‘‘मला याच तीन फंडांमध्ये पैसे गुंतवायचे आहेत.  तुम्ही सुचवलेल्या म्युच्युअल फंडांच्या योजना काही तितक्याशा चांगल्या नाहीत. तुम्ही सुचवलेल्या योजनांनी गेल्या वर्षभरात कमाल ८० टक्के नफा दिला आहे. lok06तर मी सांगते त्या योजनांनी किमान १०० टक्के नफा दिला आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या वेबसाइटवरून मला या योजनांची नावे मिळाली..’’ डिसोझा मॅडमचे ई-मेल वाचून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गणपतीनंतर भेटलेल्या डिसोझा मॅडम आणि आजच्या मेलमधून भेटणाऱ्या डिसोझा मॅडम यांच्यातला जमीन-अस्मानाचा फरक प्रकर्षांने जाणवला.
गेल्या वर्षी ‘नको तो शेअर बाजार!’ म्हणणाऱ्या मॅडम आज स्वत: म्युच्युअल फंडांच्या योजना शोधताना बघून क्षणभर फार बरे वाटले. बाजारात आलेल्या उसळीमुळे का होईना, त्यांनी अर्थसाक्षरतेचे काही धडे गिरवले, हे पाहून खरेच आनंद वाटला. पण दुसऱ्याच क्षणी त्यांची आग्रही भूमिका खटकली.
एखाद्या योजनेने एका वर्षांत दिलेले उत्पन्न या एकाच निकषावर त्या योजनेचे मूल्यमापन करणे योग्य नाही, हे सत्य अर्थसाक्षरतेच्या धडय़ांमध्ये शिकवले जात असूनही बरीच गुंतवणूकदार मंडळी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. जास्त उत्पन्न बऱ्याचदा जास्त जोखीम सोबत घेऊन येते, ही बाब आपण विसरून चालणार नाही. डिसोझा मॅडमच्या ई-मेलवर उत्तर देताना त्यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याच योजनांचे (त्यांच्या व माझ्या) आकडे (उत्पन्न व जोखमीशी संबंधित) पाठवून दिले. एक, तीन, पाच आणि दहा वर्षांत वेगवेगळ्या निर्देशांकांच्या कामगिरीची तुलना त्यांच्यासमोर आणणारे कोष्टक त्यांना पाठवून दिले. त्यावरून त्या सुचवत असलेल्या योजनांना त्यांनी गेल्या वर्षी हात लावला नसता. मी सुचवलेल्या योजना काहीशा ‘मध्यममार्गी’ असून गेल्या वर्षीदेखील त्या ‘बऱ्यापैकी’ होत्या असे त्यांचे म्हणणे होते. अर्थात त्यांनी नंतर कुठे गुंतवणूक केली, ते काही कळले नाही.
सध्या बरेच गुंतवणूकदार व सल्लागार मिड कॅप व स्मॉल कॅप योजनांच्या प्रेमात आहेत. कारण एकच- गेल्या एका वर्षांत या योजनांमध्ये पैसा दुप्पट- अडीचपट झाला आहे. पण या योजनांची डिसेंबर २०१३ पूर्वी काय हलाखीची परिस्थिती होती, याकडे आज सर्वचजण सोयीस्करपणे काणाडोळा करतात. अजूनही देशाची अर्थव्यवस्था सुधारलेली नाही. केवळ मोदी सरकारकडून असलेल्या अपेक्षांच्या जोरावर शेअर बाजार चालतो आहे. अर्थसुधारणा व आर्थिक विकास कितपत साध्य होईल, यावर शेअर बाजाराचे भविष्य अवलंबून राहील. अलीकडे झालेल्या बुल मार्केटमुळे आता शेअर बाजार गेल्या वर्षीइतका आकर्षक राहिलेला नाही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून जोखमीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सगळेच पैसे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मिड व स्मॉल कॅप योजनांकडे देणे अयोग्य आहे. तसेच गेल्या वर्षी पैसे दुप्पट करणारी योजना येत्या वर्षी पैसे दुप्पट करेलच याची शाश्वती नाही. किंबहुना, याची शक्यता अत्यल्पच आहे.
वेगवेगळ्या वेबसाइट्स, वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स आपापल्या परीने माहिती देत असतात. त्यावर दिलेली सर्व माहिती बरोबर असेलच असे नाही. जरी ही माहिती बरोबर असली तरी ती कशी वापरावी, हे आपल्याला कळले पाहिजे. केवळ एखादी योजना पाच स्टार घेते किंवा सर्वाधिक उत्पन्न देते म्हणून त्यावर पैसे लावणे हा एक जुगार ठरू शकतो. एखाद्या फंड हाऊसची गुंतवणूक तत्त्वे, फंड मॅनेजरची विचार करण्याची पद्धत आदी गुणात्मक बाबी उत्पन्नाच्या आकडय़ात कितपत उतरतात, हे तो परमेश्वरच जाणे. या गुणात्मक निकषांचा विचार गुंतवणूक सल्ला देताना करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता कमी-अधिक होत असते. म्हणूनच गुंतवणूक सल्ला देताना गुंतवणूक सल्लागाराने उत्पन्नापेक्षा जोखीम व्यवस्थापनास जास्त महत्त्व द्यावे. सामान्य गुंतवणूकदाराला दीर्घ मुदतीत पैसे जमा करायचे असतात. त्यांना त्यांच्या योजनेने सर्वाधिक उत्पन्न दिले की ती योजना तिसऱ्या स्थानावर राहिली, यात फारसा रस नसतो. किमानपक्षी चांगले व्यवस्थापन असणाऱ्या योजना दीर्घ मुदतीत सर्वोत्कृष्ट २० टक्के योजनांमध्ये येतात असा अनुभव आहे.
बाजार वर जाताना नव-अर्थसाक्षरांची संख्या वाढते. अर्थात यातील काही ‘पी हळद अन् हो गोरी’ वर्गातील असतात. त्यांचे लक्ष जोखमीकडेअजिबातच नसते असे नाही, पण त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या नजरेतून सुटतात. अलीकडचे एक उदाहरण घेऊ  या.
मोहिते आजोबांचा सकाळी सकाळी फोन आला. मी माझे सगळे पैसे अमुक अमुक फंड योजनांमध्ये गुंतवणार आहे. गेल्या तीन महिन्यांत मोहिते आजोबा अर्थसाक्षरतेचे अनेक धडे गिरवीत आहेत. त्यामुळे मला तितकासा मोठा धक्का बसला नाही. ‘‘मी दहा वर्षांकरता या योजनेत पैसे गुंतवणार आहे. म्हणजे मला नुकसान तर होणार नाहीच, पण किमान १८ टक्के उत्पन्न निश्चितच मिळेल..’’ मोहिते आजोबा उत्साहाने सांगत होते. म्युच्युअल फंड आणि तत्सम इतर योजना कशा काम करतात, याची ७४ वर्षीय मोहिते आजोबांना चांगलीच माहिती होती. त्यांनी निवडलेल्या योजनादेखील चांगल्या होत्या. पण मुदत ठेवीत पैसे गुंतवणारे हे ज्येष्ठ नागरिक अचानक आज दहा वर्षांसाठी सगळे पैसे या योजनांमध्ये गुंतवायला कसे तयार झाले, हे मला कळेना. अर्थसाक्षरता हा एकच घटक यामागे असेल असे मला वाटत नव्हते.
मोहिते आजोबांचा निर्णय कसा झाला, ते त्यांनीच मला सांगितले. त्यांनी निर्णय घेताना दहा वर्षांचे रोलिंग रिटर्नस् बघितले होते. म्युच्युअल फंडाने दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ही माहिती दिलेली होती. सदर योजनांनी सरासरी १८ टक्के उत्पन्न दिले होते आणि दहा वर्षे गुंतवणूक केली तर नुकसान होण्याची शक्यता शून्य होती. त्यामुळे मोहिते आजोबांनी उपरोक्त गुंतवणूक निर्णय घेतला होता. पण यातील काही त्रुटींकडे आपण आता पाहू. दहा वर्षांतील सरासरी उत्पन्न म्हणजे किमान उत्पन्न नव्हे. किमान उत्पन्न हे सरासरी उत्पन्नापेक्षा बरेच कमी असू शकते. एक सोपे उदाहरण घेऊ या. एका योजनेने पहिल्या वर्षी ५० टक्के उत्पन्न दिले आणि दुसऱ्या वर्षी दोन टक्के उत्पन्न दिले. तर दोन वर्षांची सरासरी २६ टक्के होते. सरासरीकडे लक्ष दिले तर ही योजना उत्कृष्ट आहेच; पण उत्पन्न-सातत्याची अपेक्षा बाळगणाऱ्या मंडळींसाठी ही योजना कदाचित तितकीशी चांगली नसेल.
आता परत मोहिते आजोबांच्या योजनांकडे जाऊ. या योजनांमध्ये दहा वर्षे पैसे गुंतवल्यास नुकसान झाले नाही, हे जरी खरे असले तरी मिळालेल्या उत्पन्नाचा दर दोन टक्के किंवा तत्सम अत्यल्प असू शकतो. इतक्या अल्प उत्पन्नासाठी शेअर बाजारात पैसे गुंतविणे सर्वाना आवडेलच असे नाही.
दहा वर्षांसाठी जरी १५ टक्के उत्पन्न मिळते असे गृहीत धरले तरी एखादे वर्ष अत्यंत वाईट असू शकते. दहा वर्षांपूर्वी ज्यांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले असतील त्यांनी आज चांगले उत्पन्न मिळवले असेल. पण २००८ मध्ये जेव्हा शेअर बाजार २१,००० पासून ८००० पर्यंत कोसळला तेव्हा कितीजण टिकून राहिले हे बघणे आवश्यक आहे. ५० टक्के नुकसान एका वर्षांत झाल्यास पुढील पाच वर्षे कोण टिकून राहील? तितके खंबीर आपण आहोत का? गेल्या दहा वर्षांत जे घडले तेच पुढील दहा वर्षांत घडेल, याची काय शाश्वती? हे प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवेत. मोहिते आजोबांना हेच प्रश्न मी विचारले. त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत मी अजून आहे. कदाचित ते मला उद्या फोन करून एसआयपी करायचाय असेही सांगतील.
बाजारात सगळ्यांचेच स्वागत आहे. अर्थात तुमचेही.. तुमच्या जबाबदारीवर.