कवयित्री नीरजा यांचा ‘मी माझ्या थारोळ्यात’ हा कवितासंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होतोय. या पुस्तकाला विद्युत भागवत यांनी लिहिलेली पत्ररूप प्रस्तावना..

प्रिय नीरजा,
तुझ्या कविता सुटय़ा स्वरूपात मी वेगवेगळ्या मासिकांमध्ये वाचल्या होत्या. पण आताच्या दीर्घकविता फार महत्त्वाच्या, मराठी साहित्यातील एक नवा आविष्कार म्हणून जाणवल्या.
कविता लिहिणे म्हणजे आपलाच आपल्याशी केलेला संवाद असतो आणि तो संवादही अतिशय उत्कट आणि प्रामाणिक असतो. पूर्वी मी कविता लिहायची आणि अजूनही त्या जपून ठेवल्यात; छापल्या नाहीत. असं वाटायचं, त्यांच्या विपरीत अन्वयार्थाचे आघात मला सहन होणार नाहीत. पण अलीकडे असं वाटतं की, कवितेतले शब्द, आशय, प्रामाणिकपणा, सत्याची चाड आणि धग हेच तर खरे माणूस असण्याचे श्वास आहे. कागदावर उतरवलेल्या कविता कधी तरी एखादे विधान करायला हवे म्हणून पुस्तकाच्या रूपात यायलाच हव्यात. तुझ्या दीर्घ कवितांचे पुस्तक निघते आहे आणि प्रकाशनपूर्व अवस्थेत तू मला त्या कविता आस्थेने वाचायला दिल्यास यासाठी मी तुझे किती आभार मानू? कारण इतक्या नितळ, कोवळ्या कविता आणि तरीही काही ठामपणे बोलणाऱ्या, वेदना मांडणाऱ्या, हरवत जाणाऱ्या शहरांच्या कहाण्या सांगणाऱ्या अशा तुझ्या कविता वाचल्यावर मला असे जाणवले की, तुझ्या कवितांमध्ये एक वेगळंच जागृत सामाजिक चिंतन आहे आणि बाईपणा आणि पुरूषपणा या दोहोंमधल्या वाढत जाणाऱ्या, ध्रुवीकरणाबद्दल खूप प्रश्न आहेत. शहरांमधील िहसा, हरवत जाणारा संवाद आणि स्त्री-पुरुषांमधला सत्तासंबंध या सगळ्यांची वर्णने एकीकडे तू करते आहेस. पण त्याचबरोबर तुला, असे का घडते याचा इतिहास पाहायचा आहे. तुझ्याभोवती घडणाऱ्या वास्तवावर नेटाने प्रेम करताना, तुला जाणवते आहे की, त्या वास्तवालाच अवकळा आली आहे. मूल्यहीन, ढोंगी, कचकडी अशा समाजजीवनाने तुझ्यावर केलेले आघात आपल्या सर्वावरच झाले आहेत आणि तुला जाणवणारे तडे वा भेगा मलाही तशाच जाणवल्याने कुठेतरी जोडलेपणाची भावना आतून जाणवली. तुझ्या कविता भान ठेवून जगणाऱ्या माणसाच्या कविता आहेत. आणि असे जगताना, त्यात अंगभूत असणारी द्वंद्वेसुद्धा तू मांडते आहेस.
आपण मराठी साहित्याचा अभ्यास करताना, केशवसुत वाचले. ‘नव्या मनूचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे’ अशी आशा दाखवणारी हिरिरी म्हणजे माणूसपणाची खूण असे आपण शिकलो. केशवसुतांची ‘तुतारी’ आणि मर्ढेकरांच्या कवितेतील ‘जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे’ अशी निराशा आपण विद्यार्थिदशेत कवितांच्या माध्यमातून वाचली. पु. शि. रेगे यांच्या कवितांमधून घेतला गेलेला गूढाचा शोध आणि स्त्री-पुरुष संवादाच्या शक्यताही आपण अजमावल्या. ‘तू बोलूच नको काही, शब्दांनी तुझी धास्ती घेतली आहे – आणि तू बोलणार तरी काय, जे मला ठाऊक नाही?’ अशासारख्या कवितांमधून आपण स्त्री-पुरुषांच्या अधिक परिपूर्ण, सघन नात्याची स्वप्नंही रंगवली. तुझ्या कवितेत जागतिकीकरणाच्या झंझावाताचा उल्लेख आहे. आणि बाईपणाचे झोपलेपण तुला अस्वस्थ करते. बाईच्या सर्जनाच्या किमयेचा शोध, हा तुझ्या कवितेचा गाभा आहे. ठार झोपेत असलेल्या भारतातल्या बायकांना सूर्य होण्याचे आव्हान तू देते आहेस. मला हे महत्त्वाचे वाटते. कारण,  खरोखरीच आम्हीसुद्धा स्त्रियांनी पुरुषांच्या सार्वजनिक जीवनामध्ये पूरक भूमिका बजावावी, कोणाचे तरी बोट धरूनच फक्त भीत भीत सार्वजनिक अवकाशात पाऊल टाकावे आणि घरादाराच्या खासगी अवकाशातसुद्धा फक्त संगोपक, संवर्धक असावे, अशी विचारचौकट स्वीकारली होती. फार पूर्वी एका सार्वजनिक सभेत, एका विचारवंताने जेव्हा आम्हाला ‘पॅरोलवर सुटलेले कैदी’ असे विशेषण लावले होते तेव्हा, प्रचंड राग आलेला होता. पण आज मागे वळून पाहताना, प्रामाणिकपणे सांगते की, खरोखरच आमची तशी अवस्था होती.
१९७५ च्या आसपास, ज्या आम्ही शहराशहरांमधून स्त्रीमुक्तीच्या विचारांचा झेंडा घेऊ पाहत होतो, त्यांनी हे स्वीकारले होते की, ज्या घरात आम्ही जन्म घेतला आणि ज्या घरात आम्ही तथाकथित प्रेमविवाह करून नांदायला गेलो, त्या त्या घरात परवडेल, रुचेल इतपतच धर्य आम्ही केले. ज्या थोडय़ांनी आयुष्ये पणाला लावली, त्यांच्या पाठिशी आम्ही आपल्या पायाखालची जमीन स्थिर करतच उभ्या राहिलो. कारण मधु किश्वर, मेधा पाटकर, अरुंधती रॉय होणे आम्हालाही परवडतच नव्हते. ‘पदर तर पेटला नाही पाहिजे, निखारा तर विझला नाही पाहिजे’ अशी तारेवरची कसरत करतच, आम्ही स्त्रीमुक्तीचा विचार मांडत होतो, समाजामध्ये अधिकृतता मिळवत होतो, आणि ‘लोकोत्तर न व्हावे लोकांप्रती’ हे ज्ञानेश्वरी सूत्र आम्हीही मान्यच केले होते. हजारोंच्या, लाखोंच्या सभेमध्ये सगळ्यांना आपले वाटेल आणि तरीही ते स्त्रीच्या स्वातंत्र्यशीलतेचे आणि पुरुषांच्या माणूसपणाचे वाट दाखवणारे असेल असे काही आम्हाला सापडत नव्हते. म्हणूनच बघता बघता, स्त्रीमुक्तीची आमची लहान लहान केंद्रे, निवारा घरे, कायद्याच्या वाटा शोधत राहिली किंवा बिगरशासकीय संघटना होत राहिली आणि स्त्रीमुक्तीच्या विचाराने भारलेल्या व्यक्ती, व्यक्तीच राहिल्या; त्यांचा समुदाय झाला नाही. कोणी डाव्या पक्षात, तर कोणी उजव्या पक्षात सामील झाल्या, तर कोणी सांस्कृतिक भांडवल असणाऱ्या घरांचा भाग झाल्या, कोणी स्त्रीअभ्यासाच्या वाटेने अभ्यासपूर्ण प्रतिष्ठित असे काही लिहीत गेल्या. परंतु, सम्यक परिवर्तनाची सज्जड भाषा आणि सिद्धांकन हे कधीच जसे हवे तसे घडले नाही. अजूनही राज्यसंस्थेच्या आधाराने कायद्यामधल्या छोटय़ा-मोठय़ा सुधारणांच्या वाटेने चळवळ जात राहिली. तुझ्या कवितेत दिसणारे गुदमरलेपण आणि ‘तू जागी हो’ हे आव्हान मला महत्त्वाचे वाटले. कारण असेच आव्हान ‘तू बोलेगी, मूह खोलेगी, तो ये जमाना बदलेगा’ या शब्दांत एकेकाळी स्त्रीमुक्ती चळवळीनेही सार्वजनिक जीवनात गटागटांनी येऊन दिलेच होते.
