lr19ललित साहित्याचा अवकाश विस्तारताना…
‘ललित म्हणजे काय रे भाऊ?’ हा डॉ. आशुतोष जावडेकर यांचा लेख अप्रतिम आहे. लिहिता लिहिता सावध बाजारू लेखकही लिहिण्याच्या ऊर्मीत अभिजात लिहून जातो. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की, मुळात साहित्य क्षेत्रात प्रवेश करणारी व्यक्ती स्वत:कडे कमी-जास्त प्रमाणात अभिजात साहित्याची गुणसूत्रे असल्याशिवाय या क्षेत्राकडे वळतच नाही. त्यामुळे बाजारू लेखन करणारा लेखक मुळात बाजारू लेखक नसतो. विशेषत: नव्या पिढीतले लेखक बाजाराकडे तुच्छतेने पाहून अभिजाततेची कास धरून (सवंग?) लोकप्रियतेची हेटाळणी करत चरफडत बसणारे नाहीत. त्यांनी ‘बाजारशरणता’ ही एक आव्हान समजून स्वीकारली आहे. त्यांची ऊर्मी त्यांचा अभिजाततेचा मूळ गुणधर्म उघड करत असली तरी लोकप्रियतेच्या निकषावर कमी न पडता त्यांना यशस्वी व्हायचं आहे. सध्याच्या वाचकांच्या ‘गर्दी’चे ‘दर्दी’मध्ये परिवर्तन होणे, हा या समस्येवरचा उपाय होऊ शकेल.
माहितीच्या संकलनाला अनुभूतीची हलकीशी फोडणी देऊन केलेल्या (प्रवासवर्णन वा तत्सम) लेखनावरच खंडीभर पुस्तकं काढून प्रथितयश झालेले ‘साहित्यिक’ जेव्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला गवसणी घालतात तेव्हा मात्र खरा साहित्यरसिक मनोमन खंतावतो. ‘ललित’ साहित्याचे व्याख्यावर्धन करताना अशा रसिकांचे भान ठेवणेही आवश्यक आहे.
– प्रमोद तावडे, डोंबिवली

विचारांना दिशा देणारा लेख
‘ललित म्हणजे काय रे भाऊ?’ हा डॉ. आशुतोष जावडेकर यांचा लेख विचारांना दिशा देणारा वाटला. अनेक उदाहरणांतून साधलेले सखोल पृथक्करण आणि स्पष्ट विवेचन आस्वाददृष्टीला खाद्य देऊन गेले. ललित साहित्याची व्याख्या विस्तारित करण्याची गरज अनुभवांतील वैविध्यामुळे, व्यामिश्रतेमुळे आणि बहुलतेमुळे निर्माण झाली आहे. एखादा लेखक स्वसामर्थ्यांवर आपल्या लिखाणात वैचारिकता व लालित्य यांचा तोल सांभाळतो. त्यामुळे ठोकळ लेबले लावण्याच्या सवयीला आवर घातला पाहिजे. गरज ही बुद्धी, भावना याचबरोबर एका संवेदनशील विचक्षण मनाचीही असते. म्हणूनच ललित साहित्याचे अवकाश संकोचत नसून त्याला अनेक नवी परिमाणे मिळत आहेत. हा लेख म्हणजे त्याचे चांगले प्रतिबिंब आहे. ललित लेखकाच्या प्रेरणास्रोतांचा शोध घेणाऱ्या लेखकाच्या विचारदृष्टीचे व ललित वैचारिकतेवर सोदाहरण भाष्य करण्याच्या लेखकाच्या कौशल्याचे कौतुक करावे तितके थोडेच.
– मोहिनी पिटके, सोलापूर.

निमित्त ‘उगवून आलेले’चे!
दासू वैद्य यांचा ‘उगवून आलेले..’ हा सुंदर लेख वाचून आनंद झाला. जी. ए. कुलकर्णी, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, प्रकाश नारायण संत या लेखकांच्या लेखनाची आठवण करून देणारा हा लेख आहे. दासूंचे बालपण मुदखेडला गेले. त्यापूर्वी काही काळ माझाही मुदखेडशी संपर्क आला होता. माझे आई-वडील बरीच वष्रे मुदखेडला राहत. दासूंच्या लेखामुळे मुदखेडच्या काही स्मृती व स्मृतीतील माणसे जागी झाली.
– डॉ. जीवन पिंपळवाडकर, नांदेड.

जगदीशचंद्र बोस रेडिओ लहरींचे संशोधक
‘आकाशवाणी’ (रेडिओ)च्या लेखात १८९६ मध्ये माकरेनी याने बिनतारी संदेशाचे स्वामित्व हक्क मिळवले, असा उल्लेख आहे. ते खरेही आहे. पण माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार, जगदीशचंद्र बोस यांनीच रेडिओ लहरींचा शोध लावला होता. पण त्यांचा क्रांतिकारकांशी संबंध असल्याच्या संशयामुळे ब्रिटिश सरकारने तो शोध दडपला. त्यामुळे माकरेनीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आणि त्याच्या नावावर पेटंट नोंदवले गेले. पण १९९५ मध्ये अमेरिकेच्या मॅस्च्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने ते प्रयोग पुन्हा करून पाहिले. त्यानंतर रेडिओ लहरींच्या शोधाचे जनक जगदीशचंद्र बोसच आहेत, असे जाहीर केले.
– शशिकांत काळे, डहाणू रोड