इतिहासमहर्षी डॉ. गणेश हरी खरे यांचे ‘मूर्तिविज्ञान’ आणि ‘महाराष्ट्राची चार दैवते’ हे कित्येक वर्षांपासून दुर्मीळ असलेले ग्रंथ नुकतेच भारत इतिहास संशोधक मंडळाने पुनर्प्रकाशित करून संशोधकांची मोठी सोय केली आहे. ‘मूर्तिविज्ञान’ हा १९३९मधील अशा प्रकारचा मराठीतील पहिला ग्रंथ होय. त्या वेळेपेक्षा देव-देवतांच्या मूर्तिसंबंधी जिज्ञासा असलेल्यांची, संशोधकांची आणि तत्संबंधीच्या अभ्यासकांची संख्या आता बरीच वाढलेली आहे.
   १९१६च्या सुमारास तंजावर येथील महाराष्ट्रीय विद्वान गोपीनाथ राव यांनी परिश्रमपूर्वक अनेक पोथ्या-पुराणे धुंडाळून मूर्तिशास्त्रावरील चार भागांतला बृहत्ग्रंथ सिद्ध केला. मराठी वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी हेच कार्य डॉ. खरे यांनी प्रस्तुत ग्रंथाद्वारे पार पाडले होते. व्यासंगी, चिकित्सक आणि ऐतिहासिक दृष्टी असलेल्या खरे यांनी ‘न्यून ते पुरते’ असे कार्य या संबंधात केले आहे. गोपीनाथ राव यांनी ज्या ग्रंथांचे दाखले दिले, ते ग्रंथ तर मुळातून वाचलेच पण अन्य ग्रंथही पडताळले. निष्कर्ष काढताना सावधगिरी बाळगली. ज्यावर नि:शंकपणे लिहिता येणार नव्हते तेथे तसे स्पष्ट केले.
   या ग्रंथात समाविष्ट असलेल्या प्रत्येक देवतेचे वर्णन तीन प्रकारे येथे केलेले आढळते- १) प्रस्ताव म्हणजे देवतेची शास्त्रीय माहिती, इतिहास, इत्यादी, २) ग्रांथिक वर्णने आणि ३) प्रत्यक्ष उदाहरणे. उदाहरणादाखल देशाबाहेरच्या मूर्तीही प्रसंगी विचारात घेतल्या आहेत. मूर्तिशास्त्रविषयक ग्रंथातून आलेल्या मूर्तिविषयक तपशिलाप्रमाणे असलेल्या विविध ठिकाणच्या मूर्तीची यथोचित वर्णने यात आलेली असल्यामुळे अभ्यासकांना आणि जिज्ञासूंना अत्यंत उपयोगी ठरणारा हा अनमोल ग्रंथ आहे.
पूर्वी नव्हती एवढी आवश्यकता सांप्रत या पुस्तकाची आहे. महाराष्ट्रात केवळ डेक्कन कॉलेजमध्ये या शास्त्राचा अभ्यास होत असे. आता पुण्यातच टिळक महाराष्ट्र विद्यापीठासह एक-दोन ठिकाणी तसेच मुंबई, सोलापूर, नागपूर येथेही होतो आहे. त्यामुळे वाचकवर्ग आणि जिज्ञासू संख्येने वाढले आहेत. या शिवाय आपापल्या कुलदेवतेसंबंधीची शास्त्रोक्त माहिती करून घेण्याची तळमळ समाजघटकात वाढली आहे. कुलदेवतेची यथास्थित माहिती होण्याची आवश्यकताही आहेच. हा ग्रंथ त्यासाठी फार उपयुक्त ठरेल हे निश्चित.
देवतामूर्तीच्या अभ्यासाचे काही नवे आयाम आता लक्षात घेतले जात आहेत. त्यासाठी तर या ग्रंथातील मूलभूत माहिती अत्यावश्यक ठरते. कारण या व अशा माहितीच्या आधारावरच आयामांचे मजले चढवायचे असतात. उदाहरणार्थ मूर्तिद्वारे/ आधारे तत्त्वज्ञानाचा विचार व्हायचा तर अर्धनारीश्वर, वैकुंठ, चतुष्पाद विलक्षण सदाशिव या व अशा सारख्या मूर्तीचे आधी आकलन व्हावे लागते. तसेच उपयोजित मूर्तिकला समजावून घ्यायची, तर गोधासना भवद्गोरी आणि मग हरगौरीची मूर्ती कळायला हवी असते. डॉ. खरे यांचा हा ग्रंथ त्यासाठी वाचायला हवाच.
नित्याच्या परिचयाच्या देवतांच्या ठरावीक मूतीर्ंशिवाय अन्य अनेक प्रकारच्या मूर्तीचा विचार या ग्रंथात केला गेला आहे. या शिवाय हस्तमुद्रा, आयुधे, अलंकारातील विविधता यांची माहितीही रेखाकृतींसह दिलेली आहे.
सांप्रत मूर्तिपूजा आणि त्यांचा अभ्यास हे केवळ भारताचे वैशिष्टय़ राहिले आहे. प्राचीन काळी इजिप्त, असिरिया, ग्रीस, इटली, बॅबिलोनिया, मेसापोटेमिया इत्यादी अनेक देशांत मूर्तिपूजा प्रचलित होती, आता मात्र ती परंपरा भारतापुरतीच मर्यादित राहिली आहे. किंबहुना भारतीय संस्कृतीचे ते व्यवच्छेदक लक्षण  आहे. तेव्हा ती समजून घ्यायची असेल आणि तिच्या संबंधीच्या शंकांचे निरसन करून घ्यायचे असेल, तर  या ग्रंथाचा उपयोग करून घेणे अपरिहार्य आहे. आतील छायाचित्रे आर्टपेपरवर घेतल्यामुळे ती आकर्षक झाली आहेत.
दुसरा ग्रंथ आहे, महाराष्ट्राची चार दैवते. २५० पृष्ठांच्या या ग्रंथात डॉ. खरे यांनी अत्यावश्यक आणि मौलिक माहिती एकत्र दिली आहे. महाराष्ट्र शक्तीची भक्ती करणारा असल्यामुळे तुळजापूरची भवानी आणि जेजुरीचा खंडोबा या दोन दैवतांची माहिती येणे अगदी स्वाभाविक आहे. कोल्हापूरची महालक्ष्मीही अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. तिचे येथे असणेही अपरिहार्य आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाच्या केंद्रस्थानी पंढरपूरचा विठोबा आहे. त्यामुळे त्याच्या संबंधीची इत्थंभूत माहितीही या ग्रंथात आली आहे.
या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीनंतर (१९५८) सुमारे पन्नासहून अधिक वर्षे उलटून गेलीत. त्यामुळे माहितीत फरक पडण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराच्या परिसराचे वर्णन, मध्यंतरीच्या काळात बराच बदल केला गेला असल्यामुळे आता लागू पडत नाही; तरी किंवा त्यामुळेच त्याचे ऐतिहासिक मूल्य वाढले आहे. सध्याची महालक्ष्मीची मूर्ती वज्रलेपोत्तरची आहे. पण या ग्रंथात त्या आधीच्या मूर्तीचे छायाचित्रही दिलेले असल्यामुळे अभ्यासकांचे दृष्टीने ते उपयुक्त ठरेल.
या ग्रंथात समाविष्ट केलेल्या प्रत्येक देवतेची    १) तिचे वसते गाव, त्या संबंधीचा इतिहास (असल्यास), ग्रामनामोत्पत्तीची चर्चा, मंदिर त्याची स्थापत्यरचना, मूर्ती, तिचे सांग वर्ण, आवश्यक तेथे चर्चा, प्राकारातील आणि गावातील इतर देवस्थानचे वर्णन, वर्णित मूर्तीचे नित्य, नैमित्तिक उत्सव, अंगभोग व रंगभोग २) ऐतिहासिक निर्देश, त्यासाठी शिलालेख, ताम्रपत्र, दस्तावेज यांची छाननी ३) दैवत-मूर्तीचे नाम रूप, काल आणि प्रवाद यांची चर्चा आणि ४) सर्वाचा निष्कर्ष, अशा चार विभागांत माहिती दिली आहे. एवढी तपशीलवार माहिती अन्य कोणी या दैवतांसंबंधी दिल्याचे आढळत नाही. मात्र अलीकडे नवीन माहिती उपलब्ध झाल्यामुळे तपशिलात थोडाफार फरक पडणे स्वाभाविकच मानले पाहिजे. मात्र येथेही डॉ. खरे यांचे वैशिष्टय़ आढळते ते असे, की त्यांची विधाने संशोधकांच्या मर्यादा सांभाळून केलेली आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणून पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीचे घेता येईल. इतरांच्या मतांबद्दल साधकबाधक विचार येथे आलेले आहेत. पण मूर्तीच्या अंगावरील वस्त्राबद्दल, माथ्यावरील मुकुटाबद्दल, मूर्तीच्या रूपाबद्दल आणि काळाबद्दल जपून विधाने केली आहेत. हे करताना विशेषत: काळासंबंधी मत व्यक्त करताना डॉ. खरे यांनी विठ्ठलमूर्ती ही मध्ययुगातली असे म्हटले आहे. पण संप्रदाय प्राचीन असेल, तर त्या काळची मूर्ती सध्या उपलब्ध नाही असे म्हटलेले नाही, हे खटकते.
या ग्रंथात तपशीलवार विवेचन आलेले आहे, ते जेजुरीच्या खंडोबाबद्दल. ते मराठीतून पहिल्यांदाच आल्याचे आढळते. त्यासाठी सर्वाधिक म्हणजे ८२ पृष्ठांचा मजकूर खर्ची पडला आहे. श्री खंडोबा ही कसा महाराष्ट्र, कर्नाटक आणि थोडय़ाफार प्रमाणात आंध्र प्रदेश व्यापणारी देवता आहे. त्याची ठाणे,  इतिहास, परंपरा व पूजोपचार, तो समाजातल्या सर्वच थरांतील मंडळींचा देव कसा या संबंधीचे भाष्य डॉ. खरे यांनी केलेले आहे.
मागील ४०-५० वर्षांत या चारही दैवतांवर स्वतंत्र पुस्तके आणि लेख लिहिले गेल्याचे आढळते. मात्र ते सगळे साहित्य ज्या ग्रंथांना ‘वाट पुसत पुसत’ लिहिले गेले आहे, ते हे दोन ग्रंथ ‘मूर्तिविज्ञान’ आणि ‘महाराष्ट्राची चार दैवते’ होत. प्रतिपाद्याची विश्वासार्हता, सौपपत्तिकता, ऐतिहासिकता आणि परखडता या सर्वच बाबतीत हे ग्रंथ नावाजण्यासारखे आहेत आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरणारेही आहेत.
महाराष्ट्राची चार दैवते , डॉ. ग. ह. खरे, भारत इतिहास संशोधक मंडळ, पृष्ठे २५०, मूल्य-४०० रुपये
मूर्तिविज्ञान, डॉ. ग. ह. खरे, भारत इतिहास संशोधक मंडळ, पृष्ठे २१२,मूल्य- ४०० रुपये

hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन