‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’  यांसारख्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर हे भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव! पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या नाटय़शास्त्र विभागाचे प्रमुख तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पदाधिकारी म्हणून अनेक वर्षे कार्यरत. आपल्या प्रदीर्घ नाटय़वाटचालीचे सिंहावलोकन करणारे त्यांचे पाक्षिक सदर.. ‘गगनिका’!
‘गगनिका’ हा शब्द मी प्रथम ऐकला तो दिवस माझ्या पक्का स्मरणात आहे. २७ मार्च १९७३ हा तो दिवस. हा शब्द त्याच दिवशी का ऐकू आला, त्याची आता कहाणीच होईल.. आणि देशात व राज्यात नव्या आलेल्या सरकारांच्या पाश्र्वभूमीवर ही कहाणी उद्बोधकही वाटेल. तर सीन असा होता : पुण्याच्या शनिवार पेठेतील आळेकरवाडय़ाची गच्ची. वेळ सायंकाळची. अंदाजे ४०-५० तरुण-तरुणी सतरंजीवर बसलेlok01ले. चेहरे चिंताक्रांत. वाडय़ाच्या अंगणात साध्या वेशातील एक-दोन पोलीस उभे. गंभीर वातावरणास कारण नाटकच होतं. हो, तेच नाटक- ‘घाशीराम कोतवाल.’ सतरंजीवर जे चिंताक्रांत मुद्रेनं बसले होते ते या नाटकातील कलाकार. सगळे म्होरक्या येण्याची वाट पाहत होते. म्होरक्या दौंडवरून लोकल ट्रेनने येणार होता. नाटकवाल्यांचं एक असतं, ते म्हणजे- त्यांना फार काळ गांभीर्यपूर्वक राहता येत नाही. गंभीरपणाचा फुगा लवकर फुटतोच. किंबहुना, तो फुटण्याचीच ते गंभीरपणे वाट बघत असतात. ज्या म्होरक्याची वाट बघणं चालू होतं तो म्हणजे जब्बार पटेल. कारण त्याने ‘घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडुलकरांचं नाटक दिग्दर्शित केलं होतं. ते राज्य नाटय़स्पर्धेच्या अंतिम फेरीत द्वितीय क्रमांकानं विजयी झालं होतं. त्यावर्षीच्या स्पर्धेची गंमत म्हणजे प्राथमिक फेरीत पुण्याच्या परीक्षकांनी निकालाच्या वेळी ‘घाशीराम’ हे मुळात नाटकच आहे की नाही, यावरच खूप वाद घातला होता. पण शेवटी, मुंबईच्या परीक्षकांना ठरवू देत, असे म्हणून पुण्यातूनदेखील दुसऱ्या क्रमांकानंच हे नाटक मुंबईला पाठवलं गेलं होतं. नाटकांना तेव्हा बरे दिवस होते. कारण टेलिव्हिजन, इंटरनेट, मोबाइलचे दिवस उगवायचे होते. पुणे-मुंबई एसटीडीही नुकताच सुरू झाला होता. पण कॉल डायल केल्यावर दीर्घकाळ ‘बीप.. बीप..’ असा आवाज येई. मग नशिबात असेल तरच फोन मुंबईला लागत असे. असे जरी असले तरी तिकडे माणूस चंद्रावरही पोचला होता.
‘घाशीराम’च्या कलाकारांपुढे प्रश्न असा होता की, नाटकाचे प्रयोग करायचे की नाही? कारण ज्या हौशी नाटय़संस्थेने ‘घाशीराम’ची निर्मिती केली होती ती संस्था म्हणजे प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन- पीडीए (स्थापना १९५२). या संस्थेच्या कार्यकारिणीने ‘घाशीराम’चे १९ प्रयोग झाल्यावर अचानक स्वत:च्याच नाटकाचे प्रयोग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. कारण ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकामुळे ब्राह्मण समाजाची नालस्ती होते आहे, तसेच पेशवाईमधील अग्रणी नाना फडणवीस या बुद्धिवंताची नाटकातील व्यक्तिरेखा नाटककाराने हिणकस, खुनशी, स्त्रीलंपट आणि इतिहासाशी प्रतारणा करणारी दाखवली आहे. तेव्हा आता १९ प्रयोग झाले तेवढे पुरे झाले; आणखी प्रयोग करू नयेत, असे संस्थेचे मत होते. वास्तविक नाटकाचे वाचन तेंडुलकरांनी संस्थेत ऑगस्ट १९७२ मध्ये केले तेव्हापासूनच नाटकविरोधी सूर संस्थेच्या ज्येष्ठ मंडळींमध्ये होताच. पण नाटक संस्थेने स्वीकारले आहे, त्यामुळे ते आता नाकारणे उचित दिसणार नाही; तेव्हा राज्य नाटय़स्पर्धेपुरते प्रयोग करू; पुढचं पुढे बघू, असा दुसरा सूर होता.
जे तरुण गच्चीवर जमले होते त्यांना या मतभेदाशी काही देणे नव्हते. त्यांना फक्त प्रयोग करायचे होते. नाटक चालू ठेवायचे होते. संस्था हौशी असल्याने मानधनाचा काही प्रश्नच नव्हता. बरेच कलाकार नुकतेच शिक्षण संपवून नोकरीधंद्याला लागलेले होते, तर काही अद्यापि कॉलेजमध्ये शिकत होते.
याच सुमारास मुंबईला विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर धुमाकूळ चालला होता. १९७२ मध्येच ‘सखाराम बाइंडर’चे प्रयोग १० मार्चला मुंबईत, तर ‘घाशीराम कोतवाल’चे पुण्याला १६ डिसेंबरला सुरू झाले. एकाच नाटककाराने इतकी भिन्न आशयाची, आकृतिबंधाची दोन नाटके एकाच वेळी कशी लिहिली? प्रतिभा म्हणजे नेमके काय असते? नाटक लिहिण्याचा हा जणू आदर्श अभ्यासक्रमच असावा अशी खरे तर ही घटना. ही नाटके मराठी रंगभूमीवर होणे हे आपले भाग्य. पण तसे न होता सगळेच- यात सर्व राजकीय पक्ष, काही अपवाद वगळता व्यावसायिक नाटकवाले- दोन्ही नाटकांवर तुटून पडलेले. ‘ही दोन्ही गिधाडे मनोवृत्तीची नाटके आहेत, महाराष्ट्राला गरुडांची नाटके हवी आहेत; गिधाडांची वाईट संस्कार करणारी नाटके नकोत..’ असे सर्वत्र वातावरण. विरोधी पक्षांना तर नवा खेळच मिळाला होता. दोन्ही नाटकांचा समारंभपूर्वक निषेध केला जात असे. ‘सखाराम..’वर अश्लीलतेचा खटला दाखल झाला होता, तर ‘घाशीराम..’मध्ये ‘एक व्यक्तिकेंद्रित अमर्याद सत्ता विनाशास कशी कारणीभूत ठरते’ हे सूत्र होते (Absolute power corrupts all). विरोध करणाऱ्यांमध्ये त्यावेळेचा जनसंघ आणि शिवसेना हे पक्ष आघाडीवर होते. पुण्यात चक्क एक ‘लिंगवाद निर्मूलन कृती समिती’ अशा अस्सल पुणेरी नावाची समिती ठिकठिकाणी निषेध सभांचे आयोजन करत होती. मुंबईत ‘सखाराम’चा एक चालता प्रयोग शिवसेनेने बंद पाडून नाटकाचे नेपथ्य मोडले होते. ही घटना निर्माता-दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी त्यांच्या ‘बाइंडरचे दिवस’ या पुस्तकात उत्तम वर्णन केली आहे. असा काही दगाफटका होऊ नये म्हणून की काय, शनिवारपेठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आळेकर वाडय़ाभोवती साध्या वेशातले पोलीस तैनात केले असावेत. पण दौंडवरून येणारा म्होरक्या अजून पुण्यात पोहचलेला नव्हता.
४०-४२ वर्षांपूर्वीच्या या घटना. दोन मराठी नाटकांनी उडवलेली धूळ देशात, परदेशात पसरली आणि या धुळीतून ही दोन्ही नाटके मात्र ‘अभिजात’ होत गेली. ज्या नाटकांच्या संस्कारांनी गिधाडाची मनोवृत्ती बळावेल म्हणून त्यावर बंदी आणावी असा विचार तेव्हा मांडला गेला होता, ती नाटके आज देशात तसेच परदेशात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा भाग बनली आहेत. ललित कला केंद्राचा मी विभागप्रमुख असताना पुणे विद्यापीठाच्या १९९९-२००० या वर्षांत बी. ए./ एम. ए. (नाटय़शास्त्र) प्रात्यक्षिक परीक्षेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी ‘सखाराम बाइंडर’ सादर केले होते. ते दिग्दर्शित केले होते जयंत जठार याने. तो आज आघाडीचा चित्रपट संकलक आहे. त्यात चंपाच्या भूमिकेत मुक्ता बर्वे होती. लक्ष्मी झाली होती हिमानी पाध्ये. आणि ‘सखाराम’ झाला होता संदीप पाठक. या आमच्या विद्यार्थ्यांची नावे गेल्या १०-१५ वर्षांत त्यांच्या कर्तृत्वामुळे रसिकांना चांगलीच परिचित झाली आहेत. कलाकृती अस्सल असेल तर ती उमलून वर येतेच. गेल्या ४०-४२ वर्षांत ही दोन मराठी नाटके देशात १०-१२ भाषांत मंचित झालेली आहेत. परदेशातील व्यावसायिक रंगभूमीवरही या नाटकांचे प्रयोग झाले. ‘घाशीराम’च्या मूळ संचातील मराठी नाटकाचे देशात अंदाजे पाचशेच्या वर आणि परदेशात ६३ प्रयोग झाले. मूळ संचातील शेवटचा प्रयोग ६ डिसेंबर १९९२ रोजी कोलकाता येथे  झाला (बाबरी मशीद पाडली गेली तो हा दिवस). ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आता तर कालौघात अधिकाधिक समकालीन होत जाताना दिसते आहे.
..अखेर दौंडवरून येणारी लोकल पुण्याला पोहोचली आणि म्होरक्या जब्बार पटेल यांची एन्ट्री शनवारात झाली. त्याचा दवाखाना दौंडला असल्याने म्हणा किंवा एकूणच स्वभावामुळे म्हणा, त्याची एंट्री वेळेवर कधीही नसायची. अपवाद काय तो फक्त विमानतळाचा असेल. वेळेवर न येण्याच्या त्याच्या परंपरेत इतक्या वर्षांत खंड पडलाय अशी साक्ष इतिहास देत नाही. असो. वेळेवर न येण्याच्या परंपरेमुळे वाट बघत असलेले तरुण कलाकार कंटाळून ‘म्होरक्या’ या शब्दाच्या जागी ‘हुप्प्या’ हा शब्द वापरत असत, हा रहस्यभेद आता करण्यास हरकत नसावी. नाटकवाल्यांना प्रसंगाचे गांभीर्य फार काळ टिकवता येत नाही, ते असे.
