रा. रा. रामभक्त नितीनजी यांची सकाळ सकाळीच होते. भक्तिभावाने ते उठतात तेव्हा पोटात अंमळ भुकेची भावना मूळ धरू लागलेली असते. किंबहुना त्या भक्तिभावनेनेच आपण उठतो असे त्यांना नेहमीच वाटते. उठताक्षणी आपल्या मनी रामजीऐवजी सावजी यावा याचा त्यांना खेद होतो. पण त्याला त्यांचा इलाज lok03नसतो. त्याला कोणाचाच इलाज नसतो. कुणा मर्त्य मानवाला देहधर्म चुकला आहे.. विचारी मना तुचि शोधूनि पाहे बरे!
हाथरूणी उठून बसताक्षणी ते दोन्ही हातांची ओंजळ करतात. तोंडासमोर धरतात. ‘कराग्रे लक्ष्मी’ म्हणतात. ‘करमुले तू गोविंदम्’पर्यंत येता येता त्यांच्या डोळ्यांवर झोप पुन्हा भक्तिभावाने दाटून येते. पण ते निग्रहाने तिला ढकलून देतात. ‘त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते’ हे हाथरूणास नव्हे, तर पूण्यभूमीस उद्देशून म्हटलेले आहे याचे भान त्यांच्या मनी नित्य जागृत असते.  
पोटात आता भुकेचे पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन सुरू झालेले असते. पण अजून प्रात:कर्तव्ये बाकी असतात.   
नितीनजी दोन्ही हात जोडतात व हल्लीच्या प्रात:स्मरणीय नावांस नमो नमो करतात. हे केल्याने तोंडाची चव बऱ्यापैकी जाते हे त्यांस गेल्या आठ मासांच्या अनुभवाने लक्षात आले आहे. पण ते कर्तव्यास चुकत नाहीत. आपण रामभक्त! स्वामिनिष्ठा हे त्या भक्तीचे पहिले लक्षण! स्वत:स ते भक्तिभावाने कसेबसे समजावतात.
आजही नेहमीप्रमाणे याच क्रमाने सारे झाले. ते उठले. बेडवरून उतरले. पायी सपाता अडकवल्या. अचानक त्यांना प्रभू रामचंद्रांच्या सपाता आठवल्या. भरताने सिंहासनावर त्याच पादुका ठेवून चौदा वर्षे राज्य सांभाळले. भरतास मानावयास हवे. याला म्हणतात भक्ती! चौदा वर्षे म्हणजे केवढा काळ! आठ महिन्यांहून कितीतरी जास्त! कसे काढले असतील त्याने दिवस!
त्यांना वाटले, बरे झाले, आपण रामाचेच भक्त आहोत! भरतभक्त व्हायचे म्हणजे.. चौदा वर्षे.. छे! नकोच!
हातातील टुवाल झटकत ते स्नानघरात शिरले.
स्नानमात्रे देह प्रसन्न होतो.. भूक बळावते.. हे तर शरीरशास्त्र. नितीनजी भोजनमेजावर येऊन बसले तेव्हा त्यांच्या मनी अन्य कुठलाही विचार नव्हता. आत्माराम संतुष्ट करणे हेही भक्ताचे कार्यच असते. ते त्यांनी यथासांग केले. मेजावरील टोपलीतील नाना फळे पाहून त्यांस पुन्हा प्रभू रामचंद्रांचे स्मरण झाले. रामभक्त आपल्या प्रभूस कदापि विसरत नसतो, हेच खरे. त्यांच्या मनी विचार आला- प्रभू रामचंद्राने वनवासातील चौदा वर्षे अशा फलाहारावरच काढली असतील. परंतु फळे म्हणजे डेझर्ट. तो कदापि मेन कोर्स नव्हे. पुन्हा ती मिळतीलच याची ग्यारंटीही नसते. म्हणजे मिळतात; पण हवी तीच मिळतात असे नव्हे. मिळण्यासाठीही त्यांचा सीझन यावा लागतो. आपल्याला हवी ती फळे मिळण्याचा सीझन कधी बरे येईल? पाच वर्षांनी येईल?.. या विचारांनी त्यांचे डोके अंमळ चढले. तेव्हा त्यांनी आणखी चार घास मुखी लावले व ते समाधानाने गुणगुणू लागले- ‘आम्ही काय कुणाच्या **चे खातो रे? तो राम आम्हाला देतो रे..’
कार्यक्रमस्थळी जातानाही त्यांच्या मनी प्रभू रामचंद्राचेच विचार होते. एवढय़ा अरण्यात रामचंद्रांनी प्रवास कसा बरे केला असेल? त्याकाळी विमाने होती. पण प्रभू रामचंद्र ती अरण्यात कशी घेऊन जाणार? तेथे कुठून विमानतळ असणार? अरण्यात वनजमीनच फार! ती साधी मोकळी करायची तरी पर्यावरणाची किती झेंगटी! या वनजमिनींचे भूदानी, ग्रामदानी, प्रकल्पदानी, अदानी असे प्रकारच केले पाहिजेत..
प्रभू रामचंद्रांना अरण्यगमन करताना किती त्रास झाला असेल? रस्त्यांतील खड्डय़ांनी सीतामाईंना किती यातना झाल्या असतील? या विचारानेच नितीनजींच्या पोटात ढवळून आले. कदाचित तो भुकेचाही परिणाम असेल. पण पवनपुत्र हनुमानाने रामलल्लांना आपल्या खांद्यावर उचलून घेतल्याचे चित्र आठवून त्यांना जरा बरे वाटले. चला, त्या महान रामभक्ताने तरी प्रभूंचे श्रम कमी केले. त्यांना भक्तिभावाने वाटले, आपण त्यांच्याइतके मोठे नाही, पण आपलेही एक भक्त म्हणून काही कर्तव्य आहेच की नाही? काय करावे बरे? आपण उड्डाण तर करू शकत नाही. पण.. उड्डाणसेतू तर उभारू शकतो! रस्ते तर बांधू शकतो!
त्यांच्या मनी ‘गीतरामायणा’तील लकेरी घुमू लागल्या..
थबकुनी बघती संघकार्य हे स्तब्ध दिशा चारी
बांधा रे, सेतू बांधा रे सागरी..
त्या नुसत्या विचारानेच त्या थोर रामभक्तपरायणाच्या वृत्ती उल्हसित झाल्या. त्यांना वाटले, हे नुसते रस्ते वा पूल बांधणे नाही. ते काम आपण करतोच आहोत गेली कित्येक वर्षे. पण ते नुसते बिल्डर-काम नाही, ते तर जाणिजे भक्तिकर्म!
रामायणकाळी रामभक्त वानरांनी सेतू उभारला.
नमोकाळी रामभक्तांनी तेच करायला हवे.
तीच खरी रामभक्ती आहे.
तोच रामभक्तीचा एक्स्प्रेस मार्ग आहे!
आणि त्या क्षणी नमोजींच्या ‘बिल्डिंग द नेशन’ या शब्दांमागचा धार्मिक अर्थ त्यांच्या लक्षात आला.
आणि त्यांनी जाहीर घोषणा केली-
हे सरकार रामभक्तांचे आहे!
तेव्हा भक्तजनहो, चला, टेंडरे भरा!