आजकाल आपण फार जास्त प्रमाणात बाहेरच्या वस्तू/अन्नपदार्थ आणून खातो. खाताना पुष्कळ वेळेस आपल्याला वाटते, की  यात काय घातले असेल? त्याचबरोबर आजकाल बाजारात डाएट स्नॅक्स जसे डाएट चिवडा, डाएट चकली किंवा डाएट मिठाई मिळते. ती आपण उत्साहाने विकत घेतो आणि मग खाताना प्रश्न पडतो, ‘खरंच हे डाएट फूड असेल का?’, ‘खरंच यात तेल घातले नसेल का?’ इत्यादी. या सर्व प्रश्नांची माहिती या अन्नपदार्थाच्या आवरणाच्या मागच्या बाजूला लिहिलेली असते. ती एका विशिष्ट स्वरूपात लिहिलेली असते. त्यालाच Nutritional Label असे म्हणतात. आपण अन्नपदार्थ विकत घेताना ती बघणे गरजेचे असते. जसे फळे-भाज्या घेताना त्या ताज्या आहे हे बघून आपण घेतो, तसेच पाकिटबंद पदार्थ घेताना ही सर्व माहिती वाचून घेणे महत्त्वाचे आहे.
कुठलाही तयार अन्नपदार्थ घेताना त्यावर त्याची उत्पादनाची तारीख असते. त्याचा अर्थ त्या दिवशी तो पदार्थ तयार झालेला असतो. जशी औषधांना मुदतबाह्य़ होण्याची तारीख असते, तसेच अन्नपदार्थाच्या वेष्टनावर कोणत्या तारखेपर्यंत ते खावेत, याची सूचना असते. ही सूचना म्हणजे त्या अवधीच्या आधी हा पदार्थ खाणे योग्य आहे. ही माहिती फार महत्त्वाची असते. विशेषत: ब्रेड, केक इत्यादी पदार्थाकरिता. जसे आपण घरी केलेले पदार्थ शिळे झाल्यावर खात नाही, तसेच आयते आणलेले पदार्थ त्याचा वापर करण्याची तारीख निघून गेल्यावर खाणे योग्य नाही.
यानंतर तयार खाद्यपदार्थात कोणकोणते पदार्थ वापरले आहेत, याची माहिती त्यावर दिलेली असते. हे वाचणेसुद्धा महत्त्वाचे आहे. आपण घरी वापरण्यासाठी जेव्हा वस्तू विकत घेतो, तेव्हा आपल्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांना विचारतो. उदा. कुठले तेल विकत घ्यावे? मग ते तेल इतर तेलांपेक्षा महाग असले तरी आपण ते विकत घेतो, कारण ते आपल्या तब्येतीला, हृदयाला चांगले असते. पण जेव्हा आपण बाजारातील आयते पदार्थ खातो, तेव्हा ही माहिती आपल्याला त्या पदार्थावरील लेबलमधून मिळते. घेतलेल्या पदार्थात कुठले जिन्नस आहेत हे त्यात लिहिलेले असते.
Nutritional Label म्हणजे अन्नाचे ‘रिपोर्ट कार्ड’ किंवा ‘पासपोर्ट’. जसे आपण विद्यार्थ्यांची ओळख त्याच्या ‘रिपोर्ट कार्ड’वरून करतो किंवा जशी प्रवाशाची माहिती त्याच्या ‘पासपोर्ट’ वरून होते, तसेच बाजारातील तयार अन्नाची माहिती त्याच्या Nutritional Labelवरून होते. यामध्ये या अन्नपदार्थातील सर्व अन्नघटक किती प्रमाणात आहेत याची माहिती दिलेली असते. ही माहिती फार तांत्रिक व वैज्ञानिक आहे असे समजून बरेच लोक ती वाचत नाहीत, पण हे चुकीचे आहे. जर तुम्ही ही माहिती वाचाल तर ती हळूहळू कळू लागते. Nutritional Labelलावण्याचा हेतूच मुळी ग्राहकाचे प्रबोधन हे आहे. ही माहिती वाचून मग आपण पदार्थ घ्यावा की नाही, हे ठरवता येते.
Nutritional Label ’ वर अन्नघटकाची माहिती १०० ग्रॅम अन्नपदार्थासाठी दिलेली असते. ही माहिती वाचताना आधी आपण किती वजनाचा पदार्थ विकत घेतला आहे हे जाणून घेण्याची गरज आहे. बऱ्याचदा आपण २०० ग्रॅम पदार्थ विकत घेतो आणि माहिती वाचताना ही १०० ग्रॅमची आहे, हे समजून घेत नाही. म्हणजे २०० ग्रॅम अन्नपदार्थाचे पॅकेट विकत घेतल्यावर आता Nutritional Label ’ वरची माहिती दुप्पट करायची हे लक्षात घेतले पाहिजे. बऱ्याच वेळा वेफर्स, चिप्सचे पॅकेट घेतल्यावर हा गोंधळ  होतो. आपण पॅकेट घेतो, माहिती वाचतो आणि बरे वाटते की ही वस्तू खाऊन आपल्याला फक्त एवढय़ाच कॅलरीज मिळतील. त्यामुळे कुठलाही पदार्थ खाताना तो आपण किती प्रमाणात खातो आहे किंवा तो किती ग्रॅमचा आहे ते लक्षात घेऊन लेबल वाचणे गरजेचे आहे.
लेबलवर सर्वात आधी त्यातील ऊर्जेची माहिती दिलेली असते. प्रत्येकाची ऊर्जेची गरज वेगळी असते, पण जर आपण मधल्या वेळेस खाण्याच्या पदार्थाचा विचार केला तर आपल्याला २००-२५० कॅलरीजहून जास्तीची गरज नसते. काही पदार्थ जसे चिप्स, चॉकलेट्स यात खूप ऊर्जा असते आणि हे पदार्थ खाऊन पोट भरत नाही. त्याचबरोबर हे पदार्थ ‘टाइमपास’ म्हणूनसुद्धा खाल्ले जातात. त्यामुळे या पदार्थाचे Nutritional Label’ वाचले की, कळते त्यात खूप जास्त कॅलरीज आहेत, ते जास्त प्रमाणात खाणे योग्य नाही. मग हे पदार्थ किती खावेत याचा निर्णय घेता येतो.
Nutritional Label चा दुसरा घटक प्रोटिन्स किंवा प्रथिने आहे. Nutritional Label’ वाचल्यावर कळते की, आपल्या अन्नपदार्थात विशेषत: न्याहारीच्या पदार्थात किती कमी प्रमाणात प्रथिने आहेत. ज्या पदार्थात प्रथिने जास्त तो पदार्थ खाण्यास जास्त योग्य!
तिसरा घटक ‘काबरेहायड्रेट्स’चा असतो.‘काबरेहायड्रेट्स’मध्ये दोन भाग असतात. ‘पूर्ण काबरेहायड्रेट्स’ व ‘साखरेतून मिळणारे काबरेहायड्रेट्स.’ आता ‘साखरेतून मिळणारे काबरेहायड्रेट्स’ किती आहे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. ज्यांना मधुमेह आहे किंवा हाय कोलेस्ट्रॉल आहे किंवा जे वजन कमी करू इच्छितात त्यांनी या अन्नघटकाकडे लक्ष दिले पाहिजे. साधारण ‘साखरेतून मिळणारे काबरेहायड्रेट्स’ शून्य असलेले पदार्थ वरील सर्व त्रासांसाठी उत्तम. ‘साखरेतून मिळणारे काबरेहायड्रेट्स’ फक्त गोड पदार्थात असतात असे नाही. त्यामुळे ही माहिती करून घेणे आवश्यक आहे. पुढचा घटक फार महत्त्वाचा आहे- Total fat. पदार्थात Total fat जितके कमी तितके चांगले. बऱ्याचशा पदार्थात या स्निग्ध पदार्थाची सखोल माहिती दिलेली असते. सर्वाचा तेलाचा कोटा दररोज २०ते २५ ग्रॅम असा असतो. तेव्हा कुठलाही पदार्थ खाताना आपल्याला किती fat मिळतात, हे माहीत असले की, मग इतर पदार्थ कमी तेलाचे की उकडलेले असे खाता येतात.
Nutritional Label  वर कोलेस्ट्रॉलची माहिती असते. शाकाहारी पदार्थात साधारणपणे कोलेस्ट्रॉल शून्य असते. पण फार जास्त ऋं३ असले, तर आपले शरीर त्यापासून कोलेस्ट्रॉल तयार करू शकते हे विसरू नये. त्यामुळे जरी पदार्थात कोलेस्ट्रॉल नसले, पण ऋं३ जास्त असले, तरीही हे पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात!
आता पुढच्या वेळेस बाजारातून वस्तू विकत घ्यायला जाल, तर Nutritional Label  वाचा. मग ती वस्तू खायचे तेल असो किंवा बिस्कीटचा पुडा असो. लेबल वाचू लागला की तुम्ही काय खाता याची माहिती होऊ लागेल. तुम्ही खऱ्या अर्थाने जागरूक ग्राहक व्हाल!