२४ ऑगस्ट रोजी ‘लोकरंग वर्धापनदिन विशेष’मध्ये प्रसिद्ध झालेल्या  ‘आजचा महाराष्ट्र आणि वैचारिकता’ हा डॉ. अरुण टिकेकर यांचा लेख मुख्यत्वे महाराष्ट्राच्या सध्याच्या वैचारिक स्थितीवर भाष्य करणारा आहे. एक साचलेपण, कोंडलेपण किंवा अधोगतीच म्हणता येईल अशी स्थिती सध्याच्या गतीहीन महाराष्ट्राची झाली आहे; याबाबत त्यांच्याशी कोणाचेही मतभेद होण्याचे कारण नसावे. परंतु या स्थितीची कारणमीमांसा करताना मात्र नि:संदिग्ध, नेमके शरसंधान न करता त्यांनी मोघमपणे का लिहिले, हे कळायला मार्ग नाही. महाराष्ट्राच्या या अवनत स्थितीचे मूळ कारण राज्याच्या स्थापनेपासूनच भूमिगत अवस्थेत आणि आता तर धडधडीत सर्वाच्या डोळ्यांत धूळफेक करीत व समोर येईल त्याला पाशवी अर्थ व सत्ताकारणाने धूळ चारीत मोकाट सुटलेल्या नेतृत्वात आहे. सामाजिक-सांस्कृतिक- राजकीय परिस्थितीचा विपरीत अर्थ लावीत, खोटी, बेगडी बांधीलकी मानणाऱ्या मानभावी विचारवंतांचा आधार घेत, त्यांच्या कुबडय़ांचा आधार घेत, आपणच समाजाचे तारणकर्ते असल्याचे भासवून आपल्या भावी पिढय़ांचे कल्याण हेच एकमात्र समाजकारण व राजकारण मानणारे आजचे सार्वजनिक नेतृत्व व त्याचे काष्टे/  पदर धरून कणाहीन जीवन जगणारे त्यांचे अनुयायी हीच महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच्या नेतृत्वाची ओळख आहे आणि हेच त्याच्या अधोगतीचे सर्वस्वी कारण आहे. महाराष्ट्र एक पाऊल पुढे जाण्यासाठी ते पाऊल दमदारपणे टाकणारे, निश्चयाचे अधिष्ठान असलेले, सर्वाच्या उन्नतीची नेमकी दिशा असलेले, नि:पक्षपाती ध्येयाची वाट चोखाळणारे असे ते नेतृत्व हवे होते. तसे ते नाही, याबद्दल कुठलीच शंका नाही.
महाराष्ट्रातील विचारसमृद्ध वारसा त्याच्या स्थापनेपासूनच जातीविचाराने किडलेला आहे. पूर्वी गुप्तपणे आणि आता तर उघडपणे जातीविचाराची पाठराखण या राज्याच्या नेतृत्वाकडून सातत्याने झालेली आहे. याचा पुरावा म्हणून सध्या समाजातील सर्वच घटकांना १०० टक्के राखीव जागा सर्वत्र देण्याची मागणी लवकरच पुढे आली तर नवल वाटायला नको. समाजात सरकारमान्य मागासलेपण वाढत आहे. यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा आहे?
‘सरकारमान्य झोपडपट्टी’ हे बिरुद हल्ली अभिमानाने मिरवले जात असलेल्या अनेक वस्त्या राज्याच्या सर्वच शहरांतून उत्तरोत्तर वाढत आहेत. या कर्माला काय म्हणावे? ‘गलिच्छ वस्त्या’ सरकारमान्य झाल्या, ही महाराष्ट्राची केवढी अधोगती आहे! मतांच्या राजकारणाने अंध झालेल्या पुढाऱ्यांना हे कळत नाही, एक वेळ मान्य. कारण समाजाचा दूरदृष्टीने विचार करण्याचे त्यांचे इंद्रियच बधीर झालेले आहे. परंतु विचारवंतांनाही हे कळू नये?
गेली १०-१५ वर्षे उघडपणे व स्थापनेपासून गुप्तपणे महाराष्ट्राचा वैचारिक वारसा विसरून आपली वडिलार्जित मालमत्ता असल्यासारखे राज्याची साधनसंपत्ती, पुरोगामी विचार व शाहू-आंबेडकर-फुले या थोर नेत्यांचे नाव घेऊन राजरोसपणे संधी मिळेल तिथे लुबाडणे, हा एककलमी कार्यक्रम राज्यकर्ते बेडरपणे राबवू शकताहेत; एवढी महाराष्ट्रातील जनतेची झगडण्याची शक्ती खच्ची केली गेली आहे. याचे कारण वेळोवेळी उघडपणे, थेटपणे राज्यकर्त्यांचे कान ओढण्याची धमक विचारवंत म्हणविणाऱ्या व नेतृत्व करणाऱ्यांत राहिलेली नाही. भ्रष्टाचाराची कीड तर सार्वकालिक व शाश्वतच झालेली आहे. परंतु समाजाला लागलेली ही ‘वैचारिक वाळवी’ अधिक घात करीत आहे. चळवळी होत आहेत, पण त्या स्वत:ला ‘मागास, गरीब’ म्हणून सरकारमान्यता मिळविण्याकरिता होत आहेत, हे समाजाचे दुर्दैव आहे. समाजाला परावलंबी, याचक बनविण्याची सरकारने स्पर्धा चालविली आहे. यामुळे समाज दुबळा होत चालला आहे. सुखवस्तुपणा, चैन, विलास, मौजमजा हेच परवलीचे शब्द बनल्यावर दुसरे काय होणार? समाजाचा बराच मोठा भाग हा सध्या सुखवस्तुपणामुळे ऐदी व अल्पसंतुष्ट बनला आहे. त्याने गती हरवली आहे. ‘आहे रे’ वर्ग वरीलप्रमाणे, तर ‘नाही रे’ वर्ग आपण सरकारमान्य ‘गरीब’, ‘मागास’ कसे ठरवले जाऊ, या चिंतेत मग्न आहे. आणि हेच खरे आपले सामाजिक दुखणे आहे. ते जाणीवपूर्वक पोसले गेले आहे. याला आजपर्यंतचे राज्यकर्ते जबाबदार आहेतच; पण त्याहीपेक्षा ‘सरकारी तत्त्वज्ञ, विचारवंत’ इ.चे मिंधेपण जास्त जबाबदार आहे. प्रसार माध्यमे- मग ती लिखित असोत वा दृक्श्राव्य- हीसुद्धा याला अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत. महाराष्ट्राच्या या अधोगतीची कारणमीमांसा करून त्याची योग्य ती चिरफाड कोण करणार? सरकारी रोष तसेच आर्थिक नुकसान पत्करून खोटा आभास निर्माण करणाऱ्या विकासाच्या सरकारी जाहिराती माध्यमे नाकारणार कधी? ही जनतेची दिशाभूल नव्हे तर काय आहे?
‘वैयक्तिक हित म्हणजे पक्षहित व पक्षहित म्हणजे राज्यहित व राष्ट्रहित!’ हे सूत्र घेऊन चालणारे दोन पक्ष- एक ‘राष्ट्रीय’ व दुसरा ‘राष्ट्रवादी’ यांची अभद्र व अतूट अशी आघाडी जेव्हा सत्तेत आली, तेव्हापासून महाराष्ट्राचा पूर्ण घात झाला आहे. हे आपण अनुभवतोच आहोत. महाराष्ट्राच्या सर्वागीण अधोगतीला पूर्णत्वाकडे नेण्याचे कार्य हे दोन पक्ष अगदी हिरीरीने करीत आहेत; हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. या दीर्घकाळ सत्तेवर असणाऱ्या अभद्र युतीने भरून येऊ न शकणारे र्सवकष नुकसान केले आहे. याच्या जोडीला वृथा अभिमान, भाषेचा व भाषिकांचा नको तितका गर्व, फुकाची श्रेष्ठत्वाची कल्पना, कष्ट न करता सहज मिळणाऱ्या सुबत्तेचा हव्यास हे मराठी माणसाचे खास दुर्गुण. इतिहासाकडून काहीही न शिकता त्याचाही नको तितका बोलघेवडा गर्व व त्यात रमणारी व वर्तमानाकडे पूर्णपणे पाठ फिरविण्याची वृत्ती- हे या समाजाचे वंशपरंपरा चालत आलेले गुणही महाराष्ट्राच्या सध्याच्या सर्वागीण अधोगतीकडे वेगाने चाललेल्या अवस्थेला कारणीभूत आहेत. बाकी वडिलांच्या कर्तृत्वावर व तथाकथित पुण्याईवर पोटच्या मुलांनीच हक्कदाखवणे; वडिलांनी त्यांच्यावर तसेच संस्कार करणे व आपल्यानंतर आपले कुटुंबीयच सर्वेसर्वा याची तरतूद व गैरसमज करून देणे; अशा ‘कुटुंबवादा’ने तर सर्वत्र राष्ट्राचाच घात चालवला आहे. महाराष्ट्रातही काही ठरावीक कुटुंबांची पिलावळच नेतृत्व करणार, अशी सर्वपक्षीय स्थितीदेखील अधोगतीस हातभार लावत आहे. याबाबत सात-आठ राजकीय कुटुंबांची उदाहरणे सहज महाराष्ट्रात सांगता येतील.
अशी सर्व एकंदरीत परिस्थिती असता प्रत्यक्ष सापाकडे दुर्लक्ष करून ‘साप साप’ म्हणून आसपासची जमीन थोपटत बसणारी व्यक्तिनिष्ठ पत्रकारिताही याला जबाबदार नाही असे माध्यमांना छातीठोकपणे म्हणता येईल का? तशी परिस्थिती मुळीच नाही. माध्यमांचा मिंधेपणाही या स्थितीस नक्कीच जबाबदार आहे, हे नाकारता येत नाही.

सूत्रबद्ध विश्लेषण
लोकरंग पुरवणीच्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रीय संवेदनेचा वेध घेण्याचा प्रयत्न आवडला. त्याअंतर्गत डॉ. अरुण टिकेकर यांनी लिहिलेला वैचारिक लेख खूपच भावला. किती विविध अंगांनी पूर्वसुरींनी समाजधारणेचा विचार केला होता, याचे विवेचन समर्पक शब्दांत लेखकाने केले आहे.
डॉ. टिकेकर यांनी लेखात केलेले सूत्रबद्ध विश्लेषण उल्लेखनीय आहे आणि सद्य:स्थितीतल्या महाराष्ट्राच्या सामाजिक प्रकृतीची दुखणी आणि त्यावरील उपाय यांवर तपशीलवार अचूक भाष्य केले आहे. या लेखातील एकेक मुद्दा म्हणजे एखाद्या भावी ग्रंथातील प्रकरण ठरावे. आजच्या महाराष्ट्राची दयनीय स्थिती, त्यामागची कारणमीमांसा आणि उपाय यांचे अचूक मार्गदर्शन लेखकाने केले आहे.
– अरुण जोशी, ठाणे</strong>

धोक्याची घंटा
अरुण टिकेकर यांचा ‘आजचा महाराष्ट्र आणि वैचारिकता’ हा लेख विचार करायला प्रवृत्त करणारा, अंतर्मुख करणारा असा आहे. या लेखाने उभे केलेले काही मूलभूत प्रश्न थेट आपल्या अस्तित्वाशी संबंधित आहेत, आपल्या अस्मितेशी जोडलेले आहेत आणि महाराष्ट्र धर्माच्या भविष्याशी निगडित आहेत. हा लेख समाजाच्या डोळ्यांत घातलेले झणझणीत अंजन आहे. महाराष्ट्राने जागरूक होण्यासाठी वाजवलेली
ही एक धोक्याची घंटा आहे.
१९८० नंतर अभूतपूर्व वेगाने मुंबई व महाराष्ट्राचे नागरीकरण झाले. या वावटळीत आमच्या संस्कृतीचे, विचारांचे, अस्मितेचे, भाषेचे अनेक स्तंभ गळून पडले. या नागरीकरणाला पशाच्या हव्यासाची, अव्यवस्थेची, मतांच्या बेगमीची जोड होती. सत्तेच्या मस्तीने, पशाच्या  गुर्मीने समाजाविषयी बेपर्वा वृत्ती वाढली. यातून गुंड प्रवृत्ती, झोटिंगशाही अग्रेसर झाली व पुढे राजकारणाच्या माध्यमातून हीच गुंड प्रवृत्ती प्रतिष्ठित झाली. स्वार्थासाठी सर्व गोष्टींना मूठमाती देण्याच्या या प्रवृत्तीचा कळत-नकळत प्रभाव आमच्या समाजमनावर पडला. अर्थाधारित शिक्षणव्यवस्थेने मूल्याधारित शिक्षणव्यवस्थेची पाळेमुळे खणून टाकली. आज आमची तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक स्थळे पसे कमावण्याचे अड्डे बनले आहेत. संस्कृती, विचार हे फक्त निबंधात लिहिण्यापुरते, व्याख्यानात बोलण्यापुरते शिल्लक राहिले आहेत.
‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीप्रमाणे समाजाला मार्गदर्शन करणारे, समाजाचे नेतृत्व करणारे ज्या प्रवृत्तीचे असतात त्याप्रमाणे समाज घडत असतो. ही वेळ कोणाला दोष देण्याची नसून जागे होण्याची आहे, समाजाला पुढे नेण्याची आहे.
– हेमंत पाटील, सांताक्रूझ

मराठी चित्रसृष्टीचे उत्तम विश्लेषण
‘स्वैर.. मराठी सिनेमा अन् अभिरुचीही’ (लोकरंग वर्धापनदिन विशेष पुरवणी- २४ ऑगस्ट) हा लेख वाचला. या लेखात मराठी चित्रसृष्टीचे उत्तम विश्लेषण केले आहे. जणू आम्हा वाचकांच्या मनातल्या विचारांनाच वैभव आबनावे यांनी शब्दरूप दिले आहे. मराठी सिनेमातले आजवरचे विविध प्रवाह आणि बदल त्यांनी छान समजून घेत या लेखाद्वारे वाचकांना समजावून सांगितले आहेत.
– अवधूत परळकर

विचारांना चालना देणारा लेख
‘स्वैर.. मराठी सिनेमा अन् अभिरुचीही’ या वाचनीय लेखाच्या निमित्ताने काही मुद्दे मांडावेसे वाटत आहे. तंत्रज्ञानामुळे घडलेले बदल हे सामाजिक आणि वैचारिक पातळीपर्यंत पोहोचले. एक वरदान जसे समाजाला मिळाले तसेच ते पचनी पडेपर्यंतसुद्धा एक प्रकारचा वेळ समाजाला मान्य करावा लागला. पुढे त्यामुळे चांगले आंतरराष्ट्रीय चित्रपट अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले, यात वाद नाही. पण याच चित्रपटांच्या वैचारिकतेमुळे निर्माण झालेली मानसिक द्वंद्वे पार करताना घालमेलही तितकीच झाली. सामाजिक, आíथक स्थित्यंतरांबरोबरच मराठी माणसामध्ये मानसिक बदल रुजू व्हायला वेळ लागत आहे, हे खरे. घडलेल्या बदलांना सामोरे जाताना सामाजिक वीण आणि विश्वास ढिला झालाय असे वरपांगी तरी दिसत आहे. त्यात राजकीय परिस्थितीचा परिणामही प्रसारमाध्यमांद्वारे पसरवला गेला. माहिती-तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेला उच्चमध्यमवर्ग आणि त्यांना मिळालेले ‘सोशल मीडिया’चे व्यासपीठ हा प्रसिद्धीचा ‘न भूतो न भविष्यति’ असा पाया ठरून गेला. त्यामुळेच का होईना, मराठी कलावंत अगदी आपल्या शेजारचे वाटू लागले. व्हच्र्युअल नाती अधिक भावू लागली. एकप्रकारे स्वप्न आणि भुरळ अस्तित्वात आल्यासारखे भासून तरी गेले. काही दिवसांत ते अतीही झाले.
िहदी आणि इंग्रजी चित्रपटाशी तुलना करताना मराठी चित्रपटातली जनता अजूनही एका बंद खोलीतली वाटते. नव्या व्यक्ती आणि विचार यांना सहज स्वीकारण्याचे भान या कलाक्षेत्रातील व्यक्तींना आहे का? अतिशय मजबूत अशा िभती मराठी कलावंतांनी स्वत:भोवती विणल्या आहेत. त्यात सीमित लोकांना मान्यता आणि प्रवेश असतो. अवतीभवतीचे चूक असा काहीसा भास या लोकांमध्ये निर्माण करण्यात आधीची पिढी यशस्वी झाली आहे.
प्रसिद्धीचे आकर्षण आणि मिळणारी प्रसिद्धी यामुळे वरपांगी चित्रपट क्षेत्र युवा पिढीला खेचून घेण्यात यशस्वी झाली आहे, हे मात्र खरे. मात्र, त्यात करिअरपेक्षा ‘पॅशन’ हा योग्य बदल मानसिकतेत होणे महत्त्वाचे वाटते. लेखात म्हटल्याप्रमाणे माणूस म्हणून स्वीकारण्याची भाषा मुळात आत्ता आत्ता पचनी पडू लागली आहे. या लेखाने खूप सारे विचार ऐकायला आणि अमलात आणायला मिळाले.
– मंदार गोडसे, पुणे</strong>

विषय समजून घेण्यास उपयुक्त
मराठी सिनेसृष्टीच्या अवस्थेचे वरपांगी ठोकताळे बांधून सोपे निष्कर्ष काढण्याऐवजी वैभव आबनावे यांनी लिहिलेला लेख हा या विषयाची गुंतागुंत समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरला. मराठी संवेदनशीलता ही एक व्यामिश्र गोष्ट आहे. स्टिरिओटाईपला धक्का लागू न देता त्याची व्याख्या करणे, हे अवघड काम आहे. उदा. जर मराठी चित्रपटगीतांबद्दल बोलायचे म्हटले जर ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मराठी भावगीते आणि त्याचा प्रभाव यासंबंधी केलेले भाष्य लक्षात घेण्यासारखे आहे. उत्तम लेख वाचायला मिळाल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
– संग्राम गायकवाड