‘सातगावचे पाणी’ हे आत्मचरित्र वाचल्यावर असे वाटते की इतर दलित आत्मचरित्रांतून दिसून येते तेवढी प्रखर, आत्मविश्वास खच्ची करून टाकणारी अस्पृश्यता डॉ. शेषराव नरवडे यांच्या वाटय़ाला आलेली नाही. अर्थात एक-दोन वेळेस तेही अनुभव येतात. पण त्यातून लेखकाचा जो स्वभाव आपल्या लक्षात येतो- तो म्हणजे असे अनुभव येतील त्यापासून दूर राहणे. ही मराठवाडय़ाची खासियत आहे, की त्यांच्या lok24धामणगावाची आहे किंवा काय, कळत नाही. कदाचित लेखकाचा असाही विचार असणे शक्य आहे की प्रत्येक दलिताने हेच का लिहावे? पुस्तक वाचताना मात्र याविषयी कुतूहल वाटत राहते. शेषराव हे नाव मराठवाडय़ात बरेच प्रचलित वाटते, कारण पुस्तकात बरेच शेषराव येतात. असो.
या धामणगावात पीरबाबूची भक्ती सर्व जातिधर्माचे लोक करत. अर्थात ही फक्त त्या गावाची विशेषता नाही. आणि फक्त मराठवाडय़ातच नाही तर भारतातील अनेक गावांची ही विशेषता आहे. ज्याचा ज्याच्यावर विश्वास, त्याची तो भक्ती करणार. या पीरबाबूमुळे मुलाचे नाव पिराजी वा मुलीचे नाव पिराबाई ठेवण्याची अनेक कुटुंबांची रीत. लेखकाच्या थोरल्या भावाचे नावही पिराजी आहेच. पुढे स्वातंत्र्यानंतर कुळकायद्याची माहिती वडिलांना एक तहसीलदार देतो. आजोबांचे म्हणणे, ‘मला कुणाची फुकटची जमीन नको.’ वडिलांचे म्हणणे की, कायद्याप्रमाणे जे होईल तसे. आजोबा-वडिलांचे भांडण नरवडे अतिशय तटस्थपणे मांडतात. नरवडे यांचे शिक्षण पुरे होईपर्यंत व त्यानंतरही १९७६ पर्यंत वडील चिकाटीने जमिनीची केस लढवतात. शेवटी १६ एकर जमीन वडील व काकांच्या नावावर होते. तरीही कुटुंबाकडे श्रीमंती येत नाहीच.
डॉ. नरवडे यांनी आपल्या शैक्षणिक काळात शारीरिक कष्ट केले पण उपासमार झाली, असे त्यांनी नमूद केलेले नाही. हे कष्टही त्यांनी हसत हसत केले असावेत, असे  वाटते. आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक वाटतो. याच  दृष्टिकोनातून आयुष्यात त्यांची झालेली फजिती, उडालेली घाबरगुंडी, काही पदे मिळवण्यात आलेले अपयश, त्यामुळे झालेली निराशा, त्यांना ज्यांनी मदत केली अथवा केली नाही त्यांची नावे, असे सर्व त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. हे लिहायला धाडस लागते. एकंदरच पुस्तक वाचल्यावर माणूस मनाचा सरळ आहे हे जाणवते. कुठेही कसलीही लपवाछपवी नाही.
या पुस्तकात काही दोष नाहीत का? तर भरपूर आहेत. पुढच्या आवृत्तीत ते सुधारावेत. बऱ्याच ठिकाणी माणसांच्या नावांची जंत्री आहे. सामान्य वाचकाला त्यात फारसा रस असायचे कारण नाही. त्याचप्रमाणे ऐकलेल्या व्याख्यानांच्या यादीतही वाचकाला रस असण्याचे कारण नाही. त्यातून तुम्ही नवे काय घेतले हे सांगणे अपेक्षित असते. कारण त्यातून तोही शिकत असतो. मराठी भाषेचीही थोडी गल्लत वाटते. म्हणजे ‘ऐ’ऐवजी पुस्तकात ‘एै’ आला आहे. सकाळच्या आन्हिकाला दोन-तीन वेळा स्नानसंध्या म्हटले आहे. पुस्तकात अनेक वेळा संपूर्ण भूतकाळ हा अर्धवट आला आहे. उदा. आम्ही खिचडी करून खात. आम्ही दूरवर चालत जात. हा मराठवाडी भाषेचा प्रकार असू शकतो, परंतु तो पुस्तकात खटकतो. चालीरीतींचे थोडेसे अधिक वर्णन यायला हवे होते. म्हणजे पीरबाबूच्या उत्सवातील संदल म्हणजे काय? अनेक वेळा जत्रेतील डान्स पार्टी असा उल्लेख आहे. म्हणजे तमाशा का? त्यावेळी कोणती डान्स पार्टी प्रसिद्ध होती? थोडक्यात, पुस्तक वाचायला घेताना वाटलेली उत्सुकता पुरी होत नाही, असे असमाधान पुस्तक वाचून संपवताना वाटते.
‘सातगावचे पाणी’ –  डॉ. शेषराव नरवडे, निर्मल प्रकाशन, नांदेड, पृष्ठे – २६८ ,
 मूल्य – २२० रुपये.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..