आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाला ६० वर्षे पूर्ण झाली. आकाशवाणीच्या बातम्यांनी त्याकाळी लोकांना भोवतालच्या घटना-घडामोडींविषयी सजग करण्याचं महत्त्वाचं काम तर पार पाडलंच; शिवाय या विभागात काम करणाऱ्या अनेक दिग्गज मंडळींशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातंही जुळलं. आकाशवाणीच्या वृत्तविभागाच्या साठीनिमित्ताने एकेकाळी या वृत्तविभागात काम करणाऱ्या वृत्तनिवेदिका ललिता नेने यांच्याशी मारलेल्या स्वैर गप्पा..

‘हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे सहा वाजून ५७ मिनिटे झाली आहेत. थोडय़ाच वेळात बातमीपत्र प्रसारित करीत आहोत..’ या उद्घोषणेनंतर घराघरांत सगळ्यांचे कान ‘रेडिओ’शी जोडले जायचे. रेडिओवरच्या बातम्या हे जर देशभर घडणाऱ्या घटनांचा कानोसा घेण्याचं माध्यम असेल तर त्या बातम्या वाचणारे वृत्तनिवेदक हे त्याकाळी ‘स्टार’ होते. आजच्या संगणकाच्या, मोबाइल फोनच्या युगात बातमीदारी करणे हे तसे अवघड राहिलेले नाही. मात्र, कुठल्याही सोयीसुविधा नसताना देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जमवायच्या, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवायचा आणि दहा मिनिटांच्या बातमीपत्रातून ठरावीक मुद्दय़ांना अधोरेखित करत अचूक उच्चारांसह, अमुक एका आवाजाच्या पट्टीत, एका तालात, एका वेगात वाचून त्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायच्या हे काम खचितच सोपे नव्हते. आकाशवाणीच्या या वृत्तविभागाला साठ र्वष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘कशी होती रेडिओवरची ही बातमीदारी?, बातमीपत्र तयार करण्यापासून ते वाचून दाखविण्यापर्यंतची प्रक्रिया, आकाशवाणीच्या वृत्त- विभागात काम करणारी माणसे हा पट या वृत्तविभागामध्ये एकेकाळी गाजलेल्या वृत्तनिवेदिका ललिता नेने यांनी आपल्या आठवणींमधून उलगडला..
‘आकाशवाणीच्या वृत्तविभागात माझा प्रवेश झाला होता तो ‘व्हॉइस आर्टिस्ट’ म्हणून. त्यावेळी मो. ग. रांगणेकर आणि नीलम प्रभू यांनी माझी परीक्षा घेतली होती. त्यांनी कुठल्याशा कादंबरीतील एक उतारा मला वाचून दाखवायला सांगितला. त्यानंतर ‘व्हॉइस आर्टिस्ट’ म्हणून त्यांनी माझी निवड केली. पण प्रत्यक्ष वृत्तनिवेदक म्हणून काम देण्यासाठी पुन्हा परीक्षा, काम अशा दीर्घ प्रक्रियेतून जावं लागलं होतं,’ असं ललिता नेने सांगतात. ‘त्याकाळी आकाशवाणीच्या वृत्तविभागात फक्त मी आणि शरद चव्हाण असे दोघेच वृत्तनिवेदक होतो. आणि आकाशवाणीच्या या वृत्तविभागाचं वर्णन करायचं झालं तर माझ्या डोळ्यासमोर गावातील अस्ताव्यस्त एसटी स्टँडचीच प्रतिमा येते,’ असं त्या हसत हसत सांगतात. ‘एसटी स्टँडसारखीच अवस्था असायची तिथे. टेबलांवर रचलेल्या फायली.. सगळीकडे पसरलेले कागद.. तिथेच टेबलावर झोपलेली रात्रपाळीची माणसं.. असं सगळं चित्र असायचं. म्हणजे पहाटेची डय़ुटी कधी असेल तर या झोपलेल्या मंडळींना प्रथम उठवायचं, फायलींमधून आदल्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्य़ांमधून आलेल्या बातम्यांचे कागद, ‘पीटीआय’वरून भाषांतरित केलेल्या बातम्यांचे कोगद असं सगळं तपासायचं आणि मग पहिलं बुलेटिन तयार केलं जायचं,’ असं त्या सांगतात. ‘मुळात बातमीपत्रात काय काय घ्यायचं आहे, ऐनवेळी बातमीपत्रात बातम्या कमी पडल्या तर वृत्तनिवेदकाने काय करायचं, याची माहिती देणारं कोणीच नव्हतं. आमचे ‘एडिटर’ विभागात असायचे. मात्र, त्यांची जबाबदारी ही आमच्या हातात ते बातमीपत्र सोपवण्यापुरतीच असायची. म्हणजे आकाशवाणीचे वार्ताहर, प्रतिनिधी आणि संपादक यांच्यावर बातम्या आणण्याची आणि लिहिण्याची जबाबदारी असली तरी त्या बातम्या वाचताना प्राधान्याने कुठल्या बातम्या घ्यायच्या, ऐनवेळी वार्ताहराक डून मजकूर मिळाला नाही की तिथे दुसरी बातमी घेऊन, ती करून घेणं अशा अनेक गोष्टी आम्ही तिथं शिकत गेलो,’ असं ललिता नेने म्हणतात.
वृत्तनिवेदन करणाऱ्यांना अनेक गोष्टींचं भान असावं लागतं, हे सांगताना त्यावेळी वृत्तनिवेदक म्हणून काम करत असताना घडलेल्या गमतीजमतींची एक लडच्या लडच त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून ऐकायला मिळाली. ‘त्यावेळी आम्हाला जिल्हा वार्तापत्रं असायची. शिवाय, मानवी भावभावनांशी संबंधित बातम्या सांगणारं पाच मिनिटांचं एक बुलेटिनही तयार करावं लागायचं. म्हणजे- ‘काही भिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्वत:ची बँक तयार केली होती..’ अशा बातम्या ऐकण्यात लोकांना खूप रस असतो. त्यामुळे अशाही बातम्यांचं बुलेटिन द्यायचं हीसुद्धा एक जबाबदारी होती. एखाद्या जिल्ह्य़ाचं वार्तापत्र तयार करताना संबंधितांकडून मजकूरच आला नाही की मग गोंधळ उडायचा. आमच्या बाबतीत तर बीडचं वार्तापत्र आलं की सगळं कठीणच होऊन बसायचं. मंत्रालयाच्या प्रसिद्धी विभागाकडून जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ांचे वृत्तविशेष यायचे, त्यांची अशावेळी खूप मदत व्हायची,’ असं त्या सांगतात. ‘मात्र, त्यातून कधी काम साधायचं, तर कधी फटफजितीही व्हायची. तरी चुकतमाकत शिकण्यावाचून पर्यायच नव्हता. पहिली टेस्ट टय़ूब बेबी जन्माला यायची होती तेव्हाची गोष्ट सांगते. आम्ही आधीच मुलाखत घेऊन ठेवली होती. आणि आता सात वाजता मी बातम्या वाचण्यासाठी जाणार त्याआधीच ते बाळ जन्माला आल्याची वार्ता आम्हाला समजली. त्यावेळी आमच्याकडे वसंतराव देशपांडे एडिटर होते. त्यांनी लगोलग छान बातमी लिहून माझ्या हातात ठेवली. ती ऐनवेळी वाचायला हातात घेतल्याने मजकूर माहिती नव्हता. त्यात लिहिताना बाळ पाचशे किलोग्रॅमचे आहे, असं लिहिलं गेलं होतं. पाचशे किलोग्रॅम म्हणजे झालं काय? काहीतरी चूक झाली आहे, ही विचारप्रक्रिया मेंदूत सुरू झाली तरी बातम्या सांगताना थांबणं शक्य नव्हतं. काही सेकंदाचा पॉजही ऐकणाऱ्याच्या सहज लक्षात येतो. त्यावेळी क्षणभर थांबून मी पाचशे ग्रॅम असं वाचण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने बातम्या वाचून बाहेर पडले तेव्हा न्यूजरूममध्ये क ोणी तक्रार केली नाही की श्रोत्यांचेही फोन आले नाहीत, तेव्हा कुठे हायसं वाटलं. मात्र, ही टांगती तलवार नित्याचीच असायची.’ lr14‘तेव्हा दूरदर्शनचा एवढा प्रभाव नव्हता. तरीही बातम्या देण्याच्या बाबतीत या दोन माध्यमांमध्ये नेहमीच स्पर्धा असायची,’ असं त्या सांगतात. ‘पुण्यात ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चा राग मनात ठेवून जनरल अरुणकुमार वैद्यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा आम्ही मुंबईत त्यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्याचवेळी पुण्यातून आमच्या वार्ताहरांचा फोन आला. त्यांनी त्या घटनेचे अगदी बारीकसारीक तपशील पुरवले आणि त्या दिवशीची बातमी छान रंगली. डॉ. काशिनाथ घाणेकरांचं निधन झालं तेव्हाही खुद्द बाळ कुडतरकरांनी ताबडतोब फोन करून आम्हाला सविस्तर बातमी दिली होती. आकाशवाणीवर ती बातमी पहिल्यांदा दिली गेली. असं काही झालं की न्यूजरूममधून बाहेर पडताना आमच्याही मनाला एक समाधान मिळायचं. आमच्याकडून चांगल्या पद्धतीने बातम्या श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या की होणारा आनंद वेगळाच असायचा. नाहीतर दैनंदिन बातम्या असायच्याच की हो. म्हणजे ‘बाजरीचं एवढं एवढं उत्पन्न झालं’ अशी हेडलाइन आमच्या हातात पडली की आज आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही हे लक्षात यायचं. मग त्यातल्या त्यात जिल्ह्य़ांच्या बातम्या पहिल्या, अमुक एखादी घटना दुसरी असा प्राधान्यक्रम लावून त्या दिवशीचं बातमीपत्र साजरं व्हायचं,’ हे सांगताना त्या मिश्कीलपणे हसल्या.
अर्थात आकाशवाणीच्या त्या छोटेखानी वृत्तविभागात काम करणाऱ्या अवलिया सहकाऱ्यांमुळे घडलेल्या किश्श्यांच्या आठवणीही त्यांच्याकडे कमी नाहीत. ‘काही वार्ताहरांनी लिहिलेल्या बातमीतली अक्षरं लागत नसली की गोंधळ उडायचा. काही आपल्या आग्रही मतांमुळे अडचणीत आणायचे. तर कधीतरी अगदी नकळत गोंधळ उडायचा. मधु दंडवते रेल्वेमंत्री असताना असाच एक अफलातून किस्सा घडला होता. रेल्वेमंत्री असताना दंडवते कुठल्याशा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते नेमकं वर्ष कुठलं, हे आठवत नाही. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे मधु दंडवते साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून जे भाषण करणार होते त्याची छापील प्रत आमच्याकडे आली होती आणि त्यांच्या भाषणाच्या दिवशी त्यावरची बातमी करून ते वाचून दाखवायचे होते. त्यांच्या भाषणाची प्रत आमच्या कुसूम रानडेंकडे आली होती. त्यांनीही त्यावर छान बातमी तयार करून ती आमचे एडिटर वसंतराव देशपांडेंकडे आणून दिली. बातम्यांच्या गोंधळात देशपांडेंनी ती त्याच दिवशीच्या बातमीपत्रात समाविष्ट केली. आणि साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच दंडवतेंच्या भाषणाची बातमी राज्यात सगळ्यांनी ऐकली. खरं तर यावर फारच मोठा गहजब व्हायचा. पण दंडवतेंनी तेव्हा या घटनेवर एक छान कोपरखळी मारली.. ‘आत्तापर्यंत अर्थसंकल्पाचं भाषण आधीच फोडलं जातं हे माहीत होतं, आता साहित्य संमेलनाची भाषणंही फोडायला सुरुवात झाली की काय?’ असो! त्यांच्या कोपरखळीवरच हे प्रकरण निभावलं म्हणून बरं. अशा चुका होत असल्या तरी आकाशवाणीचं प्रस्थ सर्वात जास्त होतं,’ असं त्या आग्रहपूर्वक सांगतात.
‘बातमी प्रथमआकाशवाणीवर येणार की दूरदर्शनवर, याबद्दल तेव्हा स्पर्धा असायची. मात्र, टीव्हीचं प्रस्थ तेव्हा एवढं वाढलेलं नव्हतं. उलट, आकाशवाणी हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होती. त्यावेळी आमचं बुलेटिन सात वाजता असायचं आणि दूरदर्शनच्या बातम्या साडेसात वाजता प्रसारित व्हायच्या. पण का कोण जाणे दूरदर्शनने त्यांची वेळ साडेसातवरून आमच्या सातच्या वेळेत आणली. त्याचा फार मोठा फ टका आकाशवाणीच्या बातम्यांना बसला,’ असं त्या सांगतात. ‘तेव्हापासून शहरातून आकाशवाणीच्या संध्याकाळच्या बातम्या बाद झाल्या. ग्रामीण भागात मात्र प्रतिसाद होता. आकाशवाणीच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. ज्यावेळी हे स्थित्यंतर घडत होतं तेव्हा त्याच्या परिणामांची जाणीवही आम्हाला होत होती. मात्र, ते थांबवणं आमच्या हातात नव्हतं याची खंत आहे. आज माध्यमांमधली स्पर्धा तीव्र झाली आहे. पण काळानुसार आकाशवाणीचंही रूप भलतंच पालटलंय. आता अद्ययावत आणि चकचकीत अशी न्यूजरूम आकाशवाणीकडे आहे. कागद-पेन जाऊन संगणकावर काम सुरू झालं आहे. आणि आता तर टीव्हीप्रमाणेच बातम्या वाचण्यासाठी त्यांनाही सव्‍‌र्हर उपलब्ध होणार आहे असं म्हटलं जातं. पण शेवटी कितीही सोयीसुविधा आल्या तरी वृत्तनिवेदकाकडे जे कौशल्य असावं लागतं ते बदलणार नाही,’ असं ललिता नेने ठामपणे नमूद करतात.
‘उपलब्ध वेळेत, योग्य त्या आवाजाच्या पट्टीत, अचूक उच्चारांसह बातमी सांगणं हे वृत्तनिवेदकाचं काम आहे. आकाशवाणीवर वृत्तनिवेदन करताना तांत्रिक गोष्टींचाही तितकाच सांभाळ करावा लागतो. माइकसमोर बातम्यांचे कागद त्यांचा फडफड आवाज होणार नाही याची काळजी घेत नीट धरायचे, माइकवर आपला आवाज योग्य तऱ्हेनं क सा लागेल याचं भान ठेवणं आणि आपली भाषा, उच्चार या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात,’ असं ललिता नेने सांगतात. सध्या मराठी भाषेच्या एकूणच उच्चारांबद्दल त्या नापसंती व्यक्त करतात. बोलीभाषा ही आपल्या रोजच्या बोलण्यातून हद्दपारच झाली आहे. असं व्हायला नको होतं. भाषेच्या बाबतीत आपण आग्रहीच असायला हवं असं त्या म्हणतात. ‘आकाशवाणीवर काम करणाऱ्यांसाठी तर भाषा हेच त्यांचं शस्त्र असतं. बोलणाऱ्याचा चेहरा लोकांना माहीत नसतो. तरीही आपल्याला ऐकणारे श्रोते त्या आवाजाशी, भाषेशी इतके जोडलेले असतात, याची प्रचीती बाहेर लोक  भेटून जेव्हा कौतुक करायचे तेव्हा यायची. आकाशवाणीचे वृत्तनिवेदक म्हणून आम्हाला नावानिशी ओळखणारेही काही चाहते होते,’ असं त्या सांगतात. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही आकाशवाणी या माध्यमाची ताकद तेवढीच आहे असं त्यांना वाटतं.
‘आकाशवाणीने आपल्याला घडवलं,’ असं ललिता नेने सांगतात. ‘ज्या माध्यमात तुमचा चेहरा लोकांना दिसत नाही, ते माध्यम तुम्हाला लोकांचे चेहरे वाचायला शिकवतं. आकाशवाणीने माणसं पारखायला, त्यांचे चेहरे वाचायला आणि लोकांनी न सांगितलेलं असं काही जाणून घेत आपल्या आवाजात सर्वदूर पोहोचवायला शिकवलं.’ कितीही अडचणी असल्या तरी एक गोष्ट त्या पुन्हा पुन्हा सांगतात, ‘आकाशवाणीचा काळ हा आमच्या घडवणुकीचा होता.. सुखाचा होता.’

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद