गणेश देवी. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या भाषाविषयक प्रचंड कामामुळे सुपरिचित असलेलं! त्यांच्या ‘पीपल लिंग्विस्टिक सव्‍‌र्हे’चे खंड आता प्रकाशित होत आहेत. या बहुमोल कामाव्यतिरिक्त त्यांचं आदिवासींच्या उत्थानासाठीचं कार्यही तितकंच अमूल्य व क्रांतदर्शी असंच आहे. त्याचा परिचय करून देत आहेत छायाचित्रकार संदेश भंडारे !
महाराष्ट्र फौंडेशन साहित्य व सामाजिक क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल दरवर्षी पुरस्कार देते. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांविषयीची एक पुस्तिकाही फौंडेशन प्रकाशित करते. त्याकरता या पुरस्कारविजेत्यांचे फोटो काढण्याचे काम मला देण्यात आले होते. त्यामुळे माझा गणेश देवी यांच्याशी प्रथम संबंध आला तो २००६ मध्ये! त्यांच्या भेटीची उत्सुकता होती. आणि प्रत्यक्ष भेटण्यापूर्वीच हा माणूस अतिशय शिस्तबद्ध, वेळेचे काटेकोर नियोजन करणारा आणि भेटायला येणाऱ्याची सर्व प्रकारे काळजी घेणारा आहे, हे लक्षात आले. मी फोनवरून त्यांच्याशी बोलल्यानंतर माझा संपूर्ण दिवस त्यांनीच प्लॅन करून दिला आणि त्यांचे फोटो काढण्यापूर्वी त्यांचं काम मला फिरून पाहता येईल अशी व्यवस्थाही केली. आयुष्यात एकदाही न भेटलेल्या माझी सगळी काळजी घेणे ही पहिल्या फोनमध्येच जणू गणेश देवींची जबाबदारी झाली होती. त्यामुळे आमच्यातले अंतर भेटीपूर्वीच संपले.
गुजरातमध्ये बडोद्यापासून ९० कि. मी. पूर्वेचे तेजगड. वेळ : सकाळी दहाची. गणेश देवींनी इथे आदिवासींची अकादमी स्थापन केलीय. या अकादमीमध्ये भलंमोठं सुसज्ज ग्रंथालय आणि संग्रहालय उभं केलंय. ग्रंथालयात सहज डोकावलो असता दहा-बारा तरुण मुलं वाचनात गर्क असलेली दिसली. नंतर समजलं की, शिकायचं कशासाठी, याचा उलगडा झालेली ही मुलं कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गातली आहेत. संग्रहालयात आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित वस्तूंचं भांडारच देवींनी मांडून ठेवलंय. केवळ संग्रहालय म्हणून ते उभं केलेलं नसून आदिवासींचं सारं जगणंच त्यातून जिवंत झालेलं पाहायला मिळतं.
तरुण मुलं म्हटलं की काहीतरी कुरबुर आलीच. तसंच काहीतरी त्या दिवशी घडलं होतं. दिवसभराची व्यस्तता संपल्यानंतर संध्याकाळी गणेश देवी शांतपणे त्या मुलांना समजावून सांगत होते. मी ऐकून थक्क झालो. ते सांगत होते, ‘अरे, पूर्वी आपल्या हातात धनुष्यबाण वगैरे शस्त्रं होती. आता आपल्याकडे ज्ञान आहे. म्हणूनच आता शस्त्राची गरज नाही. आता जे काय भांडायचं ते ज्ञानाच्या आधारे!’
स्वत: गणेश देवी त्या दिवशी कामांत व्यस्त होते. कारण दुपारी एका पाश्चात्त्य एम्बसीचं डेलिगेशन तेजगडमध्ये येणार होतं. त्यामुळे ‘दुपारच्या वेळी जवळच असलेल्या कोराजगडच्या पायथ्याशी असलेली गुहा बघून घ्या,’ असं देवींनी मला सुचवलं होतं. पॅरिसमधलं अल्तामिरा आणि मध्य प्रदेशमधलं भीमबेटका यांच्याइतकंच प्राचीन; पण तुलनेनं छोटी गुहाचित्रे या ठिकाणी आहेत. ही गुहाचित्रे दहा हजार वर्षांपूर्वीची आहेत, हे निश्चित करण्यात आलं ते गणेश देवी यांनी पुढाकार घेऊन पुरातत्त्व खात्याच्या तज्ज्ञांना इथं आणून दाखवल्यावरच! गुहाचित्रांच्या डेटिंगचं काम गणेश देवींनी केलंय, हेही समजलं त्यांच्या अभिनिवेशशून्य कथनातूनच!
दुपारचा एम्बसीच्या लोकांचा कार्यक्रम, त्याचं नियोजन, त्यानंतर कार्यकर्त्यांचे रुसवेफुगवे, विद्यार्थ्यांशी अनौपचारिक बातचीत, माझे फोटोशूट या सर्वातून प्रत्येकाच्या पातळीवर येऊन संवाद साधण्याचं नैसर्गिक साधेपण देवींमध्ये जाणवलं. त्यानंतर ते त्यांची पत्नी सुरेखा यांच्याबरोबर मला सोडायला बडोद्याला आले. या प्रवासातल्या संवादातून त्यांच्या व्यग्र दैनंदिनीची कल्पना आली. दोन दिवस हिमाचल प्रदेशच्या पूर्व भागात स्थानिक जनजातींसंदर्भात ‘हिमलोग इन्स्टिटय़ूट’ उभी करण्याचं काम ते करीत होते. दोन दिवस तेजगडमध्ये आदिवासी अकादमीचं काम; तर उर्वरित दोन दिवस गांधीनगरमध्ये एका मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये दोन तास ते शिकवीत होते. केवळ दोन दिवसांच्या दोन तासांसाठी त्यांना महिना दोन लाख रुपये मानधन मिळत. त्यातले वैयक्तिक गरजेपुरते पैसे ठेवून बाकीचे ते सामाजिक कामाला देऊन टाकत होते. गप्पांच्या ओघात मी त्यांच्या उत्पन्नाविषयी विचारले होते. त्यांनी सांगितले, ‘मित्रमंडळींचं एकत्र जमणं वा जेवणं या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. वाचनही मी रात्री बारा ते चार या वेळात करतो.’ हे ऐकून माझा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. बडोद्याहून पुण्याला परतलो. २००६ च्या या भेटीनंतर आमचा पुढे फारसा संपर्क राहिला नाही.
नंतर नोव्हेंबर २०१० साली ज्येष्ठ कवी दिलीप चित्रे यांच्या प्रथम स्मृतिदिनी एक स्मृतिग्रंथ काढायचं ठरलं आणि त्यासाठी लेख मागायला मी गणेश देवी यांच्याशी संपर्क साधला. लेख तर देवींनी दिलाच; पण मला ‘फेब्रुवारी २१ ला बडोद्यात या,’ असे निमंत्रणही दिले. गुजरातच्या पूर्व भागातल्या पंचमहाल ते डांग या पट्टय़ातल्या आदिवासी महिलांच्या जगण्यात पडलेला फरक छायाचित्रांच्या माध्यमातून मी नोंदवावा असे त्यांनी मला सुचवले. त्यानुसार मी काम सुरू केले आणि देवींशी संबंध वाढत गेला. त्यातून आदिवासी भागातील त्यांच्या कामाची वेगळ्या प्रकारे ओळख होऊ लागली.
गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील कवाठ गावातल्या आठवडे बाजारात एकीकडे आदिवासी मुला-मुलींच्या हातात मोबाइल दिसतात, तर दुसरीकडे रानातला अमूल्य असा पांढरा डिंक! आदिवासींकडून फक्त रताळी आणि बटाटय़ाच्या बदल्यात अमूल्य पांढरा डिंक घेणारे लबाड व्यापारी सर्रास आढळतात. इथं शोषित आदिवासींमध्ये आत्मभान जागवण्याचं देवींचं काम किती महत्त्वाचं आहे, हे जाणवलं. गेल्या दहा वर्षांत त्यांनी आदिवासी अकादमीमध्ये दहावी-बारावी शिकलेल्या आदिवासी मुलांसाठी दहा महिन्यांचा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग चालवला आहे. त्यातून या मुलांना विविध सरकारी योजनांचे लाभ आपल्या समाजाला कसे होतील, याचं भान त्यांनी दिलंय. त्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, महिला बचत गट अशी कामंही उभी राहिली आहेत. त्यातून २४० तरुण कार्यकर्ते तयार झाले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावात काम करतात. या सर्व गावांतून ग्रंथालय, बचत गट आणि विविध सरकारी योजनांचे लाभ पोहोचवले जात आहेत. दहा रुपयांत आरोग्य विमा, धान्य बँका, आरोग्य केंद्रे, लहान पाटबंधारे अशी जनसहभागातून उभी राहणारी कामं ते करवून घेत आहेत. त्याद्वारे बाराशे गावांतले लोक स्वयंपूर्ण होऊ लागले आहेत.
हे सर्व काम देवींच्या बरोबर पाहत असताना तिथल्या महिलांच्या अंगाखांद्यावर चांदीचे दागिने मोठय़ा प्रमाणावर दिसले होते. त्यांची पाश्र्वभूमी आणि माहिती देवींनी दिली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाती थेट पैसा येऊ लागल्याने आता त्यांना सावकाराकडे अतिशय कमी पैशाकरता दागिने गहाण ठेवण्याची वेळ येत नाही. देवींनी सांगितले, ‘हजारो वर्षांपासून या महिलांकडे परंपरेने हे दागिने आलेले आहेत. रोमच्या दरबारात दोन हजार वर्षांपूर्वीचा एक उल्लेख आहे की, ‘केवळ मसाले घेण्यासाठी इतक्या प्रमाणात चांदीचे दागिने तुम्ही का वाटता?’ अशी विचारणा रोमच्या व्यापाऱ्यांना करण्यात आली होती. रोमला हा व्यापार नर्मदासागरमार्गे चालायचा. तेव्हापासून आदिवासी महिलांकडे भरपूर दागिने होते. व्यापाऱ्यांना आदिवासी भागातून सुरक्षित येता यावं यासाठी चांदी वाटली जाई.
किलोत चांदी गहाण ठेवून त्यांच्या किरकोळ गरजा सावकारांकडून भागवल्या जात. असे आदिवासींचे शोषण सुरू होते. देवींच्या कामामुळे आदिवासींमध्ये केवळ आत्मभानच आले असे नाही, तर थेट हातात पैसाही आल्याने दागिने सावकाराकडे जायचं काही प्रमाणात थांबलंय. गेल्या पाच वर्षांत बचत गटांमुळे इथे सहा कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागलीय.
आदिवासींच्या मुलांना शाळेत जायची संधी मिळत नाही. अशा १० ते १२ वयाच्या मुलांना निवडून त्यांना एक वर्ष मातृभाषेतून शिक्षण द्यायचं, नंतर त्यांना गुजरातीतून शिक्षण द्यायचं; ज्याद्वारे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल! हा प्रयोग देवींनी राबवला. तोही त्यांच्या आदिवासी अकादमीद्वारे आश्रमशाळेच्या माध्यमातूनच राबविण्यात येत आहे.
आदिवासींबरोबरच छारानगर (गांधीनगर) इथल्या कंजारभाट जमातीसाठीही असंच काम देवींनी उभं केलंय. त्यातून ग्रंथालय, कौशल्यविकास आणि संगणक प्रशिक्षणही दिलं जातं. नाटक करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देऊन ‘बुधन’ हा नाटय़प्रयोग बसवला गेला. तो राष्ट्रीय पातळीवर गाजला. बुधन हा आदिवासी बंगालमध्ये पोलिसी अत्याचाराला बळी पडला होता. त्याच्या जीवनावरील या प्रभावी नाटय़प्रयोगामुळे छारानगरमधले तरुण चक्क राष्ट्रीय नाटय़ विद्यालयापर्यंत पोहोचले. आपल्याकडच्या पारधी जमातीसारखाच छारा जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेलाय. देवींच्या प्रयत्नांमुळे या मुलांसाठी मीडिया स्कूल काढले गेले.  तिथे शिकून आज एक मुलगा राष्ट्रीय इंग्रजी दैनिकात क्राइम रिपोर्टर आहे, तर तिघे एनएसडीतून पदवी घेऊन बाहेर पडलेत.
नर्मदेचं पाणी आदिवासी भागातून जातं. आदिवासींच्या दारातलं हे पाणी १०० कि.मी.वरील लोकांना पुरवलं जातं आणि आदिवासी मात्र कोरडाच राहतो. हे आदिवासी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे मजूर म्हणून काम करतात. तेही अल्प मजुरीवर. ते ऊसतोडणीसाठी तसेच शहरात बांधकाम मजूर म्हणूनही जातात. तिथे ते आठ महिने राबतात. गणेश देवींना वाटतं की, त्यांच्या कामाचं साफल्य यातच आहे, की हे आदिवासी त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या पाण्यावर आपला हक्क सांगतील आणि आपल्या आयुष्यातली वेठबिगारीसदृश परवड स्वत:च संपवतील!
‘भटके फोटोग्राफर’ ही देवींच्या कल्पनेतून आकाराला येऊ पाहणारी कल्पना! ते मला म्हणाले की, ‘फोटोग्राफर हा भटक्या असतोच; त्यामुळे मुळातच भटक्या असणाऱ्यांच्या हातात कॅमेरा दिला तर काय होईल?’ बरोबरच आहे ते, की भटक्यांना त्यांच्या नजरेतून दिसणारे वेगळे आणि कदाचित विलक्षण जग त्यातून कॅमेराबद्ध होऊ शकेल. अर्थात ही कल्पना अजून प्रत्यक्षात यायचीय.
मुक्ती देते ती विद्या! देवी नेमके हेच करू पाहताहेत. महिला बचत गट असोत की गुन्हेगारी जमातीच्या तरुणांसाठीचं मीडिया स्कूल; गणेश देवी शोषितांना आत्मभान देण्याचं काम करताहेत, त्यांना स्वतंत्र करू पाहताहेत. हे केवळ सामाजिक वा सांस्कृतिक काम नाही, तर दीर्घकालीन राजकीय व्यवस्थाबदलाच्या दिशेने टाकलेले ते पाऊल आहे. म्हणूनच ते महत्त्वाचे आहे!

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?