‘डॉक्टर, मला धीट व्हायचंय. मला सगळ्यांसमोर मीटिंगमध्येदेखील न घाबरता बोलता आलं पाहिजे. मीटिंग सुरू झाली, किंवा सुरू व्हायच्या आधीच माझ्या छातीत धडधडायला लागतं, चक्कर यायला लागते, घसा कोरडा पडतो. सारखी लघुशंकेची भावना होते. कधी कधी तर उठून निघून जावंसं वाटतं.
कधी मीटिंगच्या (खूप महत्त्वाची मीटिंग असते तेव्हा) आदल्या दिवशीच चक्कर यायला लागते. अलीकडे तर माझ्या चार मीटिंग्ज अशाच आदल्या दिवशी चक्कर यायला लागल्यामुळे बुडाल्या. परवाच्या दिवशी अचानक मीटिंग बोलावली होती. त्यामुळे तर मीटिंगमध्येच मला मळमळायला लागलं. त्यामुळे उलटी झाली. अखेर बॉसने मला बोलावून सांगितलं की, ‘अजय, यू नीड टू शो टू अ डॉक्टर, रादर अ सायकीयाट्रीस्ट!’ मी म्हटलं, ‘यस सर, आय वील शो मायसेल्फ!’ पण मनात जरा त्याचीही भीती वाटत होती. म्हणजे माझ्या मनावर खूपच तर परिणाम झाला नाही ना, मला वेडच तर लागणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांचे जाळे माझ्या मनात निर्माण झाले. शेवटी मी ठरवलं की, एकदा जाणं तर जरुरीचं आहे. ही भीती तर घालवायलाच हवी ना. आज बॉस समजून घेतोय. पण उद्या माझ्या प्रगतीवर त्याचा परिणाम व्हायला लागला तर? त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर आहे डॉक्टर. प्लीज, मला या भीतीपासून मुक्तता द्या.’
अजयने एका दमात सगळं सांगून टाकलं. मी त्याला शांत करून विचारलं, ‘ही भीती फक्त मीटिंगपुरतीच आहे की इतर अशाच सामाजिक परिस्थितीत असाच त्रास होतो तुला?’ त्यावर तो म्हणाला, ‘डॉक्टर, तुमच्याशी बोलतानासुद्धा मी कसंबसं बळ एकवटलं आहे. आत येताना मला धडधडतच होतं. बाहेर बसल्याबसल्या दोन वेळा मी लघूशंकेला जाऊन आलो. एरवीसुद्धा सोसायटीचं गेट टुगेदर, मीटींग्ज याची सुद्धा भीती वाटते. तिथेही मी गप्प बसतो. लहानपणापासूनच मला अनोळखी माणसांशी बोलायची भीती वाटायची.’
अजयला ‘सोशल फोबिया’चा प्रॉब्लेम होता. ‘सामाजिक भयगंड’ असं त्याला मराठीत म्हणता येईल. मी त्याला सांगितलं, ‘तुला समजतं की, तुला या परिस्थितीत भीती वाटायची खरी काहीच आवश्यकता नाही.़, पण तरीही ती परिस्थिती आली की तुला चिंता निर्माण होते. या सगळ्याची तुला लाजही वाटते. तरीही तू ती परिस्थिती व चिंता टाळू शकत नाहीस.’
‘अगदी बरोबर डॉक्टर, अगदी नेमकं असंच होतं माझं. पण मग यातून बाहेर पडायचं कसं?’
‘हे बघ, ही समस्या बायो सायकॉलॉजिकल आहे. म्हणजे काही जीवरासायनिक (मेंदूतील) बदलांमुळे ही लक्षणं निर्माण होतात. त्यामुळे ती लक्षणं नियंत्रित करण्यासाठी काही औषधं आपण सुरू करू या. पण त्याचबरोबर त्यातील लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी इतरही उपाय सुरू करणं महत्त्वाचं आहे. या लक्षणांचं नियंत्रण ज्या स्वयंचलित चेतासंस्थेकडून होतं, तिचं मूळ मेंदूतील हायपोथॅलॅमस भागाकडून होतं. पण या भागावर मेंदूतील कॉर्टेक्सचे नियंत्रण असते. जिथे विचारांचा उगम होतो. म्हणजे चिंतेची भावना व भीतीयुक्त वर्तन हायपोथॅलॅमसमधून तर त्यामागचे विचार कॉर्टेक्सकडून येतात. म्हणजेच या दोहोंवर आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी हायपोथॅलॅमिक उपाय म्हणजे स्नायू शिथिलीकरणाचे तसंच दीर्घ श्वसनाचे प्रकार आपण तुला शिकवू या. त्यानंतर मग विचारांकडे वळू या!’
मग अजयला स्नायू शिथिलीकरणाचे व्यायाम, दीर्घ श्वसनाचे प्रकार शिकवण्यात आले. ज्याचा सराव व औषधोपचार घरी कही दिवस घेण्यास सांगितले व दहा दिवसांनी भेटायला बोलावलं. या व्यायाम प्रकारातून वर्तनोपचार (Behavioral Therapy) सुरू करण्यास मदत होणार होती. टप्प्याटप्प्याने त्याची या समस्येविषयीची संवेदना कमी करण्यास मदत होणार होती. (Systematic Decensitisation) हा वर्तनोपचारपद्धतीचा भाग होता. पुढच्यावेळेस अजय आला तेव्हा खूपच बरा वाटला. त्याची देहबोली त्याच्यातील बदल सांगत होती. तो स्वत:च म्हणाला, ‘डॉक्टर, या आठवडय़ातील मीटींगच्या वेळेस खरंच मी खूपच शांत होतो. त्यामुळे माझा बॉसही खूश झाला. मी औषधंही घेतली. शिवाय दीर्घ श्वसन वगरेचा सरावही केला, त्याचा खूप उपयोग झाला.’ मग मी त्याला म्हटले की, ‘हे बघ, ही फक्त सुरुवात आहे. तापासारखं या समस्येचं नाही, बरं वाटलं, उपचार बंद केले. उपचारांमध्ये सातत्य ठेवल्यानंतर मग डोस कमी करून त्यानंतर औषधं बंद केली जातात. त्याचबरोबर पुन्हा लक्षणं उद्भवत नाहीत याची खात्री केली जाते. पण त्याचबरोबर पुन्हा असं होऊ नये यासाठी आपण तुला REBT सदसद्विवेक वर्तनोपचार पद्धतीचा अवलंब करायचा आहे. म्हणूनच आता मला सांग की, ‘तुला भीती का निर्माण झाली?’
त्यावर अजयने तेच सांगितलं जे कोणीही सांगितलं असतं- ‘मीटिंगमुळे!’‘ पण मग तुला इतरही वेळी भीती वाटते त्याचं काय? म्हणजे त्या त्या परिस्थितीमुळे तुला भीती वाटते असं तुला म्हणायचं आहे. पण मग मीटिंगमधल्या इतरांना का नाही असाच त्रास होत? याचं उत्तर असं की, मीटिंगमुळे नव्हे तर एकूणच अशा सर्व परिस्थितींबाबत तू जे विचार करतोस त्याच्यात तुझ्या समस्येचं मूळ आहे.’
‘तुला जी समस्या आहे तशीच समस्या या REBT चे प्रणेते व अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांनाही त्यांच्या तारुण्यात होती. त्यांनाही समुदायासमोर बोलायची भीती वाटायची. मग त्यांनी विचार केला की, मला अशी भीती का वाटते? मग खूप विचार केल्यावर त्यांना आढळलं की, याचं मूळ माझ्याच अविवेकी विचारसरणीत आहे. मला असं वाटतं की, मला कधीच कोणीच हसताच कामा नये. मग त्यामुळे तशी परिस्थिती आली की, मग मनात अविवेकी विचार येतात, मला कोणी हसलं तर? माझ्यावर कोणी टीका केली तर? इत्यादी. मग चिंता निर्माण होते व लक्षणं. त्यामुळे चिंता, भीतीची लक्षणं हा परिणाम या अविवेकामुळे होतो. मग मला असा विचार केला पाहिजे की, मला जे योग्य वाटते, ते मुद्देसुदपणे बोलणं माझ्या हातात आहे, लोकांच्या प्रतिक्रिया माझ्या हातात नाहीत. मग त्यासाठी मी बोलणं सुरू करायला पाहिजे. त्यांनी मग ‘रॅडिकल ग्रुप’ नावाचा गट सुरू केला. त्या ग्रुपतर्फे त्यांनी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये भाषणं देण्यास सुरुवात केली व हळूहळू भीती नष्ट झाली. इतकं की, पुढे ते उत्कृष्ट वक्ते झाले.’
‘थोडक्यात, याच पद्धतीने (अगदी अशाच नाही) आपल्याला तुझ्या या अविवेकाकडून विवेकाकडे जायचं आहे. त्यासाठी काही सेशन्स आपल्याला करावी लागतील. त्यास तू मनापासून सहकार्य केलंस तर भीती नक्की तुझी वाट सोडेल!’
मुळात कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवायला पाहिजे, तुम्ही करू शकता असा विश्वास इतर कोणालाही नसला तरी तुम्हाला तो असायला हवा. एकंदरीत, जग तुमच्याकडे कसं पाहातं, त्यामुळे तुम्हाला फारसा फरक पडणार नाही, तुम्ही स्वत:कडे कसं पाहाता त्यामुळे तुम्हाला सर्वोतोपरी फरक पडेल. म्हणून तुमच्या या प्रज्ञेला योग्य दिशा द्या.