कुणीही आपल्या वडीलधाऱ्यांना प्रश्न विचारला, की ‘जन्माला येऊन तुम्ही असे काय केलेत?’ तर नीट उत्तर द्यायला अनेकांची जीभ चाचरेल. जन्माला आलो, वाढलो, थोडेफार शिकलो, मुलेबाळे झाली आणि मेलो, याव्यतिरिक्त सांगण्यासारखे कुणाकडे काही असण्याची शक्यता फारच कमी. पण ज्यांनी आयुष्यात एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप काही असेल.
लहान मुले नादिष्ट असतात. या नादातूनच ध्यास उत्पन्न होतो. हे माहीत नसलेले फक्त वयाने मोठे झालेले या मुलांची नादिष्ट म्हणून हेटाळणी करीत असतात. सतत मोठय़ा माणसांकडून बोलणी खाल्ल्याने ही मुले नादिष्टपणा सोडून देतात आणि एका आत्यंतिक आनंदाला मुकतात ती कायमचीच. त्यांना ध्यास लागण्याची शक्यता कमी होते. तहानभूक  विसरून एखाद्या गोष्टीत हरवून जाणे हे लहानपणी कुणाला होत असेल तर आपल्या पोटी एक प्रतिभावंत जन्माला आला आहे हे आईवडिलांनी लगेच ओळखले पाहिजे. त्याऐवजी ‘नादिष्ट कारटे, नुसते मुंग्यांशी तासन्तास खेळत असते,’ असे म्हणू नये.
अठराव्या शतकाच्या शेवटी काही जणांनी हवेत उडण्याचा ध्यास घेतला. अत्यंत ‘हुशार’ लोकांना लगेच लक्षात आले की, हा वेडेपणा आहे. माणसाला पंख नाहीत आणि तो हवेपेक्षा फारच जड आहे. साधा तर्क आहे की, माणूस हवेत उडू शकणार नाही. पण नाही. या वेडय़ा लोकांना ते पटले नाही. आपापली यंत्रे उडवताना खूप लोक मेलेदेखील. भारतातदेखील डोंगरे नावाच्या गृहस्थांनी मुंबईला एक विमान उडवून दाखवले होते, असे म्हणतात. शेवटी राईट बंधूंनी विमान बनवले आणि स्वत: बसून सुरक्षितरीत्या उडवून दाखवले. आज आपण सामान्य माणसे विमानात बसून भराऱ्या घेतो, जगभर हिंडतो, ते या ध्यास घेतलेल्या माणसांमुळे.
जगातले एकूण एक शोध अशा ध्यास घेतलेल्या माणसांमुळे लागलेले आहेत. आपण आरामात त्या शोधांचा उपभोग घेत असतो. ध्यास घेतला की, त्यामुळे आपल्याला पुढे काय मिळणार आहे याची कुणालाच फिकीर नसते. कारण इथे आणि आत्ताच इतका आनंद होत असतो की, उद्या काय होणार असे मनातसुद्धा येत नाही. स्वराज्याचा शिवाजीराजांनी ध्यास घेतला. त्यापोटी कित्येकदा मृत्यू समोर पाहिला, पण ध्यास सुटला नाही. औरंगजेबाची नोकरी करणे किती सोपे होते! आरामात आयुष्य गेले असते त्यांचे, पण ध्यासातली मस्ती जगण्यात कणभरही आली नसती.
ध्यास ही काही लादलेली गोष्ट नाही. ती अंतर्यामीची एक गूढ हाक आहे. तिला ‘ओ’ देणे अगर ती गूढ हाक दाबून टाकणे हे आपल्या धैर्यावर अवलंबून असते. सामान्यपणे कुटुंब आणि समाज अशा ध्यासाला दाबून टाकायला मदत करीत असतात. आपण त्या  दबावाला बळी पडलो की, आपले मदाऱ्याचे माकड होते आणि आपण अनेक लोकांच्या हातात आपल्याला खेळवणाऱ्या दोऱ्या देऊन मनाविरुद्ध नाचत  राहतो. या गूढ हाकेला ‘ओ’ दिली रे दिली की आयुष्य उजळून जाते. आयुष्याचे प्रयोजन सापडते. मी जन्माला येऊन काय करणार आहे, हे स्पष्ट कळते. असामान्यत्वाकडे  वाटचाल चालू होते.
ही गूढ हाक सुरुवातीला अतिशय अस्पष्ट असते. मुळात अशी हाक असते, हेच कुणाला माहीत नाही. तिच्याकडे लक्ष दिले की, तिचा आवाज मोठा मोठा होत जातो. ध्यास बनून जातो. हा ध्यास कोण कशाचा घेईल, हे कुणालाच कळत नाही. कुणी वाद्याच्या प्रेमात पडेल, कुणी किडे जमवेल, कुणी कविता करेल, कुणी कुंडलिनीशक्ती जागृत करेल, कुणी लोखंडाचे सोने करेल, कुणी पक्षी-प्राणी पाहत हिंडेल, कुणी सायकल चालवेल, कुणी भणंगासारखा गडकिल्ले धुंडाळत हिंडेल, कुणी पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र याद्वारे निसर्गाचे गूढ उकलेल, तर कुणी काय काय अशक्य ते शक्य करायच्या मागे लागेल.
