मेकॅनिकल इंजिनीअर असणाऱ्या दिलीप कुलकर्णी यांनी टेल्को कंपनीत पाच-सहा वर्षे आणि कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात आठ-दहा वर्षे काम केले. त्यानंतर ते कोकणातील कुडावळे या लहान गावी गरजा मर्यादित ठेवत आणि कमीतकमी ऊर्जेचा वापर करून राहतात. कुलकर्णी यांच्या कुटुंबाने स्वीकारलेल्या पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या प्रचारासाठी ते व्याख्याने, शिबिरे, ग्रंथलेखन आणि ‘गतिमान संतुलन’ हे मासिक, या माध्यमांचा वापर करतात. ‘गतिमान संतुलन’ या मासिकात २००१ ते २०१३ या काळात प्रसिद्ध झालेल्या संपादकीयांपैकी निवडक ५६ लेख ‘पर्यावरणाच्या हितासाठी बदलू या जीवनशैली’ या शीर्षकाच्या दोन भागांतील पुस्तकांत संकलित केले आहेत. पुस्तकांचे शीर्षक पर्यावरणाच्या हितासाठी जीवनशैली बदलण्याचे सूचित करते. पर्यावरण मात्र हित-अहिताचा विचार करू शकत नाही. विश्वाचे आणि पृथ्वीचे पर्यावरण कायम बदलत आले आहे. पर्यावरणाचे संतुलन वर्तमानातील आणि भविष्यातील माणसांच्या भल्यासाठी
राखायचे असते.
प्रत्येकी १०४ पृष्ठांच्या या दोन पुस्तकांतील २७ आणि २९ लेखांत अनेकदा तोचतोचपणा जाणवतो. त्याची जाणीव असल्याने त्यावर लेखकाने प्रस्तावनेत एक उपाय सांगितला आहे – ‘पुस्तक सलग वाचण्याऐवजी आठवडय़ाला त्यातील एकेक लेख वाचावा; तसेच न कळालेल्या भागाच्या स्पष्टीकरणासाठी लेखकाची इतर पुस्तके वाचावीत.’ या सूचना करण्याऐवजी थोडे परिश्रम घेऊन पुनरावृत्ती टाळली असती आणि आशयाप्रमाणे लेखांचे स्वतंत्र विभाग केले असते तर वाचकांची सोय झाली असती. कागदाची बचत झाली असती; काही झाडेदेखील वाचली असती!
मासिकासाठी ‘गतिमान संतुलन’ हे नाव ऊ८ल्लं्रेू ए०४्र’्रु१्र४े या संकल्पनेवरून लेखकाने योजले असावे. गतिमान संतुलन असणारे बदल शाश्वत असतात. याउलट खाणी/तेलविहिरीतून कोळसा, खनिजतेल, नैसर्गिक वायू काढून ते जाळणे हे संतुलित रेषीय बदल पर्यावरणाचे संतुलन बिघडवतात अशी लेखकाची रास्त भूमिका आहे.
पर्यावरणाला वाहिलेल्या पुस्तकाने वाढती लोकसंख्या, लोकांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी लागणारी वाढीव ऊर्जा याचा विचार करणे अपेक्षितच आहे. पृथ्वीवर माणूस वावरू लागल्यापासून इ. स. १८०० साल उजाडेपर्यंत जन्मदर आणि मृत्युदर जास्त असूनही त्यात मामुलीशी तफावत असल्याने जगाच्या लोकसंख्येने
१०० कोटींची मर्यादा ओलांडली नाही. म्हणूनच मृत्यू पावलेल्या माणसांची जागा नव्याने जन्मलेली माणसे घेत असली, तरीही या काळातील लोकसंख्या हे गतिमान संतुलनाचे उदाहरण आहे. पृथ्वीवरील काही नैसर्गिक बदल चक्रीय स्वरूपाचे आहेत. दिवस-रात्र, ऋतू, आकाशातील नक्षत्रदर्शने, नत्र आणि कर्ब यांची सजीव ते निर्जीव रूपे ही त्याची उदाहरणे आहेत. काटेकोरपणे पाहू जाता चक्रीय बदलांत संतुलन नसते. परंतु चक्रीय बदलांच्या वारंवारितेमधून (फ्रिक्वेन्सी) संतुलनाचा आभास होतो. ढोबळमानाने या चक्रीय बदलांनादेखील गतिमान संतुलन म्हणता येते. पुस्तकात जरी निसर्गातील बदलांच्या प्रकारांची चर्चा नसली तरी प्रस्तुत पुस्तकासाठी निवडलेली संपादकीये मुख्यत्वे गतिमान संतुलन आणि चक्रीय बदल या दोन प्रकारांतील आहेत.
पुस्तकातील लेख क्रमांक १, २८, ३७, ३८, ३९, ४०, ५६ यातून पर्यावरणसंतुलन ढळण्यामागील पुढील कारणे लेखकाने मांडली आहेत- पर्यावरणस्नेही हिंदू धर्माच्या मूळ गाभ्याचा विसर पडणे, बाजारपेठेला शरण जाणे, केवळ जीडीपी म्हणजे एकंदर राष्ट्रीय उत्पन्न (सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ असे त्यांना म्हणायचे असावे.) यांच्या आधाराने विकासमापन पद्धतीला बळी पडणे इत्यादी. लेखकाच्या मतानुसार, पर्यावरणस्नेही हिंदू धर्माचा कमीतकमी ऊर्जा वापरण्याचा सल्ला शाश्वत विकासाला पूरक आहे.
पर्यावरणीय संतुलन बिघडवणाऱ्या विकृती हिंदू धर्मात शिरल्या आहेत असे लेखकाला वाटते. त्या दूर करू पाहणाऱ्या लेखांचा दुसरा विभाग योजता आला असता. त्यात क्रमांक ६, ९, १०, १३, २०, २९, ३५, ४७ अशा लेखांचा समावेश होऊ  शकेल. गणपती उत्सव, खर्चीक विवाह, वटसावित्री, दसरा, दिवाळी यांसारखे सण हे पर्यावरणपूरक पद्धतीनेच साजरे करावेत, असा लेखकाचा आग्रह आहे. कर्मकांडे आणि श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्यावर या लेखांत खरमरीत टीका आहे. परंतु पर्यावरणासाठी हिंदू धर्माची कास सोडू नये, असे मात्र लेखकाचे ठाम मत आहे. त्यापायी एकीकडे लेखक पुनर्जन्माची निराधार संकल्पना उचलून धरतो आणि मृत्यूनंतर शरीर दहन करण्यासाठी प्रत्येकाने पाच झाडे लावावीत, असेही सुचवतो. परंतु लेखकाला देहदान, पारशी अंत्यसंस्कार हे पर्याय सुचत नाहीत. काही जातींमध्ये मृत शरीर दफन करत असले तरी लेखकाचा त्याला स्पष्ट विरोध आहे.
पर्यावरणाच्या संदर्भात हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहणाऱ्या लेखांचा तिसरा भाग करता येईल. जगभरात विविध रूपांनिशी रुजलेल्या विवाह या संकल्पनेचे जनकत्व हिंदू धर्माला देणे, पाश्चिमात्य विरुद्ध भारतीय भूभागातील सभ्यता आणि संस्कृती ही द्वंद्वे वारंवार उभी करणे, त्यांच्या सोयीस्कर आधाराने हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व वारंवार अधोरेखित करणे अशा गोष्टी या लेखांत आढळतात. बाजारपेठ आणि विज्ञान-तंत्रज्ञान ही पाश्चिमात्य अपत्ये आहेत, असे सांगत त्यांचा त्याग करायचाही सल्ला देण्यास लेखक कचरत नाही. कोणत्याही काळातील आणि भूभागातील मानवी समूहांच्या संस्कृतीमध्ये खूप विविधता आणि गुंतागुंत असते. वर्तमान आणि इतिहास याकडे स्वच्छ नजरेने पाहिले, तर अशा संस्कृतीची एका छापाची चित्रे एकांगी म्हणून अर्धवट असतात. पाश्चिमात्य आणि भारतीय भूभागातील सभ्यता व संस्कृती यांची एकछापी अर्धवट चित्रे गृहीत धरणे, ही लेखकाची अत्यंत विवाद्य भूमिका आहे. वास्तविक युरोपात भांडवलशाही प्रथम उदयास आल्याने तिचे अपत्य असणारे बाजारपेठ, नफा हे शब्द प्रथम तेथेच परवलीचे झाले! भांडवलशाहीने विज्ञान-तंत्रज्ञानाला नफ्याच्या गाडय़ाला जुंपले. त्यामुळे कधी नव्हे अशा वेगाने बाजारपेठेची व्याप्ती वाढली. त्यातून वसाहतींची साम्राज्ये उभारली. दोन महायुद्धे झाली. पेनिसिलीन आणि इतर अँटिबायोटिक्स आणि विविध आजारांविरुद्ध प्रतिकारयंत्रणा जागी करणाऱ्या लसी यांच्या शोधांमुळे जखमी सैनिकांचे आणि नंतर सामान्य नागरिकांचे मृत्यू कमी झाले. अकाली मृत्यूची दु:खे कमी झाली. कुटुंबनियोजनाचाही प्रचार आणि प्रसार झाला. परंतु जन्मदराच्या तुलनेत मृत्युदर वेगाने कमी झाल्याने लोकसंख्येचे गतिमान संतुलन बिघडले. आजच्या घडीला जगाची लोकसंख्या ७२५ कोटींपेक्षा जास्त आहे. भारत आणि चीनसारख्या देशांतील सर्वसाधारण जीवनमान सुधारल्याने जन्मदर कमी होऊन नवे संतुलन अजून तरी घडलेले नाही. ही गुंतागुंत लेखक विचारात घेतच नाही. जगभरातील बाजारपेठशरण नेते सत्ता आणि तिला आधार देणाऱ्या संपत्तिधारकांच्या नफ्यासाठी अनावश्यक गरजा वाढवणे, युद्धे, धार्मिक-जातीय दंगली, कृत्रिम टंचाई असे अनेक अमानवी उपाय बिनदिक्कत वापरताना आढळतात. युरोपचा गेल्या तीन-चार शतकांचा आणि भारतातील गेल्या ३० वर्षांचा इतिहास याला साक्षी आहे. परंतु, याच जागतिक भांडवलशाहीच्या गरजेपोटी (राजेशाह्य़ांच्या तुलनेत) शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे, आरोग्य सुधारते आहे, स्त्रीस्वातंत्र्य विस्तारते आहे, लोकशाही स्थिरावते आहे. या बदलांचे सामान्य जनतेलाही रास्त आकर्षण आहे. त्यामुळे बाजारपेठशरण व्यवस्थेवर आणि तिला पूरक राजकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवून नफ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अमानवी उपायांचे उच्चाटन करणे हे मानवी उपाय आहेत. त्यासाठी व्यक्तीच्या विचारसरणीत आणि व्यवस्थेत बदल घडवणे गरजेचे आहे. ही गुंतागुंत आणि तिचे भान या पुस्तकात मुळीच उमटलेले नाही.
विकासाची सगळी मदार पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा (तो वापरून तयार केलेल्या विजेवर) या जीवाश्म इंधनावर आहे आणि ती संपणार आहेत हे लेखकाचे म्हणणे योग्य आहे. सध्याच्या अतिपेट्रोल-डिझेल जाळणाऱ्या दळणवळण व्यवस्थांमध्ये परिवर्तन आवश्यक आहे. तसेच प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील व्यक्तिगत श्रेष्ठत्वाच्या वल्गनांपायी आज होणारी संसाधनांची उधळमाधळ टाळणे अत्यावश्यक आहे. अशा इतर विषयांना स्पर्श करणाऱ्या लेखांचा वेगळा गट करणे शक्य होते.
काळाच्या कोणत्याही टप्प्यावरील मानवी गरजा पुढील सर्व काळासाठी योग्य आहेत असे म्हणता येण्यासारखी परिस्थिती नाही. परिणामी, गरजा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी ऊर्जावापर वेगाने वाढत आहे. त्यातून उद्भवलेल्या ऊर्जासमस्येवर चटकन सुचणारा एक मार्ग म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करणे. परंतु कोणी, किती कमी ऊर्जा वापरावी, हे कोणी ठरवायचे? त्याचा आधार काय असावा? ऊर्जावापराचे निकष बदलत्या काळानुसार पुन्हा पुन्हा ठरवावे लागतील का? ठरवून दिलेल्या मर्यादा सक्तीच्या करायच्या की लोकांनी त्या आपणहून पाळायच्या? प्रश्न अनंत आहेत. कुलकर्णी यांच्याप्रमाणे जगातील सर्वानी कायमच गरजा मर्यादित ठेवल्या तर ऊर्जावापर नक्कीच कमी होईल. परंतु ते मोजक्या ‘संन्यस्त’ माणसांना जमते. बाकी लोक या ‘संन्यस्त’ व्यक्तींना चबुतऱ्यावर बसवून हार घालतात आणि आपले व्यवहार पूर्ववत चालू ठेवतात. साहजिकच भोंदू साधूंप्रमाणे भोंदू कृतिवंत पर्यावरणवाद्यांचेदेखील पीक जगभरात फोफावते आहे. त्याबाबत पुस्तकात काही ठिकाणी टीका आणि खंत तेवढी व्यक्त झाली आहे.
पर्यावरणाच्या निमित्ताने हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रचाराचे ओझे लेखकाने आपल्या शिरावर घेतल्याने पुस्तकाला अनेक वैचारिक मर्यादा पडलेल्या आहेत. तरीही जीवनशैली बदलण्यामागील लेखकाची कृतिशील तळमळ मात्र वाचकांपर्यंत जरूर पोहोचते.
‘पर्यावरणाच्या हितासाठी बदलू या जीवनशैली’
(भाग १ व भाग २) – दिलीप कुलकर्णी,
राजहंस प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – प्रत्येकी १०४, मूल्ये – ८० रुपये.

Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी