0009‘छोटय़ाशा सुट्टीत’ हे नाटक मी २००४ साली माझा मित्र, नाटय़-दिग्दर्शक मोहित टाकळकर याच्या सांगण्यावरून लिहिले. मी लिहिलेले माझ्या पहिल्या कादंबरीचे हस्तलिखित मोहितने वाचले होते. एकदा त्याने माझ्यापुढे नाटक लिहून देण्याचा प्रस्ताव मांडला; ज्याची मला मौज वाटली.
माझा त्यापूर्वी नाटकांशी संबंध आला नव्हता. मराठी माणसाचे काही न करता आपोआप एक प्रकारचे पोषण मराठी नाटकांवर झालेले असतेच. तसे माझे झाले नव्हते. कारण माझ्या आई-वडिलांनी मला कधीही नाटके दाखवली नाहीत आणि स्वत:ही पाहिली नाहीत. माझी आई मला आग्रहाने दर शुक्रवारी अमिताभ, अनिल, सनी, ऋषी, जॅकी यांचे हिंदी सिनेमे पाहायला नेत असे. आणि माझे बाबा मला दर रविवारी हौसेने इंग्रजी चित्रपट दाखवीत. मी लहानपणी एकच नाटक पाहिले होते. त्यात भक्ती बर्वे होत्या. त्याचे नाव होते-‘आई रिटायर होते.’ मी पुढे कॉलेजात असताना उमेदवारी करण्यासाठीही चित्रपट क्षेत्रच निवडले. शाळा-कॉलेजमध्येही कधी स्पर्धाची नाटके केली नाहीत. त्यामुळे मोहितने मला नाटक लिहितोस का, असे विचारल्यावर मला संकोच आणि भीती वाटली. कारण माझी पुरेशी ओळखच नव्हती त्या माध्यमाशी.
मला नाटकाची कल्पना सुचली ती जगाच्या नकाशावरून. मला फार आकर्षण वाटते जगाच्या नकाशाचे. आणि मी तासन् तास बघत बसतो अजूनही जगाचा नकाशा. खूप आवड आहे मला प्रवास करण्याची. शिवाय माझ्या मनात एक मोठा न्यूनगंड आहे, की आपण अपुरे आहोत, आपल्यात काहीतरी कमी आहे, कच्चे आहोत आपण. आणि वाटतं, या सगळ्याला पूर्णत्व आणण्यासाठी आपल्यापेक्षा संपूर्ण वेगळ्या माणसांमध्ये आपण मिसळून जायला हवं.. आपले आपण उरता कामा नये. माझी पात्रं माझ्या या आसुसलेपणातूनच बाहेर येतात.
मला नाटक लिहिण्याची भीती वाटत होती ते त्याच्या लिखाणाच्या तंत्रामुळे! नाटकाची संहिता आणि चित्रपटाची पटकथा लिहिण्यातकेवढा तरी फरक असतो. नाटकाचे आणि चित्रपटाचे विषयच वेगळे असतात. नाटक मुख्यत: संवादांवर आणि नटाच्या ताकदीवर अवलंबून असते. तिथे कॅमेरा नसतो आणि एडिटिंगची महत्त्वाची प्रक्रिया नसते. सिनेमात नटाला अभिनय आला, नाही आला तरी चालते; कारण इतर तांत्रिक गोष्टींनी अभिनय धुतला, पुसला, सावरला जातो. पण नाटकात नाटककाराने नटांना संपूर्ण ऊर्जा ही लिखाणातूनच पुरवावी लागते. त्यामुळे नाटकात लिखाणाचे सगळे तंत्रच बदलते. ते कसे आणि कुठून आजमावायचे?
अर्थात् माझ्यावर कुणाचा दबाव नव्हता. कारण मोहित सोडून मी कुणालाही ओळखत नव्हतो. आणि तो अतिशय मोकळेपणाने प्रोत्साहनच देत होता लिहिण्यासाठी. मला नाटकाची पुस्तकं आणून दिग्गजांची नाटकं वाचत बसायचा कंटाळा आला. त्यातून काही सापडेना. छापील पानांवर संवादांचा भडिमार होता तो. कसलंही वर्णन नसायचं. त्यामुळे माझ्या डोळ्यांसमोर काहीच उभं राहायचं नाही. त्याने माझी भीती थोडी जास्तच वाढली. त्यामुळे मी नाटक लिहायचा विचार मनातून काढून टाकायला लागलो तेव्हा मोहित मला म्हणाला, ‘‘तू तुला हवे ते, हवे तसे लिही. ते कसेही असले तरी मी ते नाटक बसवीन.’’ तो असं म्हणाल्यामुळे मला फार मोठा धीर आला.
महेश एलकुंचवार हे सुप्रसिद्ध नाटककार मला फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये ‘पटकथा’ हा विषय शिकवायला होते. त्यांनी एकदा आम्हा विद्यार्थ्यांना संगीत आणि लेखनाचा अतिशय घट्ट धागा उलगडून दाखवला होता. त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही. आणि त्यांनी बाखचे संगीत लावले स्टिरिओवर आणि आम्हाला म्हणाले, ‘‘थोडा वेळ शांतपणे ऐका आणि मग मनात काय येईल ते लिहून काढा.’’ मी ती आठवण कधीच विसरणार नाही; ना त्यांनी शिकवलेली लिखाणाची तंत्रे!
मी शांतपणे संगीत ऐकलं खूप.. ‘छोटय़ाशा सुट्टीत’चे ड्राफ्ट बनवताना.

उत्तरा आणि कार्तिक मुंबईत एकत्र राहत असतात. उत्तरा प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री असते आणि कार्तिक र्मचट नेव्हीमध्ये ऑफिसर. जगभर सतत प्रवास करणारा. त्या दोघांनी लग्न केलेले नाही. एका सुट्टीत त्यांच्याकडे सायरस हा उत्तराचा कॅनडामध्ये राहणारा पारशी बालमित्र येतो. त्याच्यासोबत त्याचा मित्र व्योमही असतो. सायरस उत्तराला सांगतो की, येत्या वर्षी सॅनफ्रॅन्सिकोमध्ये जाऊन तो आणि व्योम एकमेकांशी लग्न करणार आहेत.
आणि नाटक सुरू होतं..
लग्न करण्याचा कंटाळा करणाऱ्या स्त्री-पुरुष जोडप्यासमोर एकमेकांशी लग्न करण्यासाठी अतिशय उत्सुक असलेले दोन पुरुष येतात, हे या नाटकाचं बीज. नाटकाची कथा सांगत बसण्याची ही जागा नाही, कारण नाटकाला कथात्मक व्याप्ती नाही. माणसाच्या मनाचा तळ गाठत जाणारं हे नाटक आहे.
मला अपेक्षित असलेल्या दृश्यात्मकतेला न्याय देत मोहितने हे नाटक बसवलं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून पाठिंबा दिला. मूळ नाटक आणि त्याचा प्रयोग या किती वेगळ्या गोष्टी असतात, हे मोहितने मला त्याच्या ताकदवान कामामधून दाखवून दिलं. ‘छोटय़ाशा सुट्टीत’ हे ज्या काळात लिहिलं गेलं, त्या काळाचं ते नाटक होतं. त्यातली पात्रं माझ्या आजूबाजूची होती आणि परिचयाचीही होती. नाटकाला एक शांत सूर होता; जो प्रयोगात उमटत राहिला. मला काय किंवा प्रेक्षकांना काय, हे नाटक अजिबात समलिंगी चळवळीचं वगैरे वाटलं नाही. हा या बदलत्या काळाचा परिणाम असावा. त्यातील पात्रांकडे माणूस म्हणून पाहिले गेले.
नाटक बसवताना रंग, आवाजाचे आणि संगीताचे पोत यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली होती. मराठी नाटकांमध्ये नट उगाचच हातवारे करत मोठय़ांदा बोलतात, तसं काहीच या नाटकात नव्हतं. उत्तराच्या घरात बसल्यासारखं वाटायला लावणारा प्रयोग होता तो. माझ्यासाठी नाटकाचा हा पहिला अनुभव होता. त्याची चांगली निर्मितीमूल्ये ही माझ्यासाठी मापदंड बनून राहिली. मोहितला विजया मेहता यांची कार्यपद्धती फार आवडायची. त्याची एक सुरेख सावली आमच्या नाटय़प्रयोगावर सतत असे. पुण्यात त्यावेळी सुदर्शन रंगमंच ही जागा नव्याने तयार झाली होती. तिथे आणि मुंबईत माहीमच्या ‘आविष्कार’च्या जागी आमच्या नाटकाचे प्रयोग होऊ लागले. पुण्यात त्यावेळी नव्या गोष्टी स्वीकारण्याचे एक मोकळे वातावरण होते. या नाटकाच्या माध्यमातून मी कितीतरी लोकांच्या संपर्कात आलो. मला स्वत:ला  अनेक माणसांबद्दलचे पूर्वग्रह असलेले विचार बदलता आले, हे प्रायोगिक नाटकाच्या या कृतीने मला मिळालेली मोठी गोष्ट आहे असे मला वाटते. त्यामुळे मी हे नाटक लिहून स्वत:लाच एक मोठी मदत केली.
त्या काळात मला असलेला ‘सामाजिक चळवळी’ या विषयाचा कंटाळा आणि फेमिनिझमचा येणारा राग या नाटकात अतिशय नीट उतरून गेला आहे. अर्थातच त्यामुळे अनेक प्रेक्षक दुखावले जात आणि त्यावर वाद घालत. आपण नक्की कोण आहोत, आणि काय मातीचे बनलो आहोत, हे लोकांनी आपली निंदा केली की फार चांगले कळते. तसे कळायला मला या विरोधाने आणि प्रेक्षकांच्या रागाने खूप मदत झाली. आपण ‘सामाजिक चळवळी’ या विषयाबद्दल फार भावूक, भाबडे आणि जुने असतो. तो एक धर्म होऊन बसलेला असतो. आणि त्याविषयी उणेदुणे बोललेले त्या धर्माच्या अनुयायांना चालत नाही. मी ते केल़े. त्यामुळे खूप माणसे- विशेषत: स्त्रिया माझ्यावर चिडल्या आणि मला फार बरे वाटले. माझा चळवळीशी जोडल्या गेलेल्या अनेकांशी विरोधातून संवाद झाला आणि मग मैत्रीही झाली, हेसुद्धा या नाटकाचे श्रेय!
विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे, समर नखाते, मोहन आगाशे, सतीश आळेकर, सुलभा देशपांडे, चेतन दातार, पुष्पा भावे, राजीव नाईक, शांता गोखले यांनी ‘छोटय़ाशा सुट्टीत’ हे नाटक प्रेक्षकांपर्यंत अतिशय जबाबदारीने पोहचवण्यात आम्हाला फार मदत केली. आणि मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सांगितले की, आता लिहायचे थांबता कामा नये. मला अजूनही मी नाटककार आहे असे वाटत नाही. कारण मी नाटय़मूल्ये असलेले लिखाण करू शकतो का, हे मला आजपर्यंत कळलेले नाही. ‘छोटय़ाशा सुट्टीत’नंतर मी न थांबता ‘फ्रिजमध्ये ठेवलेले प्रेम’, ‘चंद्रलोक कॉम्प्लेक्स’ आणि ‘पूर्णविराम’ अशी तीन नाटके सलग लिहिली; जी मोहितने एकामागोमाग एक बसवली. माझी ही खात्रीच आहे की, मी जे काही लिहीत गेलो त्याला मोहितने नाटय़मूल्ये आणि प्रयोगमूल्ये बहाल केली आहेत. मी स्वयंप्रेरणेने एकही नाटक लिहिलेले नाही. मला मोहितने चारही वेळा लिहिण्यात ढकलले आहे. त्यामुळे नाटके लिहून कुणी नाटककार होत नाही, असे जे म्हणतात त्याचे मीच एक चांगले उदाहरण आहे.
सचिन कुंडलकर – kundalkar@gmail.com

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट