खरे तर एकेका जातीचे एकेक वर्तुळ सामाजिक अवकाशात स्वत:भोवती स्वतंत्रपणे फिरत असते. ही वर्तुळे फिरता फिरता कधी परस्परांत सामावतात, कधी परस्परांना गिळतात, तर कधी त्यांचे कंगोरे परस्परांना घासून संघर्षांच्या ठिणग्या उडतात. अल्पसंख्याकांना आत्ता आत्ता कुठे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक जाग येते आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपावेसे वाटते आहे. हे सगळे विलक्षण आव्हानात्मक आहे. यासंबंधात सोपी समीकरणे मांडून भोळसर उत्तरांची मांडणी करण्याचे काम लेखकाने सोडले तरच ही आव्हाने त्याला समर्थपणे स्वीकारता येतील.

ल लित लेखनाच्या संदर्भात ‘चित्रण’ हा शब्द मोठा फसवा आहे. हुबेहूब चित्रण, प्रत्ययकारी चित्रण, जिवंत चित्रण असे त्या- त्या लेखनाचा व लेखकांच्या शैलीचा गौरव करताना म्हटले जाते. कधी कधी प्रश्न मनात येतो की, ज्या तुकडय़ाचे चित्रण लेखनात आहे, त्या तुकडय़ाला तरी स्वयंपूर्णता लाभली आहे का? कुठलाही तुकडा सुटा तर नसतोच; भवतालाच्या संदर्भातच तो अनुभव सगुणसाकार करण्याचे कौशल्य लेखकाला दाखवावे लागते. अगदी प्रेमकथा जरी घेतली तरी तिला काळाचे परिमाण लागू होतेच. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कुसुमाग्रजांची कविता वाचताना स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करण्यास आतुर असलेल्यांचा प्रक्षुब्ध काळ, क्षुद्र इच्छा-आकांक्षांमध्ये गुंतून न पडण्याचा काळ आणि त्या काळात संवेदना जागृत ठेवून जगणारी माणसे या गोष्टी विचारात घ्याव्याच लागतात.
आज जेव्हा लेखक अवतीभोवती पाहतो, तेव्हा लेखनात उतरण्यासाठी आतुर असलेला जीवनाचा ऐवज इतका गुंतागुंतीचा झालेला दिसतो, की  लेखन दूरच; पण त्या ऐवजाचे आकलन करून घेण्यातच लेखकाची प्रचंड शक्ती खर्च पडावी. या ऐवजामध्ये इतक्या वेगाने परिवर्तन होत आहे की, लेखनाची घाई करता करता वास्तव त्याच्या लेखणीतून निसटून जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
माझा गाव, माझी शेती, काळी आई- जीवनदायी – यांचा अर्थच हरवण्याची वेळ आली आहे. काही धूर्त लोकांनी ‘इंडिया विरूद्ध भारत’ असा सामना रंगवण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. हे ढोबळ द्वंद्व म्हणजे बुद्धिभेद करण्याचाच प्रकार होय. पण काही लेखक या भुलावणीला बळी पडतात. आपण वंचितांची, शोषितांची बाजू घेत आहोत, एक भूमिका घेऊन जगतो आहोत अशा भ्रमात ते लिहीत राहतात. मुंबईत, मंत्रालयात सत्तेवर असलेली, म्हणजे ‘इंडिया’त असणारी माणसे भारताच्या मातीतून, कडेकपारीतून, रानावनातून, पिका-कणसातूनच गेलेली असतात. सत्ता म्हणजे केवळ राजकारणी किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांची नाही, तर ती प्रत्येक सामाजिक – आर्थिक – राजकीय – धार्मिक संस्था जी सामान्य माणसाच्या जीवनावर अनुकूल किंवा विपरीत परिणाम करणारे निर्णय घेण्याची क्षमता राखून असते. हा पेच कसा सोडवायचा? भावनेच्या किंवा लोकप्रिय विचारप्रवाहाच्या आहारी न जाता, लेखन समतोल ठेवण्याचे कसब किती लेखकांजवळ असते? ‘भावनेला येऊ दे गा। शास्त्रकाटय़ाची कसोटी,’ असे मर्ढेकर म्हणाले खरे, पण असा तोल सांभाळणाऱ्या लेखकाच्या वाटय़ाला काही तात्कालिक आणि भौतिक लाभ येत नाहीत, हेही खरे!
पूर्वी खेडय़ापाडय़ात फक्त एसटी धावत असे तेव्हा आम्ही, हात दुखेपर्यंत उंचावत असू. पण सरकारी खाक्या आणि एकाधिकार असा, की अर्धी गाडी रिकामी असूनही, न थांबता, आमच्या नाकातोंडात धूळ फेकून ती तडक जात असे. आता खासगीकरण झाले. आता काळ्यापिवळ्या गाडय़ा त्यांच्या खिडक्या-दारातून ओसंडून जाईपर्यंत प्रवासी भरतात; पुढे बॉनेटवर आणि मागे वजनाने तुटणाऱ्या पायरीवरही. ड्रायव्हरजवळ लायसन्स असेलच, याची खात्री नाही. माणसे पडतात, झडतात, मरतात. सरकार आता खासगी वाहनमालकांच्या बाजूने ठामपणे उभे राहते. कोणाची बाजू घेणार? शेतकऱ्याला आजकाल ऐन हंगामात शेतमजूर मिळत नाहीत. मिळतील त्यांना मागतील ती मजुरी द्यावी लागते. मग लेखक काय करणार? गरीब शेतकरी आणि शेतमजूर यांनाच झुंजवणार? खरं तर, नागडय़ापाशी उघडं गेलं अन् सारी रात हिवानं मेलं- अशी सगळी अवस्था. पण बाजू घेण्याच्या नादात, करुणरसात बुडून जाण्याची आणि वाचकाला बुडवण्याची सवय लागलेला लेखक लेखनाचाच तोल बिघडवून बसतो. पूर्वी- म्हणजे सतीप्रथा सुरू होती तेव्हा, चितेवर जळणाऱ्या स्त्रीच्या किंकाळ्या ऐकू येऊ नयेत, म्हणून वाद्यांचा कल्लोळ करत असत. आज शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात अनेक घटकांचा असा काही गलबला आणि गदारोळ सुरू असतो की, वास्तव गुदमरूनच जाते. पण ‘सत्य असत्याशी। मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमतां’ या संतवचनाला प्रमाण मानणाऱ्या लेखकाने तरी सत्याच्या शोधात खोल बुडी मारावी ना!
आता दुपारच्या वेळी अर्धे खेडे रिकामे दिसते. याचे कारण, पोरे शेतात कामावर गेलेली असतात असे नाही, तर ते ऑटोरिक्षा, काळीपिवळी किंवा मोटारसायकलने जवळच्या छोटय़ा शहरात गेलेले असतात. कोणत्यातरी पक्षाच्या किंवा संघटनेच्या कार्यालयाभोवती रेंगाळतात, दादा, भाऊ, ताई, बाप्पू यांनी सांगितलेली कामं करतात, संध्याकाळी कुठल्यातरी धाब्यावर दांगळौ करतात. घरी येऊन धाडधिड पसरतात.
आपल्या समाजातील जातिवास्तव म्हणजे आकलनाची कसोटी पाहणारा गुंता आहे. आपली जातिव्यवस्था कळून घेण्यासाठी खूपच नेट आणि बौद्धिक आवाका पाहिजे. आपली अवस्था अशी, की आपल्याला फक्त आपली ‘जात’ माहीत असते. आपल्याच जातीच्या उपजाती किंवा पोटजातीही माहीत नसतात. मला तर शाळा संपवून कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळायला लागले की, आत्तापर्यंत आपल्याला फक्त १० जातीच माहीत होत्या; शंभर पोटजाती आहेत- असतात, हे जाणवून नवलाचे वास्तव समजले. देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, चित्पावन, सारस्वत, मराठे, कुणबी, तिरळे कुणबी, पाटील, देशमुख, घाटावरचे, घाटाखालचे, आसामी, बावनेमहार, सोमवंशी लाडवन, शहाण्णव कुळी, माहेश्वरी, अग्रवाल, जिरेमाळी, गाशेमाळी, फुलमाळी, भावसार – आणि गंमत म्हणजे यापैकी कोणतीही पोटजात दुसऱ्या पोटजातीला स्वत:च्या बरोबरीचे समजत नाही. शिक्षक झाल्यानंतर तर विद्यार्थ्यांच्या सहवासामुळे या जातींच्या रीतीभातीचे बारीक-बारीक, पातळ-पातळ पदर लक्षात यायला लागले. पण साहित्यात पाहिले तर एकेका जातीचे ‘चित्रण’ पाहायला मिळते. दलित साहित्यात मुख्यत: दलित आणि सवर्ण असा वर्णसंघर्ष नकार आणि विद्रोह या मूल्यांच्या आधारावरच उभा केलेला दिसतो. ‘अगडे आणि पिछडे’ असे वर्णसंघर्षांलाही कवेत घेणारे लेखन आता आता नवे लेखक करू लागले आहेत. खरे तर एकेका जातीचे एकेक वर्तुळ सामाजिक अवकाशात स्वत:भोवती स्वतंत्रपणे फिरत असते. ही वर्तुळे फिरता फिरता कधी परस्परांत सामावतात, कधी परस्परांना गिळतात, कधी त्यांचे कंगोरे परस्परांना घासून ‘संघर्षांच्या ठिणग्या’ उडतात. काही अल्पसंख्याकांना – नाही, यापेक्षा लोकसंख्येत अल्प असलेल्या जातींना असे म्हणणे योग्य – आता कुठे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक जाग येते आहे आणि याचा परिणाम, म्हणून त्यांना स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपावेसे वाटते. मग ‘जातिव्यवस्था नष्ट व्हावी’ या विचाराचे भवितव्य काय?
हे सगळं विलक्षण आव्हानात्मक आहे. सोपी समीकरणे मांडून भोळसर उत्तरांची मांडणी करण्याचे काम लेखकाने सोडले तरच ही आव्हाने स्वीकारता येतील. त्यासाठी प्रतिभा आणि कल्पनाशक्तीबरोबरच वरच्या दर्जाची आकलनक्षमता आणि विश्लेषकवृत्ती लेखकाजवळ असणे गरजेचे आहे. आणि प्रचंड अभ्यास!
काही गोष्टींवर पाणी सोडणेही गरजेचे आहे. एक कादंबरी बऱ्यापैकी यशस्वी झाली की, प्रकाशक लोक त्या लेखकाला ‘शुक शुक’ करतात; की हा पठ्ठय़ा बसलाच बैठक मारून निर्मिती करायला! ही निर्मिती मागणीनुसार पुरवठा या नियमानुसार, विशिष्ट कालावधीत पूर्ण करावी लागते. कारण त्या वर्षीच्या पुरस्कारांच्या यादीत पुस्तक घेण्यासाठी, अमुक एका महिन्याच्या आत पुस्तक ‘बाजारात येणे’ आवश्यक असते, अशी श्रींची (म्हणजे प्रकाशकाची) इच्छा असते. (श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे.. तर असे आता कोणी म्हणेल की खरे आणि जातिवंत लेखक असे करत नाहीत. प्रश्न तोच आहे; खरे आणि न खरे?) पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबरच कोणत्या नियतकालिकात कोण मित्र (समीक्षक नव्हे!) त्यावर लिहिणार हेही आजकाल थोडय़ाशा अभ्यासाने सांगता येते. आणि महिन्याला एक याप्रमाणे एकेक नियोजित पुरस्कार त्या पुस्तकाला दिले जातात. आणि अशा रीतीने लेखकाला ‘थोर’ करण्याची प्रक्रिया सफळ संपूर्ण होते.
एकदा तर, एका समारंभात पाच पुस्तकांना म्हणजे त्यांच्या लेखकांना पुरस्कार घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. चार जण आले. एक जण नाही आला. तेव्हा निवेदकाने नि:संकोचपणे व्यासपीठावरूनच सांगितले, की मुद्रणालयातील अडचणींमुळे कालपर्यंतही ‘ते’ पुस्तक तयार होऊ शकले नाही, म्हणून लेखक आले नाहीत. तेव्हा संयोजकांनीदेखील निस्संकोचपणे व्यासपीठावरून सांगितले की, जेव्हा त्यांचे पुस्तक प्रकाशित होईल, तेव्हा आम्ही त्यांना जरूर पुरस्कार देऊ. यात लक्षणीय बाब म्हणजे लेखकाला संकोच वाटला. आणखी काय हवे!
मग वारेयाचेयां धारसां । पडिला कोंडा न उरे जैसा
आणि कणांचा आपैसा । राशि जोडे।।
ज्ञानेश्वरांनी सांगितले की, खळ्यामध्ये कापलेल्या धान्याची बैल तुडवणी करतात. पण इतके इतके पोते धान्य असे म्हणता येत नाही. मग टिव्हाळ्यावर (म्हणजे तीन पायांची उंच लाकडी रचना) उभे राहून टोपल्यांमध्ये माल घेऊन शेतकरी उपणणी करतो. वारा (विवेकाचा!) सुटतो आणि कचरा उडून पलीकडे पडतो आणि जवळ निर्मळ, मोत्यासारख्या धान्याची रास खाली जमा होते. अशा रीतीने ज्ञानात मिसळलेले अज्ञान आणि सत्यासारखे भासणारे असत्य – एकमेकांपासून स्पष्टपणे वेगळे होते. आज लेखकाला कशाची गरज असेल तर या विवेकाच्या वाऱ्याची. नाहीतर वास्तवाचा वेध घेणे त्याच्यासाठी नेहमीच अवघड असेल.
इतकं सगळं गुंतागुंतीचं आणि थक्क करणारं वातावरण अवतीभोवती असतं की, माणूस हबकूनच जावा. शत्रू नंबर एक आणि शत्रू नंबर दोन असे राजकारणाच्या मंचावरून एकमेकांना म्हणणारे पक्ष आणि नेते जेव्हा एकमेकांच्या गळ्यात गळा घालताना दिसतात तेव्हा, सामान्य माणूस ‘आ’ वासून नुसता पाहतच राहतो. मात्र एक चांगली गोष्ट होते- सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर न्याय मागण्यासाठी विरोधी पक्षाकडे जाऊ नये, या व्यावहारिक सत्याचा त्याला साक्षात्कार होतो.
ज्या अभिनेत्याने फुटपाथवरील माणसे चिरडली व इतरही गुन्ह्य़ांमध्ये जो आरोपी आहे, ज्याच्यावर न्यायालयात खटले सुरू आहेत – तो मध्यभागी; त्याच्या उजव्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री; डाव्या बाजूला राज्याचे गृहमंत्री – तिघेही एका कार्यक्रमात हास्यविनोद करत बसले आहेत, असा फोटो जेव्हा नागरिक पेपरात पाहतात, तेव्हा एक तर त्यांचा थरकाप उडत असेल किंवा ते कडवट थुंकी गिळून घेत असतील.
प्रश्न असा आहे, की या वास्तवाला साहित्यरूप आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर कसे द्यायचे हे त्या त्या कलावंताच्या प्रकृतिधर्मावर अवलंबून आहे. त्याआधी असा प्रश्न पडतो, की हे वास्तव त्याला निर्मितीचा विषय वाटते का आणि या वास्तवाच्या अंतरंगातील बारीक सारीक धागे उकलण्याची त्याची तयारी आहे का?
स्वत: पूर्वग्रह, गैरसमज यापासून मुक्त असलेल्या, वास्तव भेदण्याची दृष्टी असलेल्या, इतिहास, समाज, संस्कृती यांची जाण असलेल्या आणि आपल्याला साहित्यच निर्माण करायचे आहे याचे भान असलेल्या त्या जबाबदार आणि निर्भय लेखकाची मराठी प्रतीक्षा करत आहे.    ल्ल
ल्लं१ं८ंल्ल‘४’‘ं१ल्ल्र‘@ॠें्र’.ूे