचा आहे, हे ओम प्रथमच स्पष्ट करतो. ओम हा (सध्या  popular असलेलं)  gay character नाही. पण त्याच वेळेला त्याची लैंगिकता ही आधीच्या पुष्कळ पिढय़ांपेक्षाही निकोप, हवं-नको शोधणारी आणि चोखंदळ आहे. हा लैंगिकभाव शोधत जाण्याचा प्रवास हेदेखील ‘मुळारंभ’चं महत्त्वाचं सूत्र आहे.
‘मुळारंभ’ची कथनशैली सकृतदर्शनी जरी तृतीयपुरुषी असली, तरी त्यामध्ये प्रथमपुरुषी निवेदनाचे अनेक कप्पे आहेत. stream of consciousness novels  च्या अंगानं पुष्कळदा ‘मुळारंभ’मधील पात्र अभिव्यक्त होतात, पण मुख्यत्वे हे तंत्र वापरलं आहे ते ओमच्या आणि कनकच्या पात्रयोजनेत.
तंत्र वापरले आहे, असं म्हटलं खरं; पण ते काही खरं नाही. ते तशा पद्धतीनं सुचलं, लिहिलं गेलं आणि मागाहून त्याचं वर्गीकरण stream of consciousness novels  या सदरात करता आलं हेच खरं!
ओमचं जग हे पुढे तो ज्या जगामध्ये प्रवेशणार आहे, त्याची छोटी आवृत्ती आहे. त्या खऱ्या मोठय़ा जगामधलं प्रेम, भांडण, द्वेष, असूया हे सारं त्या ओमच्या छोटय़ा जगात उपस्थित आहे, पण अगदी छोटय़ा प्रमाणात.
मृत्यूचा डंख त्या जगात नाही. विश्वासाचं गुदमरणं ओमच्या जगात नाही. स्पर्धेचं भेसूर वेंगाडणारं तोंड ओमला ठाऊक नाही. त्याच्या जगात आहे miniature स्वरूपामधली स्पर्धा, द्वेष, लोभ, प्रेम. पण मजेची गोष्टी ही की, ते त्या जगातल्या मंडळींना तसं वाटत नाही. त्यांच्या लेखी ते miniature  स्वरूपात नसतंच मुळी – ते खरखुरंच असतं.
आणि ज्या टप्प्यावर हे सगळं, खोटं नसलं; तरी फार फार छोटं आहे, याचा ओमला प्रत्यय येतो – तिथेच खरा मुळारंभ होतो. कादंबरी संपते, त्या तिथेच खरा ओमचा नवा प्रारंभ होतो. जगण्याचा खराखुरा, भव्य, घाबरवणारा, दचकवणारा आणि तरी खेचून घेणारा पट ओमला अखेरीस स्पष्ट दिसतो. ओमला मैत्रीच्या, बंधाच्या, प्रेमाच्या, आप्तेष्टांच्या, पालकांच्या आणि स्वत:च्याही मर्यादा जिथे उघड होतात; तिथे मुळारंभ होतो!
‘‘गच्च अंधार एव्हाना झाला होता आणि ओम अगदी एकटा एकटा पावलं टाकत टेकडी उतरत होता. त्याला जाणवलं, की असं असलं तरी कनकची मिठी खोटी असू शकत नाही. जिंदीयासोबत दिल्लीला जी फायटिंग आपण केली, त्यातली मजा आयुष्यभर कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि गीताची सोबत मोलाची नव्हती का? आणि पूनमनं आपल्याला धीट बनवलं, हे खरं नाही का? तेव्हा आपण एकटे कसे असू? ही माणसं असली नसली, तरी त्यांच्या या आठवणी आपल्यासोबत आहेतच. पठार संपलंच आता अगदी. ओमनं अंधारात समोर नजर टाकली. पुढे खरी उतरण सुरू होत होती.’’
तशी उतरण आपल्या साऱ्यांच्याच आयुष्यात येते आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या बिनउत्कट अनुभवांची सवयही होते. ओमचा पुढचा प्रवास असाच असेल का निराळा? कुणी सांगावं?
पण ओमनं ‘मुळारंभ’ कादंबरीत जसा प्रवास केला आहे; तसा उत्कट, रम्य, सळसळता, जिवंत प्रवास- हा मात्र आपण साऱ्यांनीच कधी ना कधी केलेला आहे आणि निरस जगण्याच्या पोटात आठवण म्हणून ठेवला आहे. ती आठवण उलगडण्याचा हा एक मुळारंभ!