सक्काळ सक्काळी उठावे. पादप्रहारे सतरंजी धुडकावूनि लावावी. वामहस्ती बचकभर मिश्री घ्यावी. जिव्हाग्र स्पर्शे उजवी तर्जनी नाममात्र ओली करावी. मिश्रीत बुडवावी व ते बोट असे अलगद आपुल्या कुंदकळ्यांवरूनि lok13फिरवावे. मग समोर ताज्या ताज्या पेपरांचे चघाळ घ्यावे. त्यात काल दिवसभर च्यानेलांवरून चघळलेल्या बातम्यांना छान खमंग फोडणी दिलेली असते. त्या मसालेदार बातम्या वाचाव्यात..
ही आमुची नव्या दिनाची, नव्या मनूची महन्मंगल सुरुवात!
एकीकडे दातांचे सारंगीवादन, त्याने मेंदूस हलके हलके चढणारी मिश्रधुंदी आणि त्यास साथ देण्यास बातम्यांचे द्रुततालातील वाचन!
मैफल काय जमून येते म्हणून सांगू!
कलाक दोन कलाक कुठे गेले हे समजतसुद्धा नाही!
तर त्या दिशी आम्ही असेच स्वर्गीय आनंदोत्सवात रममाण झालो होतो, तोच दारावरून साद आली.
‘‘आहेत का मीडियामरतड घरात?’’
हे आमुचे परमशेजारी रा. रा. लेले. आम्ही वृत्तपत्री खर्डेघाशी करतो म्हणून ते आम्हांस मीडियामरतड संबोधतात, की रोज दोन तास पेपरे वाचतो म्हणून म्हणतात हे कोडेच आहे. त्यांचे काहीच सांगता येत नाही. परवा दारी पेपर टाकणाऱ्या पोऱ्यासही ते मीडियामरतड म्हणाले होते! हे म्हणजे च्यानेलवर येणाऱ्या हरेक पत्रकारू-नारूस विचारवंत म्हटल्यासारखे झाले!!
‘‘यॉ यॉ लेले..’’ आम्ही तोंड मोकळे केले.
‘‘काय पेपर वाचताय वाटतं?’’
आता आम्ही काय पेपरांवर बसलो होतो काय? लेलेपण कधी कधी मेंदूचे डोळे आल्यासारखे वागतात!
खाटेवर टेकत ते म्हणाले, ‘‘हे पेपर वाचून नुस्ता गोंधळ होतो हो डोक्याचा. काही कळेनासंच झालंय..’’
‘‘का? काय कळत नाहीये? मराठीत तर आहेत! बाकीची इंग्रजी पेपरं वाचायची नसतातच! ती पाहायची आणि रद्दीत घालायची. चार महिन्यांत स्कीमचे पैसै वसूल!’’
‘‘भाषेचं नाही हो. मी निवडणुकीचं म्हणतोय.. कोणता पक्ष निवडून येणार हेच समजत नाहीये. नुसताच गोंधळ! हे पाहा हा पेपर म्हणतोय, निकालानंतर नवी समीकरणं जुळणार. हा म्हणतोय भाजपची सत्ता येणार.. सगळाच विचका..’’
लेलेंसारख्यांचा गोंधळ उडणे स्वाभाविकच होते! राजकारणाचा अभ्यास नसला की असे होते! आमचे वेगळे! आम्ही पत्रकारू. त्यामुळे आम्हांस सगळेच समजत असते!
अर्थात, परवापर्यंत बघा- आम्ही सांगत होतो की युती तुटणारच नाही. त्यातले काही तर अगदी छाती ठोकून सांगत होते. नंतर त्यांना दमा झाला! अखेर पत्रकारूंनाही काही शारीरिक मर्यादा असतात! पण आमचे पुढचे सगळे अंदाज बघा कसे खरे
ठरत आहेत!
पाहा ना, युती-आघाडी तुटल्यानंतर आम्ही म्हणालो राज्यातील निवडणुका पंचरंगी होणार. झाल्या की नाही? मग?
तुमच्या मनी अद्यापि शंका असेल तर कुठल्याही वृत्तपत्रातील वार्तापत्रे पाहा. बघा कसे तंतोतंत अंदाज वर्तविलेले असतात. म्हणजे – अमुक अमुक मतदारसंघामध्ये अमुक अमुक यांचे पारडे जड आहे. मात्र त्यांचे निकटतम प्रतिद्वंद्वी तमुक तमुक यांना अधिक मते मिळाली तर तेही निवडून येऊ शकतात. अर्थात मतदार कोणाला मते देणार याच्यावरच हे अवलंबून असेल. मात्र ऐनवेळी वारे फिरल्यास वेगळाही निकाल लागू शकतो!
इतका धादांत परफेक्ट निकाल तुम्हांस राजकारण कोळून प्यायलेले आमुच्यासारखे विचारवंत पत्रकारूच देऊ  शकतात! आणि तरीही लेले म्हणतात, ‘गोंधळ उडतो!’ आम्हांस हे पुरते ठाऊक आहे की निवडणूकवार्ता वाचून लेलेंप्रमाणे तुमच्याही मस्तकाचा गोविंदा झाला असेल. (काय करणार, तुमचा अभ्यास कमी पडतो ना!)
तेव्हा खास तुमच्याकरिता आम्ही खास सादर करीत आहोत निकालाचे काही छातीठोक अंदाज –
१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही! (आहे ना धक्कादायक अंदाज? मग?)
२. विविध पक्षांचा वेगवेगळ्या मतदारसंघांत विजय होईल! (नाही झाला, तर अप्पा म्हणून नाव सांगणार नाही!)
३. या निवडणुकीत काही बडय़ा उमेदवारांचा पराभव होऊन त्यांचे प्रतिस्पर्धी निवडून येतील.   
४. भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे, स्वाभिमानी, झालेच तर बसपा, अण्णाद्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांना शून्य ते शंभपर्यंत जागा मिळून, जास्त जागा मिळणारा पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरेल.
५. भाजपला या वेळी सत्ता स्थापनेची संधी मिळेल. पण त्यांना दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावी लागेल. या परिस्थितीत भाजप, शिवसेना, मनसे किंवा भाजप, राष्ट्रवादी, मनसे किंवा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, भाजप किंवा.. अशी समीकरणे बनू शकतात. मात्र यांपैकी कोणतेही एकच समीकरण सत्तेवर येईल.
आमचे हे अंदाज अत्यंत अभ्यासांती आणि परिस्थितीचा सखोल विचार करून काढलेले आहेत. ते जर असत्य ठरले, तर हातातील या बॉलपॉइंटी पेनची शपथ घेऊन सांगतो, पुढच्या निवडणुकीपर्यंत आम्ही अंदाज संन्यास घेऊ!