तुझ्या कवितांचे आणखी वैशिष्टय़ वाटले, ते म्हणजे या कवितांमध्ये भाबडेपणा नाही. अरेबियन नाइट्सच्या कहाण्या लिहिल्या जातात, तर मग िलगसत्तेच्या जुन्या गोष्टी, गुहेतल्या आदिम अंधारातल्या गोष्टी कोणी का लिहिल्या नाहीत, असा प्रश्न विचारत तू ‘पुरुष’ नावाच्या चौकटीला वेठीला धरतेस. सृजनाची गर्भाशयातून लागणारी चाहूल आणि अग्नीच्या शोधातून घडणारी मानवी संस्कृती याचे किती सुंदर समीकरण तू मांडते आहेस! खासगी, सार्वजनिक विभेदन आणि त्यात स्त्री-पुरुषांचे कैद होणे आणि ध्रुवीकरण होणे याचा इतिहास तू शेतीशी किंवा औद्योगिकीकरणाशी फक्त न जोडता आणखीनच शतकानुशतके मागे जाऊन शोधतेस.
पुरुषाच्या भल्या मोठय़ा प्रासादाची, अंधारी खोली होण्याची मान्यता आपणच देतो आणि आपणच गत्रेत पडतो हे तू किती सहजपणे सांगितले आहेस, तुझ्या ‘शहर वसण्याआधी’ या दीर्घ कवितेत! तुझ्या या दीर्घ कवितेत आणखी एक महत्त्वाचे येते ते म्हणजे, बाईच्या शरीरात शिरू पाहणारा, प्रत्येक पुरुष तिच्या मनात शिरू शकत नाही, पण तिचे मन मात्र नियंत्रित करायला पाहतो. हे कोडे किती सहजपणाने तू महाभारतातल्या अर्जुनाच्या गोष्टीतून वाचकांपर्यंत पोहचवतेस. गावांचे शहर झाले, शिक्षण आले, पण पतिव्रता धर्माची व्याख्या जुनीच राहिली. त्याग, समर्पण वगरे शब्दांमध्ये डुंबत बसणारी बाई स्वत:चंच स्वत: पोतेरे करून घेते, आणि सारवत बसते शतकानुशतके- हे सारे भन्नाटपणे तू लिहिले आहेस. नवे तंत्रज्ञान, ग्लोबल शहर आल्यानंतरही, माजघरातलं फडताळ तसंच राहतं, हे तुझ्या लक्षात आलं आहे. आणि मग तू स्वातंत्र्याच्या करकरीत गंधाला श्वासात साठवते आहेस.
२०१२ साल संपता संपता दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात, खासगी बसमध्ये शिरलेल्या, गावखेडय़ातून दूरवर येऊन शिक्षण घेणाऱ्या मुलीची विटंबना, हत्या आणि तिचे गर्भाशयाचे छिन्नविच्छिन्न होणे, हे सारे या पृथ्वीतलावर जिवंत असणाऱ्या सर्वच माणसांनी अनुभवले आणि पाहिले. तुझी ‘माझ्याच थारोळ्यात रुतलेली मुलगी’ ही दीर्घ कविता एका बधिर करणाऱ्या अनुभवाला शब्द देणारी, आणि तरीही पुन्हा एकदा विचार करायला लावणारी अशी वाटली. जमीन हरवलेली, रेनकोट आणि छत्री ठरवून विसरणारी मुलगी गोठून गेलेल्या माणसांना शोधायला निघालेली- हजारो निबंध लिहूनही जे साधलं नसतं, ते तुझी कविता साधते, हे खरंच. ‘झोपू दे निवांत मला माझ्या थारोळ्यात’ ही कविता पुन्हा एकदा इच्छा मरणाच्या आसपास फिरताना दिसते. जगण्याचा आणि अखंड जिवंत राहण्याचा कंटाळा या कवितेत निर्थकपणासह झिरपताना दिसतो.
या कवितांमध्ये अपरिहार्यपणे आपल्यापाशी असणारी सृजनाची शक्ती सगळ्या वादळवाऱ्यातसुद्धा आपल्याकडेच आसरा मागते, हे लक्षात घेतले तर वणवणत थकून गेलेल्या आपल्या आतल्या पोरीलासुद्धा स्वत:च्याच थारोळ्यात निवांत झोपण्यापेक्षा नवी समूहात्मता लाभू शकेल असे मला खात्रीने वाटते. खैरलांजीतला सुरेखा, प्रियांकाचा अपमान आणि विटंबना आपल्या सर्वाच्या हृदयात ज्या प्रकारे घर करून आहे, ते पाहता निवांतपणासुद्धा शोधताना, तो सामूहिक असेल आणि त्यातून उमटणारा आवाज साऱ्या पृथ्वीला वेढून टाकेल अशी मला खात्री वाटते. 
तुझी, विद्युत

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन