lok01ताई – (खाटेखाली डोकावून पाहत) अर्रे लब्बाडा! इथं बसून पास्ता खातोयस काय एकटा एकटा.. मी सांगणारे मम्मीला- एक मुलगा कुठं लपलाय ते..
पप्पू – (हाताच्या बाह्या वर गुंडाळीत) ए ताई, बघ हं.. मी रडीन..
ताई – हूं.. तिकडं तुझ्यामुळं सगळी रडारड सुरू झालीय. तू कसला रडतोस? चल, अशी शाळा बुडवून कसं चालेल? शाळेत जायचं. छान छान अभ्यास करायचा. छान छान परीक्षा द्यायची. अन् छान छान पास व्हायचं.
पप्पू – (दोन्ही पाय आपटत) आम्हाला काय नको ती शाळा!
ताई – नको कसं? माह्यताय? एका मुलाला ना आता मॉनिटर करणारेत! दिग्गीकाकांनी तर तुझ्यासाठी छान छान बॅचपण आणलाय. त्यांच्या तरुणपणी त्यांनी स्वत:साठी बनवून घेतला होता तो.
पप्पू – काय नको मॉनिटर! (गाल फुगवत) सारे हसतात आम्हाला. अहमदकाका हसतात. मोदीकाका हसतात. मला माहिताय- तूसुद्धा हसतेस! सगळे सगळे हसतात आम्हाला. म्हणतात, ‘पप्पू कान्ट पास साला!’
ताई – (फिस्सकन हसत) आता कोणी हसलं ना, तर आपण त्याचं घर उन्हातच बांधू..
पप्पू – गुजरातमध्ये बांधायचं. मम्मीचं घरसुद्धा गुजरातमध्ये बांधायचं. (ताईकडं संशयानं पाहत) तुझंसुद्धा!
ताई – हो.. पण का? दिल्लीतपण आता तितकंच कडक ऊन आहे.
पप्पू – (हाताच्या बाह्या वर गुंडाळीत) मग मम्मी मला पास का करत नाही? मी कित्ती अभ्यास करतो. सगळे निबंध मी पाठ केलेत! बोलून दाखवू?.. साथीयों, हम में और उन में ये फर्क है. हम ये करते है.. और वो वो करते है. ये फर्क है हम में और उन में!
ताई – (हलकेच स्वत:च्या कपाळाला हात लावीत) हो. निबंध पाठ केलेस आणि परीक्षा हॉलमध्ये धडाधड म्हणून दाखवलेस. पण ते पेपरात लिहिणार कोण? तिथं ऐन परीक्षेत पेपर टरकावलास..
पप्पू – (पुन्हा पाय आपटीत) ताई, मी रडीन हं..
ताई – राह्यलं. पण तू माझा शाणा दादा आहेस ना? शाणी मुलं कधी मम्मीवर रागावतात का? आपली मम्मी फक्त हेड टीचर आहे की नाही? मग? कोणाला पास करणं का हेड टीचरच्या हातात असतं? पण ती तुला मॉनिटर करणारे की नाही आता? मज्जा आहे बुवा एका मुलाची!
पप्पू – (मोठ्ठा विचार करत) ताई, मी हेड टीचर होणार!
ताई – आँ?
पप्पू – येस्स! मी हेड टीचरच होणार!
ताई – आणि?
पप्पू – (हाताच्या बाह्या वर गुंडाळीत) आणि काय? सगळं ठीक करणार!
ताई – म्हणजे?
पप्पू – शाळाच बंद करणार! म्हणजे मग परीक्षेला सुट्टी.. म्हातारी बुट्टी!! मम्मीला सांग- मला हेड टीचर केलं तरच मी परत येईन. नाय तर कध्धीच येणार नाही.
ताई – (क्षणभर त्याच्याकडं रोखून पाहते. उठते. एक्झिट घेता घेता हाक मारते..) मम्मी, ए मम्मी, पप्पू कुठंच सापडत नाहीये गं..!!!
०००  
स्वाध्याय :
१. ताईने पप्पू सापडत नाही, असे खोटे का सांगितले? तिलाच मॉनिटर व्हायचे आहे असे समजून पुढचे संवाद लिहा.
२. पप्पू हाताच्या बाह्या सतत वर करतो. त्या अखेर किती वर जाऊ  शकतील ते मोजा.
३. परीक्षेत नापास झालेल्या अशा अन्य दोन पप्पूंची नावे सांगा.
४.  ‘हम में और उन में’ असलेले पाच फर्क पाठ करा.
५. हे बालनाटय़ आपली परिचित पात्रे (उदा. आदू, दादू, राजू ) घेऊन नव्याने लिहून काढा.     
अप्पा बळवंत- balwantappa@gmail.com