सी. रामचंद्र ऊर्फ अण्णा यांच्या संगीताची एक खासीयत अशी की, स्वरांची मोठी अंतरं.. त्यातली गॅप ते फार खुबीने भरू शकत. जोडणी इतकी सुरेख, की कुठेही सांगीतिक धक्का न लागता हे अंतर पार होतं. उदा. ‘भूल जाए सारे गम, डूब जाए प्यार में, बज रही है धुन यही रात के सितारमें’ या गाण्यात ‘सितारमें.. ते भूल जाए’ हा प्रवास ऐका. ‘में’वरच्या एका छोटय़ा फ्रेझमुळे, काय सुरेख लिंक मिळाली. संपूर्ण सप्तक एका फ्रेझने ओलांडलं. ‘मेरे मनका बावरा पंछी’मध्ये ‘डोले’पासून पुन्हा ‘मेरे’ शब्दावर येणाऱ्या ‘डोले’वरची जागा किती वैशिष्टय़पूर्ण! आणि हे सगळं सलग. ‘देखो जी बहार आयी’ या कमालीच्या गोड चालीत ‘गलियाँ’ शब्दावरचे ते गोड आंदोलन पुन्हा ‘देखो’वर घेऊन येतं.
थक्क करणारं आणखी एक वैशिष्टय़. अंतऱ्याच्या शेवटच्या ओळीला अण्णा अशा तऱ्हेने वळवतात की, ध्रुवपदाला ती अचूक येऊन मिळते. ध्रुवपद तेच असतं, पण कडव्याची चाल वेगळी. हे इतकं वैविध्य चालीत देणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच संगीतकार होते. अण्णांची प्रतिभा ‘जिनीयस’ याच प्रकारातली. पुन्हा ‘भूल जाए सारे गम’चं उदाहरण घेऊ. यात तीनही अंतऱ्यांच्या चाली वेगळ्या. त्याच्या शेवटच्या ओळी काळजीपूर्वक ऐकल्यात तर त्यातलं वैविध्य लक्षात येईल. त्यातही ‘हम न हैं’ आणि ‘जल भी जाए आशियां’ या ओळी वरपांगी सारख्या वाटल्या तरी ‘जल भी जाए’ या ओळीला कोमल धवताचा स्पर्श आहे. तो वेगळेपणा आणतोच.
काही पाश्चात्त्य वाद्यं खुबीने आपल्या गाण्यात, अगदी ‘ऐतिहासिक’ पाश्र्वभूमी असलेल्या गाण्यातही अण्णांनी वापरली. हे विलोभनीय कॉम्बिनेशन खूप वेगळा कलर देऊन गेलं. उदा. ‘तू छुपी है कहाँ’ (सनई-नगारा-गिटार), ‘दुआ कर गमे दिल’ (तबला-गिटार), ‘आधा है चंद्रमा’ (तबला-हवाइयन गिटार).
रफी, तलत यांचे आवाज, अण्णांच्या गाण्यात खूप वेगळे वाटतात. ‘तारों की जुबांपर’ मधला रफीचा आवाज विलक्षण गोड, आणि ‘जा जा के पलट आती है फिर तेरी जवानी’मधल्या ‘नी’ची थरथर दैवी. आशाबाईंच्या आवाजाला ‘देख हमे आवाज न देना’मध्ये वेगळंच माधुर्य मिळालंय. तलत उपलब्ध न झाल्याने स्वत: अण्णांनी गायलेली गाणी.. ‘कितना हसीं है मौसम’ किंवा ‘कहते है प्यार किस को’सुद्धा खूप मेलोडियस. ‘आँखों में समा जाओ’सारख्या एकेका गाण्यावर स्वतंत्र लेख व्हावा. ‘जाग दर्दे इश्क जाग’चा डौल वा ‘जमाना ये समझा के हम’ची मजा किंवा ‘मुझसे मत पूछ’चं अप्रतिम काव्य.. ‘आधा है चंद्रमा’साठी अपूर्णतेचा फील देण्यासाठीच बहुधा मालकंसासारखा पंचमविरहित राग निवडणं.. ‘भोली सूरत’साठी अस्सल रांगडा ठेका शोधणं.. ‘शोला जो भडके’ या गाण्याची आजही नाचायला लावण्याची जादू कायम ठेवणारा तो रिदम देणं.. ‘ओ निर्दयी प्रीतम’ हे गाणं खास ‘शांताराम’ स्टाईलमध्ये त्यांच्या सिनेमासाठी बांधणं.. हे सगळं केवळ अफाट आहे! कशा- कशाबद्दल लिहायचं?
अण्णांनी ‘घरकुल’ किंवा ‘श्रीसंत निवृत्ती ज्ञानदेव’साठी दिलेली मराठी गीतंही विशिष्ट ठसा उमटवून गेली. ‘मलमली तारुण्य माझे’ या सुरेश भटांच्या रचनेला चार चांद लागले ते अण्णांच्या चालीने. आशाबाईंच्या आवाजात हा विलक्षण रोमँटिक, काहीसा मादक ढंग मराठीत आला तो याच गाण्यातून. ‘लागुनी थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी’ म्हणताना जी छोटीशी तान आशाबाई घेतात ती जीवघेणीच आहे. ‘पप्पा सांगा कुणाचे’सारखं तालाला वेगळं गाणं किंवा ‘नंबर फिफ्टी फोर’सारखं गाणं मराठीत खूप वेगळेपणा घेऊन आलं. या गाण्यांनी मराठीत पाश्चात्त्य ढंग सुरेख मिसळला. ‘बांबू’ या शब्दाचा ध्वनी हा अंगभूत नाद आणि रिदम घेऊन येतो या गोष्टीचा अण्णा फार कल्पक वापर करतात. दुसरीकडे ‘नवल वर्तले गे माये’चा सात्त्विकपणा, पावित्र्य काही औरच. ‘चत वाऱ्याची वाहणी’ सारखी ज्ञानेश्वरांच्या शैलीशी साधम्र्य दाखवणारी गदिमांची शब्दकळा आणि त्याला त्या चत्रातल्या झुळकेसारखीच, पलाश वृक्षासारखीच मोहरून टाकणारी ती दैवी चाल! काय प्रवाह आहे या गाण्याला! स्वत:बरोबर तुम्हालाही त्या विलक्षण पहाटवाऱ्यात वाहत नेणारं हे गाणं. (‘मिस्टर जॉन’ आणि ‘नवल वर्तले’ देणारा हाच संगीतकार आहे.) याला किमयागार नाही तर आणखीन काय म्हणायचं?
काही मोजक्या गाण्यांचा थोडय़ा विस्ताराने वेध घेऊ.
ओ चाँद जहाँ वो जाए (राजेंद्र कृष्ण, शारदा)
या गाण्याची खासीयत ही की, दोन अनुपम आवाज.. दोन अद्वितीय शैली या गाण्यात विलक्षण रीतीने एकत्र येतात. लता-आशाची एकत्रित गाणी आहेत, पण या गाण्याची खुमारी काही निराळीच. एक तर तीनही अंतऱ्याच्या चाली वेगवेगळ्या बांधल्यामुळे या गाण्याला एक फार मोठं वैभव मिळालंय. पहिला अंतरा ‘वो राह अगर भूले तू राह दिखा देना, परदेस मे राही को मंझिल का पता देना’ यात सुंदर आलाप तर येतोच. पण ‘है पहला सफर उनका’ या ओळी प्रेमळ, समजूतदार आवाजात येतात, कारण त्या चालीत आणि आवाजातच ही ‘काळजी’ आहे. ‘कहना मेरे होठोंपर’ हा मामला काही निराळाच. त्या आवाजाची सगळी मस्ती, सगळी नशा त्या ‘कहना मेरे होठोंपर रुकती हुई आहें है.’ मध्ये पाझरलीय. ती तानसुद्धा स्वभाव घेऊनच उतरते. ‘बेताब मुहब्बत का बेताब है अफसाना, हर रात खबर लाना’वरची जागासुद्धा रूपगर्वतेिचीच अभिव्यक्ती दाखवते. त्यात समर्पण नाही.. आव्हान आहे.. उधळून देणं आहे.. ‘ऐ चाँद कसम मेरी’ हा तिसरा अंतराही दोघींचे स्वभाव घेऊनच अवतरतो. त्या दोघी, स्वरात सांगायचं तर एकच तान घेतात, पण ‘रे रे नी नी प प’ हे स्वर लताबाई एक आस ठेवून घेतात, तर आशाबाई वेगळ्याच खटकेबाज पद्धतीने. त्यात, शब्दातही कसा फरक! मीनाकुमारी ‘त्याची’ काळजी करतेय तर श्यामा स्वत:चा विचार. अशा विभिन्न कॅरॅक्टरसाठी, वेगळ्या स्वभावांसाठी वेगळे आवाज लावणं. नुसते आवाजच नव्हे तर गायकीची शैलीसुद्धा त्याप्रमाणे बदलणं. ती चाल ‘तशी’ असणं. हे कसं जमलं असावं?

दुआ कर गम ए दिल (शैलेन्द्र, अनारकली)
‘वफाओं का मजबूर दामन बिछाकर, दुआ कर गम ए दिल, खुदा से दुआ कर..’ त्या सलीमसाठी, निरागस मनाने दिलेली दुआ, खुदाकडे त्याच्या जिंदगीसाठी करुणा भाकणं. जेव्हा अशा दैवी सुरावटीत आणि निर्मळ निष्पाप आवाजात व्यक्त होतं. तेव्हा जर खुदानं ते ऐकलं नाही, तर त्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका घ्यावी लागेल. ते गिटार, ऐतिहासिक पाश्र्वभूमी असूनही खटकत नाही. उलट त्यामुळे एक सुंदर टेंपो मिळतो. ‘खुदासे दुआ कर, दुआ कर गम ए दिल’ हे शब्द ज्या तऱ्हेने मांडलेत (सलगपणे, न तुटता.) त्यामुळे खुदाकडे केलेली विनवणी फार नसíगक वाटते. दुसरा ‘गमेऽदिलऽ’ कसा उमाळ्याने येतो. मला शैलेन्द्रची कमाल वाटते. ‘करूंगी म क्या चंद सांसे बचाकर’ या एका वाक्यात तो किती सांगून जातो! आणि शेवटचा ‘बिछा’कर कान देऊन ऐकलात, तर एक श्रुती कमी लावून जी कमाल लताबाईंनी आणि अण्णांनी केलीय, त्यात गाण्याचं सगळं सार उतरलंय. अशा गाण्यांवर, खरं तर अभिनय करावाच लागत नाही.
दिल दिल से कह रहा है (नूर लखनवी, परछाई)
‘दिल दिल से कह रहा है, जो तू है वो ही म हूँ’
मनाच्या कुठल्या अवस्थेत अण्णांनी ही चाल बांधली असावी? केवळ चकित करणारी! या गाण्याचा संपूर्ण टोन, रंग वेगळाच आहे. तू म्हणजे मीच, मी म्हणजे तुझचं प्रतिरूप. ‘तस्वीरे देखने मे दो है जरूर लेकीन’ हा अंतरा सुरू झाल्यावर दुसऱ्या वेळी या ओळी जेव्हा येतात तेव्हा एकाच वेळी तलतसुद्धा त्याच ओळी ‘contra’ पद्धतीने गातो. अक्षरश: प्रतििबब ‘ऐकल्या’सारखं वाटतं. हे गाणं खरोखरच त्या वेगळ्या स्वप्निल जगातलं, इथलं नाहीच. हाच अनुभव, दुसऱ्या अंतऱ्यात येतो, जेव्हा लताबाई contra गातात. आणि ते विलक्षण ‘अचाट’humming. संपूर्ण गाण्याला एक निराळाच अलौकिक गंध आहे. जणू रात्रीची हळुवार मंद गार झुळूक अंगांगावर शहारा आणतेय आणि एक विलक्षण धुंदी सगळ्या वातावरणात भरून राहिलीय. त्या हळुवार मोरपिशी व्हायोलीनने, त्या नाजूक  humming ने तर आपण वजनरहित अवस्थेत तरंगल्याचा भास होतो. तलत-लता दोन मखमली हळुवार आवाज एकमेकांना सांगतातयत- आपण एकच की.
ये जिन्दगी उसी की है.. (राजेन्द्र कृष्ण, अनारकली)
हे तर एक खंडकाव्यच! कवी आणि अण्णा यांच्यात प्रतिभेची नुसती आतषबाजी, जुगलबंदी. आनंद आणि दु:ख, प्रेम आणि विरह, नव्हे चिरविरह यांचा विलोभनीय आविष्कार. ती अनारकली सांगतेय, अरे चराचरातली प्रत्येक गोष्ट, हा विलक्षण समा, बहार सांगतेय की, ‘उधळून दे काळजातलं सारं सारं साचलेलं’. वेडय़ा, या हृदयाची धडधड, काळजाचे ठोके कधी कोणी मोजतं का? त्या ‘मस्तीयों में डूब जा’मधला ‘डूब’चा उच्चार दहा हजार वेळा तरी ऐकावा. एखाद्या िहदी न कळणाऱ्या व्यक्तीलाही अर्थ समजेल हा उच्चार ऐकून! ‘किसी की आरजू में अपने ‘दिल’ को ‘बे’करार कर’ या अक्षरांचा तो विशिष्ट उच्चार. आवाजात, उच्चारात काय ताकद असू शकते! ‘धडक रहा है दिल तो क्या’मध्ये, ‘धडक’नंतर ते क्षणभर थांबून काळजाचा ठोका चुकवणं. द्राक्षाचा घड आणि आपले ओठ. यातलं अंतर म्हणजेच तर सुखासाठीची आपली धडपड. हे सुख तुला खुणावतंय. कुणाचं तरी होण्यात, कुणासाठी तरी झोकून देण्यातच तर आयुष्याची सार्थकता.
आणि नंतर? मी नसले. तरी माझी दास्ताँ. ही मजार सांगेल. मजार नव्हे. हा तर माझ्या मुहब्बतीचा शानदार महाल! इथे भेटलो नाही, पण ‘त्या’ दुनियेत तर नक्कीच मीलन होईल. आयुष्याच्या अशा अखेरीला हसत हसत आल्िंागन देणारी रुबाबदार, सौंदर्यखनी अनारकली. एक एक वीट तिच्या भोवती चढवत जाणारे मजूर. मी चालले. मला बाकी काहीच नको. केवळ तुझा एक कटाक्ष. या अनारकलीचा तुला शेवटचा सलाम. अलविदा.. अलविदा..
अण्णांनी उभा केलेला हा ऐश्वर्यसंपन्न स्वरमहाल. प्रतिभेला सृजनाची ‘वानवा’ नसली की, अशा चाली निर्माण होतात. शेवटच्या भागात तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, शेवटचा अंतरा सुरू झाल्यापासून ‘अलविदा’पर्यंत एक सुसंगत असा स्वरतर्क आहे. त्या विटांसारखंच चढत चढत जाणारं. ‘जहाँ को भूल जाऊं’ला वरच्या सप्तकात पोचलेली चाल पुन्हा ‘बस इक नजर’ला खाली येते. तिथून तो अलविदा.. एका शेवटाची सुरुवात होते. शेवटची हाक. ‘डोळ्यात एकदा तुला भरून घेऊ दे’ हा आक्रोश, पण त्यात आक्रस्ताळेपणा नाही. अतिशय धीरोदात्तपणे, मृत्यूला सामोरी जाणारी अनारकली आणि तो तिचा शेवटचा सलाम. वरच्या गंधारावरचा तो ‘अलविदा’ अंतर्मुख, विषण्ण करणारा, हलवून सोडणारा. या शेवटच्या भागाला काय उपमा द्यावी?
पाच जानेवारी १९८२ रोजी लिव्हरच्या विकारानं अण्णांना आपल्यापासून शरीरानं दूर नेलं. काय काय संपलं? मेलडी संपली. गोडवा संपला. नाचरी लय संपली. उस्फूर्तता संपली. जिंदादिली संपली. मस्ती संपली. एक स्कूल, एक घराणं संपलं. उरली ती आजही तितक्याच तीव्रतेने तनामनाला व्यापून टाकणारी ती गाणी!
………
वाचकहो, अनेक संगीतकारांवर लिहायचंय. नौशाद, शंकर जयकिशन, सलील चौधरी, ओ. पी. नय्यर, अनिल विश्वास, राहुल देव बर्मन, सज्जाद, लक्ष्मीकांत प्यारेलाल.. आणि काही उपेक्षित पण गुणी अशा रवि, चित्रगुप्त, हंसराज बहल यांच्याबद्दल पुढे कधीतरी नक्की लिहिणार आहे. तूर्तास विराम. तुमच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार! अलविदा!      
(समाप्त)

Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!