‘लोकरंग’ मधील (२ ऑगस्ट) ‘निमित्त : फाशी’ हा अतुल पेठे यांचा लेख वाचला. लेखक थोडे ओळखीचे, त्यांची शैलीही ओळखीची. त्यांच्या लेखाचा सूर एकुणात फाशीची शिक्षा ही योग्य नव्हे असा आहे. त्यांचा सो कॉल्ड मानवतावाद त्यात डोकावतो. फाशीची शिक्षा हा न्यायव्यवस्थेने केलेला एक निर्घृण खूनच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आपली न्यायव्यवस्था किती अप्रगत आहे, असे त्यांचे ठाम म्हणणे आहे. प्रगत भारताकडून विज्ञाननिष्ठ, विचारशील, विवेकी विचार व्हावा अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
त्यांच्या भूतदयेविषयी काय भाष्य करावे? हा लेख वाचून एकुणातच मी सुन्न झालो. पेठे यांचा हा लेख न्यायव्यवस्थेला आव्हान देणारा वाटला. मुळात न्यायव्यवस्था, शासन, न्यायप्रणाली यांविषयी सखोल अभ्यासाशिवाय भाष्य करणे बरोबर नाही. त्यातूनही अगदी सहज कॉमेंट करायची असेल तरीही त्या देशाची सामाजिक परिस्थिती काय आहे, याचे भान असावयास हवे.
मुळात अनेक वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल्सवर सध्या फाशी व त्याच्या अंमलबजावणीवर बरीच चर्चा सुरू आहे. याचे कारण याकूब मेमनला झालेली फाशी. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याने निरपराध २५७ जणांचा एका क्षणार्धात बळी घेतला. अशा अनेक व त्याचबरोबर जे जखमी झाले त्यांच्या परिवारासोबत ते कसे तरी जीवन जगताहेत. त्यांना न्याय कसा मिळणार?
पेठे म्हणतात, फाशी ही अशा निरपराध मंडळींवर केलेली तात्पुरती मलमपट्टी आहे. माझे प्रामाणिक मत असे आहे, की पेठे हे विचार मांडून लोकांची दिशाभूल करीत आहेत. अगदी अनादी काळापासून, आतापर्यंत कठोर शिक्षा म्हणजे फाशी- डेथ पेनल्टी हीच सर्वोच्च शिक्षा मानली जाते. त्याने गुन्हेगारावर जरब बसते, समाजरचना अबाधित राहते. वर ऊठसूट फाशी ही कुणालाही दिली जात नाही. मुंबई बॉम्बस्फोट हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी फाशी योग्यच! पेठे म्हणतात त्याप्रमाणे अनेक देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली आहे. पण त्यात प्रत्येक देशाची सामाजिक परिस्थिती पाहणे महत्त्वाचे ठरेल.
शेजारील राष्ट्राकडून होणारे थेट- छुपे हल्ले अशा परिस्थितीशी मुकाबला करताना सरकार, पर्यायाने न्यायव्यवस्था यांना तारेवरची कसरत करावी लागते, हे पेठे यांना काय समजणार? त्या त्या देशाची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गाने आपल्यास त्रास देतो, हे मान्य केले तर भारताने फक्त गांधीगिरी करायची, चर्चा, सहिष्णुता दाखवायची हे एक केवळ हास्यास्पद ठरले आहे.
हिंसा ही फक्त कठोर शिक्षेपुरतीच मर्यादित नसते. अत्यंत मायक्रो व तरल पातळीवरसुद्धा हिंसा असते, हे पेठे यांना माहीत नाही काय? बहुधा ते प्रायोगिक रंगभूमीवर काम करतात. त्या प्रायोगिक रंगभूमीवरचा हिंसाचार जरी थांबवता आला तरी ते पेठे यांचे यश मी मानेन.
जाता जाता असे म्हणावेसे वाटते, (संशयाने) नेमका आताच या लोकांना फाशी शिक्षा, त्याचे पर्याय आठवले? कदाचित विशिष्ट समाजाला खूश करावयास, त्यांना प्रोटेक्ट करावयास अशी अभियाने वेगवेगळ्या पातळीवर राबवली जात असावीत. असे असेल तर या भारताचे हे दुर्दैवच!
– जितेंद्र (बाबा) आफळे

नक्षलवाद्यांमध्ये जाऊन  अहिंसा शिकवावी
एखाद्याने ‘holier than thou ’ वृत्ती अंगिकारली की त्याचे आविष्करण पेठे यांच्या लेखाप्रमाणे होते. एका पॉलिश सिनेमाचे उदाहरण ते देतात, जेथे सुरुवातीला खुनी वाटणारा तरुण निष्पाप वाटू लागतो. उलट फाशी देणारी यंत्रणा आणि आपण सारेच निर्घृण खुनी वाटू लागतो. माझ्या मते, ही कथा फसलेल्या तपासाची आहे. जेव्हा तपास निर्दोषपणे होऊन निर्घृण खुनाचा आरोप निर्विवाद सिद्ध होतो तेव्हा यंत्रणेने आणि समाजाने गुन्हेगाराच्या फाशीबद्दल स्व-ताडन करणे अनावश्यक आहे. पुढे पेठे म्हणतात, फाशी देण्याने दहशत न बसता हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अनाचार वाढतो. फाशी रद्द केलेल्या ८६ राष्ट्रांची उदाहरण त्यांनी दिली आहेत. या सर्वच राष्ट्रांत फाशी न दिल्याने हिंसाचार कमी झाला असेल का? उत्तर ‘नाही’ असे आहे. या उलट हातपाय तोडणे या शिक्षेमुळे गुन्हे १०० टक्के कमी झाले आहेत. फाशीच्या जागी पेठे यांना हा उपायी deterrent    म्हणून जास्त पसंत असायला हवा. ‘खून करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा ही व्हायलाच हवी. पण कशी? खुनाइतकीच क्रूर?’ असा सवाल ते करतात तेव्हा त्यांना शिक्षा करणे मान्य आहे. असे असल्यावर फाशी की मरेपर्यंत जन्मठेप हा तपशिलाचा भाग ठरतो. पूर्णपणे अंतिम निकाल म्हणून जर फाशी किंवा मरेपर्यंत एकांतवासाची जन्मठेप हे पर्याय असले तर बहुतेकांना फाशी हा दयाळू प्रकार वाटेल.
मार्टिन ल्युथर किंग यांचे एक निर्थक वाक्य पेठे यांनी उद्धृत केले आहे. ते बरोबर मानायचे तर संपूर्ण जग आंधळे व्हायला ५० टक्के इतरांचे डोळे फोडणारे हवेत. प्रत्यक्षात ते अगदीच कमी असतात आणि ते वाढू नयेत म्हणून त्यांचाही डोळा फोडला जाईल, अशी भीती वाटायला हवी. हल्लीच्या जमान्यात वाल्याकोळीला फाशी झालीच पाहिजे. रामायण दुसरे कोणीतरी लिहील. पुराणातली वानगी पुराणात राहू देत. मानवतावादी  पेठे यांनी एक प्रयोग म्हणून नक्षलवाद्यांमध्ये जाऊन त्यांना अहिंसा शिकवावी.
– श्रीराम बापट, दादर.