समाजाने आखून दिलेल्या चौकटीतलं जगणं, कुटुंब आणि समाजातलं तिचं दुय्यम स्थान तसंच ‘स्त्रीलज्जे’चं तिच्या मनावर ठेवलं जाणारं जोखड.. या सर्वाचा स्त्रीच्या आचार-विचारांवर होणारा परिणाम lok20आणि यातून साकारणारं ‘तिचं’ व्यक्तिमत्त्व.. ज्यात तिला स्वत:चं म्हणून स्वातंत्र्यच माहीत नाही. माणूस म्हणून स्वत:चं अस्तित्व असतं याची जाणीव नाही.. अशा संस्कारांचं ओझं वागवत आयुष्य जगणाऱ्या स्त्रीची कहाणी म्हणजे मल्याळी लेखक सेतु यांची ‘पांडवपुरम’ ही कादंबरी.  
मूळ मल्याळम भाषेतली ही अभिजात कलाकृती आहे. धनश्री हळबे यांनी ही कादंबरी अनुवादित केली आहे.lr10 मुखपृष्ठापासूनच वेगळेपण जपणारी ही कादंबरी स्त्रीजीवनाचे अनेक पदर उलगडत जाते. स्त्री-पुरुष लैंगिकतेसंदर्भात भारतीय समाजात असलेल्या भंपक कल्पना, पारंपरिक समजुती, स्त्री-पुरुष संबंधांतील भ्रामक आचारविचार अशा अनेक गोष्टींचा विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे.
या कादंबरीतली नायिका- देवी हिच्याभोवती ही कादंबरी गुंफली आहे. तिचा नवरा कुन्हीकुट्टन तिला एकाएकी सोडून जातो, तो तिला सोडण्याची कारणं अधांतरीच ठेवून! मग देवी एका अनामिक ध्येयाने पछाडली जाते. आपल्या नवऱ्याने आपल्याला का सोडलं, या प्रश्नाभोवती तिचं आयुष्य फिरतं. पुरुष कधीही चुकत नसतो, हा भारतीय परंपरेतून तिच्या मनावर संस्कारित झालेला विचार.. यामुळे ती त्यासाठी स्वत:लाच दोषी ठरवते, आणि आपला दोष काय, या शोधाच्या मार्गावर स्वत:चं वेगळं भावविश्व निर्माण करते; जे भ्रामक आहे, काल्पनिक आहे आणि तिला मानसिक आजाराच्या खाईत ढकलणारं आहे. तिचं नेहमीचं वास्तवातलं जगणं आणि काल्पनिक जगणं यांचा ताळमेळ न राहून तिची मानसिक स्थिती अधिकच बिघडत जाते. त्यातून उद्ध्वस्त होणारं देवीचं भावविश्व वाचकाचं मन हेलावून टाकतं.
काळ बदलला, आपण आधुनिकतेचा झगा अंगावर चढवला, तरीही स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता यांविषयीचे आपले विचार बहुतांशी बुरसटलेलेच राहिले आहेत हे आजही आपल्याला समाजात प्रकर्षांने जाणवते. त्यामुळे आजही ही कादंबरी तितकीच समर्पक वाटते.
कादंबरीतील पात्रे, त्यांचं ठसठशीत चित्रण आणि खिळवून ठेवण्याची क्षमता यामुळे ही कादंबरी अधिकच वाचनीय होते. आणि सरतेशेवटी अनेक प्रश्न वाचकाच्या मनात उपस्थित करते. धनश्री हळबे यांनी केलेला उत्तम अनुवाद हीसुद्धा या कादंबरीची जमेची बाजू म्हणावी लागेल.
‘पांडवपुरम’ – सेतु, मराठी अनुवाद-धनश्री हळबे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १४२, मूल्य – १५० रुपये.