‘आर. डी. बर्मन – जीवन संगीत’ हे बालाजी विठ्ठल व अनिरुद्ध भट्टाचार्य यांनी लिहिलेलं पुस्तक लवकरच इंद्रायणी साहित्यतर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश.
हि वाळ्यातली एक थंडगार सकाळ होती ती. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी शहराला, सांताक्रूझच्या वेधशाळेने lok24व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही अधिक गार करून टाकलं होतं. हवेत फारसं धुकंही नव्हतं, हे मलय मुझुमदार यांच्या लक्षात आलं. ते १५ वा रस्ता, सांताक्रूझ पश्चिम येथील आपल्या अपार्टमेंटमधून बाहेर पाहत होते. सकाळचे साडेसहा वाजले होते आणि रस्ता शांत, निर्मनुष्य होता. मुझुमदार यांच्या घरीच जेवणखाण करणारे त्यांचे अविवाहित काका मृगेंद्रनाथ लाहिरी हे नाश्त्यासाठी अध्र्या तासात येणार होते. बेल वाजली. आश्चर्यच! मुझुमदार यांच्या मनात विचार आला. कारण दूधवाला आणि पेपरवाला हे तर आधीच येऊन गेले होते.
दारात मुझुमदारांचे ६१ वर्षांचे शेजारी उभे होते.
‘पंचम गेला,’ भानू गुप्ता कसेबसे बोलले. त्यांचा कंठ रुद्ध झाला होता. त्यांच्या डोळ्यांखालच्या सुरकुत्या ओलावल्या होत्या.
शक्ती सामंतांच्या घरातल्या पार्टीतून पंचम रात्री १२.३०च्या सुमारास परत आला होता. त्याची कार गॅरेजमध्ये आणून ठेवल्याबद्दल त्याने बििल्डगच्या वॉचमनला पन्नास रुपयांची बक्षिसी दिली होती. तो त्याच्याकडच्या ४० इंची नॅशनल टीव्ही सेटवर बीबीसीच्या बातम्या पाहात असताना पहाटे अडीचच्या सुमारास त्याला अचानक घाम फुटला आणि त्याच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्याने नोकरांना बेल मारून बोलावून घेतलं. रूममध्ये धावत आलेल्या सुदामला जीभ बाहेर पडलेला पंचम दिसला. त्याने त्याचे तोंड उघडून जिभेवर सॉर्बट्रिेटचा फवारा मारला. रमेश महाराणा या शोफरने घाईगडबडीने अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली आणि पंचमचा सेक्रेटरी भरत अशर फोनवरून ही बातमी मिळताच एका डॉक्टरला सोबत घेऊन आला. त्यांनी पंचमला इमर्जन्सी काíडअ‍ॅक मसाज दिला. रात्रीचा शांत अंधार कापत एक अ‍ॅम्ब्युलन्स त्याच्या दारात हजर झाली, तोपर्यंत पंचम कोसळला होता. पहाटेचे ३.४० वाजले होते. काळ पुढे सरकला.. आर. डी. बर्मनविना.
पहाटेचं तांबडं फटफटत असताना डॉक्टरांनी राहुल देव बर्मन, वय चौपन्न, यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. पुढच्या तासाभरातच त्या बातमीने आधी संगीतरसिकांना अविश्वासाचा धक्का दिला आणि नंतर दु:खाच्या खाईत लोटून दिले.
सुदाम जाना, मनू पाल आणि रमेश महाराणा हे पंचमचे तीन सर्वात विश्वासू नोकर वाचा गेल्यासारखे सुन्न झाले होते. पंचमची आई श्रीमती मीरा देव बर्मन यांना त्यांच्या मुलाच्या निधनाची बातमी सांगितली गेलीच नाही. अल्झायमरच्या विकाराने तिला सत्यापासून वाचवले. ऑक्टोबर २००७मध्ये स्वत:चा मृत्यू होईपर्यंत ती माऊली असंच समजत राहिली की तिचा लाडका टुबलू लंडनमध्ये राहतो आणि तिथून संगीत देतो.
कोलकात्यात १९४०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून १९५०च्या मध्यापर्यंत जे पंचमचे स्थानिक पालक होते, ते मृगेंद्रनाथ लाहिरी रोजच्या दिनक्रमानुसार मुझुमदारांच्या फ्लॅटमध्ये नाश्त्यासाठी पोहोचले. त्यानंतर काही क्षणांतच सत्तरीतले लाहिरी सांताक्रूझमध्येच मेरीलँड्समध्ये पंचमच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले होते. पहिल्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या हॉलमध्ये पोहोचल्यावर त्यांना गर्दीत आशा भोसले, मधू बहल आणि जया बच्चन या टुबलूच्या शेजारी बसलेल्या दिसल्या. त्याच्या पायाशी संगीतकार जतीन-ललित बसले होते. आसपास काय चाललं होतं, हे त्यांच्या आकलनाच्या पलीकडे होतं.
त्या शोकमग्न घरामध्ये पसरलेल्या सुन्न शांततेत शक्ती सामंता, गोगी आनंद, जॅकी श्रॉफ, आमीर खान, संजय दत्त, गुलशन बावरा, बी. आर. चोपडा, मजरूह सुलतानपुरी आणि इतर अनेक जण होते. अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती जिन्यावर एकमेकींचा हात पकडून भरल्या डोळ्यांनी उभ्या होत्या. बासू चक्रवर्ती, मनोहारी सिंह, मारुतीराव कीर, पं. उल्हास बापट, केरसी लॉर्ड आणि शैलेंद्र सिंह यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांना पंचमच्या घरात इतकी शांतता ओळखीची नव्हती. मेहमूद एका खुर्चीत बसला होता, आजारल्यासारखा दिसत होता. गुलज़ार त्याच्याशेजारी उभे राहून त्याच्याशी बोलून त्याचं सांत्वन करत होते.
लीना गांगुलीने सकाळी जेव्हा अमितकुमारला ही बातमी सांगितली, तेव्हा ‘अं?’ एवढीच त्याची प्रतिक्रिया होती. गिटारवादक रमेश अय्यरने अनेक वेळा फोन करूनही तो न लागल्याने तो स्वत:च जुहू तारा रोडवरच्या अमितच्या बंगल्यात येऊन पोहोचला होता. पंचम आणि अमित यांच्यात आदल्या दिवशीच बोलणं झालं होतं. ‘बसू आणि गाणी बनवू. पुन्हा नव्याने सुरुवात करू. उद्या माझ्या घरी ये,’ असं पंचमने सांगितलं होतं. ‘नंतर मी ढसढसा रडलो,’ अमितला अजून आठवतं.
शोकाचे वेगवेगळ्या माणसांवर वेगवेगळे परिणाम होतात. काही जण एकदम मौनात खेचले जातात. काहींना आठवणींचे कढ येतात. अंत्यसंस्कारांसाठी आलेले बहुतेक जण शांतपणे बसलेले असताना अनू मलिक मात्र तरुण गोल्डी बहलबरोबर सतत बोलत होता. जुन्या काळातल्या पंचमचे किस्से सांगत होता. त्याच्या चाली गुणगुणत होता.
ख्यातनाम गायिका रूमा गुहा ठाकुरता यांची मुलगी श्रोमोना ठाकुरता हिने संदीप राय यांना जेव्हा ही बातमी सांगितली, तेव्हा ते गप्पच झाले. श्रोमोना ही पंचमसाठी बहिणीसारखी आणि मुलीसारखी होती. तिने त्याला हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा देण्यासाठी अखेरचा फोन केला होता. पंचम आता नाहीये, यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती सुन्न झाली होती. ऑफिसला गेली नव्हती. तिची ही बधिर अवस्था आणखी महिनाभर टिकणार होती. एका लाइव्ह शोमध्ये सुमन चट्टोपाध्यायने (आता कबीर सुमन) गायलेल्या ‘गानवाला’ या गाण्याने, पंचम आता नसणार, हे वास्तव तिच्यासमोर लख्खकन् मांडलं जाणार होतं आणि तो गेल्यानंतर महिनाभराने ती रडणार होती.
‘इतका तरुण आणि चतन्यमय माणूस मरू कसा शकतो?’ छाया गांगुलीने सांगितलेली बातमी ऐकून शात्रीय गायक पंडित अजय चक्रवर्ती यांची ही पहिली प्रतिक्रिया होती. त्यांची पंचमबरोबरची इिनग्ज आता कुठे सुरू होत होती. दोघांनी एकत्र अल्बम बनवण्याच्या योजना आखल्या होत्या. तीच एस. पी. बालसुब्रह्मण्यमचीही गत होती. जसजशा त्याच्या पंचमबरोबर भेटी होत होत्या, तसतसं त्याच्या मनातलं पंचमच्या संगीताबद्दलचं आकर्षण अधिकाधिक गहिरं होत चाललं होतं. इतर अनेक गोष्टींबरोबर एसपीच्या मनात पंचमचं एक विधान सतत गुंजत होतं. ‘आजा मेरी जान’च्या रेकॉìडगच्या वेळी पंचम त्याला एक कचकचीत शिवी हासडून म्हणाला होता, ‘याचसाठी मी तुला मद्रासवरून खास बोलावून घेतो रे ०*! तूच हे करू शकतोस!’
पंचमच्या अंतिम यात्रेची तयारी सुरू होती. राखी गुलज़ारने आणलेला नवा धोती-कुर्ता त्याला पेहरवण्यात आला होता.
रणधीर कपूर, गोगी आनंद आणि गुलशन बावरा यांच्यासारख्या पंचमच्या जिव्हाळ्याच्या यारदोस्तांव्यतिरिक्त अंत्ययात्रेत अनेक वादक आणि चित्रपटसृष्टीतले मान्यवर सहभागी झाले होते. या फिल्मी दुनियेचा न्यायही अजब आहे. या अंत्ययात्रेत अशीही अनेक माणसं होती, जी पंचमच्या जाण्याबद्दल अतीव हळहळत होती. पण त्यांनी त्यांच्या स्वत:च्या निर्मितीमध्ये कधी त्याचं संगीत प्राधान्याने वापरलं नव्हतं- उदा. यश चोपडा, प्रकाश मेहरा आणि सुभाष घई.
चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि पंचमबरोबर काम केलेल्या वादकांचा मान राखून मृगेंद्रनाथ लाहिरी यांनी चितेला अग्नी दिला. एस. डी. बर्मन यांनी ४८ वर्षांपूर्वी संगीतात करिअर करण्यासाठी मुंबईला जाताना आपल्या मुलाला कोलकात्यात त्यांच्याकडे सोपवलं होतं. त्याला त्यांनी आज निरोप दिला.
सलील चौधरी विमनस्क अवस्थेत बसले होते. ज्याचं वर्णन त्यांनी ‘गेल्या २० वर्षांतील आपल्या चित्रपटसृष्टीतील एकमात्र सांगीतिक ‘फिनॉमेनन’ अशा शब्दांत केलं होतं. त्याच्या अचानक जाण्याने ते सुन्न झाले होते. त्यांनी आदरांजली म्हणून एक कविता लिहिली. ती ‘आजकाल’ या बंगाली दैनिकात प्रकाशित झाली.
अशीम सामंताला प्रश्न पडला होता की, शक्ती सामंता पंचमला त्या रात्री आपल्या घरी थांबवून घेत होते. ते त्याने ऐकलं असतं, तर आता तो जिवंत असला असता का? पंचमने त्या पार्टीत सांगितलं होतं की, ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’ ही त्याच्या सेकंड इिनग्जची सुरुवात असेल आणि आता तो कधीही मागे वळून पाहणार नाही. त्या रात्री त्याच्यात दांडगा आत्मविश्वास दिसत होता.
पाच जानेवारी रोजी देशभरातल्या संगीतरसिकांना त्याच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवरून समजली. मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्याच्यावर एक अग्रलेख लिहिला होता. लोकप्रिय चित्रपट संगीतातल्या संगीतकाराला हा मान बहुधा पहिल्यांदाच मिळाला असेल.
‘राहुल देव बर्मन यांच्या निधनाने चित्रपटांच्या जगताची आणि खासकरून संगीताच्या जगताची मोठी हानी झाली आहे,’ असं तेव्हाचे माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री के. पी. सिंग देव म्हणाले. आर.डी. बर्मनच्या जाण्याने संगीताच्या जगाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनीही त्याला आदरांजली वाहिली होती.
कोलकात्यातील एक आघाडीचा स्पोìटग क्लब असलेल्या द ईस्ट बेंगॉल क्लबने त्यांच्या निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमांतर्गत पंचमच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका संगीतमय सोहळ्याची घोषणा केली. पंचम त्यांच्या क्लबचा लाइफ मेंबर होता.
अमित कुमार आणि रमेश अय्यर यांनी आपला ‘सुरेर बॉस’ हा लेटेस्ट अल्बम ‘बॉस’ला अर्पण केला. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी या बातमीतलं सुप्त ‘मूल्य’ ओळखून तोपर्यंत प्रदíशत न झालेल्या ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’ या त्याच्या अखेरच्या चित्रपटावर लक्ष केंद्रित केलं. छापील माध्यमेही मागे राहिली नाहीत आणि मग चित्रपटविषयक, संगीतविषयक लेखक, समीक्षकांनी लेखांचा धडाका सुरू केला. आश्चर्यकारकरीत्या काही दिवसांतच ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’ हा कोणीच न ऐकलेला अल्बम ‘आर. डी. बर्मनचे आजवरचे सर्वात थोर संगीत’ अशा शब्दांत उतावीळपणे गाजवला जायला लागला. तोही चित्रपटाचं संगीत रिलीझ झालेलं नसताना.
पंचम गेला होता. पण विश्वातली ऊर्जा कधीही नष्ट होत नाही म्हणतात. ती फक्त एका रूपातून दुसऱ्यात रूपांतरित होते. वादकातून वादकाकडे, चाहत्याकडून चाहत्याकडे, अनुकरण करणाऱ्याकडून अनुसरण करणाऱ्याकडे, संगीतकाराकडून संगीतकाराकडे, रीमिक्सरकडून रीमिक्सरकडे, एका शतकातून दुसऱ्या शतकाकडे.. पंचम सतत पुढे सोपवला जाणार आहे.. जिवंत राहणार आहे.

साभार पोच
१) अ‍ॅलोपथीच्या पलिकडे – डॉ. उल्हास – डॉ. वर्षां कोल्हटकर, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – २३२, मूल्य – २६० रुपये.
२) हिंदुहृदयसम्राट – उन्मेष गुजराथी, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – ३८८, मूल्य – ३८० रुपये.
३) प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र – श्रीकांत कार्लेकर, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पृष्ठे – २१०, मूल्य – २०० रुपये.
४) तुलनात्मक शासन आणि राजकारण – वासंती रासम, विजय देठे, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पृष्ठे – २८०, मूल्य – ३९५ रुपये.
५) अमृताचा घनु : राम शेवाळकर – नागेश सू. शेवाळकर, इसाप प्रकाशन, नांदेड, पृष्ठे – ११२, मूल्य – १२० रुपये.
६) गुरुदत्त : एक अशांत कलावंत – इसाक मुजावर, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे -१५२, मूल्य – १६० रुपये.
७) सूक्ष्म आर्थिक विश्लेषण – एस. व्ही. ढमढेरे, ए. एम. पवार, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पृष्ठे – २४८, मूल्य – २५० रुपये.
८) एका शिक्षिकेची शिदोरी – सुधा देसाई, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे – १९३, मूल्य – २५० रुपये.
९) द वॉचमन – रॉबर्ट क्रेस, अनुवाद – बाळ भागवत, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – ३२०, मूल्य – ३०० रुपये.
१०) वॉरन बफे – अतुल कहाते, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – २०२, मूल्य – २२० रुपये.
११) एन्ड गेम – मॅथ्यू, अनुवाद – उदय कुलकर्णी, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – ५००, मूल्य – ५०० रुपये.
१२) देणे घेणे जीवघेणे – सतीश सोळांकूरकर, अनघा प्रकाशन, ठाणे (पू.), पृष्ठे – ११२, मूल्य – १२० रुपये.
१३) घात – व्यंकट पाटील, कुलस्वामिनी प्रकाशन, डोंबिवली (पू.), पृष्ठे – २४६, मूल्य – २५० रुपये.
१४) मुद्दल आयुष्याचं व्याज – विजय जोगमार्गे, अक्षर मानव प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १२८, मूल्य – १२० रुपये. ल्ल