आता प्रश्न असा होता की, पी. डी. ए. या संस्थेने बंद केलेले नाटक पुन्हा सुरू कसे करायचे? सगळ्यांची इच्छा होती की वेगळी संस्था काढावी आणि प्रयोग सुरू ठेवावेत. हे नाटक हौशी कलाकारांचे असूनही पुढे लोकप्रिय ठरणार आहे, नाटकातील दिग्दर्शकीय कौशल्यामुळे, लोकसंगीताच्या वापरामुळे एका नव्या रंगभाषेचा इतिहास भारतीय रंगभूमीवर घडणार आहे, याची तेव्हा कोणालाही पुसटशी कल्पनाही नव्हती. मग म्होरक्याने प्रश्न सुरू केले की, ‘नवी संस्था का? कोणत्या उद्दिष्टांसाठी?’ अशी तात्त्विक चर्चा सुरू झाली. जमलेल्या तरुणांत कम्युनिस्ट, समाजवादी ते काँग्रेस व्हाया राष्ट्र सेवा दल ते संघ असे सर्व विचारांचे कॉकटेल होते. पण ते नाटक करण्याच्या आड कधी आले नाही. आळेकर वाडय़ाशेजारीच साधना कार्यालय आणि जरा पुढे गेले की संघाचे कार्यालय- मोतीबाग असा सगळा आजूबाजूचा सीन होता. चालू नाटक बंद केले गेले आहे, हा सरळ अन्याय आहे, ते लवकर सुरू झाले पाहिजे, यावर सर्वाचे एकमत. तरुण कलाकारांना नाटकामधून मिळणारी ऊर्जा जर कलाबाह्य़ कारणांनी अडवली गेली तर काय जबरदस्त अस्वस्थता येते याचे जमलेले तरुण हे उत्तम उदाहरण होते. अशा अस्वस्थतेचा निचरा योग्य मार्गाने न झाल्यास त्याचे परिवर्तन नैराश्यात किंवा हिंसेत होण्यास भरपूर वाव असतो. पण सुदैवाने तसे झाले नाही. सर्वाचे म्हणणे एवढेच होते, की आम्हाला आमचं नाटक आमच्या मनासारखं करू देत.
आता नवीन हौशी नाटय़संस्था काढायची तर संस्थेला नाव हवे. मग विविध नावांची चर्चा सुरू झाली तेव्हा अनिल जोगळेकर म्हणाला की, सई परांजपेंनी नाव सुचवले आहे ‘गगनिका’- म्हणजे सायक्लोरामा. रंगमंचाच्या पाश्र्वभागी असणारा पडदा. त्यावर नेहमी आकाश, चंद्र, फिरते ढग वगैरे दाखवतात. पण चर्चेत हे नाव मागे पडले आणि ‘थिएटर अ‍ॅकॅडेमी, पुणे’ हे नाव नक्की झाले. त्याला आता ४२ वर्षे होतील. गच्चीवर जमलेले सगळे ४२ वर्षांत आपापल्या परीने रंगभूमीवर कार्यरत झाले. काही हौशीच राहिले, काही व्यावसायिक झाले. काही विशेष गाजले. काही थांबले. काहीजण वाटचालीत दुखावले गेले. तर काही कायमचे प्रत्यक्ष गगनिकेच्या अवकाशात अंतर्धान पावले.. ते म्हणजे दत्ता कळसकर, श्रीधर राजगुरू, मोहन गोखले, दीपक ओक, सुरेश बसाळे, रमेश टिळेकर, अरविंद ठकार, मिलिंद डोंगरे आणि नुकताच गेलेला आनंद मोडक.
-‘गगनिका’ हे नाव मी प्रथम ऐकले ते असे! वाचकांना मात्र हे नाव आता वर्षभर सोसावे लागणार आहे.
तळटीप : नाटकवाल्यांची आणखी एक सवय म्हणजे अवेळी चमचमीत खाणे. त्या दिवशी रात्री गच्चीवर खिचडी, काकडी होतीच. खालच्या मजल्यावर माझ्या आईने साध्या वेशातल्या पोलिसांना चहा दिला होता आणि वडील १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत ते साडेचार वर्षे येरवडा जेलमध्ये कैदी असतानाचे त्यांचे अनुभव पोलिसांना सांगत होते.          

१९८६ साली अमेरिका दौऱ्यावर निघालेल्या ‘घाशीराम कोतवाल’चा मूळ कलाकार संच.            
छाया : ‘थिएटर अकॅडमी, पुणे’च्या सौजन्याने.
सतीश आळेकर – satish.alekar@gmail.com

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान