झाडीपट्टीपासून अपरान्तापर्यंत, गोदातटापासून वरदातटापर्यंत उभा महाराष्ट्रच नव्हे, तर दाही दिशा, नऊ  ग्रह, सप्तपाताळे, तिन्ही ऋतू अशी अवघी कायनात ज्याची युगानुयुगे वाट पाहात होती तो क्षण आता जवळ आला आहे..
दुष्काळाच्या वृत्तपत्रीय छायाचित्रातील त्या पेटंट वृद्ध कास्तकाराप्रमाणे ही मर्राठीभूमी डोईवर हात ठेवून विझल्या मनाने गेली कित्येक वर्षे उभी होती.
पण आता ती प्रतीक्षा संपली आहे..
अरे कष्टकऱ्यांनो, कामकऱ्यांनो, आयटीतल्या वेठबिगारांनो, मॉलमधल्या ब्रँडेड गर्दीत गुदमरणाऱ्या मऱ्हाटी मालविक्यांनो, दहीहंडी मनोऱ्यांतल्या खालच्या थरांनो, गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांनो, नाशकातल्या नानांनो, दादरच्या दादांनो..
गुढय़ा उभारा, तोरणे लावा
हत्तीवरून साखर वाटा
वाऱ्याच्या कानात व्हाटसॅपवरून सांगा..
आईभवानीने, काल्र्याच्या एकवीरेने, कोल्हापूरच्या अंबाबाईने, जेजुरीच्या खंडोबाने, पंढरीच्या विठोबाने अखेर उजवा कौल दिला आहे..
राजगडाला जाग आली आहे.
त्या आशादायी जागृतीच्या तिरंगी क्षितिजावर
निळ्या निळाईची प्रभा फाकली आहे.
गडय़ांनो, ब्लू-प्रिंटच्या प्रकाशनाची घटिका समीप पातली आहे..
थांबा.
हे वृत्तउतावळ्या पत्रकारूंनो,
पहिलटकरणीच्या पतीप्रमाणे येरझाऱ्या घालू नका.
कळते-समजते आणि सूत्रांचे हवाले..  
मीडियामित्रहो, दारावर टकटक करू नका.
(कोण आहे रे तो? एकदा सांगितलेले समजत नाही का?)
ती नीलकांती अजून नटते आहे-
गळ्यात स्वप्नांच्या माळा
प्रगतीची वजट्रिक
कानांत बुगडी विकासाची
नाकात नथ तोऱ्याची
अंगात चमचमती चोळी
नऊ  हजार पानांची नऊवारी
चापूनचोपून सजते आहे
सांगितले ना, ती येते आहे..
काळोख्या रात्रीच्या गर्भातला उष:काल बनून येते आहे.
शतकानंतर उगवणारी पहिली रम्य पहाट बनून येते आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक नवनिर्माणाची वाट बनून
     येते आहे.
टाटांच्या नॅनोरथावर स्वार होऊन येते आहे.
एकदा सांगितले ना, ती येते आहे..
आठ वर्षे थांबलात-
अजून थोडी कळ काढा
आणि बघा
तिच्या नुसत्या वाचनाने दूर होतील सगळ्या दशा,
भ्रष्टाचाराच्या दरडीखालील
महाराष्ट्र-माळिणीची उजळेल दिशा
तिच्या नुसत्या दर्शनाने दूर होतील नाना व्याधी
भूतबाधा, मूठकरणी, किसी का कुछ किया-कराया,
संतती, विवाह, सौतन, नौकरी न लगना..
बाई ब्लू-प्रिंट का सिफ्ली इलम

पुरी करेगा मन की आशा
त्या पाहा, त्या पाहा..
महाराष्ट्राच्या क्षितिजावर दिसू लागल्यात
झुकूझुकू इंजिनाच्या
निळ्या निळ्या धुरांच्या रेषा..
निळ्या निळ्या धुरांच्या रेषा!