या हाकेला ‘ओ’ देण्याचे धैर्य मात्र दाखवायलाच लागते. पहिल्यांदा भीती वाटणे साहजिक आहे. आपल्या अख्ख्या घराण्यात कुणी असला वेडेपणा केलेला नसतो. आपण जे करणार, त्यातून पुढे काय उद्भवेल, हे आपल्यालाच माहीत नसते तर दुसऱ्या कुणाला समजण्याची शक्यता नसते. त्यातून पैसे मिळणार की जाणार, हेही ठाऊक नसते. पण ते करायचेच आहे, हे मात्र नक्की असते. नशीबवान लोकांना समजून घेणारी माणसे आसपास भेटतात. ती माणसे आधार देतात. धैर्य वाढवतात. कमी नशीबवान लोकांना अतोनात त्रास दिला जातो. कुणी समजून घ्यायलाच तयार नसते. अविचल निष्ठा हाच एक आधार उरतो आणि तेवढय़ावरच मार्गक्रमण करणे हे हातात असते.
ध्यास हा कधीच पुरा होत नाही, कारण तो अनंत असतो. एखाद्या गोष्टीची माहिती, कौशल्य हे नेहमी अपरिमितच असते. त्यामुळे आता ध्यास पुरा झाला, असे होत नाही. त्या विषयाचे वेगवेगळे आयाम सतत समोर येत राहतात. विस्मय वाढत राहतो. हे सारे  करीत असताना आपण कसे राहतो आहोत, कसे दिसतो आहोत याविषयी जवळजवळ पूर्ण बेफिकीर राहून मार्गक्रमण चालू असते.
या ध्यासामागे स्वार्थ नसतो, हावरटपणा तर कधीच नसतो. आपल्या या ध्यासात अनेकांना सामील करून घेण्याची इच्छा मात्र जरूर असते. आपल्याला येत असलेला आनंद इतर सर्वाना यावा अशी मनापासून इच्छा मात्र असते. या ध्यासमग्न माणसांची आभा वेगळीच असते. आपल्याच धुंदीत आणि मस्तीत जगताना त्यांना पाहणे हादेखील एक आनंद असतो. त्यामुळे
पं. भीमसेन जोशी किंवा रविशंकर यांचे छायाचित्रसुद्धा आनंद देऊन जाते. खरेतर ते गाणारे आणि वाद्य वाजवणारे कलावंत, पण त्यांचे गातानाचे किंवा वाजवतानाचे चित्रदेखील आनंद देते ते त्यांच्या ऊर्जेमुळे. ध्यास नसलेल्या माणसाने अगदी तश्शीच ‘पोझ’ दिली तरी त्यात ती ऊर्जा येत नाही.
आपल्या आयुष्यात कधीतरी हे ध्यासपर्व आलेले असणारच. तो ध्यास आठवा आणि मारा उडी. या ध्यासामागे तुमच्या ऊर्जेचे एकत्रीकरण होऊ लागेल. वांझोटे विचार करण्यात ऊर्जेचा व्यय होणार नाही. आनंदाला पारावार उरणार नाही. ‘बोअर होणे’ हा मराठी भाषेतला सगळ्यात प्रचलित वाक्प्रचार तुम्ही कधी वापरणार नाही. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आपल्याला हा ध्यासेश्वर दिसू लागेल. जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याशी काही ना काही बोलू लागेल. आपल्याला कधीही न कळलेल्या गोष्टी कळू लागतील. आपल्या आयुष्याचे ‘प्रयोजन’ कळेल. तगमग संपेल. क्षुद्र वर्तन होणार नाही. ऊर्जेचा स्तर वाढता राहील.
आपल्या देशात कित्येक शतकांत नवीन शोध लागलेले नाहीत. आपण पाश्चात्त्यांनी लावलेल्या शोधाची फळे चाखत असतो. नुसते आसपास बघा. एकाही गोष्टीचा शोध भारतात लागला आहे, असे तुम्हाला आढळून येणार नाही. सगळे परदेशात लागलेले शोध आहेत. हा भारत असा नव्हता, हे आपला इतिहास वाचल्यावर जाणवते. आपल्याला सर्वाना ध्यास घेतला पाहिजे. भोवतालच्या निसर्गाची कोडी इथे राहून उलगडली पाहिजेत.
एकेका गोष्टीचा अगदी  खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. ज्यांनी काही ध्यास घेतला आहे, त्यांचे खच्चीकरण न करता त्यांना जास्तीतजास्त मदत केली पाहिजे. आपल्याकडचे श्रीमंत १०-१५ मजली इमारती बांधून त्यात आलिशान सजावट करून राहण्यात स्वत:ला धन्य समजतात. परदेशातले श्रीमंत हे न करता विद्यापीठांना मोठमोठय़ा देणग्या देतात. ते असे का करतात तर ध्यास घेतलेल्या माणसांना रोजीरोटीसाठी आपला वेळ आणि बुद्धी वाया घालवायला लागू नये. त्यांना निवांतपणे आपले काम करता यावे. आपल्याकडे विद्यापीठे काढून पैसे मिळवतात. विद्यापीठात काय काय चालते आणि खरोखर काम करणाऱ्यांना काय अडचणींना तोंड द्यावे लागते, याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आपण ऐकतोच.
तर आपण स्वत: ध्यास घ्या. नाही जमले तर आपल्या आसपास ज्यांनी काही ध्यास घेतला आहे त्यांना मदत करा.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे