नाटय़कलेची परंपरा खोलवर रुजलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राची देशाला ओळख आहे. पण ही ओळख हौशी व व्यावसायिक नाटकांपुरतीच मर्यादित आहे. महाराष्ट्रात गेली अनेक दशकं अगदी महाविद्यालयीन पातळीपर्यंत जाऊन रुजलेल्या एकांकिका या कलाप्रकाराचा फारसा बोलबाला राष्ट्रीय पातळीवर दिसून येत नाही. पण या माध्यमाचं रंगभूमीवरचं योगदान मोठं आहे. तरुण कलावंतांचा मोठ्ठा वर्ग वेगवेगळ्या स्पर्धाच्या रूपाने एकांकिका या माध्यमाशी जोडला जातो. त्याची रंगभूमीशी पहिली ओळख होते. तो इथे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाशयोजना अशा रंगभूमीच्या विविध घटकांची हाताळणी करतो, आणि त्यापलीकडे जात व्यक्त होतो. आपल्या सामाजिक, कौटुंबिक तसंच राजकीय परिसराबद्दलचं त्याचं म्हणणं मांडू लागतो. थोडक्यात, या कलाप्रकारानं जगण्याकडे बघण्याची आणि त्यासंदर्भात विचार करण्याची सवय लावण्याचं काम अत्यंत सहजगत्या केलं आहे.
या माध्यमाकडे आकर्षिलं जाण्यामागे एक महत्त्वाची बाब असू शकते, ती म्हणजे याचा कालावधी. एकांकिका करणे व्यावहारिकदृष्टय़ा सोपे व सुटसुटीत असते. स्पध्रेच्या रूपानं एक आयतं व्यासपीठ मिळतं. त्यामुळे तरुणाई या माध्यमात पुरेपूर रमताना दिसते. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकांकिका स्पर्धा’ पाहतानाही हा अनुभव येत राहिला. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा या तरुणाईच्या ऊर्जेला वाट करून देण्याचं साधन ठरत आल्या आहेत. एक तर तरुण वय; त्यामुळे असलेली बेफिकिरी आणि स्वप्नं या सगळ्यातून मनात विचारांची होणारी घुसळण व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे एकांकिका! आणि यात व्यक्त होण्याचे नवनवे मार्ग शोधण्याचे प्रयत्नही होताना दिसतात. आणि ही शोधाची प्रक्रियाही आपण काही मोठा प्रयोग करत असल्याचा आव न आणता केली जाते. याचं कारण नाटक करायची मजा घेणं, हा त्यामागचा प्रमुख उद्देश असतो. त्यामुळे चुकण्याची, प्रयत्न फसण्याची, फजितीची धास्ती नसते. उलट, बिनधास्तपणे आपल्याला हव्या त्या मार्गानं आपलं म्हणणं मांडायची एक झिंग त्यात असते. या अशा बेधडकपणे चोखाळलेल्या वाटांतूनच नवं काहीतरी हाताला लागतं. स्वत:च्याही नकळत नवी मंच-परिभाषा शोधण्याचा हा खटाटोप व्यक्ततेच्या नवनव्या शक्यता निर्माण करताना दिसतो.
एकांकिका स्पर्धाचं लोण खेडोपाडी पसरत गेलं आणि वेगवेगळ्या समाजघटकांच्या जीवनाचं दर्शन त्यात घडू लागलं. अगदी तळागाळातल्या माणसांचं आयुष्यही त्यात येऊ लागलं. मुळात एकांकिका करणारा आणि पाहणारा प्रेक्षक काही वेगळं पाहायला मिळणार, या अपेक्षेनं येतो. बॉक्स सेट व पांढरपेशा मध्यमवर्गीय नाटय़जाणिवांच्याही पलीकडे जाणारंही तो स्वीकारतो. त्यामुळे विषयाची, आशयाची कसलीही बंधनं (वा गणितं) न जुमानता कलावंत आपलं म्हणणं मांडू लागतात. यामुळेच कामगार व दलित चळवळ, विद्रोही जाणिवा, स्त्रियांचं भावविश्व,  ग्रामीण व आदिवासी जीवन इथपासून ते कॉर्पोरेट कल्चपर्यंत कसल्याही विषयात त्या सुसाट घुसताना दिसतात.  
हे करत असतानाच समूहनाटय़, एकपात्री एकांकिका, मूकनाटय़, छायानाटय़ (श्ॉडो प्ले), पपेट प्ले, माईम, संगीतप्रधान अशा कितीतरी प्रकारांची हाताळणी केली जाते. एक प्रकारे वेगवेगळ्या रंगमंचीय शक्यतांचा हा शोध असतो. तोडून, मोडून, काही नवं करून पाहण्याचा हा प्रयत्न असतो. यात केवळ नाटय़कलेचाच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासाचाही एक भाग असतो.
आपणच एकांकिका उभी करायची असल्याने व्यवस्थापनाचाही अनुभव मिळतो. महाविद्यालयाशी झगडून त्यांना नाटकं करण्याचं महत्त्व पटवत त्यासाठी लागणारा खर्च उभा करणं, मग कलाकारांचा संच जमवून त्यांच्यातील गुणांचा योग्य वापर करणं, हे सारं विद्यार्थ्यांनाच करावं लागतं. यातून नेतृत्वगुण बहरतात. घरातल्या कोषातून, पौगंडावस्थेतून बाहेर पडलेला मुलगा/ मुलगी बाहेरच्या जगात स्वत:ची ओळख शोधण्याच्या प्रक्रियेत असतात. एकांकिकांच्या निमित्तानं होणारी इंटरअ‍ॅक्शन नकळत त्यांना याकामी मदत करते. परस्परांच्या स्वभावांचे कंगोरे समजावून घेत एक व्यक्ती म्हणून ते घडत जातात. एक संघ (टीम) म्हणून सांघिकरीत्या काही करण्याचे धडेही त्यांना त्यातून मिळतात. पुस्तकापलीकडचं हे शिकणंही मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाचं असतं.
याकडे ओढली जाणारी तरुणाई दोन प्रकारांत मोडते. महाविद्यालयात एक्स्ट्रा-करीक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी- म्हणजे मौज म्हणून त्याकडे बघणारा एक वर्ग असतो. त्याला ही अ‍ॅक्टिव्हिटी महाविद्यालयापुरतीच ठेवायची असते. त्यामुळे हौस वा आवड हाच त्यामागचा उद्देश असतो. एकांकिका स्पध्रेच्या मांडवाखालून जाणाऱ्या मंडळींतून उद्याच्या सजग प्रेक्षकांची नकळत घडण होत असते. वेगळ्या रंगमंचीय शक्यतांचे स्वागत करून जुन्या वाटा मोडण्याचा प्रयत्न याच प्रेक्षकांच्या मदतीनं शक्य होऊ शकतो. परिवर्तन स्वीकारणारा हा प्रेक्षक ही रंगभूमीच्या चळवळीतला महत्त्वाचा घटक असतो. ती गरज एकांकिका स्पर्धातून पुरवली जाते.

दुसऱ्या वर्गाला नाटकातच करिअर करायचं असतं. त्यासाठीचा पाया, प्रशिक्षण आणि पूर्वतयारी यादृष्टीनं तो याकडे पाहतो. त्यामुळे एकांकिका हा नाटय़प्रशिक्षणाचा महत्त्वाचा मार्ग ठरतो. याच काळात आपल्या क्षमता जाणून घेत या क्षेत्रात पडायचं की नाही, याचा निर्णय घेता येतो. आजवर मराठी रंगभूमीवरील लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व कलावंतांच्या अनेक पिढय़ा एकांकिका स्पध्रेच्या माध्यमातूनच पुढे आल्या आहेत.  
या दोन वर्गाव्यतिरिक्त तिसऱ्या वर्गातल्या नाटकवाल्यांविषयीही बोलायला हवं. काही स्पर्धक उत्साहाने स्पध्रेत उतरतात. विलक्षण ऊर्जेनं काम करत यशस्वी होतात. पण नंतर मात्र व्यक्ततेचं प्रयोजन बाजूला पडून बक्षीस हेच त्यांचं प्रयोजन होऊन बसतं. परिणामी शक्यतांच्या नव्या वाटा धुंडाळण्याऐवजी ते हाती लागलेला फॉम्र्युला प्रभावीपणे वापरून पारितोषिकपात्र एकांकिका बसवण्याचं कौशल्य आत्मसात करतात, एकांकिका स्पर्धात सातत्यानं यश मिळवतात आणि अखेर तिथेच साचून राहतात. इथे पुन्हा एकदा स्पर्धा या प्रकाराकडे गंभीरपणे पाहण्याची गरज निर्माण होते. स्पध्रेच्या स्वरूपामुळे बक्षिसासाठी काही नवं करून अयशस्वी होण्यापेक्षा तेच ते गणित मांडून करंडक जिंकण्याकडे त्यांचा कल होतो.
आजवर अशा कित्येक गणितांचे ट्रेंड आलेले दिसतात. कधी समूहनाटय़ाचा ट्रेंड येतो, कधी विनोदी एकांकिकांचा. कधी घ्या एखादा आदिवासी इश्यू, दाखवा त्यांचं शोषण आणि घ्या टाळ्या- ही चापलुसी दिसते. कधी स्त्री-पुरुष संबंधांवर धिटाईने (या धिटाईत फक्त लंगिक संबंध व शिव्यांचाच अंतर्भाव का असतो, कळत नाही.) भाष्य केल्याचे दाखवत करंडक मारा, हाही विचार जाणवतो. विद्यार्थी जेव्हा बक्षिसाच्या प्रयोजनापुरतंच काम करू लागतात तेव्हा स्पध्रेचं मूळ प्रयोजन मागे पडू लागतं आणि त्यांची वाढ खुंटते.
इथे वाढ खुंटणं याचा अर्थ एकांकिकेतून पूर्ण नाटकाकडे न वळणं असा नाही. कारण तसे मानले तर एकांकिका हा स्वतंत्र कलाप्रकार नाही असे मानण्यासारखे होईल. पण हेही खरे आहे की, एकांकिका एक स्वतंत्र कलाप्रकार म्हणून स्थापित न व्हायला त्याचा कालावधी हीच मर्यादा पडली असावी. आजही तीन एकांकिका पाहायला जाण्याची सवय प्रेक्षकाला लागू शकलेली नाही. तसे काही प्रयोग झालेही; पण ते रुजले नाहीत. परिणामी एकांकिका स्पध्रेतच अडकून राहिली.
आज स्पध्रेकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आढळतो. एकांकिका स्पध्रेतून व्यावसायिक नाटक आणि मालिकांकडे जाण्याचे मार्ग खुले होतात, हे लक्षात आल्यावर एकांकिका ही जणू ऑडिशन्स असल्याचं मानलं जाऊ लागलं आहे. स्टेपिंग स्टोन म्हणून याकडे पाहणं हे या स्पध्रेच्या मूळ उद्देशालाच मारक ठरू शकतं. स्पर्धकांनी आपले उद्देश तपासून पाहिले पाहिजेत. ती त्यांची जबाबदारी आहे; आयोजकांची नाही.
‘लोकाकिकां’च्या निमित्ताने जाणवली ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या तरुणांची व्यक्त होण्याची तळमळ! सोशल नेटवर्किंगपासून साधं माणसाचंही जिणं नाकारलेल्यांपर्यंत सर्व घटकांकडे आत्मीयतेनं पाहत त्यावर काही म्हणणं मांडण्याची त्यांची असोशी.. व्यक्तीपासून समष्टीपर्यंत जात, आपला भवताल समजून घेत त्यावर रिअ‍ॅक्ट होण्याच्या जबाबदारीचं भान.. लोककलांपासून ते मॉडर्न गॅझेटस्च्या मदतीनं नव्या रंगमंचीय शक्यतांचा शोध घेण्याचा आटापिटा!
ही मुलं पाश्र्वसंगीताची बाजू सांभाळताना नव्या तंत्रज्ञानाचा लीलया वापर करतात. परंतु प्रकाशयोजना व नेपथ्याचा वापर करताना त्यातल्या प्रत्येक घटकातून एक म्हणणं.. एक विधान करता येतं का, याचा शोध कमी पडताना दिसतो. नेपथ्य सूचक वा अर्थपूर्ण करण्यापेक्षा वास्तववादाच्या आकर्षणापायी सजावटीवर भर दिसतो. प्रकाशयोजनेबद्दल तर घोर अज्ञानच आढळतं. प्रकाशाची गरज काय, त्यामागचा उद्देश काय, कुठल्या रंगातून काय अर्थ बाहेर येतो, याबाबत कसलाही विचार न करता चकाचक लाइटस् वा भाराभर स्पॉट्स वापरण्याचा सोस अधिक दिसतो. विनोदाच्या नावाखाली विनोदी मालिकांचा, पीजेंचाच वापर जास्त होतो. तसेच चमकदार कल्पनेच्या चमकदार आविष्कारात आशयापेक्षा ‘इम्पॅक्ट’वर अधिक भर जाणवतो. लेखनाच्या बाबतीत आपला भोवताल, आपल्या अनुभवांतून आलेलं असं काही मांडण्याऐवजी अन्यत्र कुठेतरी काहीतरी पाहिलेलं मांडण्याचाच कल दिसतो. तेही आपल्या भाषेत मांडण्याऐवजी अमुक असं लिहिलं तर ते साहित्यिक भाषेतलं वाटेल या भावनेतून बोजड वा निर्थक लेखनच जास्त आढळतं. यात टीव्ही मालिकांचा प्रभावही कारणीभूत आहे. मालिकेतल्यासारखंच तकलादू मांडण्याचाही ट्रेंड दिसून येतो.
त्याचवेळी अपवादानं का होईना, पण अत्यंत विचारपूर्वक काही मांडायचा प्रयत्नही होताना दिसतो. आजही तरुणाई या स्पर्धातून मनातली घुसमट, संभ्रम, गोंधळ आणि चिंतन मांडताना दिसते. हे अनवट असणंच तर महत्त्वाचं आहे. या तिन्ही प्रकारांतल्या तरुणाईची ऊर्जा मात्र विलक्षण असते. आणि या ऊर्जेवरच एकांकिका स्पर्धाचा पसारा वाढत जाताना दिसतो आहे.
हे सगळं समजून घेण्यासाठी रंगभूमीशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकानं एकांकिका स्पर्धा पाहण्याची गरज आहे. ‘लोकांकिका’ पाहताना यातली बलस्थानं, प्रयोग, धडपड आणि कच्चे दुवे लक्षात आले तरी त्याचबरोबर हेही जाणवलं, की एकांकिका स्पर्धाची व्यासपीठं ही आज विचारपीठं बनताहेत. आणि उद्याची रंगभूमी या विचारपीठाच्या पायावरच उभी राहणार आहे.

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
onion, Nashik, onion auction,
विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया