‘गरज ‘राष्ट्रवादी’मुक्त महाराष्ट्रा’ची’ हा संजय पवार यांचा आणि त्यावरील प्रताप आसबे यांचा ‘‘खलनायक’ पुरोगामी कसा?’ हे दोन्ही लेख वाचल्यानंतर लेखकद्वयींची झालेली मानसिक गोंधळाची स्थिती समोर आली. संजय पवार यांनी शरद पवार यांच्यावर आपल्या सदरातून जी टीका केली आहे त्यात तथ्यांश असला तरी त्यांची भाषा, आवेश व मांडणी आक्रस्ताळेपणाची आहे. एखाद्या घटनेचे, कृतीचे, निर्णयाचे मूल्यमापन करताना ते व्यक्तीसापेक्ष न करता उद्दिष्टसापेक्ष व्हायला हवे. तसे संजय पवार यांच्या लेखात झाले नाही. शरद पवार यांच्याबद्दलचा संताप, खदखद व्यक्त करण्यासाठी त्यांनी हे व्यासपीठ वापरले. हे केवळ निषेधार्हच नाही, तर लेखनस्वातंत्र्याचा दुरुपयोग करणारे आहे.  
त्यांना उत्तर देताना प्रताप आसबे यांनीही तीच चूक केली आहे. पवारांच्या राजकारणाचे मूल्यमापन न करता त्यांच्या कृषी मंत्रालयातील लोकप्रिय निर्णयांची आणि इतर कर्तृत्वाची भलामण त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते पवारसाहेबांच्या कृषीधोरणामुळे की कसे, याचे विवेचन या लेखात नाही. सुरुवातीला पवारविरोधी लिहिणारे आसबे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच बदलतात, त्यांचे मतपरिवर्तन होते, हे मनाला पटणारे नाही. पवारांच्या एका भेटीत एका अनुभवी पत्रकाराच्या निष्कर्षांला केराची टोपली दिसणार असेल, तर त्याच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते.
जत्रेत एक आरशांचा खेळ पाहायला मिळतो. या दालनात गेलो की आपल्याला आरशात विविध प्रकारच्या प्रतिमा पाहायला मिळतात. जाड, बारीक, लंबगोल. पण त्या दालनात आपली खरी प्रतिमा मात्र दिसत नाही. संजय पवार व आसबे यांनी आपल्याला या मयसभेत फिरवून आणले आहे. शरद पवारांची खरी प्रतिमा कधी कोणी दाखवणार आहे का ?

पुरोगामी आणि खलनायक?
संजय पवारांचा लेख वाचून अनेक पुरोगाम्यांचा कंठ दाटून आला. पुरोगामी असणे म्हणजे इतिहासाच्या पानांमध्ये हीरो म्हणून स्वत:चे नाव नोंदवण्यासारखे आहे असा गैरसमज अनेकांचा आहे. कदाचित तसे असेलही. म्हणूनच कदाचित या पुरोगाम्यांच्या मांदियाळीत बिहारचे सुपुत्र लालूप्रसाद यादव हे भारतीय इतिहासातील नायक ठरतात. मुलायमसिंह यादव व त्यांचे सुपुत्रही पुरोगामी असल्याने  नायक ठरतात. त्यांना ‘खलनायक’ कोण म्हणणार? याच न्यायाने आजवर पुरोगाम्यांसाठी सगळे प्रतिगामी  ‘खलनायक’ ठरत आलेत. भलेही ज्यांच्या पिढय़ान् पिढय़ा ईशान्येकडील राज्यांत जाऊन राष्ट्रसेवा करण्यात जाऊ  देत किंवा कोणताही आकांडतांडव न करता ५०-५० र्वषे विरोधी पक्षात राहून लोकशाही बळकट करण्याचे काम करू देत. त्यांच्याविरुद्ध सतत गरळ ओकणे हे पुरोगामीपणाचे ठरते. पुरोगामी व्यक्ती कधी खलनायक असूच शकत नाही.
– डॉ. परीक्षित देशपांडे, जालना.  

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Uddhav Thackeray
“महाराष्ट्रात गद्दारांचे दोन मालक..”, उद्धव ठाकरेंची मोदी-अमित शाह यांच्यावर बोईसरच्या सभेत टीका
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”

पवारांकडून भ्रमनिरास
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राजकीय कारकीर्द ज्या पिढीने पाहिली, तिचे आम्ही प्रतिनिधी असल्याने हा लेखनप्रपंच! प्रचंड जनसंपर्क, लोकांच्या प्रश्नांची जाण, सहकार क्षेत्राचा सखोल अभ्यास, राजकीय विरोधकांशी मैत्रीचे संबंध, भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आणि सामाजिक प्रश्नांबाबत पुरोगामी विचार ही शरद पवारांची जमेची बाजू. अर्थात राजकारणात हेवेदावे असतात, विरोधक खरे-खोटे आरोप करत असतात, हा राजकारणाचा भाग झाला. पवार यांना ‘खलनायक’ ठरवताना संजय पवारांनी त्यांच्यावर गुन्हेगारांशी संबंध, भ्रष्टाचार, विश्वासार्हतेचा अभाव, वगैरे आरोप केले आहेत. प्रश्न असा आहे की, असा एकही आरोप पवारांचे गुरू यशवंतरावजी चव्हाण यांच्यावर त्यांच्या हयातीत कधीच झाला नाही. असे का? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही निर्णय न घेण्याचे आरोप झाले, तरी कुणीच भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केलेले नाहीत. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नाला आपण पवारांना जबाबदार धरू शकत नाही. पण आपण एक ज्येष्ठ नेते आहात व ज्या क्षेत्रांशी आपला प्रत्यक्ष संबंध होता व आहे, त्यामध्ये जर गडबड होत असेल तर त्याचे उत्तरदायित्व आपल्यावरच येईल. पवारांनी मनावर घेतले असते तर महाराष्ट्रात अनेक अण्णा  हजारे आणि पोपटराव पवार ते निर्माण करू शकले असते. पण हे झाले नाही. त्यांच्याकडून भ्रमनिरास झाला.
 – शशिकांत जोशी, नाशिक