हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती ‘पोपटी पार्टी’ची. पावसाळा संपत आलेला असतो, पण अजूनही ओलसर असलेल्या जमिनीमुळे आणि हवेतील थंडाव्यामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या तसेच अन्य शेंगा, वांगी, मिरच्या, नवलकोल या भाज्यांचं मायंदाळ पीक येऊ लागतं. उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही या मोसमात येतात. या भाज्या आणि थंडी यांचा संयोगाने मिलाप झाला की ‘पोपटी पार्टी’चे आयोजन इथे तिथे सर्वत्र व्हायला सुरुवात होते. कुटुंबाची, मित्र-मैत्रिणींची, कट्टय़ावरच्या ग्रुप्सची, ऑफिसातल्या मित्रमंडळींची अशा वेगवेगळ्या ग्रुप्सची पोपटी पार्टी ठरते.

ग्रुपमध्ये पोपटीसाठी आवश्यक पूर्वतयारीची सर्वसंमतीने वाटणी केली जाते. त्यात भाज्या आणणे, मडके आणणे, लाकडे गोळा करणे, भांबुडर्य़ाचा पाला आणणे, वाटण बनवणे, बसण्याची जागा साफसुफ करणे अशी कामे एकेकास वाटली जातात. सगळेजण जमले की ‘पोपटी’ला सुरुवात होते. सोबत खेळ व मनोरंजनाची धमाल असतेच.
पोपटीसाठी आवडीनुसार भाज्या आणि मंडळी मांसाहारी असतील तर मटण वा चिकनही आणले जाते. मडके आतून स्वच्छ धुऊन-पुसून घेतले जाते. पोपटीकरता वाल, मेदळ आणि तुरी तसेच शेवग्याच्या शेंगा, कांदे, lr25बटाटे, वांगी वगैरे अख्खीच धुऊन घेतली जातात. बटाटे, नवलकोल आणि वांग्यांना धुऊन चिरा पाडतात. चिरा पाडलेल्या अलकोल, वांगी व इतर भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबरे, थोडे आले, लसूण घालून केलेले वाटण आणि मीठ व ओवा चोळतात. वाटण उरले तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तर वेगळीच चव येते. मटण वा चिकन असेल तर त्यालाही आले, लसूण, मिरची व कोथिंबिरीचे वाटण लावतात. भाज्या व मटण/ चिकन एकत्र शिजवायचे असेल तर मटण वा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधून ठेवतात. कुणी शाकाहारी असतील तर मटण वा चिकनसाठी दुसरे मडके लावले जाते.
या मोसमात भांबुर्डा ही वनस्पती ओसाड जागी व शेताच्या बांधावर उगवलेली असते. तिला एक विशिष्ट वास असतो. भांबुडर्य़ाचा जखमा भरण्यासाठी औषधी उपयोगही केला जातो. भांबुडर्य़ाचा पाला धुऊन घेतात. मडक्याच्या तळाला भांबुर्डा टाकून त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण वा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुडर्य़ाचा पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
हे मिश्रण शिजवण्यासाठी शेतातील एखादी जागा निवडण्यात येते. मोकळ्या जागी पोपटीचे मडके बसवण्यासाठी एक विताएवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा खड्डा खणला जातो. त्या खड्डय़ात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्डय़ात मडक्याचे तोंड असते. मडक्याभोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या लावून त्याला आग लावली जाते.
साधारण अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण शिजवले जाते. तोपर्यंत जमलेल्या मंडळींचे मनोरंजनाचे खेळ आणि गप्पागोष्टी चांगल्याच रंगात आलेल्या असतात. कडाक्याच्या थंडीच्या दिवसांतच पोपटी पार्टी होत असल्याने कुटुंबातील लहानथोर पोपटीच्या शेकोटीजवळ शेक घेत बसतात. अर्धा ते पाऊण तासाने पोपटी करणारे जाणकार मडक्यावर थोडे पाणी शिंपडतात. ‘चर्र्र’ असा आवाज आला की पोपटी शिजल्याचे समजते. पोपटीचा गरमागरम वाफाळता आस्वाद घेण्यासाठी सारे बैठक मारून सभोवार बसतात. मडक्याभोवतालची आग काठीने बाजूला सारून जाडी काठी खड्डय़ात मडक्याच्या तोंडाजवळ टाकून मडके बाजूस सारले जाते आणि जाड फडक्याने पकडून ते बाजूला केले जाते. बैठकीच्या मधोमध एका पेपरवर हे मडके ठेवून त्यातील वरचा भांबुडर्य़ाचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि मटण वा चिकन टाकले असेल तर ते काठीने किंवा पळीने पेपरवर काढून सगळ्यांना वाढण्यात येते. या ‘पोपटी’ला भांबुडर्य़ाच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा खरपूस गंध व चव असते. हा पूर्णपणे भाजून केलेला, तेल व पाणी न वापरता केलेला पदार्थ असतो. भाजल्यामुळे पोपटी पचायलाही हलकी असते. मडक्यातील खमंग भाज्या बाहेर काढण्यासाठी सगळेजण त्यावर तुटून पडतात. पोपटीचा आनंद लुटतात. अंधाऱ्या थंडगार रात्रींत शेत-माळव्यावरील निसर्गसान्निध्यात पोपटीचा घसा शेकत शेकत आस्वाद घेण्याचा अनुभव अवर्णनीयच असतो.