ओळख नसणे हे सर्व मानवी दु:खांचं मूळ आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ओळख हवीच. ओळख नसलेला माणूस ताशी शंभर मैल वेगाने धावला तरी इंचभरही पुढे सरकत नाही. ओळख असलेला झोपून राहिला तरी तो उठायच्या आत शंभर मैल पुढे गेलेला असतो. आता मी ठरवून टाकलं आहे- मागे राहायचं नाही. ओळखी वाढवायच्या. लहान-थोर, भला-बुरा दिसेल त्याच्याशी सलगी करायची, सर्वाशी खेळीमेळीनं वागायचं. छोटय़ांना कडेवर घ्यायचं, मधल्यांवर प्रेम करायचं, ज्येष्ठांच्या पायावर पडायचं. ओळखी वाढवून पुढे जायचं. खूप मोठं व्हायचं.
पूर्वी बालमनावर संस्कार करण्यासाठी गोष्टी सांगण्याची पद्धत होती. मी ऐकलेली एक गोष्ट मला सतत आठवते. गोष्टीत मोठय़ा प्रवासाला निघालेला एक नायक असतो. तो लगबगीनं चालत असताना अचानक मागून हाका ऐकू येतात. तो गडबडतो. थांबतो. मागे वळून बघतो. तो थांबून मागे वळतो- न वळतो तोच त्याचा दगड होत असे.
आता रस्ते दिसत नाहीत. दगडच दिसतात. सर्व रस्ते खचाखच दगडांनी भरून गेले आहेत. थांबून, मागे वळून बघणारे पायाखाली दगड होऊन पडले आहेत. आता आपला दगड होऊ नये म्हणून आपण कुणाच्या हाकेला ‘ओ’ देत नाही. थांबत नाही. धावत राहतो. ‘थांबला तो संपला’ या संस्कारामुळे आपण इतरांपेक्षा जरा जास्तच जोरात धावतो. पायात गोळे येतात. छातीत कळ येते. घशाला कोरड पडते. पण आपण थांबत नाही. बसल्या बसल्या, झोपल्या झोपल्या, वाचताना, जेवताना आपण धावतच असतो.
पण काहीतरी गडबड आहे. एवढं धावूनही आपण पुढे सरकत नाही. जेवढं जोरात धावावं, तेवढे आपण मागे पडत जातो. आपल्या मागचे रांगणारेही पुढे जातात. पण आपण तिथेच! काय होतंय कळत नाही. मन खिन्नविखिन्न होऊन जातं. असो!
परवा रिक्षातून उतरलो. रिक्षा दिसेनाशी झाल्यावर वळलो. वळल्यावर आपला स्मार्ट फोन रिक्षात राहिल्याचं लक्षात आलं. चार महिन्यांत तिसरा फोन गेला. जीवन निर्थक वाटू लागलं. स्वत:वरचा विश्वास उडाला. हा-हा म्हणता कॉन्फिडन्स गेला. समोरच पोलीस स्टेशन होतं म्हणून पोलीस स्टेशनात घुसलो. कॉन्फिडन्स गेल्यामुळे मी नवख्या चोरासारखा दिसत होतो. पोलीस स्टेशनात मोबाइल हरवलेल्याचा सन्मान होईल अशी अपेक्षा नव्हती, पण..
मला रिक्षाचा नंबर आठवत नव्हता. रिक्षावाल्याचा चेहराही बघितला नव्हता. फक्त त्याची पाठ तेवढी आठवत होती. पाठीचं वर्णन कसं करावं, कळेना. पाठीवरून रिक्षा कशी शोधता येईल, तेही समजेना. भीती वाटायला लागली. मी कॉन्फिडन्स गोळा करत असतानाच पोलीस एका गुंडाला घेऊन आले. गुंडाच्या चालण्या-बोलण्यात रुबाब होता. आवाजात दरारा होता. त्याचा आत्मविश्वास बघून मला आपल्या जगण्याची लाज वाटू लागली. तेवढय़ात गुंडापेक्षा दुप्पट आत्मविश्वास व चौपट रुबाब असलेल्या एका गृहस्थाने प्रवेश केला. त्याने पटापटा दहा ओळखी सांगितल्या. पाच-पन्नास व्हिजिटिंग कार्डस्  फेकली. काही थोरामोठय़ांसोबत काढलेले फोटो दाखवले. एका फोटोत ते मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे होते. दुसऱ्या फोटोत ते उपमुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. एका फोटोत तर ते ओबामांसोबत होते. दोघांमध्ये फरक करता येत नव्हता. त्या गृहस्थाने ‘गुंडाला सोडावं अशी तमाम थोरामोठय़ांची इच्छा आहे,’ असं सांगितलं. पोलीस गडबडले. त्यांना निरोप द्यायला दारापर्यंत गेले. मीही गेलो.  ते हात हलवत होते. गळा दाटून आला. मी खूप स्वस्तातल्या मोबाइल फोनची चौकशी करायला समोरच्या दुकानात गेलो. असो!
आपलं काम व्हायला हवं असेल तर ओळख हवीच. आता ओळखीशिवाय पानही हलत नाही. ओळख नसलेल्याच्या अंगाला वाराही शिवत नाही अशी स्थिती आहे.
परवा एका सांस्कृतिक कार्यक्रमाला गेलो. तिथे अनेक वजनदार लोक भेटले. त्यांच्या थोरामोठय़ांबरोबर असलेल्या ओळखी ऐकून हबकायला झालं. भेटलेल्यांपैकी चौघे राणे-साहेबांना ओळखणारे निघाले. त्यातले दोघे राणेसाहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात, तर दोघे म्हणे चक्क मांडीवरच बसतात असं कळलं. दहाजण पवारांच्या वर्गात होते. दोघे पवारांबरोबर क्रिकेट खेळत, तर एकजण कॅरम खेळणारा निघाला. एकाचा मेहुणा गडकऱ्यांकडे ड्रायव्हर आहे. सर्व निर्णय तोच घेतो, हे ऐकून आनंद झाला. ज्यांना बघून गवळीही कमरेतून वाकतात असेही काहीजण निघाले. साधी राहणी व दरिद्री विचारसरणी असलेले भले मास्तर भेटले. ते शाळेत दाऊदला पी. टी. शिकवीत अशी माहिती कळली. दाऊद आजही न चुकता गुरुपौर्णिमेला एस. एम. एस. करतो, हे सांगताना त्यांना गदगदल्यासारखं होत होतं.
माझी कुठेच ओळख नसल्यामुळे मला काहीच बोलता आलं नाही. कॉलनीतली कुत्रीही मला कचरा गोळा करणारा समजून माझ्या अंगावर धावतात, हे सांगण्याचं धाडस मला झालं नाही. स्वत:विषयी हीन-दीन भावना निर्माण झाल्यामुळे आता आपण स्वत:लाही ओळख देऊ नये, असे विचित्र विचार मनात येऊ लागले आहेत. असो!
आमचे एक शेजारी मूल जन्मल्या जन्मल्या मुलाला बालवाडीत घालण्यासाठी चिठ्ठी आणायला मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. पण मुख्यमंत्री स्वत:च्या मुलासाठी चिठ्ठी आणायला दिल्लीला गेल्यामुळे म्हणे भेट झाली नाही! खरं-खोटं देव जाणे. पण आपल्यासारख्यांचं पुढे काय होईल, असा विचार मनात आला तरी थरथरायला होतं.
ओळख हवीच. ओळख नसलेला माणूस ताशी शंभर मैल वेगाने धावला तरी इंचभरही पुढे सरकत नाही. ओळख असलेला झोपून राहिला तरी तो उठायच्या आत शंभर मैल पुढे गेलेला असतो. आता मी ठरवून टाकलं आहे- मागे राहायचं नाही. ओळखी वाढवायच्या. लहान-थोर, भला-बुरा दिसेल त्याच्याशी सलगी करायची, सर्वाशी खेळीमेळीनं वागायचं. छोटय़ांना कडेवर घ्यायचं, मधल्यांवर प्रेम करायचं, ज्येष्ठांच्या पायावर पडायचं. ओळखी वाढवून पुढे जायचं. खूप मोठं व्हायचं.
परवा कंटाळा आला म्हणून फेसबुकवर फिरत होतो. कुणा एका मुलीने काखा वर केलेल्या पोजमधला आपला एक फोटो  फेसबुकवर टाकला आहे. सत्राशेसाठ लोकांना हा फोटो आवडला आहे. मोठं होण्याच्या प्रवासात काखा वर करणारेही उपयोगी पडू शकतात, हे लक्षात घेऊन मीही फोटो खूपच आवडल्याचं व भारावून गेल्याचं कळवलं आहे.
आमचे शेट्टी नावाचे एक स्नेही आहेत. शेट्टीचा बार आहे. शेट्टीला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही. कट्टर शाकाहारी माणूस. शेट्टी श्रद्धाळू आहे. घरून बापर्यंतच्या प्रवासात तो सतत डावी-उजवीकडे बघत हात जोडत राहतो. एकाच धर्मावर विसंबून न राहता क्रूस, चाँदतारा, त्रिशूळ कशालाही मनापासून हात जोडतो. त्याने सर्व धर्माच्या देवांशी सलगी केली आहे. शेट्टीची वपर्यंत ओळख आहे. शेट्टी रसिक आहे. स्वत: वाचत नसला तरी त्याला साहित्यात खूपच इंटरेस्ट आहे. परवा टेबलावर रवींद्रनाथ टागोरांवर चर्चा सुरू होती. त्यावर ‘टागोर नगर में हमारा छोटा भाई का डान्स बार है..’ अशी टागोरांविषयी नवीन माहिती त्याने दिली. असो.
तर आता शेट्टी सैफ अली, कतरिना अशा लोकांना घेऊन एक हिंदी सिनेमा काढतो आहे. गोष्ट शेट्टीनेच रचली आहे. बारमधला जेवणाची ऑर्डर लिहून घेणारा एक ज्येष्ठ वेटर पटकथा लिहितो आहे. किचनमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्याने सहा गाणी रचली आहेत. आपलं दु:ख, आपले भोग, आपल्या जगण्यातलं काहीही गाण्यात येऊ न देता गाणं रचणं हे कठीण काम आहे. महाकवींनाही हे जमलं नाही, पण आचाऱ्याला ते जमून गेलं आहे. आपल्या लेखनाला दु:खाची झालर लावण्याचा थिल्लरपणा त्याने केलेला नाही.
मोठय़ा माणसांच्या व सर्वधर्मीय देवांच्या ओळखीमुळे सिनेमा धंदा करील, सर्व अ‍ॅवार्डस् मिळतील, भारतातर्फे सिनेमा ऑस्करसाठी जाईल असा शेट्टीला भरवसा वाटतो आहे.
अलीकडे गुण, प्रतिभा वगैरे गोष्टींना काही महत्त्व उरलेलं नाही. ओळख हवी.
सध्या सर्वत्र स्पर्धाचं पेव फुटलंय. गल्लीबोळांतून स्वत:च्या आई-वडिलांच्या नावाने नसलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा भरवल्या जातात. स्पर्धा म्हटली की परीक्षक लागतात. सध्या काहीच काम नसलेले व नजीकच्या काळात काम मिळण्याची शक्यता नसलेल्या दोघा-तिघांची निवड केली जाते. त्यांना कलेतलं काही कळायला पाहिजे अशी कुणाचीच अपेक्षा नसते. ते ओळखीचे, शेजारी, गाववाले, जातवाले असा विचार करून निर्णय लावतात. जिंकलेले मोठे कलाकार म्हणून प्रसिद्ध पावतात. आई-वडिलांच्या आत्म्याला शांती लाभते.
अलीकडे एस. एम. एस. करूनही कलावंतांना मोठं करण्याची सोय आहे. कलावंत ओळखीच्यांना माझ्यासाठी एस. एम. एस. करा, अशा विनवण्या करतो. अशा वेळेला समस्त काखा वर करणारे मदतीला धावतात, उपयोगी पडतात. गुणांपेक्षा ओळख महत्त्वाची ठरते. खूप ओळख असलेला जिंकतो. महान कलावंत ठरतो.
महान व्हायचं तर ढोल बडवता आले पाहिजेत. आपण ग्रेट आहोत अशी बोंब ठोकता आली पाहिजे. ओळख असली तर बोंब ठोकणाऱ्यांपाशी गर्दी सहज गोळा होते. ओळख असणाऱ्याने काही केलं नाही तरी गावा-गावांतून त्याचे कौतुक सोहळे साजरे केले जातात. काही करणाऱ्यांना पाडणे आणि न करणाऱ्यांना पुजणे- अशी आपली पद्धत आहे. असो!
शेवटी ओळख नसणे हे सर्व मानवी दु:खांचं मूळ आहे, एवढं माझ्या लक्षात आलेलं आहे.
आता मी कुत्र्यांना बिस्किटं घालतो. त्यामुळे ते भुंकत नाहीत. त्यांच्या पद्धतीने मुजरा करतात. गेटपर्यंत सोडायला येतात. परवा मागच्या गल्लीतले एक समाजसेवक देशी प्यायले. त्यामुळे त्यांना रस्ता व खड्डा यांत फरक करता आला नाही. ते पडले व त्यांचा पाय मोडला. उद्या ते निवडून आले (येतीलच!) आणि त्यांनी वर्तमानपत्र किंवा विद्यापीठ काढलं तर ओळख असावी असा विचार करून मी त्यांना भेटायला गेलो. त्यांचा पाय मोडलेला असल्यामुळे त्यांच्या पायावर पडता आलं नाही. उद्या ते बरे झाले व त्यांना रस्ता-खड्डय़ातला फरक कळायला लागला की पुन्हा भेटायला जायचं असं ठरवलं आहे.
हळूहळू ओळख वाढत चालली आहे. समाजात वजनही वाढत चाललं आहे. माझ्या  एका मित्राचे नातेवाईक सरकारी हॉस्पिटलात अ‍ॅडमिट होते. ओळख नसल्यामुळे ते अचानक गेले. पटकन् बॉडी मिळावी म्हणून तरी काही ओळख काढता येईल का, असा मित्राचा फोन आला. मी प्रयत्न करायचं ठरवलं.
धावत हॉस्पिटलात पोहोचलो तेव्हा माझ्यासारखे अनेक तिथे जमलेले दिसले. ते म्हणाले, ‘सकाळपासून प्रयत्न सुरू आहेत. ओळख कमी पडते. बॉडी हलत नाही.’ ‘बॉडीसाठी ओळख कशाला?,’ असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘भारतात एक वेळ जिवंत माणूस ओळखीशिवाय देवाच्या दयेवर जगू शकेल, पण बॉडीसाठी ओळख लागतेच.’ पुन्हा धावाधाव सुरू झाली. वजनदार माणसाचा शोध सुरू झाला.
शरद पवारांना बालपणापासून ओळखणारे एक गृहस्थ येऊन गेले. पण बॉडी इंचभरही हलली नाही. त्यावर, ‘आता महाराष्ट्रात पवारांचं वजन उरलं नाही. बॉडी दिल्लीत असती तर निव्वळ पवारांच्या नावानेच स्वत:हून पळत ती मुंबईच्या स्मशानात गेली असती. कुणी अडवायची हिंमत केली नसती..’ अशी चर्चा कानावर पडली.
त्याच हॉस्पिटलात एक खूप प्रामाणिक, शुद्ध चारित्र्याचे, नीतिमान गृहस्थ नोकरी करतात असं कळलं. थोडी ओळखही निघाली. त्यांच्याकडे जाऊन बॉडीची कैफियत मांडावी असं ठरवत होतो. अनुभवी लोक म्हणाले, ‘ते गृहस्थ भ्रष्ट नाहीत. त्यांना भ्रष्टाचार अजिबात खपत नाही. कुणाचं काम करणं, कुणाला मदत करणं म्हणजे भ्रष्टाचार करणं, असा समज झाल्यामुळे ते काम करत नाहीत. कुणाचंही काम होऊ देत नाहीत. लोक त्यांच्याकडे कामासाठी जात नाहीत. फक्त आशीर्वादासाठी जातात.’ बॉडीला आशीर्वादाची गरज नसल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही.
शेवटी हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत राहणाऱ्या आणि पाकीटमारीचा व्यवसाय करणाऱ्या एका कनवाळू दादाच्या ओळखीने बॉडी सुटली. पुन्हा धावाधाव झाली. वॉर्डबॉय, आया-माया सर्व जमले. खुशीनं काहीतरी द्या, म्हणाले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. सर्व झिम्मा- फुगडी खेळू लागले. असो!
तर ओळखीचा महिमा मोठा आहे. ओळखीशिवाय जन्म घेता येत नाही. मरताही येत नाही. ओळखीशिवाय आता सुटका नाही.
शेवटी ओळख असू द्या, ही विनंती.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा